Login

प्रेमाचे बंध (भाग/२)

कथा मालिका


भाग /२

राजेश चे सर चहा घेण्यासाठी आत येतात...

पुढे...

राजेशचे सर आत येतात. तर त्याची आई अजूनही कपबशांचे तुकडे उचलत होती आणि राजेश आतल्या खोलीत बॅग आणायला गेला. काही फाईल्स आणि लॅपटॉप घेईपर्यंत त्याला वेळ झाला. त्यामुळे त्याचे सर आत आले.

"राजेश,राजेश,किती वेळ लागेल तुला?"

"आलोच "

"अरे ,सर या ना या. बसा."
राजेशने सरांना बसायला सांगितले आणि
स्वतः कपबशांचे तुकडे उचलू लागला.

मालतीताईंनी तो पर्यंत पाणी दिले आणि चहा आणायला आत गेल्या.

राजेश कोण आहेत ह्या.

सर ती माझी..

"राजेश काही बोलणारच की सर तुझी आई आहे ना? आणि वडील कुठे आहे? बोलव त्यांना."

राजेशने त्याच्या वडीलांना आवाज दिला.

"अप्पा ,ओ अप्पा , बाहेर या."

अप्पा खोलीतून बाहेर आले.
"काय राजेश,काय झाले?"

"बाबा हे माझे सर, त्यांना तुम्हांला भेटायचे आहे."

अप्पा येऊन त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर बसतात.

"अप्पा इथे या ना जवळ. त्याचे सर बोलतात."

"नको मी इथेच ठीक आहे."

पण, राजेशचे सर हात धरून त्यांना जवळ बसवतात.

"नमस्कार अप्पा, मी राजेशचे सर सुशांत देशमुख.

"नमस्कार. आम्ही दोन तीन महिने झाले राजेश कडे राहायला आलो आहोत."

"अच्छा, काय करत होता तुम्ही? म्हणजे नोकरी वगैरे."

तेवढ्यात मालतीबाईंनी चहा आणला.

"सर, चहा घ्या ना."

सगळ्यांनी चहा घेतला आणि सर लगेच उभे राहिले.

"माई ,अप्पा मला आशीर्वाद द्या. आज माझी एक महत्त्वाची मिटींग आहे. तेव्हा ती सक्सेस होऊ द्या."

"अरे, तुम्ही असे पाया नका पडू. आमचे आशीर्वाद तर नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी असतात."

सर आणि राजेश निघून जातात.

"अहो, हे घ्या पोहे. थोडंसं खाऊन घ्या मग गोळ्या घेऊन घ्या."

दोघांनी मिळून थोडे थोडे पोहे खाल्ले आणि परत खोलीत निघून गेले.

दुपारी एक वाजता जेवायला बसले. तर फक्त चार पोळ्या आणि वाटीभर भाजी बाजुला काढून ठेवली होती.

"मालतीबाई वरण भात नाही ना आजही?"

"अहो, नाही जमलं तिला करायला. करेल उद्या पासून ती."

हम्म.

ना चटणी,ना लोणचं, ना पापड कसं जेवायचं बरं. दोघांच्याही मनात एकाचवेळी अनेक विचार येऊन गेले. पण, काय करणार?

मालतीताईंनी थोडेसे पाणी ताटात घेऊन त्यात पोळी भिजवली आणि भाजी टाकून दोघांनी तेच खाल्ले. एक एक घास घशाखाली उतरत नसतांनाही केवळ औषध घेण्यासाठी ते जेवत होते. पण, तेही त्यांच्या जीवावर आले होते. पण, कसंबसं जेवण उरकले आणि ताट घासून स्वच्छ धुवून घेतले.

"मालतीबाई आज आयुष्यात एक मोठी चुक केल्याची जाणीव होत आहे. आपण आपले गाव सोडून शहरात राहायला येण्याची."

"अहो असे का म्हणता? त्यांचे धावपळीचे जीवन आणि आपण म्हातारे. आपली आणि त्यांची कशी बरोबरी होईल तुम्हीच सांगा. आपल्याला येऊन जेमतेम दोन तीन महिने झाले आहेत. होईल सवय हळुहळु."

"पण, तरीही. नुपूर कडून असे वागणे अपेक्षित नव्हते."

"अहो, मला माहित असते ना कुठे काय ठेवलं आहे तर मीच केलं असतं."
पदराने डोळे पुसत बोलत होत्या. वसंतराव लगेच खोलीत निघून गेले.

दहा मिनिटांनी परत वसंतराव पेपर शोधत हाॅल मध्ये आले आणि सगळीकडे शोधू लागले. एकदम नीटनेटके आवरून ठेवलेला हाॅल, प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवलेली होती. खूप सुरेख सजवला होता. पण, अनवधानाने वसंतरावांच्या हातून टी पाॅय वरून फुलदाणी पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले.

आवाज ऐकताच मालतीताई बाहेर आल्या.

"अहो, काय झालं? काय फुटलं?"

ते....ते....

फुलदाणी फुटलेली पाहून मालतीताई घाबरल्या.

"अहो , आता काय करायचं? नुपूरला काय सांगणार? तिचा राग तुम्हांला माहित आहे ना?काय करायचं आता?"

"माझ्या हातून फुटली ना फुलदाणी. मग मीच सांगेल. तू काळजी करू नकोस. तू घाबरू नकोस."

"तसं नाही. तुमच्या हातून फुटली काय किंवा माझ्या हातून. तिला जे काही करायचे ते करणारंच."

"तुम्ही काळजी करू नका.काय होईल ते पाहुया."

©®आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all