Feb 26, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेमाचे सासर भाग २

Read Later
प्रेमाचे सासर भाग २


नुकतेच डेहराडून येथे आय.एफ.एस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) चे ट्रेनिंग पूर्ण करून मध्य प्रदेश येथे निखिलचे पोस्टिंग झाले होते.

"पुढे जावून घरच्यांनी आपल्या लग्नाचा विषय उचलून धरण्याआधी आपणच घरी आपल्या प्रेमाची कल्पना द्यावी." असे मनात आले नि  निखिलने लगेचच काकांना ही गोष्ट विचारण्याचे धाडस केले.

निखिलने विचार केला होता त्यापेक्षा सगळे उलटच घडत होते. मनातील भावनांचा निचरा तर झाला होता पण विलास काकांच्या प्रतिक्रियेनंतर मात्र त्याच्या मनावर खोल जखम झाली. काकांचे काही वाक्य तर इतके जिव्हारी लागले होते त्याच्या की, केलेल्या उपकारांची जणू त्याला जाणीव करून दिली जात होती. मनाला झालेली ही जखम पुढे कित्येक दिवस भरून निघणारीदेखील नव्हती.

विलास काकांचा आवाज क्षणाक्षणाला वाढतच चालला होता.

"तू असे काही विचारून खूप मोठी चूक केली आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती मला. आता काय, तुझे काम झाले ना..तुझे निर्णय तू स्वतः घेण्याइतपत मोठा झालास. तुझ्या बापाची अजून माझ्या समोर उभे राहून बोलायची हिंमत झाली नाही पण तू मात्र बरोबर सगळे वसूल करतो आहेस. गरज होती तोपर्यंत काका काका करत राहिलास आणि आता स्वतः कमावता झालास तर परस्पर निर्णय घेण्याचे बळ तुझ्यात आले." आता विषय हा कुठच्या कुठे भरकटत चालला होता.

काकांचा रागाचा पारा इतका चढला होता की त्यांना आवरणे आता मुश्किल झाले होते. शेवटी शालिनी काकी मध्ये पडल्या.

"अहो नका ना इतका त्रास करून घेवू. तुम्हाला काही झाले तर आम्ही काय करायचे?" अप्रत्यक्षपणे काकीही निखिलच्या विरुद्ध असल्याचे अखेर सिद्ध झाले.

बघता बघता प्रकरण वेगळ्याच दिशेला चालले होते. काकांच्या बोलण्याने निखिलच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. काय करावे त्याला काहीच सुचेना. घरातील सर्व लहान भावंडे सुरू असलेला हा सर्व प्रकार दुरुनच फक्त केविलवाण्या नजरेने पाहत होते.

निखिल दादा म्हणजे घरातील सर्वांचा आदर्श, हुशार, सुसंस्कारी असा मोठा भाऊ होता. त्याला असे रडताना पाहून सर्वांचे डोळे पाणावले. नेमके झाले तरी काय? बराच वेळ कोणाला काहीच समजेना. विलास काकांच्या बोलण्यातून हळूहळू सर्व प्रकार उघडकीस येत होता.

"अरे! पण त्याचे म्हणणे तरी ऐकून घे विलास. नुसता आरडाओरडा करून आणि गाव गोळा करून तू आपलीच इज्जत वेशीला टांगत आहेस, असे नाही का वाटत तुला? इथे भिंतीलाही कान असतात आणि तू तर स्वतःहून घरातील गोष्टी चव्हाट्यावर मांडत आहेस." विलास काकांचे थोरले बंधू म्हणजेच निखिलचे तीन नंबर काका विश्वनाथराव विलासरावांची समजूत घालत होते.

"मी नाही इज्जत चव्हाट्यावर मांडत, आपल्या लाडक्या पुतण्याने ती केव्हाच मांडली आहे. प्रेम करतो म्हणे प्रेम. इथे खायला प्यायला नसतानाही पोटाला चिमटा काढून याला शिकवले. काय तर हुशार आहे म्हणून याचे भविष्य घडवण्यासाठी पोटच्या लेकरांना बाजूला ठेवून आधी याचा विचार केला मी. आता कुठे याचे भविष्य मार्गी लागत आहे. याने मात्र त्याची अशी परतफेड करावी?"

"अरे! ठीक आहे ना. त्याने त्याला जे वाटते ते फक्त सांगितले तुला. थोडीच ना त्याने पळून जाऊन लग्न केले आहे.

"तेवढेच बाकी आहे आता. तेही करून मोकळा हो म्हणावं. बापाला दोन रुपये कमवायची अक्कल नाही आणि पोरगा निघालाय लव्ह मॅरेज करायला. जर करायचेच होते प्रेम तर निदान आपल्या जातीची तरी मुलगी शोधायची होती." विलास काका कोणाचे काहीच ऐकायला तयारच नव्हते. तावातावाने फक्त ते बोलत होते. काकांचा मोनालीला नकार असण्याचे कारण अखेर समोर आले.

"काका तुम्ही मला बोला, पण दादांना यात नका हो ओढू. मान्य आहे त्यांनी तुमच्याइतके जग नाही पाहिले पण शेतात राब राब राबतात हो ते. हाडाचे शेतकरी आहेत ते. कष्ट हीच त्यांची सर्वात मोठी कमाई आहे. दोन रुपये कमवायची अक्कल नाही असे नका हो म्हणू." हुंदके देत निखिल बोलत होता. आपल्यामुळे आज आता वडीलांना ऐकून घ्यावे लागत आहे. याचेच त्याला खूप वाईट वाटत होते.

भिंतीच्या आडून भरल्या डोळ्यांनी माधवराव सुरू असलेला सर्व प्रकार कानांनी फक्त ऐकत होते. लग्नाला आलेल्या आपल्या लेकाचे अश्रू उघड्या डोळ्यांनी पाहण्याची त्यांच्यात हिंमतच नव्हती जणू. आपल्या लेकाला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा देखील हक्क नसावा? याचेच त्यांना वाईट वाटत होते.

प्रमिलाताई देखील स्वयंपाक करता करता राहून राहून डोळ्याला पदर लावत होत्या. लेकाचे अश्रू त्यांच्याच्याने पाहवेनात.

"देवा! काय रे ही वेळ आणली आज? उभा जन्म कष्ट करण्यात गेला. कष्ट करूनदेखील त्या कष्टाच्या रुपयावर सुध्दा कधी हक्क दाखवला नाही आम्ही. का? तर त्याची कधी गरजच भासली नाही. कारण घरातील खमके लोक घराची सगळी धुरा सांभाळत आहेत. ते कधीही आम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत, याची कुठेतरी खात्री होती मनाला. पण पुढे जावून आमचे जीवनच यांच्या ताब्यात जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते कधी. काय गुन्हा आहे माझ्या लेकाचा? प्रामाणिकपणे त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या. पण म्हणतात ना की, सत्याचा न्याय इतक्या सहजासहजी कधीच होत नाही. मनात आले असते तर परस्पर लग्न करून मोकळा झाला असता तो, पण त्याने तसे नाही केले. शेवटी पाटील घराण्याचे संस्कार आहेत ते."

प्रमिला ताईंना म्हणजेच निखिलच्या आईला, आपल्या लेकावर आपल्याच दिराकडून होत असलेला हा कटू शब्दांचा भडीमार काही केल्या ऐकवत नव्हता. शांत बसून फक्त तमाशा पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यांच्याकडे. कारण विलासरावांसमोर वर मान करून बोलण्याची मुळीच हिंमत नव्हती कोणात.

आता सारे प्रकरण घराबरोबरच दारातही पसरले होते. पाटील घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आली होती. काहीजण विलासरावांना तर काहीजण निखिलला नावे ठेवत होते.

पाच भावंडांचे हे पाटील घराणे, विलासरावांनी मोठ्या हिमतीने आजही एकत्र बांधून ठेवले होते. सर्वात मोठे अशोकराव त्यानंतर निखिलचे वडील माधवराव. त्यांच्या पाठची बहीण अलका. भावांमध्ये तीन नंबर होते विश्वनाथराव त्यांच्या पाठीवर विलासराव आणि सर्वात धाकटे बंधू आनंदराव. इतके मोठे हे पाटील घराणे.

दोन भावंडांचे घरदेखील एकत्र बांधून ठेवणे आजच्या ह्या काळात तरी अवघड आहे. पण, तिथेच पाटील घराणे मात्र गावातील एक आदर्श आणि घरंदाज घराणे म्हणून नावाजलेले होते. आर्थिक बाजू जरी इतकी भक्कम नसली तरी खाऊनपिऊन मात्र सुखी होते सर्वजण. फक्त कष्टाला तेव्हढा पर्याय नव्हता. निखिलमुळे मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत चालली होती.

वाड्यालाही लाजवेल इतके भलेमोठे घर. घरासमोर प्रशस्त अंगण. दूध दुभत्याने भरलेला गोठा. ही अशी श्रीमंती म्हणजे जणू स्वर्गसुखच.

सर्वात मोठी भावंडांची जोडगोळी म्हणजे अशोकराव आणि माधवराव शेतीची धुरा सांभाळत होते. विश्वनाथराव गावातील हायस्कूलमध्ये  पिऊनची नोकरी करत होते तर विलासराव शेजारच्या गावातील एका खाजगी शाळेत शिक्षक होते. सर्वात धाकटे बंधू आनंदराव नोकरीनिमित्त शहरात स्थायिक होते. दर सुट्टीला मात्र आवर्जून ते गावी यायचे. गावच्या मातीची ओढ त्यांना शहरी भागातील सुख सुविधांपेक्षा जास्त मौल्यवान वाटायची.

फक्त विलासरावांमुळे सारे घर आजही एकत्र होते. त्यांच्या पत्नी शालिनीताई, यांना मात्र हे कधीच मान्य नव्हते. पण तरीही कुठेतरी घरात विलासराव आणि शालिनीताई म्हणतील तीच पूर्वदिशा होती.

क्रमशः

आता असे असताना काय होणार निखिलच्या प्रेमाचे? मिळेल का त्याला त्याचे प्रेम? की सुशिक्षित कुटुंबात वाढूनदेखील जुन्या प्रथा आणि परंपरांमुळे त्याला द्यावा लागणार त्याच्या प्रेमाचा बळी? प्रेमाचे सासर मिळण्याचे मोनालीचे स्वप्न उतरेल का कधी सत्यात? जाणून घेवूयात पुढील भागात.

©®कविता वायकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

नवनवीन आव्हाने आवडतात मला स्वीकारायला.. लेखणीच्या माध्यमातून आवडतात मनातील भावना कागदावर उतरवायला..

//