Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेमाचे सासर भाग ३

Read Later
प्रेमाचे सासर भाग ३


प्रमिलाताई आणि घरातील सगळ्यात मोठी सून सुमनताई, दोघींनी  मिळून रात्रीचा स्वयंपाक केला. शालिनी काकीने आग्रह करून विलास काकांना कसेबसे जेवणाच्या ताटावर बसवले.

न राहवून निखिल पुन्हा एकदा बोलला, "काका पण, मी काय म्हणतो? एकदा फक्त ऐकून तरी घ्या ना."

"अरे तुला कळत कसं नाही, शांत हो ना जरा. सुखाने दोन घास खाऊ तरी दे त्यांना. जेवढा झाला तेवढा तमाशा पुरे नाही का? एवढे सगळे होवूनही मन भरले नाही का तुझे?" शालिनी काकी जवळपास खेकसलीच निखिलच्या अंगावर.

शालिनी काकीच्या शब्दांची धार, तिच्या बोलण्यातील परकेपणा निखिलच्या मनावर सपासप वार करून गेला. त्याचे हृदय तिच्या शब्दांनी अक्षरशः पिळवटून निघाले. कारण एकच...आतापर्यंत स्वतःच्या आईपेक्षाही शालिनी काकी त्याला अत्यंत जवळची होती. मनातील साऱ्या गोष्टी तो तिच्याशी शेअर करायचा नेहमी. आज त्याला त्याचे प्रेम मिळवून देण्यातदेखील काकी नक्कीच मदत करेल असे वाटले होते. पण, तसे काहीच झाले नाही. उलट जो काही प्रकार घडत होता त्याला काकीच तर जबाबदार नाही ना? असे क्षणभर त्याच्या मनात आले.

न राहवून मागे एकदा निखिलने मोनालीबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल सांगितले होते शालिनी काकीला. आज हे असे अचानक बदललेले काकीचे वागणे पाहून निखिलच्या पायाखालची जमीनच सरकली.

"काकी तू थांब ना जरा, मी बोलतोय ना काकांसोबत." थोड्या चढ्या आवाजात निखिल बोलला.

निखिलच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडताच रागाच्या भरात काकांनी समोर असलेले जेवणाचे ताट जोरात त्याच्या दिशेने भिरकावले. घरातील कोणालाही हे अजिबात अपेक्षित नव्हते.

शालिनी काकीनेही रडून रडून आकांडतांडव सुरू केला.

"काय रे विलास! हे असे वागताना तुला काहीच कसे वाटत नाही. तिकडे शाळेत मुलांना ज्ञानाचे धडे देतोस आणि हे असे अविचाराने वागतोस? निखिल चुकला तर त्याला शांतपणे समजावून सांगायचे सोडून हा असा तमाशा करून काय मिळणार आहे तुला?" न राहवून विश्वनाथ काका पुन्हा एकदा मध्ये बोलले.

"तू तर एक शब्दही बोलू नकोस. हे सर्व तुझ्यामुळेच घडत आहे. तुझाच त्याला पाठिंबा आहे. नाहीतर त्याची एवढी मजल झालीच नसती."

"हो आहे माझा त्याला पाठिंबा आणि यापुढेही असेल, काय करणार आहेस तू?"न राहवून विश्वनाथ काकांचा देखील आवाज चढला.

"चल निखिल.. पुढे बोलण्यात काहीही अर्थ नाही. एकवेळ दगडाला पाझर फुटेल पण याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. याच्या हेकेखोर स्वभावाचा आता तसाही कंटाळा आलाय."

एवढे बोलून विश्वनाथ काकांनी निखिलला तिथून बाजूला नेले. त्यांच्या गळ्यात पडून निखिल हमसून हमसून रडला.

"काका, पण माझे काय चुकले? तुम्ही तरी सांगा ना. फक्त जे मनात आहे ते ओठांवर आले. विलास काका स्वतः शिक्षक आहेत. वाटलं होतं की ही जातीपातीची बंधने निदान ते तरी मानणार नाहीत."रडत रडत निखिल बोलत होता.

गेल्या दोन तासांपासून सुरू असलेला हा सर्व प्रकार विश्वनाथ काकांमुळे थांबला होता.

ह्या एका गोष्टीमुळे नात्यात मात्र खूप मोठी दरी निर्माण झाली होती. निखिलला तर स्वप्नातही वाटले नव्हते हे सारे अशा पद्धतीने घडेल. मनातील भावना व्यक्त केल्याची एवढी मोठी शिक्षा त्याला मिळाली होती.

"विलास काकांनी दादांना तरी एवढे टाकून नव्हते ओ बोलायला पाहीजे."

"जावू दे, नको विचार करू जास्त. रागाच्या भरात माणूस काय बोलतो, काय वागतो ते त्यांचं त्यालाच समजत नाही बघ. हा.. फक्त त्याने बोलताना जिभेवर ताबा मात्र ठेवायला हवा होता. दादाने त्यावेळी आमच्यासाठी त्याचे शिक्षण अर्धवट सोडले. हे तो विसरला इतक्या सहज. आमचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून माधवदादा शेतीकडे वळला. लहान वयातच मोटेचा कासरा त्याच्या हातात आला. गोठ्यातील बैलांशी त्याची मैत्री झाली नि दप्तर, पाटी पुस्तक सोडून शेती, मोट, बैल हेच त्याचे आयुष्य बनले."
विश्वनाथ काका क्षणभर भूतकाळात रमला. जुन्या गोष्टी आठवून त्याचे डोळे पाणावले. निखिल कान देवून काकांचे बोलणे ऐकत होता.

"रोज सकाळी पहाटे तांबड्यातच आप्पांसोबत दादा शेतात जायचा. कधी कोणती तक्रार केली नाही की तोंडातून कोणाला अपशब्दसुद्धा काढला नाही. आज त्याच माधव दादाला एक रुपया कमवायची अक्कल नाही असे हा म्हणतो."

"काका, जावू द्या ओ, तुम्ही शांत व्हा बरं. हे सगळं आईकडून ऐकलं होतं मी. आज फक्त त्याची खात्री पटली. कितीही त्रास करुन घेतला तरी गेलेले दिवस काही परत यायचे नाहीत."

"अरे! पण, हा एवढा तमाशा करून गाव गोळा करायची गरजच काय होती त्याला?"

"त्याचेच वाईट वाटते आहे काका. नाहक माझ्यामुळे त्या मुलीची किती बदनामी झाली. ज्याला माहित नाही त्यालाही ही गोष्ट माहीत पडली. तिचेही लग्न व्हायचे आहे अजून. आधीच जर असे होवून बसले तर पुढे कसे होणार? पण, काका खरंच सांगू, मोनाली खूप छान मुलगी आहे. अत्यंत हुशार, मनमिळावू, सर्वांना क्षणात आपलेसे करणारी. आईलादेखील ही अशीच सून पाहिजे बघा. माझा जीव अडकलाय हो तिच्यात."

"तू काळजी करू नकोस, मला माहित आहे ती मुलगी. प्रदीपच्या तीनही मुली मी अगदी जवळून पाहिल्यात. अगदी नाकासमोर चालणाऱ्या आणि शिस्तीच्या. शेवटी तुमच्या लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या असतील तर साक्षात देवही तुमचे लग्न होण्यापासून नाही थांबवू शकणार."

विश्वनाथ काकांच्या बोलण्याने निखिलला मात्र खूपच आधार मिळाला होता. तरीही पुढे काय होणार? याचीच त्याला चिंता सतावत होती. विश्वनाथ काका कितीही पाठीशी उभा असला तरी विलास काकाच्या संमतीशिवाय हे शक्यच नाही. याची निखिलला जाणीव होती.

त्या दिवशी घरात कोणीही नीट जेवले नाही. विश्वनाथ काकांच्या मुलीने, अपेक्षाने जबरदस्ती तिच्या लाडक्या निखिल दादाला दोन घास खावू घातले.

तिकडे मोनालीदेखील खूपच टेंशनमधे होती.

"काय झाले असेल निखिलच्या घरी? तो तर म्हणाला होता की फोन करतो म्हणून. पण, रात्रीचे अकरा वाजले तरी त्याचा मॅसेज नाही की कॉल नाही. देवा! काही वेगळे झाले नसले म्हणजे मिळवलं."
सारखं ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत मोनाली एकच विचार करत होती.

जोपर्यंत निखिलचा काही रिप्लाय येत नाही तोपर्यंत तिला झोप देखील लागणार नव्हती.

"निखिलच्या घरच्यांचा जो निर्णय असेल तो पचविण्याची ताकद दे देवा मला. निखिलशिवाय माझे आयुष्य जरी अपूर्ण असले तरी माझ्या स्वार्थासाठी मी त्याला त्याच्या माणसांपासून नाही तोडू शकत."

नुसत्या विचाराने, निखिलपासून दूर जाण्याच्या कल्पनेनेच मोनालीचे डोळे पाणावले. बघता बघता अश्रूंनीदेखील त्यांची सीमा ओलांडली. तिच्या मानेखाली असलेल्या उशीचा बराच भाग अश्रूंनी ओला झाला होता. निखिलच्या आठवणीत ती वेडीपिशी झाली. त्याच्या फोनची ती आतुरतेने वाट पाहत होती. झोपनेही आज का कोणास ठाऊक पण कुठेतरी दडी मारली होती. भावनांचा महापूर नयनांवाटे ओसंडून वाहत होता. बंद पापणीच्या पल्याड फक्त आणि फक्त निखिलचा चेहरा तिला स्पष्ट दिसत होता.

क्रमशः

करेल का निखिल मोनालीला फोन? केलाच तर काय उत्तर देईल तो तिला? पचवू शकेल का मोनाली सारे सत्य? जाणून घेवूयात पुढील भागात.

©®कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//