प्रेमाचे बंध (भाग/१)

कथा मालिका
भाग/१

रिटायर्डमेंट नंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली होती. पण, मुलाच्या घरी राहायला आल्यापासून ते दोघेही सतत नाराज होते. रोजच्या किरकिरीला ते कंटाळले होते. आताही तेच घडत होते. स्वतः च्या मुलाच्या घरी असुनही परकेपणा जाणवत होता. आपुलकी आणि आदर, जिव्हाळा तर दूरच पण , साधे बोलत देखील नव्हते.
"अहो, वसंतराव येरझाऱ्या घालून झाल्या असतील तर या खोलीत.आता कोणी आपल्याला चहा देईल ही आशा सोडून द्या."
"पण, राजेश आणि नुपूर येतच असतिल घरी. थोडावेळ त्यांची वाट बघतो आणि मग झोपतो मालतीबाई."
तेवढ्यात दारासमोर गाडी थांबल्याचा आवाज आला. वसंतराव हातातील काठी टेकवत परत दारापर्यंत गेले. त्यांना राजेश आणि नुपूर उतरतांना दिसले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
पण, दोघेहीजण त्यांच्याकडे न बघता आपापल्या खोलीत निघून गेले. एरवी नीट बोलणारा राजेश हल्ली वसंतराव आणि मालतीबाईंशी बोलणे टाळू लागला.
"चला , मालतीबाई झोपू या आता. चहा आता उद्या सकाळीच."
नजर चुकवत वसंतराव बोलत होते.
तांब्यातील पाणी ग्लास मध्ये ओतले आणि चहाची आस पाण्यावर भागवली आणि वसंतरावांनी झोपण्याचे नाटक केले.
मालतीबाई केव्हाच झोपी गेल्या होत्या. पण, मुलाच्या घरी राहायला आल्यापासून वसंतरावांची अवस्था कठीण झाली होती. सतत काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. डोळ्यांवर झोपेची झापड येत असूनही मनात मात्र कल्लोळ उठला होता. या कुशीवरून त्या कुशीवर करत सकाळी सकाळी त्यांचा डोळा लागला.
अचानक घरात झालेल्या आवाजाने त्यांना जाग आली.
\"काय झालं?\"हे बघण्यासाठी त्यांनी डोळ्यांवर चष्मा घातला आणि बाहेर आले. तर नुपूर मालतीबाईंवर ओरडत होती.

"एवढी कसली घाई म्हणते मी. करतच होती ना मी चहा. पाच मिनिटे वेळ झाला तर काही फरक पडत नाही. पण , दमच नाही. जसं काही मरून जाणार तुम्ही."

"नुपुर काय बोलते आहेस तू? कोणाशी बोलत आहे कळतंय का तुला?" राजेशने आवाज चढविला.

"साॅरी राजेश. अरे, काय करू मी. आपल्या चौघांचे डब्यांची घाई ,त्यात माई आणि अप्पांचा स्वयंपाक वाढला आता. एकतर सकाळी मला वेळ पुरत नाही. त्यात हा नवीन कप बश्यांचा सेट फोडून ठेवला. बरं त्यातल्या त्यात चहा पण सांडला‌ गॅसवर. नाही होत रे माझ्याकडून एवढं सगळं?"

नुपुरची सकाळी सकाळी चाललेली धावपळ राजेश रोजच बघत होता.पण, नुपूर आईला जे बोलली ते आवडले नाही.

"नुपूर तू समजून घे ना जरा आईला. अगं तिच्याकडून होत नाही हल्ली आणि तू त्यांचा चहा का नाही केला आधीच. तिची गडबड नसती झाली."

"तू ही मलाच बोल आता." असे म्हणत ती आवरायला खोलीत निघून गेली.
थोड्याच वेळात ,"हे बघ मी निघाले मला उशीर होत आहे. मी मुलांना स्टाॅपवर नेऊन सोडते. बाकी तू तुझं आवरून घे."

राजेश आईजवळ जाऊन, "आई तू राहू दे. मी करतो. तो स्वतः सगळं आवरतो."

"अरे ,असू दे. मी आवरते. तुझे कपडे खराब होतील."

तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

राजेश जाऊन दार उघडतो.

समोर शंकर उभा होता.

"शंकर काय झाले? तू अचानक घरी कसा? मी येतच होतो ऑफीसला."

"अहो, साहेब पण आहेत सोबत. त्यांनी तुम्हाला बोलावले बाहेर."

"बरं चल मी येतो."

"राजेश तू तयार आहेस ना. आपल्याला निघायचे आहे. एक अर्जंट मिटींग अटेन्ड करायची आहे. तेव्हा चल पटकन."

"सर दोन मिनिटे द्या मला. तोवर आत या. चहा घेऊन निघू या. तोपर्यंत मी आवरून .
घेतो.

"ठीक आहे चल येतो."सुशांत सर आत आले.

©®अश्विनी मिश्रीकोटकर








🎭 Series Post

View all