प्रेमाचे सासर भाग ४

नशिबानेच मिळते प्रेमाचे सासर.


विचार करता करता मोनाली भूतकाळात रमली. तिला निखिलची आणि तिची पहिली भेट आठवली.

"ये हाय! तू  सोनालीची बहीण मोनाली ना?"

"हो मी मोनाली...पण हे काय विचारणं झालं. इतकी वर्षे एकत्र शिकलो आपण आणि आता हा प्रश्न? तू निखिल... मी मात्र ओळखले बरं का तुला. पण, किती बदललास रे. शाळा सोडल्यानंतर आता तुला आज पहिल्यांदा पाहतिये. मधल्या काळात खूपच उंच झालास आणि गोरा पण बरं का." बोलून झाल्यावर मोनालीने हलकेच दाताखाली जीभ चावली.

"ह्ममम.." हसूनच निखिलनेही रिप्लाय दिला. निखिलला मोनालीच्या या बिंदास स्वभावचे थोडे हसूच आले.

बरं सोनाली कुठे असते सध्या? तिचे लग्न झाले वाटतं?"

"हो दोन वर्षे झाली आता तिच्या लग्नाला. ती मुंबईला असते सध्या?"

"ती नाही का आली मग आजच्या यात्रेला?"

"नाही अरे! बाळ छोटं आहे ना तिचं त्यामुळे नाही आली ती."

"अच्छा! पण तिला सांग मी विचारले म्हणून."

"हो नक्की सांगेल आणि काय रे तुझे आय.एफ.एस. चे ट्रेनिंग सुरू होते ना? म्हणजे मी कोणाच्या तरी तोंडून ऐकले होते तसे."

"हो..अजून दोन महिने बाकी आहेत."

"अशी मधेच सुट्टी कशी काय घेतली मग?"

"नाही ग! सुट्टी नाही घेतली. ट्रेनिंग दरम्यान पाय थोडा फ्रॅक्चर झाला होता म्हणून मग रिक्वेस्ट करून सुट्टी मिळवली. त्यानिमित्ताने गावच्या यात्रेचा आनंद तरी घेता येईल म्हटलं. आता ठीक आहे पाय. दोन तीन दिवसांनी जाणार आहे पुन्हा."

"ओके..काळजी घे बाबा."

"बरं तू काय करतेस? म्हणजे कॉलेज वगैरे झाले का पूर्ण?"

"हो माझे बी.कॉम झाले पूर्ण. सध्या एम.कॉम प्लस बँक एक्झामची तयारी सुरू आहे. बरं झालं तू भेटलास. तुझी मदत लागेल आ मला. प्लीज जेव्हा फ्री असशील तेव्हा फक्त एखादा मॅसेज करत जा. तुझे मार्गदर्शन नक्कीच कामी येईल माझ्या."

"ऑफकोर्स नो प्रॉब्लेम. एवढे ट्रेनिंग संपले आणि पोस्टिंग मिळाली की मग मिळेल वेळ. तेव्हा नक्की बोलू आपण."

"हो नक्की. बरं चल! निघते मी आता. खूप वेळ झाला.

आई म्हणेल हिच्या गप्पा काही संपायच्या नाहीत." हसतच मग दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

का कोण जाणे पण तो दिवस दोघांसाठीही खास होता.

निखिलची आणि तिची ती पहिली भेट आठवून मोनलीच्या चेहऱ्यावर हास्यलकेर उमटली. गाव देवीच्या यात्रेदरम्यान खूप वर्षांनी दोघे भेटले होते. दोघेही एकाच शाळेत शिकले. एकाच ठिकाणी लहानाचे मोठे झाले.

निखिल आणि मोनालीची थोरली बहीण सोनाली हे दोघेही क्लासमेट होते. मोनाली दोन वर्षे त्यांच्या पाठीमागे होती. पहिल्या पासूनच निखिलची हुशारी ती जाणून होती.

आज तो इतका मोठा ऑफिसर झाला पण तरीही अजिबात बदलला नाही याचे मोनालीला विशेष वाटले. त्याने तिला ओळख दिली याचेच तिला नवल वाटले. अजून तरी पाय जमिनीवर होते त्याचे.

पुढे एका रविवारी त्याने तिला पहिला फोन केला. दोघांनीही मनसोक्त गप्पा मारल्या. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या गाईडलाइन्स देखील त्याने तिला सांगितल्या.

पुढे जावून वरचेवर दोघांचेही फोन सुरू झाले. बघता बघता छान मैत्री झाली दोघांमध्ये. सुंदर अशा मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झाले ते दोघांनाही समजले नाही.

लहानपणापासून एकमेकांना ओळखणारे आणि दोन्ही कुटुंब एकमेकांच्या परिचयाची असल्याने नात्यात सुरुवातीपासूनच कोणताही आडपडदा नव्हता. दोन्हीही कुटुंब एकमेकांच्या तोडीस तोड होती. योग्य वेळ पाहून निखिलने मोनालीला लग्नाची मागणी घातली.

मनातून ती खूपच खुश झाली. कारण नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यात आधीच मने जुळलेली असल्याने कोणतीच अडचण नव्हती. दोघेही एकमेकांना अगदी अनुरूप होते. तितकेच हुशार आणि कर्तबगारदेखील. हा! फक्त एकच गोष्ट त्यांच्या एकत्र येण्याला आडकाठी ठरण्याची दाट शक्यता होती आणि ती म्हणजे त्यांची जात.

त्यांच्या आंतरजातीय विवाहाला दोन्ही घरून मान्यता मिळेल याची शक्यता खूपच कमी होती. मोनालीने ही शक्यता बोलून देखील दाखवली निखिलला.

"आता प्रेम काही जात धर्म पाहून तर होत नाही ना. त्यासाठी मने आणि विचार जुळले की झालं." निखिलचे हे विचार ऐकून मोनालीला त्याचा खूपच अभिमान वाटला. पण घरच्यांचे काय?

तरीही मनातून तिला कुठेतरी खात्री होती की, घरून कडाडून विरोध होणार.

"घरचे जर नाहीच तयार झाले तर?" मोनालीने सहजच प्रश्न केला.

"तर आपण पळून जाऊन लग्न करुयात." निखिलनेही अगदी सहजच उत्तर दिले.

"म्हणजे घरच्यांनी आतापर्यंत जे काही केले तुझ्यासाठी, तुला इथवर आणले ते एका क्षणात असे विसरून जाणार तू? आणि तुझा बरोबर मीही माझ्या घरच्यांची फसवणूक करू? तुला चालेल हे पण मला अजिबात नाही चालणार. माझ्यासाठी दोन्ही घरांचा मान खूप महत्त्वाचा आहे. तो मी असा सहजासहजी धुळीला नाही मिळू देणार. माझे आई बाबा एक वेळ मान्यता देतीलही आपल्या लग्नाला कारण त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीचे सुख खूप महत्त्वाचे आहे आणि तुझ्यासारखा कर्तबगार मुलगा त्यांना जावई म्हणून का नको असेल? पण तुझ्या घरचे इतक्या सहजासहजी नाही ऐकणार."

आता मोनाली अडून बसली होती, "तुझ्या घरच्यांचा होकार आल्याशिवाय मी लग्न नाही करणार. कारण मला फक्त तू एकटा नको आहेस, लग्नानंतर माझे प्रेमाचे सासर आणि माझी माणसं माझ्यासोबत असायला हवी आहेत मला."

मोनालीच्या या अशा विचारांवर तर दिवसेंदिवस निखिल तिच्यात जास्तच गुंतत गेला. मनात आले असते तर समाजाला, घरच्यांना न जुमानता तिने निखिलला लग्नास भरीस पाडले असते. पण तिने तसे काहीच केले नाही आणि तिची हीच गोष्ट निखिलला खूपच भावली.

अगदी तशी वेळ आलीच तर प्रेमाचा त्याग करण्याची देखील तयारी ठेवायला हवी, हे मोनालीचे वाक्य आज तिलाच त्रासदायक वाटत होते.

इतका वेळ होवूनही अजून निखिलचा काहीच रिप्लाय आला नव्हता. मनातून तिने आता निखिल सोबतच्या लग्नाचे विचार काढून टाकण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचा थोडाफार अंदाज तिलाही आलाच होता जणू. नुसत्या विचारानेच डोळ्यांतील आसवांचा पूर झरझर वाहू लागला. मनाला झालेली ही जातीयवादाची जखम रक्तबंबाळ झाली होती.

"आज फक्त जात आडवी नसती आली तर कदाचित निखिलच्या आणि माझ्या एकत्र येण्याला कोणी विरोध नसता दर्शवला."मोनाली मनातल्या मनात चरफडत होती.

एकीकडे मोनालीने निखिलसोबत लग्नाची आणि प्रेमाच्या सासरची स्वप्न उराशी बाळगली होती तर दुसरीकडे ही सारी स्वप्न सत्यात उतरण्याआधीच जमीनदोस्त होण्याचीही तितकीच भीती वाटत होती तिच्या मनाला.

मोनाली विचारांच्या अधीन झालेली असताना तितक्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला.

स्क्रीनवर निखिलचे नाव पाहता तिच्या जीवात जीव आला.

"हॅलो.. बोल निखिल."

"मोना मी आता काहीच बोलू शकणार नाही गं. तुही काही विचारु नकोस मला. प्लीज समजून घे मला. हा! फक्त एकच सांगतो, उद्या पहाटे चार वाजताच मी निघणार आहे. आता बोलण्याची मानसिकताच उरली नाही माझ्यात. पण उद्या मी नक्की कॉल करतो तुला, तेव्हा सांगेल सर्व सविस्तर. आता ठेवतो मी फोन. तुही काळजी घे. जास्त विचार करत बसू नकोस. उद्या बोलू आपण. बाय.. गुड नाईट.. टेक केअर." म्हणत निखिलने फोन ठेवला.

"मी ज्याला ओळखते तो हा निखिल असूच शकत नाही. इतक्यात हार मानणारा." मनातच तिने अंदाज बांधला. न बोलताही मोनालीला सारे काही समजून चुकले होते जणू. कारण तर स्पष्टच होते.

"वेळ आलीच तर प्रेमाचा त्याग करण्याची तयारीदेखील ठेवायला हवी. माझ्यामुळे जर माझ्या प्रेमालाच त्रास होणार असेल तर त्याच्यासाठी मला त्याच्यापासून दूर राहायला लागले तरी चालेल."
हिंमत करून मोनालीने मनाला आवरले. डोळ्यांतील अश्रूंना धीराने सावरले. जी परिस्थिती समोर येईल तिला मनापासून स्वीकारायचे तिने ठरवले.

क्रमशः

आता पुढे कथा नेमके कोणते वळण घेणार? मोनालीला ज्या प्रेमाच्या सासरची ओढ लागली होती ते असेल का तिच्या नशिबात? जाणून घेवुयात पुढील भागात.

©®कविता वायकर

🎭 Series Post

View all