प्रेमाचा चकवा भाग - १६ ( अंतिम)

ही एक सामाजिक कथा आहे


प्रेमाचा चकवा  (अंतिम)

विषय - कथामालिका


"व्वा! शेवटी आली तर तुला अक्कल." नितिन निशाच्या रूममध्ये येत म्हणाला.

निशाचे आई-बाबा बाहेर गेले असतांना घरी कोणी नव्हते तेव्हा तिने त्याला मेसेज करून बोलावले होते. त्यामुळे तो तिला भेटायला तिच्या घरी आला.

"हो अरे मला राहावत नव्हते म्हणून तुला बोलावून घेतले."

"म्हणजे प्रेमाचं भूत उतरलं म्हणायचं डोक्यावरून. शेवटी समजले ना हे प्रेम नाही तर शरीराची भूक आहे जी भागवणे गरजेचे आहे."

"हो ना, तू दूर गेल्यानंतरचं कळले मला की मी त्या गोष्टी शिवाय राहू शकत नाही. तुझी इतकी सवय झाली ना की आता मला तुझ्याशिवाय, तुझ्या स्पर्शाशिवाय राहवत नाही."

"ओहो! क्या बात है! इतकी आतुर झाली आहेस का तू? मग चल लवकर कपडे काढ. बायकोला पाळी आली आहे म्हणून तीन दिवसापासून उपाशी आहे. आता मलाही राहवत नाही." तो तिच्या अंगावरून ओढणी बाजूला सारत म्हणाला.

"अरे थांब ना थोडा, इतकी काय घाई आहे?" ती त्याचा हात पकडत म्हणाली.

"आता नाटक नको करू हा, दुकानात जायचे आहे मला. गिऱ्हाईक तात्काळत बसतील. घे लवकर सुरू कर."  तो त्याची टी-शर्ट काढत म्हणाला.

"त्याआधी एक काम करायचे आहे ते तर करू दे." ती गोड हसत म्हणाली.

"आता कुठलं काम आहे? या कामापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नाही." तो तिच्याजवळ जात म्हणाला.

तो तिला हात लावणार तितक्या तिने संपूर्ण ताकदीनिशी सणसणीत त्याच्या  थोबाडात लावून दिली.

"निशा......" तो रागाने म्हणाला आणि तिला मारायला हात उचलला तर त्याचा हात हवेतच धरल्या गेला. त्याने कोण हात पकडले म्हणून वळून बघितले तर त्याचे डोळे मोठे झाले.

"शितल तू?" त्याचा हात पकडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको शितल होती. तो तिला तिथे आलेलं बघून घाबरला.

"हो मी. काय झालं? आता का दातखीळ बसली तुझी. आतापर्यंत निशावर ओरडत होता ना, आता ओरड ना! रहावत नव्हते ना तुला?"

"अगं शितल तू हिच्याकडे लक्ष नको देऊ. ही एक नंबरची खोटारडी आणि चारित्र्यहीन मुलगी आहे. जो मुलगा दिसला त्याच्यावर आपल्या प्रेमाचे दाणे टाकते आणि त्याला फसवते आणि मग आपली शरीराची आग विझवण्यासाठी अशी एकांतात बोलवत असते." तो स्वतःची बाजू सावरत म्हणाला.

"हो काय? ती चारित्र्यहीन आहे की तू चारित्र्यहीन आहेस. लाज वाटत नाही असं तोंड वर करून सांगतांना?" शितलने पण एक जोरदार त्याच्या थोबाडीत लगावली.

"शितल...." तो ओरडला.

"नितिन...." शितलच्या मागेहुन एक कठोर आवाज ऐकू आला त्यामुळे नितीनने त्या दिशेने बघितले.

"मामा तू? तू इथे?" त्याच्या मामाला पण तिथे आलेलं बघून त्याची बोबडी वळली.

"हो मी पण इथे. आम्ही दोघेही तुझं खरं रूप बघायला येथे आलो आहोत. चांगलं केलं ह्या मुलीने जिने आम्हाला तुझ्याविषयी सगळं खरं सांगितलं. त्यामुळेच तुझं खरं रूप आम्हाला दिसलं. नाही तर मी तर तुला खूपच सज्जन समजत होतो आणि तू इतका नालायक निघालास." मामा रागाने लालबुंद झाले होते.

"अच्छा तर ही हिची चाल होती तर पण मामा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. ही खूप खोटारडी आहे. हिचे आणि माझे काहीही संबंध नाही. ही स्वतःहून माझ्या मागे पुढे करत असते . खूप वर्षापासून ही माझ्या मागे लागली आहे पण मी हिला स्पष्ट नकार दिला त्यामुळे त्याचा बदला घ्यायला हिने स्वतःहून मला इथे बोलावले. हा बघा हिने केलेला मेसेज, मी काहीही केले नाही. हीच चारित्र्यहीन आहे." तो मोबाईलमधील निशाचा एक दिवसाआधी आलेला मेसेज दाखवत बोलू लागला.

निशावर आरोप लावत आहे आणि तिला चारित्र्यहीन म्हणत आहे म्हणून मामाने सुद्धा त्याला  कानाखाली एक जोरदार ठेवून दिली.

"तुझे आणि  तिचे काहीही संबंध नाही काय? मग हे काय आहे?"  त्यांनी निशाचाच मोबाईल त्याच्यापुढे धरत विचारले.

"मामा ही सगळी चाल आहे हीची. तुम्हाला खोटे सांगून इथे बोलवायचे आणि मग असे रंगेहात पकडण्याचे नाटक करायचे. तुम्ही तिच्या चालीमध्ये फसू नका."

"तिने तुला बोलावले नाही तर आम्ही तिला तुला येथे बोलवायला लावले आहे." मामांच्या वाक्यावर नितिन डोळे फाडून त्यांच्याकडे बघू लागला.



२ दिवसापूर्वी


निशाच्या भाऊजींनी इकडून तिकडून विचारपूस करून नितिनच्या घराचा पत्ता मिळवला होता त्यामुळे निशा, निशाची ताई आणि भाऊजी असे तिघेही त्याच्या घरी गेले. भाऊजीने दरवाजा ठोठावला तेव्हा  शीतलने दरवाजा उघडला.

"कोण पाहिजे आपल्याला?" तीन अनोळखी व्यक्तीला बघून तिने विचारले.

"तू नितिनची बायको आहेस काय?" ताईने विचारले.

"हो मीच त्याची बायको शितल." शितल म्हणाली.

"आम्हाला तुझ्यासोबत थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे."

"हो बोला ना."

"इथे असं दरवाजावर नको. आत बसून बोलूयात काय?"

"ठीक आहे या आत."  असं म्हणून शितल दरवाज्याच्या बाजूला झाली आणि त्या तिघांना आत घेत म्हणाली. ते तिघे आत आल्यानंतर नितीनचे बाबा हॉलमध्ये बसून होते. नितीनची आई बाजारात गेली होती. त्यामुळे घरात नितिनची बायको आणि त्याचे मामा असे दोघेच होते.

त्या तिघांनी मामाला नमस्कार केला. त्यांनी सुद्धा गोड हसून त्यांचे स्वागत केले पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न स्पष्ट दिसत होते.

"कोण आहेत बाळ हे? तुझी मैत्रीण आहे का ही?"
त्यांनी निशाकडे बघत विचारले.

"नाही बाबा यांना माझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत आहेत."

"बरं, काय बोलायचे होते तुम्हाला आमच्या शितलसोबत?" मामाने त्या तिघांकडे बघून प्रश्न विचारला.


त्यांच्या प्रश्नावर मात्र ते तिघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागले. ताईने निशाला तू सांग म्हणून खूण केली त्यामुळे निशा विचार करू लागली. तिला कसे बोलावे? कुठून सुरू करावे ? ते सुचत नव्हते पण सांगणे गरजेचे होते म्हणून तिने एक आवंढा गिळला आणि बोलायला सुरुवात केली.

"माझे नाव निशा आहे. मी नितिनच्या वर्गात होते. आमचे प्रेम संबंध होते. इतकेच नाही तर त्याने शरीर संबंध ठेवण्यासाठी मला फसवले. प्रेमाचं खोटं नाटक केलं आणि   हवं तेव्हा त्याच्या शरीराची भूक भागवण्यासाठी मला प्रत्येकवेळी बोलावून उपभोगले आणि आता तुझ्यासोबत लग्न करून  तुझे आयुष्य खराब करत आहे."

"ए..... तोंड सांभाळून बोल. माझ्या नवऱ्याबद्दल काहीही अपशब्द बोललेले मी खपवून घेणार नाही. तू म्हणशील आणि मी विश्वास करणार काय तुझ्यावर? लहानपणापासून ओळखते मी त्याला. तो तसा नाही. आम्ही लहानपणापासून एकत्र राहत आहोत पण तरीही त्याने माझ्यावर वाकडी नजर टाकली नाही आणि तुला त्यासाठी फसवणार काय? आमचे सुद्धा लव मॅरेज झालेले आहे. माझ्यावर प्रेम असतांना तो तुझ्यासोबत प्रेम करणार नाही. खोटं बोलत आहेस तू, झाले असेल तुझे बोलून तर आता उठायचं आणि निघायचं."  ती भडकत म्हणाली.

"मला वाटलचं होतं तुझं माझ्यावर विश्वास बसणार नाही आणि विश्वास पण कसा ठेवणार ना? एखादी अनोळखी मुलगी येऊन आपल्या नवऱ्यावर आरोप करते आहे हे कुठल्याही बायकोला सहन होणार नाही. यात तुझी काही चूक नाही. माफ कर, तुमचे आता आता लग्न झाले आहे तरीही मी तुला हे सांगायला आले पण मला असं वाटतं की जशी मी फसले त्याच्या जाळ्यात तशी तू  फसू नये आणि तुलाही त्याचं खरं रूप समजावं म्हणून मी इथे आले आहे." निशा अगदी सौम्यपणे बोलत होती.

"काय पुरावे आहेत तुझ्याकडे की त्याने तुला फसवले आहे? मला तर वाटते तूच त्याला फसवत असणार पण तो तुझ्या जाळ्यात आला नाही आणि त्याने माझ्यासोबत लग्न केले म्हणून तू बदला घेण्यासाठी हे सगळं खोटं बोलत आहेस. मला एकदा म्हणाला होता नितिन की त्याच्यामागे भरपूर मुली लागल्या आहेत पण तो कुणाच्याही जाळ्यात अडकला नाही. त्याला फक्त आणि फक्त मीच आवडते. बहुतेक तू पण त्याच मुलींपैकी एक आहेस." शितल रागात बोलत होती.

"हे बघा, आम्ही घरी आलेल्या पाहुण्यांचे सन्मान करतो पण याचा अर्थ हा नाही की कुणी काहीही येऊन माझ्या जावयाबद्दल बोलून जाणार आणि मी गप्प बसू. तो आता माझा जावई आहे पण आधी तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. लहानाचा मोठा तो माझ्याजवळ झाला आहे त्यामुळे मी त्याला चांगलाच ओळखतो. उगाच त्याच्यावर काहीही आरोप लावू नका." मामा भडकत म्हणाले.

"मी कुठलेही खोटे आरोप लावत नाही आहे. तुम्हाला पुरावे हवेत ना? हे बघा, गेल्या तीन वर्षापासून तो माझ्या संपर्कात आहे आणि रोज आम्ही मेसेज आणि फोनवर बोलतो त्यापैकीच हे मेसेज बघा."

तिने आपल्या मोबाईलमधून त्या दोघांमध्ये झालेल्या चॅटिंगचे मेसेज दाखवले. निशाला एक सवय होती की ती कधीही नितीन सोबतचे मेसेज डिलीट करायची नाही. तिचा मोबाईल तिच्या व्यतिरिक्त कोणीही हाताळत नव्हता त्यामुळे ती बिनधास्त त्याचे मेसेज आपल्या मोबाईलमध्ये ठेवत होती. जेव्हा पण तिला आठवण यायची ती मग ते मेसेज पुन्हा पुन्हा वाचून आनंदी व्हायची. आज तिची तीच सवय तिच्या उपयोगात पडली.

नितिनचे मामा आणि त्याची बायको शीतल जसे जसे ते मेसेज वाचत होते तसे तसे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते. शितलने तर तोंडावर हात ठेवून दिला. मामा रागाने लालबुंद झाले. इतके वर्ष तो शितलसोबत पण प्रेमाचे नाटक करत होता. त्याचे तिच्यावरच खरे प्रेम आहे हे तिला भासवत होता. त्या मेसेजवरून उघड होत होते की ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि प्रत्येक मेसेजमध्ये भेटायला नितिन पुढाकार घेत होता आणि तिला ब्लॅकमेल सुद्धा करत होता. निशाने सुद्धा सुरुवातीपासून तर त्यांच्या शेवटच्या भेटीपर्यंतचे सगळे सांगून टाकले. ते ऐकून शितलला राग आणि रडू दोन्ही येत होते.

"बाबा...." शितल आपला हुंदका दाबत आपल्या वडिलांच्या मिठीत शिरली.

"रडू नकोस पोरी, येऊ दे त्याला घरी मी जाब विचारतो. इतके वर्ष तो तुला फसवत होता आणि या मुलीचे पण आयुष्य नासवले त्याने." मामा भडकत म्हणाले.

"नाही बाबा, तुम्ही त्याला जाब विचारू नका कारण तुम्ही त्याला या विषयी विचारले तर तो काहीतरी खोटे कारण सांगेल आणि आपली दिशाभूल करेल. त्यापेक्षा आपण त्याला रंगेहात पकडू. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू वाटते काय त्याला? तसं असेल तर मग त्याला त्याच्या कर्माची शिक्षा नक्की मिळेल. स्त्रीची इज्जत कशी करायची हे त्याला सांगावे लागेलच ना? त्याला जर असेच सोडले तर तो असाचं स्त्रियांच्या भावनांशी खेळत राहणार. मला त्याला त्या लायक सोडायचे नाही की तो पुन्हा आणखी कुणा मुलीचे आयुष्य उध्वस्त करेल. मला आयुष्यभराची अद्दल घडवायची आहे  त्याला. तो निशाचा आणि माझा दोघींचाही तितकाच गुन्हेगार आहे."

"पण करणार काय आहेस पोरी तू?" मामांनी विचारले.

"माझ्याजवळ एक आयडिया आहे पण निशा मला यात तुझी मदत हवी आहे." शितल म्हणाली.

"हा बोल ना, मला पण त्याला अद्दल घडवायचीच आहे. कुठलीही स्त्री ही उपभोगासाठी नसते हे सांगायचे आहे.  बोल, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. त्याला सळो की पळो करून सोडायचे आहेत."

"मग ऐक, तुझ्या घरी कोणी नसतांना तू त्याला भेटायला बोलव. तू असं काही बोल त्याला की तो तुला नाही म्हणणार नाही आणि जेव्हा तो येईल तेव्हा मग आपण त्याला रंगेहात पकडू. पुढचं तू माझ्यावर सोड, पुढे काय करायचे ते मी बघून घेईल."

"हो चालेल."

बाकी सगळ्यांना पण तो प्लॅन आवडला त्यामुळे ठरल्याप्रमाणे आई बाबा घरी नसतांना निशाने लाडीगोडी लावत नितिनला भेटायला तयार केले होते. सुरुवातीला तर तो तिला खूप वाईट बोलत होता. शिवीगाळ देत होता पण तिने सगळे सहन केले आणि त्याला भेटण्यासाठी तयार केले.

तो भेटायला येण्याआधीच शितल आणि त्याचे मामा त्यांच्या घरी येऊन होते. ताई भाऊजी सुद्धा होते पण ते एका रूममध्ये गपचूप बसले होते आणि नितिनच्या येण्याची वाट बघत होते. जसा नितिन घरी आला ते सुद्धा बाहेर निघून दरवाज्याच्या आड लपून उभे होते. ते योग्य वेळेची वाट बघत होते आणि जेव्हा त्यांना ती वेळ जाणवली ते आत शिरले.


"मामा, खरंच मी काही केले नाही. हिने सुरुवात केली. हिने जर मला आधी प्रपोज केले नसते तर मी हिच्याकडे वळलो नसतो. ही जवळ असतांना मी कसा काय कंट्रोल करणार आहे? मी पण पुरुष आहे ना,  ही स्वतःहून जेव्हा लगट करत होती मग गेला माझा तोल. चूक झाली माझी माफ करा यानंतर मी असे करणार नाही." तो आपल्या मामाला हात जोडत म्हणाला.

"माफ करू तुला? लाज वाटत नाही असे बोलतांना?" मामांनी पुन्हा एकदा जोरदार त्याच्या थोबाडीत लगावली. तो निशाच्या पायावर जाऊन पडला. तर निशाने मागेहुन त्याची शर्ट पकडून त्याला उठवले.

"हो केले होते मी तुला प्रपोज कारण खरं प्रेम होते माझे पण तू माझ्या त्याच प्रेमाचा गैरफायदा घेतलास आणि मला फसवले. काय म्हणाला तू? मी लगट करत होते? मी पुढाकार घेतला? जनाची नाही पण मनाची तरी लाज आहे काय तुला? मूर्ख होते जो तुझ्यासारख्या नालायक मुलाच्या प्रेमात पडले. तू माझ्याचं नाही तर कुणाच्याचं प्रेमाच्या लायक नाहीस. तुला तर अशी शिक्षा द्यायला हवी की पुन्हा दुसरा कुठला नितिन कुठल्याही निशाच्या आयुष्याशी खेळण्याचा विचार सुद्धा करणार नाही. नालायका...." तिने त्याच्या थोबाडीत लावली आणि मारतच सुटली. त्याने चिडून तिचा हात पकडायला घेतला तर शितलने त्याचा हात पकडून त्याला स्वतःकडे ओढले.

"तू यानंतर ही चूक करणार नाही असं बोललास ना? पण मी तुला यानंतर काही करण्याच्या लायकीचाच सोडणार नाही." तिने कॉलर पकडून त्याला ओढत दरवाज्याच्या बाहेर घेऊन गेली आणि त्याला बाहेर ढकलली. तो पळून जाऊ लागला तर निशाच्या भाऊजींनी त्याला पकडले. सोबत मामा होते. ती बाहेर निघाली, तिच्या पाठीमागे निशा निघणार होती.

"नाही निशा यानंतर तू यायचे नाहीस. याचे काय करायचे ते मी बघून घेणार. तू जर या प्रकरणात गुंतली गेलीस तर आपल्या समाजातील लोकं तुला सुखाने जगू देणार नाही. चूक मुलाची जरी असली तरी लोकं त्याला काहीच बोलणार नाही पण मुलींना नाव ठेवत फिरतात. नको तितकी तिची बदनामी करतात. जग कितीही प्रगती करू दे पण आपल्या स्त्रियांची प्रगती कधीच होणार नाही कारण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीच बदलणार नाही त्यामुळे तू यात पडू नकोस. तुझं लग्न ठरलं आहे, तू त्यचा विचार कर. खूप भोगले आहेस तू, आता नको. आता मी काय करते याचे ते बघ." ती निशाला म्हणाली आणि तिने तिच्या बॅगमधून बेल्ट काढला जो नितिनचा होता आणि तिने तो हातात पकडून त्याला मारायचे काम केले आणि मारत मारत तिने त्याला गेट बाहेर नेले.

लगेचचं त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली. तो तिला मारायला जाणार तर मामा त्याच्या मुस्कटात मारत होते त्यामुळे तो शितलवर हात उचलू शकत नव्हता आणि ती त्याला सावरायला वेळही न देता मारत होती. मारत मारत ती चक्क त्यांच्या गावामध्ये त्याला घेऊन आली तिच्यात महांकाली संचारली होती. मारतांना ना तिचे हात थकत होते ना चालतांना पाय पण जे लोक तिला मारतांना बघत होते ते तिलाच बोलत होते. नवऱ्यावर हात उचलते ही चांगली बायको नाही. असं कोणी नवऱ्याला मारतो काय? कितीही झाला तरी नवरा आहे. असे कुजबुज करत होते. तर कुणी फ्री मधला तमाशा बघायला मिळत आहे म्हणून एन्जॉय करत होते पण शितलला त्याची पर्वा नव्हती. ती फक्त त्याला सोलून काढत होती. ती तसेच मारत मारत त्याला घरापर्यंत नेली. नितिनची आई तीसुद्धा बाहेर निघून आपल्या मुलाला मार खातांना बघत होती पण तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिला एक दिवसा आधीच मामांनी सगळा प्रकार सांगितले होते. घराजवळ आल्यानंतर तिने बेल्ट फेकला आणि रडू लागली. मामा तिला मिठीत घेऊन समजावत होते.

"आई...." त्याची आई दिसताचं तो त्याच्या आईकडे जायला निघाला.

"खबरदार मला आई म्हणालास तर? आजच्या नंतर ना तू माझा मुलगा ना मी तुझी आई. अरे लाज वाटते मला तुझी आई म्हणून घ्यायला. मी कुठे कमी पडले जो तू माझ्या पोटी जन्माला आलास? मी तुला स्त्रियांचे सन्मान करायचे शिकवले होते पण तू इतका नीच निघशील असे वाटले नाही. जा चालता हो इथून, यानंतर ना घरात पाय ठेवायचे ना तोंड दाखवायचे."  आईने सुद्धा त्याच्या थोबाडीत लगावली आणि त्याला ढकलत बाजूला केले आणि ती आत निघून गेली. तिच्या पाठीमागे मामा आणि शितल सुद्धा आत गेली आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. तो बराच वेळ तिथे रडत बसला पण कोणीच त्याला आत घेतले नाही. आजूबाजूची लोकं सुद्धा त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते.


ती गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. शितलने कुठेच निशाचे नाव येऊ दिले नाही पण नितिनला जन्मभराची शिक्षा दिली. लोकं त्याच्याकडे बघून तऱ्हे तऱ्हेच्या गोष्टी करत होते त्यामुळे त्याला तिथे राहणे अशक्य झाले. मामांनी त्याच्यासाठी घराचा दरवाजा पण बंद केला  आणि दुकान सुद्धा काढून घेतले. तो निराधार झाला वरून बदनामी इतकी की कोणी त्याला काम पण देईना. तो लावारिस सारखा इकडे तिकडे फिरू लागला .त्याला गाव सोडावे लागले. उपाशी तापाशी भटकावं लागलं. त्याचे आयुष्य निरर्थक झाले. 


तर दुसरीकडे निशाचे आणि पंकजचे लग्न पार पडले. निशाला या सर्वातून सावरायला थोडा वेळ लागणार होता पण तरीही तिने पंकजचे निस्वार्थ प्रेम स्वीकारले होते आणि ती कायमची त्याची झाली होती.


समाप्त


✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग

🎭 Series Post

View all