Login

प्रेमाचा रंग एक असाही भाग ६

कधी कधी आपल्याला गरज असते ती एका सच्चा मित्राची असा जो आपलं सगळं ऐकून घेईल आपल्याला समजून घेईल किशन होईल का अंतराचा तोच सच्चा मित्र
प्रेमाचा रंग एक असाही भाग ६ 

किशनला सासवडला येऊन चांगले दोन महिने झाले होते. छानपैकी तो तिथे आता रुळला होता. सूर्यवंशी साहेब असताना घरात हसून खेळून बोलणे, मोठ्याने बोलणे हे अजिबात चालत नसायचे त्यामुळे सूर्यवंशी साहेब घरात नसले तेव्हाच अरूं तेधतीचा हसतानाचा, मनमोकळे होऊन बोलतानाचा आवाज येत असायचा. कित्येक वेळा किशनला त्याबद्दल अरुंधतीला विचारावे असं वाटले होते परंतु त्याने कधी ते विचारण्याचे धाडस केले नाही. त्याच्या मनात खूप शंका कुशंका होत्या घराबद्दल, अरूंधतीच्या वागण्याबद्दल, अंतराबद्दल, अंतराच्या बाबतीत तर खूपच गूढ होते त्याला. घरात असूनही त्याने तिला खूप कमी प्रमाणात घरामध्ये पाहिले होते. ती या घरात राहते ते देखील अद्याप कॉलेजमध्ये कोणाला माहित नाही. ती असं का करते याचे उत्तर फक्त तीच काय ते देऊ शकते आणि नेमकी तीच किशनला फार कमी वेळासाठी भेटत होती. 

असंच एक दिवस तब्येत बरी नसल्याने किशन अचानक दुपारचा दुकानातून घरी परतला. नेहमीप्रमाणे इकडे तिकडे न बघता सरळ तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला. घरात तो आलेला हे तो सोडून इतर कोणालाच माहीत नव्हते. नुकताच डोळा लागत असताना त्याला काचेच्या वस्तू फुटण्याचा आवाज आला. दचकून उठून त्याने दरवाजाकडे धाव घेतली. दरवाजा उघडणार तेवढ्यात त्याला बाहेरून अरूंधतीच्या रडण्याचा आवाज आला.

" साहेब, नको ना. तुम्ही म्हणालात तसंच मी केले कायम. आता मागे झालेले जाऊ द्या ना. जे झालं ते झालं. उगाच अंतरा वर नका हो राग काढू त्याचा? ती काही करणार नाही तसं." 

किशनने दरवाजा थोडा उघडून बाहेर पाहिले. हॉलमध्ये जमिनीवर फ्लॉवरपॉटचे तुकडे पडले होते. सूर्यवंशी रागाने मोठं मोठे श्वास घेत हाताची मूठ आवळत तिथेच उभे होते. अरुंधती त्यांच्या पाया पडत जमिनीवर गुडघ्यावर बसली होती. रडल्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे अश्रूंनी भिजलेला होता. तिच्या चेहऱ्यावर भितीचे, काळजीचे भाव उमटले होते. अशातच दोन्ही हात जोडून तर कधी पाया पडून ती सूर्यवंशी यांना सांगत होती.

" तू आणि तुझ्या पोराने सगळ्या गावकऱ्यांसमोर माझं नाक कापलं. आणि त्यात आता कहर म्हणजे तुझी ही नालायक पोर देखील तेच करत आहे. माझ्या हाताला लागला असता ना तो तुझा पोरगा तर हिला देखील कळालं असतं मी कोण आहे ते. भेटला असता तर तिथेच त्याचा मुडदा पाडला असता मी."

" त्यात फक्त त्याचा दोष नव्हता ना. तुमच्यामुळे झाले होते ते सगळं." सूर्यवंशी रागाने बोलतच होते की तेवढ्यात अंतरा तिथे आली. अरूंधतीला आधार देऊन उठवत तिने सुर्यवंशी साहेबांकडे एक रागीट कटाक्ष टाकला.

" अंतरा, तू काही बोलू नकोस. तू जा बरं. इथून." अरुंधतीने तिला हलका धक्का देऊन जायला सांगितले.

" का म्हणून मी इथून जाऊ? दरवेळी याचंच ऐकून घेणं गरजेचं आहे का आई? जे झालं त्यात जेवढी यांची चूक आहे तेवढी कोणाचीच नाही. जी काही शिक्षा व्हायला हवी ती यांनाच व्हायला हवी. माणूस म्हणून तर तुम्ही चांगले नाहीच आहात पण एक बाप म्हणून देखील तुमची लायकी नाही." अंतरा पुढे काही बोलणार तेवढ्यात अरुंधतीने तिच्या कानाखाली मारले.

" तुला जा सांगितले ना इथून. मग गपगुमान जा. आपल्या पेक्षा वयाने मोठ्या माणसांसोबत असं बोलायचं नसते हे समजत नाही का तुला? जा इथून म्हणतेय ना मी." अरुंधती चिडली.

" वाह! आधी स्वतःच लेकीला काहीबाही बोलायला शिकवायचे आणि मग सगळ्यांसमोर संस्कार असल्यासारखे बोलायचे. वाह! छान आहे तुझं. तुम्ही मायलेकी नीट नाही वागलात तर या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील, लक्षात ठेव ही गोष्ट. समजलं ना?"

सूर्यवंशी साहेबाने अरूंधतीच्या हनुवटीला धरून धमकी दिली आणि तडक घरच्या बाहेर निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ अंतरा देखील रडत घराबाहेर निघून गेली. अरूंधती मात्र रडत तिथेच बसली. किशनला तिचे रडणे सहन झाले नाही. त्याने त्वरित पुढे होऊन तिला उठवले. त्याला अचानक समोर पाहून ती दचकली. 

" तू? तू इथे काय करतोयस यावेळी? दुकानात गेला होतास ना तू." अरूंधतीने त्याच्या दंडाला पकडले.

" सांगतो, आधी तुम्ही पाणी प्या." किशनने तिला नीट सोफ्यावर बसवले. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या तांब्या मधील पाणी तिला ग्लास मध्ये ओतून दिले. तिने थोडं पाणी पिऊन ग्लास बाजूला ठेवून दिला. 

" तुम्ही ठीक आहात का?" किशनने खूप मायेने तिला विचारले.

त्याची ती आपुलकी पाहून तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आले. त्याच्या केसांवरून हात फिरवत तिने हुंदका देत हुंकार दिला. किशनने तिच्या हातावर हात ठेवून तिला दिलासा दिला. अरूंधती थोडी नॉर्मल झाल्यावर तो त्याच्या खोलीत परत आला.

" काय प्रकार आहे हा? काय भानगड आहे काहीच समजत नाही. एक मन म्हणतेय नको यात पडायला, आपण भलं अन् आपलं काम भलं. तर, दुसरी कडे मन अंतराकडे ओढ घेत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी आवडलं. पहिल्यांदाच जीव कोणासाठी इतका कासावीस होत आहे. तिच्याशी बोलावे, तिला भेटावे,  तिला सतत बघावे असंच वाटत असते. काय करू काहीच समजत नाही." खोलीत आल्यावर किशन बेडवर बसून विचार करत होता. 

संध्याकाळी थोडं बरं वाटत असल्याने किशन लायब्ररीमध्ये गेला असता त्याला तिथे अंतरा भेटते. समोर पुस्तक नावालाच ठेवून ती कुठेतरी शून्यात हरवलेली होती.

" हॅलो." किशनने तिच्या बाजूला बसत हळूच तिच्या कानात कुजबुजला.

" तू! तू इथे?" अंतरा त्याचा आवाज ऐकून दचकली.

" हो. मी इथे." तो गालात किंचित हसला. त्याच हास्य पाहून ती काही क्षण त्यात भारावून गेली.

" काही काम होतं का?" स्वतःला सावरत तिने लक्ष परत पुस्तकात दिले. किमान त्याला तसं भासवत होती ती.

" हम्म, काम तर होतं पण, तू करू शकेल असं वाटत नाही मला?" किशन नजर वर करून हाताची घडी घालून बोलला.


अंतराला भेटेल का किशनच्या रूपात एक सच्चा मित्र? घरातील गौडबंगाल कळेल का किशनला?