प्रेमाचा जाहीरनामा (मध्यंतर)

Letter to fiancee

प्रिय डॉन,

माझ्या आयुष्याशी थेट सबंध येणाऱ्या तुम्हीं दुसऱ्या महिला.

आपलं लग्न ठरल्यानंतर; तुमच्यापासून दूर राहून तुम्हांला सरप्राईज देण्यासाठी मुद्दामहून हा पत्रप्रपंच. (अगदीच बोअरिंग नाही हा मी.)

आपला साखरपुड्याला अगदीच दोन दिवस राहिले आहेत.. नात्यातील गुलाबीपणा काहीसा फुलू लागला आहे आणि त्याच सर्वस्वी श्रेय तुमच्याच पुढाकाराला आहे एवढं मात्र नक्कीच.

एरव्ही सगळं छानच पण नवरात्र झाली; लक्ष्मी पूजन आणि दिवाळी काही तासांवर आहे; त्यानिमित्ताने तुम्हांला काही सांगावंसं वाटतं. (असंच आपलं रटाळ तत्वज्ञान!)

जर स्त्रीला आपण देवी म्हणत असू तर आमच्याकडे आई नंतर तुम्हीच दुसरी दुर्गा असाल. आता या गोष्टीचा आनंद व्यक्त करायचा की दडपण बाळगायचा ते तुमचं तुम्हीं पहाल. दडपण आलं तर तेवढं मात्र पक्कं सांगाल. तुम्हांला कॉमेडी आवडते नं?; मग आपण करूयात की काही तोडकीमोडकी कॉमेडी. त्यात काय एवढं? तुम्हाला हसू आल्याशी मतलब! थोबाडाने कितीही गंभीर वाटलो तरी स्वभावात मिश्कीलपणा अगदी ठासून भरलाय बरं का. आतपर्यंतच्या फोन संभाषणातून तुम्हांला ते जाणवलं असेलच.

बाकी आता काही दिवसांनी तुमचं नेहमीचं मंदिर, भक्तगण, परवलीचे पुजा-उपचार असं सारं सारं काही बदलेल. तुम्हीं मात्र त्याच असाल. नविन भक्तांच्या अपेक्षांचं भलं मोठं ओझं बाळगत नव्याने अवतरलेली गृहलक्ष्मी!

पण मी एक सांगू का?? तुमचा मुळातला स्पष्टवक्तेपणा जर कायम ठेवलात तर तुमचे बरेचसे दडपण कमी होईल. कारण आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी वेळीच जाहीर केल्या तर परिवाराला वेळीच आपलं वागणं बदलता येतं आणि पुढचा ज्वालामुखी आधीच शांत करता येतो. आशा आहे की आपलं इतक्या दिवसांचं बोलणं तुम्हांला काहीसं नक्कीच कम्फर्टेबल करणारं असेल.

नवीन घरात प्रवेश करण्याआधी तुमच्याही अपेक्षा असतील, काही ठेवणीतल्या सवयी असतील. वास्तविकतेचा विचार करता सगळ्याच पुर्ण होतीलच असं नाही. आणि तुम्हीं स्वतः वास्तविकतेचं भान असणाऱ्या आहात त्यामुळे तुम्हीं सारं काही सांभाळून घ्याल यात शंका नाही.

बाकी तुम्हीं मी ईरावर लिहिलेला 'प्रेमाचा जाहीरनामा' वाचला आहातच. एक सांगू इच्छितो की त्यात लिहिलेलं काहीही बदलणार नाहीये.. मुळात जे जे झेपेल आणि करायचं ठरवलं होतं तेच लिहिलं होतं.

या पत्राद्वारे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींसाठी धन्यवाद द्यायचे आहेत. आपलं लग्न ठरल्या पासून, माझ्या नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने आपलं भेटणं झालंच नाही. मग ते अगदी साखरपुड्याची साडी असो की अंगठी; माझा सगळीकडे डिजिटलच सहभाग होता. त्यावेळेस वस्तुस्थिती स्वीकारल्याबद्दल थँक्स. आपलं लग्नाची बोलणी फायनल झाली आणि मी आपला थेट तुम्हांला काहीच सूचना न देता दुसऱ्या दिवशी गुजरातला जाणारी ट्रेन पकडली होती.. त्यावेळेस काहीश्या रुसल्या होतात तरीही जास्त तांडव केला नाहीत त्याबद्दल आभारी! (मेसेजमधून मला कोणी अगदी आपटून आपटून धुतलं असं जर का मी माझ्या मित्रपरिवाराला सांगितलं तर तेही विशेष चकीत होतील, माहितेय का? आता तुम्हीं म्हणाल की हे लिहायची गरज होती का? तर मी म्हणेल; नक्कीच! तुमच्याबद्दल एवढं गोड गोड लिहिलं तर बाकीच्यांना 'डॉन' शब्दाचा संदर्भ कसा लागेल ना? ). दसऱ्याच्या दिवशी एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायच्या ठरल्या; तुम्हीं आमच्या घरी फोन केलात पण माझ्या फोनने नेमकं बंड पुकारलं आणि मला फोन करताच आला नाही. त्याबद्दल 'फुगून' न बसल्याबद्दल धन्यवाद!( नाहीतर गुजरातला राहून मुबंईमध्ये राहत असलेल्या होणाऱ्या बायकोचा रुसवा काढणं खूप अवघड गेलं असतं ओ!). माझ्या दूर असण्याने आपले हे खास क्षण तुम्हांला फारसे जगता येत नाही याची मलाही खंत आहेच पण नाईलाज असल्याने मलाही सध्या काहीही करता येत नाहीये.

लवकरच, आपण दोघे एकत्रितपणे यावर नक्कीच मार्ग काढुयात. आपण दोघेही 'कार्टून' प्रकारांतील मानव असल्याने आपलं नातं हसतं-खेळतं राहील यात सध्यातरी शंका दिसत नाही.

फोनवर म्हटल्याप्रमाणे जरी अजून तुमच्या प्रेमात पडायला झालं नसलं तरी कुठेतरी 'आपलं माणूस' भेटल्याची भावना दाट होऊ लागली आहे. तुमच्याशी बोलताना छान वाटतं याची कबुली मी आधीच दिली आहे. माझ्यातला रटाळपणा बदलण्यासाठी तुम्हीं कंबर कसलीच आहात. रात्री १०.३० ला झोपणाऱ्या माणसाला स्वखुशीने ११.३० पर्यंत जागे ठेवण्यापर्यंतचा पल्ला तुम्हीं गाठलाच आहात. लिहिण्यासारखं खुप काही आहे पण आता आवरत घेतो..

आज आपण भेटतोय; तुमच्यासाठी दोन गिफ्ट्स आहेत. एक हे ईरावरच पत्र आणि दुसरं तुमच्या प्रत्यक्ष हातात देईन ते. पत्र ईरावर का लिहिलं त्याच उत्तर तुम्हांला लगेच कळेलच. आणि राहिला प्रश्न दुसऱ्या गिफ्टचा तर एकच सांगायचं आहे की दुकानदाराने सांगूनही मी त्यावर कोणताच टॅग लावलेला नाहीये. कारण त्या गिफ्ट सारखं आपणही एकमेकांना अनोळखी आहोत. जस जसं गिफ्टच वेष्टन उघडेल तसतसं आपल्याला कळेल की आवरणाखाली जे आहे ते आपल्याला आवडतं की नाही ते. पण तुम्हांला नक्कीच आवडेल असं वाटतंय. (तुमचा रिप्लाय येईपर्यंत मनातल्या मनात 'आल इज वेल, आल इज वेल म्हणत राहील मी.) बाकी तुम्हीं मात्र त्या गिफ्ट सारख्याच रहा. तुमचं आजूबाजूला दिसलं झालं नाही तरी तुमच्या असण्याची सर्वांना जाणीव होत रहावी. तुमचं असणं कायमच प्रसन्न करणार राहो हिच सदिच्छा!

ईरावर माझ्या कथा ज्या काही मोजक्या वाचकांनी वाचल्या आहेत त्यांना तर आज पटकन जाणवेल की हि व्यक्ती कथेत लव्ह अँगल का लिहीत नाही म्हणून.. जमतच नाही बुवा! पण तरीही एक व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे, नेहमीसारखं समजून घ्या डॉन!

-तुमचा होणारा 'आगाऊ' नवरा 
मयुरेश

ईरा वरील समस्त वाचकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!