मनात असंख्य प्रश्नांचे काहूर उठलेले असतानाही धाडस करून भीती बाळगतच निखिल बोलला.
"बोल ना..काही महत्त्वाचे आहे का?"
काकांनीही प्रश्नभरे नजरेनेच प्रतिप्रश्न केला. कारण आतापर्यंत असे बिंदासपणे काकांशी बोलण्याची घरात तरी कोणाचीच हिंमत नव्हती. फक्त निखिलसोबत काकांचे नाते थोडे फ्री होते. निखिलबद्दल काकांच्या मनात जितके प्रेम आणि विश्र्वास होता तितकाच आदर निखिलच्या मनात काकांबद्दल होता. काकांच्या परवानगीशिवाय कोणतीच गोष्ट तो करत नसे आणि तसे करण्याची घरात कोणाला परवानगीदेखील नव्हती.
काकांनीही प्रश्नभरे नजरेनेच प्रतिप्रश्न केला. कारण आतापर्यंत असे बिंदासपणे काकांशी बोलण्याची घरात तरी कोणाचीच हिंमत नव्हती. फक्त निखिलसोबत काकांचे नाते थोडे फ्री होते. निखिलबद्दल काकांच्या मनात जितके प्रेम आणि विश्र्वास होता तितकाच आदर निखिलच्या मनात काकांबद्दल होता. काकांच्या परवानगीशिवाय कोणतीच गोष्ट तो करत नसे आणि तसे करण्याची घरात कोणाला परवानगीदेखील नव्हती.
घाबरतच निखिल पुढे बोलू लागला.
"हो! म्हणजे तसे महत्त्वाचेच आहे." नजर चोरतच निखिल उत्तरला.
नुकताच शिशिर संपून वसंताची चाहूल लागली होती. सायंकाळचा मंद गारवा हवाहवासा वाटत होता. सूर्य मावळतीला चालला होता. लाल पिवळसर रंगांची नभी जणू रंगपंचमी सजली होती. पक्षांचा किलबिलाट आसमंती घुमला होता. घरट्याची ओढ त्यांच्या आवाजात प्रकर्षाने जाणवत होती. गोठ्यात असलेल्या गायींच्या तसेच नुकत्याच शेतातून परतलेल्या बैलांच्या घुंगरांचा खुळखुळाट लक्ष वेधून घेत होता. हिरव्यागार चाऱ्यावर सर्व जनावरे तुटून पडली होती. अधूनमधून मनीचे आणि मोत्याचे पायात घुटमळणे स्वर्ग सुखाचा आनंद देवून जात होते. तो सुंदर नजारा नजरेत साठवण्याचा मोह मग काकांनीही आवरला नाही.
अंगणातील आंब्याच्या झाडाला लागलेल्या मोहोराचा मंद सुवास वाऱ्याच्या झुळूकेबरोबर चहूकडे सुगंध पेरत बेभान होवून जणू पसरत होता. वातावरणात एक प्रकारचा आल्हाददायकपणा आला होता.
घरातील बायका रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीत गुंतल्या होत्या.
निखिलचे काका विलासराव अंगणात खुर्ची टाकून निसर्गाचा हा सुंदर नजारा नजरेच्या कप्प्यात मनसोक्त साठवून घेत होते.
"हीच योग्य वेळ आहे,"असे म्हणत निखिल विलास काकांच्या शेजारी जावून उभा राहिला होता.
गोठ्यातील गायीची तिच्या वासरासाठी सुरू असलेली धडपड तसेच एका आईचे काळीज आपल्या पिल्लाच्या ओढीने कसे चिंब झाले होते याचा प्रत्यक्ष नजराणा जणू काका नजरेत साठवत होते. माणूस काय आणि प्राणी काय..शेवटी प्रेम, माया, ममता ही निसर्गाची देणगी सर्व जीवसृष्टीलाच लाभलेली असते.
"बघ निखिल.. मुक्या जनावरालादेखील किती ज्ञान असते. जशी आईला आपल्या लेकराची ओढ असते अगदी तशीच गायीलाही आहे."
काका बोलत होते, निखिल मात्र विचारांच्या गर्दीत हरवून गेला होता.
"कसे बोलावे काकांसोबत? ते समजून घेतील का मला? भलेही त्यांचे उत्तर काहीही असो पण पुन्हा हातातून वेळ निघून गेल्यावर, तेव्हा का मी गप्प बसलो? असे विनाकारण वाटत राहील. त्यामुळे आताच विचारावे,"असे निखिलचे मन त्याला वारंवार सांगत होते. परंतु, विचारांच्या गतीला काबूत ठेवणे त्याच्याच्याने शक्य होत नव्हते.
"काका जो काही निर्णय देतील तो मला मान्य असेल. त्यांच्या शब्दाबाहेर मी अजिबात जाणार नाही. माहीत नाही, त्यांना काय वाटेल? पण, मनातून कुठेतरी वाटत आहे की काका मला समजून घेतील." निखिलचे विचारचक्र थांबायचे काही नावच घेईना.
बाजूला असलेली खुर्ची निखिलकडे सरकवत विलास काकांनी त्याला बसण्याचा इशारा केला.
धाडस करून निखिल मग काकांशेजारी बसला.
"बोल! काय म्हणतोस बाळा? परवा जाणार आहेस ना? तू आलास आणि घर बघ कसे गोकुळासारखे भरले होते. आता ते पुन्हा खाली होणार." बोलता बोलता काका भावूक झाले. कदाचित परवा जायचे त्यासंदर्भात निखिलला काहीतरी बोलायचे असेल असे वाटले विलास काकांना. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच नव्हते.
निखिल जसा सुट्टीला आला तसा गेल्या पंधरा दिवसांपासून तो धडपडत होता काकांशी बोलायला. पण, मनातील भीती त्याला बोलू देत नव्हती. बघता बघता सुट्टी संपली नि पुन्हा कामावर रुजू व्हायची वेळ जवळ आली.
"आता नाही तर कदाचित पुन्हा कधीच ही वेळ येणार नाही."
असे म्हणत सर्व धीर एकवटून अखेर तो एकाच दमात विचारुन मोकळा झाला.
असे म्हणत सर्व धीर एकवटून अखेर तो एकाच दमात विचारुन मोकळा झाला.
"काका..मला आपल्या गावचे सरपंच आणि तुमचे जवळचे मित्र प्रदिप जाधव यांची धाकटी लेक मोनाली मनापासून आवडते. मला लग्न करायचे आहे तिच्याशी?"
आता प्रतीक्षा होती ती, काकांच्या उत्तराची.
निखिलचे हे शब्द कानी पडताच विलास काकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाने त्यांचा चेहरा लालबुंद झाला.
अंगणात असलेल्या नळावर पाणी भरत असलेल्या विलास काकांच्या बायकोच्या म्हणजेच शालिनी काकीच्या कानावर निखिलचे बोलणे पडले. काही दिवसांपासून तिलाही या गोष्टीची कुणकुण लागली होती. तिने तशी विलास काकांना कल्पनादेखील दिली होती.
"हे ह्या जन्मात तरी शक्य नाही." असे विलास काकांनी त्याचवेळेस बायकोला सांगितले होते.
"निखिल माझ्या स्वप्नांना कधीही कवडीमोल ठरवणार नाही." याची विलास काकांना खात्री होती.
"हे वयच असे असते," म्हणत त्यांनी शालिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते तेव्हा.
झरझर शालिनीचे सर्व बोलणे विलासरावांच्या कानात गुंजारव करू लागले. निखिल स्वतः येवून असे काही विचारील असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते.
"म्हणजे शालिनी म्हणत होती त्यात तथ्य आहे तर." काका मनातच बोलले.
"निखिल जर माझा पोटचा मुलगा असता तर आता ह्या क्षणी त्याच्या दोन कानाखाली द्यायलाही कमी नसते केले मी. पण, भावाचा मुलगा त्यामुळे तेही नाही करू शकत." विलासरावांच्या डोळ्यांत रागाची लाली पसरली होती.
"काका रागावू नका ना, मला जे वाटले ते मी फक्त तुम्हाला सांगितले. तुमच्या शब्दाबाहेर मी बिलकूल जाणार नाही. तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल." काकांचा रागीट चेहरा पाहून निखिल त्यांना समजावणीच्या सुरात बोलला.
"एकदा धनुष्यातुन सुटलेला बाण कधीही मागे येत नसतो निखिल. एवढी मोठी गोष्ट वर तोंड करून सांगण्याआधी दहा वेळा विचार तर करायला हवा होतास तू. चांगले पांग फेडलेस बाबा आमचे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव..तू खूप मोठा विश्वासघात केलायेस माझा. त्यामुळे तुला कधी मी माफ करु शकेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नकोस."
काकांच्या रागाबरोबरच त्यांचा आवाजदेखील नकळतपणे वाढत चालला होता. एव्हाना शेजारी पाजारीदेखील आवाज पोहोचला होता त्यांचा. दारे-खिडक्यांतून हलेकच लोक डोकावून पाहत होते. अचानक असे काय घडले? हे जाणून घेण्यासाठी जणू लोकांची धडपड सुरू होती. खेडेगावात ह्या अशा गोष्टी काही नवीन नसतात. एखादी गोष्ट घडायची खोटी की, हा हा म्हणता बातमी गावभर पसरते.
"काका...पण, काय गुन्हा केला आहे मी? फक्त मनातील गोष्ट तुम्हाला सांगितली, एवढेच ना. यात काय चुकले माझे? तसेही मी आधीच सांगितले आहे की, तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार मी."
"अरे! पण हे असे काही विचारण्याचा तुला अधिकार तरी आहे का? हा विचार नाही केलास तू? तोंड वर करून काय विचारतो आहोत आपण? आणि कोणासमोर बोलत आहोत? याचे साधे भानही नाही राहिले तुला. कोणाच्या जीवावर तू इथवर पोहोचलास? हे आधी पडताळून बघ आणि मग ये माझ्याशी बोलायला. चार पैसे काय कमवायला लागलास तर इतका माज दाखवायला लागलास. स्वतःच्या मनाचा मालकच झालास तू तर."
काकांचे हे जिव्हारी लागेल असे बोलणे कानी पडताच निखिल क्षणभर स्तब्धच झाला.
क्रमशः
काय असेल निखिलची खरी कहाणी? त्याच्या आई वडिलांपेक्षा विलास काकांचे मत इतके का महत्त्वाचे असेल त्याच्यासाठी? त्यात मोनाली ही विलास काकांच्या मित्राची मुलगी तरीही त्यांचा तिला का बरं नकार असेल? जाणून घेवूयात पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा