प्रेमाचा रंग भाग 5

Premacha Rang Bhag 5


प्रेमाचा रंग भाग 5


श्रेणी - राज्यस्तरीय कथामालिका.
विषय - प्रेम कथा
जिल्हा - संभाजीनगर संघ



मल्हारची प्रेम व्यक्त करण्यासाठी धडपड सुरू होती. त्याला समजले होते की त्याचे हस्ताक्षर घरातील कुणीच वाचू शकले नाही. आता काय करावं या विचारात तो होता.


तेवढ्यात काकू कडून चुलत भाऊ सनीला कळाले की मल्हार प्रेमात पडलाय. सनी आला आणि म्हणाला - " दादा मला नाही सांगितले की तू प्रेमात पडलायस ? जिच्या प्रेमात पडलास तिला तरी सांगितले का नाही अजून?"


सनी इंजिनिअरिंग करून नामांकित कंपनीत मॅनेजर पदावर आहे. मल्हारचा सख्खा चुलत लहान भाऊ आहे. मल्हार सगळ्यात मोठा आहे.


मल्हार - " नाही रे भावा.. तूच सांग कसे सांगायचे?"

" मल्हार दादा, पण ती भेटली कुठे? कशी? कधी? ओळख कशी झाली? "

मल्हार जान्हवीच्या पहिल्या भेटी पासून पूर्ण माहिती इतकी फुलवून, इतक्या प्रेमाने सांगतो.

सनीला खात्री पटते की मल्हार जान्हवीच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे.


सनी - " तू काय ठरवलंस?"


मल्हार - " पत्र लिहणार होतो. पण काय लिहावे जमत नव्हते. शब्द सुचत नव्हते. माझे अक्षर तिला कळले नाही तर काय उपयोग ? मग.. "


सनी -" अरे लाल गुलाब दे, कॅडबरी दे, दिल शेप वाली,मस्त प्रपोज कर. रिंग घे. कितीतरी पद्धती आहेत प्रपोज करण्याच्या!\"


मल्हार म्हणाला " एवढे जमणार नाही मला. "


सनी उत्साहात , " अरे दादा.. तुझे दंड मस्त पिळदार आहेत . बॉडीबिल्डर आहेस . ऊंच धिप्पाड. छान परफ्यूम मारून जा.. टिशर्ट घाल शॉर्ट बाह्यांचा.... बोल.... अन आज सांगून टाक.."


मल्हार पटकन म्हणाला " तू चल"


सनी आश्चर्याने " मी कशाला मध्ये? "


मल्हार - " पण भेटायचे कुठे?"


इतक्यात मल्हारला जान्हवीच्या बाबांचा फोन आला . जान्हवीला नोकरी मिळाली त्या कंपनीत एच. आर ऑफिसर म्हणून उद्या जॉईन करणार असल्याचं सांगितलं.


मल्हार ने तिला अभिनंदन सांगा, माझ्याकडून असं म्हटल्यावर

बाबांनी आनंदाने सांगितलं की जान्हवीला सांगतो आल्यावर कारण ती सिनेमा पहायला गेली आहे मैत्रीणी सोबत, त्यांनी थिएटरचे नावही सांगितलं.


मल्हार मनात आनंदला आणि बाबांनी "फोन ठेवला.


मल्हार सनीला म्हणाला - " अरे चल.. ती त्या थिएटर मध्ये मुव्ही पाहायला गेली आहे."


सनी -" बरं चल पटकन आपण ही मुव्ही पहायला जाउया."


मल्हार ने एक लाल गुलाब घेतला.दाढी करून, मस्त टिशर्ट घातला. परफ्यूम लावून, गॉगल, घड्याळ, मोबाईल सगळं कसं एकदम महागडं आणि स्टाईलमधे तयार होऊन गेले. सनी व मल्हार सोबतच सावरून थिएटर बाहेर वाट पहात उभे राहिले.


इतक्यात मल्हार म्हणाला, " अरे आली आली.. संपला पिक्चर.. आली.. !"


मल्हारला तिच्या सोबत चांगला बॉडीबिल्डर, ऊंचपुरा मुलगा येताना दिसला .. मल्हारला त्या मुलाकडे पाहून एकाच वेळी मनात दुःख, हार्टब्रेक फिलींग, त्या मुलाचा राग, त्या मुलावर जळणे असे अनेक भाव मनात आले.

मल्हारने सगळा राग त्या गुलाबाच्या फुलांवर काढला, गुलाबाच्या पाकळ्या पाकळ्या केल्या व हात पाठीमागे घेऊन मल्हार उभा होता.


जान्हवीचे मल्हारकडे अचानक लक्ष गेले कारण तो रस्त्यातच ऊभा होता. जान्हवी जवळ येत होती. तिच्या सोबत तो मुलगा होता.

पिक्चर कसा छान होता, काय काय विनोद होते, काय भारी असे म्हणत एकमेकांना टाळ्या देत येत होते.

मल्हारचा मात्र तिळपापड होत होता. जान्हवी सोबतच्या मुलाला मल्हार कच्चेच खातो की काय असे सनीला वाटले.

आता काय? सनीने विचार केला व मल्हार तर रागाने लालबुंद झाला होता.

समोरच जान्हवी आली आणि मल्हार काहीच बोलू शकला नाही.

जान्हवीने आनंदाने सांगितलं की तिला नोकरी लागली.

मल्हारने साधे अभिनंदनही केले नाही.

जान्हवीने मल्हारची ओळख त्या मुलाला करून दिली.
" हा मला घरी रात्री सोडवायला आला होता. त्या रात्री पाऊस आला होता व खूपच उशीर झाला होता. म्हणून कॅब ने याने मला घरी सोडलं होतं. "

त्या मुलाने मल्हारचे खूप धन्यवाद , आभार मानले.

जान्हवी त्या मुलाला बोलता बोलता दादा म्हणाली.
मल्हारने मग परत विचारले "हा कोण ?जान्हवी तुम्ही आता काय म्हणालात?"

जान्हवीने ओळख करून दिली. "हा माझा सख्खा, एकुलता एक, मोठा भाऊ , कृष्णा दादा! आम्ही मैत्रीणी पिक्चर पाहायला येणार होतो. दोन्ही मैत्रीणी ऐनवेळी आल्या नाहीत. मग मी दादालाच सोबत आणले. पिक्चर मात्र खूप छान होता. हसलो खुपच. मजेशीर होता.!"

जान्हवीने एक जोक सांगितला पिक्चर मधला व सगळेच जण हसले.


मल्हारला समजले की हा जान्हवीचा भाऊ आहे व मल्हारचा जीव भांड्यात पडला.

त्याला इतका आनंद झाला की तो हसू लागला.

जान्हवीला वाटले की तो जोक मुळे हसतोय.

सनीला टाळ्या देऊन मल्हार हसत होता.


मल्हारला भावा समोर प्रपोज करणे शक्यच नव्हते.

मल्हारने गुलाबाचे फूल आधीच तोडून टाकले होते.

आता मल्हारने जान्हवीचं अभिनंदन केलं.
नोकरी लागलीय . जान्हवीला पण थोडे अवघडल्यासारखं वाटत होतं . नोकरी लागली सांगितल्यावर पाच मिनिटांनी तो अभिनंदन करत होता.


सनी ने स्वतःहून आपलीच ओळख करून दिली.
"मी सनी ,मल्हारचा लहान चुलत भाऊ. आमच एकत्र कुटुंब आहे. मी इंजिनिअर आहे."


मल्हारला फक्त एकाच गोष्टीचा आनंद झाला होता की तो मुलगा जान्हवीचा भाऊ होता.

जान्हवी मल्हारला म्हणाली," तुमचा रूमाल माझ्याकडे राहिला आहे. घरी आहे. नंतर भेटल्यावर देईन!"


जान्हवी आणि तिचा भाऊ अच्छा येतो आम्ही म्हणून निघाले.


थोड्या वेळाने मल्हार आणि सनी पण परत निघाले.

मल्हार म्हणाला ," सनी बरं झालं तो मुलगा तिचा भाऊ निघाला. "


सनी म्हणाला - " हो ना. भावासमोर प्रपोज करणे शक्यच नव्हते. आजचा चान्स गेला. आता परत कधी सांगणार?"


मल्हार म्हणाला - "तूच सुचव ना.
काही आयडिया कर भारी. "

मल्हार आणि सनी दोघे सोबत वाढलेली भावंडे होती, चुलत असली तरीही भावांचे . सख्यांच्या वर प्रेम असते.

सनी म्हणाला, "करतो काही विचार दादा."


दोघे एकमेकांच्या साठी काही करायला तयार होते. दोन्ही भावांचे ट्यूनिंगही छान होतं . दोघे विचार करत गळ्यात हात टाकून घरी परतले.



क्रमशः


सौ भाग्यश्री चाटी सांबरे
©®