प्रेमाचा चकवा भाग - १५

ही एक सामाजिक कथा आहे


प्रेमाचा चकवा    भाग १५

विषय - कथामालिका


निशा ताईच्या बोलण्यावर विचार करू लागली. थोड्यावेळ तिने विचार केला आणि  मनात एक निश्चय करून तिने आपले डोळे कोरडे पुसले.

"बरोबर बोलते आहेस ताई तू.  जर आज मी  त्या नालायक नितिनला असेच सोडून दिले तर त्याच्यासारख्या अनेक नितिनला चालना मिळेल आणि ते असेच माझ्यासारख्या निशांना फसवत जाणार, त्यांच्या भावनांशी खेळणार आणि काम झाल्यानंतर सोडून देणार. त्याला आयुष्याची अद्दल घडवणे गरजेचे आहे. निदान त्याचे उदाहरण समोर ठेवून कुणी दुसरा नितिन निशाला फसवण्याचा विचार करणार नाही.

मी म्हणत नाही की यात फक्त त्याची चूक आहे. माझी ही चूक आहेच, उलटं माझी जास्त चूक आहे म्हणूनच मला त्याची शिक्षा मिळालेली आहे. माझी एक नाहीतर दोन बाळं मी गमावून बसले. माझी.... निरागस.... बाळं." ती कातर आवाजात म्हणाली. तिचे डोळे भरून आले होते.

"काय? दोन बाळं?" ताई आश्चर्याने मोठ्याने ओरडून म्हणाली. भाऊजी आणि ताई एकमेकांकडे बघू लागले आणि नंतर प्रश्नार्थक नजरेने निशाकडे बघू लागले.

"हो ताई दोन. लग्नाच्या आधी पण मी एकदा प्रेग्नेंट होते तेव्हा कुणालाही न कळू देता नितिन मला अबोर्शन करायला घेऊन गेला होता."

"निशु.... खरं ना मला आता तुझ्या मूर्खपणावर तुला दोन कानाखाली ठेवून द्यावेसे वाटत आहे. अग वेडे, जेव्हा त्याने पहिल्यांदाच तुला अबॉर्शन करायला सांगितले तेव्हाच तुझ्या लक्षात यायला हवे होते ना की तो तुझी साथ कधीच देणार नाही. अगं इकडे लोकांना मूलं होत नाही म्हणून मुलांकरिता तडपत असतात आणि ज्याने आकारही घेतला नव्हता अशा निरागस बाळांचं कोणी घात करत असेल तर समजून जायला हवे होते की त्याच्या मनात काय आहे? असे म्हणतात की जर आपल्या हातून काही चूक घडत असेल तर त्यातून सावरायला देव आपल्याला काही ना काही संकेत देत असतो. आपल्याला बस ते संकेत समजून घेऊन सावरणे गरजेचे असते. तुला इतके संकेत मिळूनही तू ते समजू शकली नाही. इतकी सुशिक्षित मुलगी अशी वागू शकते याचे मला आश्चर्य वाटते आहे."

"हो ताई, मी नाही समजू शकले त्याच्या मनातील कुटीरता. खूप आंधळे प्रेम केले होते ग मी. तो खूप चलाखीने गोड गोड बोलून, विश्वासात घेऊन माझ्याकडून सगळं करून घेत होता आणि मी वेडी त्याच्या त्या चालीला समजले नाही. मी त्याला प्रेम समजत होते. खरंच मी मूर्ख आहे, चुकले मी आणि म्हणूनच तर मला ती शिक्षा मिळाली ना पण कदाचित देवाला माझ्या हातून काहीतरी चांगले घडवून आणायचे असेल म्हणूनच त्याने मला पुन्हा एकदा जीवनदान दिले पण असे प्रत्येक निशासोबत होतं नसते. प्रत्येक निशाच्या वाट्याला त्यांचे प्राण वाचवण्यासाठी कोणी धावून येत नाही आणि प्रेमात दगा मिळाल्यानंतर अनेक निशा आत्महत्येचा मार्ग निवडतात कारण त्यांना त्यावेळेस सावरायला कुणी जवळ नसतो, समजावून सांगायला कोणी नसतो आणि म्हणून अशा अनेक मुली अशा धोकेबाजांच्या चालीवर बळी पडतात पण मला पुन्हा माझ्यासारख्या निशा घडू द्यायच्या नाहीत. त्यामुळेच मला त्याला अद्दल घडवायची आहे."

"निशा मी एक बोलू का? माफ कर, माझ्याकडून पण चूक झाली आहे पण बाळा, आता तुझे लग्न ठरले आहे तर मला असं वाटतं की तू सगळं विसरून जाऊन तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात कर. पंकज खरंच छान मुलगा आहे, तो तुला चांगले आयुष्य देईल मग तू का त्या नालायक नितिनच्या मागे लागली. अग जर पंकजच्या घरी किंवा त्याला याबद्दल कळले ना तर तुझे लग्न मोडेल आणि नंतर माहिती नाही दुसरा कोणी मिळणार की नाही पण त्यापेक्षा महत्त्वाचे जर मामाजींना हे कळले ना तर त्यांच्या मनावर आघात पोहोचेल." निशाचे बोलणे ऐकून भाऊजी तिला समजावू लागले.

"नाही भाऊजी, मी आतापर्यंत बाबांना खूप दुखावले आहे पण आता नाही. त्यांना काय सांगायचं? कसं सांगायचं? ते मी बघून घेणार. राहिली गोष्ट पंकजजींची तर ते खूप छान आहेत आणि इतरांकडून कळण्यापेक्षा आधी मी त्यांना याबद्दल सगळं सांगणार आहे. त्यांना लग्न मोडायचं आहे की करायचं आहे हे सगळं मी त्यांच्यावर सोपवणार आहे. ते जे काही निर्णय घेणार तो मला स्वीकार असेल पण त्यांना फसवून, त्यांच्यापासून लपवून मी माझा संसार उभारणार नाही मग भलेही मी आयुष्यभर अविवाहित राहिले तरी चालेल." निशा निर्धाराने म्हणाली.

"गुड गर्ल! आता खरंच मला तुझा अभिमान वाटायला लागला आहे  निशु. तू जो काही निर्णय घेणार त्यात मी तुझ्या पाठीशी उभी राहणार." ताई निशाला मिठी मारत म्हणाली.

"थँक्यू ताई, तू नसती तर कदाचित आज अनर्थ घडला असता. तू वारंवार मला समजून घेतेस. मी खूप नशीबवान आहे जी मला तुझ्यासारखी ताई मिळाली. आता मला थांबायचे नाही. जिथपर्यंत त्या नितिनला अद्दल घडवणार नाही तिथपर्यंत माझ्या जीवाला शांती मिळणार नाही."

"काय करायचे ठरवले आहेस तू?"

"मला सर्वात आधी पंकजजींसोबत बोलायचे आहे पण त्यांचा नंबर नाही माझ्याकडे."

"त्याची काळजी तू नको करूस, त्यांचा नंबर मी मिळवते. आई बाबाला येऊ दे घरी नंतर मी बाबांना कळू न देता त्यांच्याकडून नंबर घेते."

ते बोलत असतांनाच आई-बाबा आणि आजी घरी परतले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संभाषणाला विराम लावला. तिघेही नॉर्मल झाले आणि आई-बाबांकडे गेले. सगळे मिळून हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. आई आणि बाबा खूपच आनंदी होते. निशा गप्प गप्प होती. ताई अधून - मधून एखादा शब्द बोलायची. ताईने भाऊजींना इशारा केला तसे भाऊजी बाहेर निघून गेले. बाकी सगळे थोड्यावेळ गप्पा मारून आई - बाबा त्यांचा रूममध्ये जायला निघाले.

"बाबा, मला तुमचा मोबाईल द्या ना. माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपला आहे. हे बाहेर गेले आहेत,  मला एक वस्तू मागवायची आहे तर येतांना घेऊन यायला सांगते त्यांना."

जाणाऱ्या बाबांना आवाज देत निशाच्या ताईने त्यांच्याकडून मोबाईल मागितला. बाबांनीही काहीही आढेवेढे न घेता तिला त्यांचा मोबाईल देऊन टाकला आणि ते रूममध्ये निघून गेले. ते जाताचं ताईने पटकन कॉन्टॅक्ट लिस्ट काढली आणि तिथून पंकजचा नंबर मिळवला. तिने निशाला कागद, पेन आणायला सांगितले आणि त्यांनी पंकजचा नंबर लिहून घेतला.बाबांना समजू नये म्हणून ताईने भाऊजींना फोन लावून घरी बोलवले आणि तिने बाबांना मोबाईल परत नेऊन दिला. निशाला पंकजचा नंबर मिळाल्यानंतर हायसे वाटले. ती बस सकाळ उजाळण्याची वाट बघू लागली.


******"******


"हॅलो कोण?" सकाळी पंकज ऑफिसमध्ये निघून गेल्यानंतर त्याला एका नवीन नंबरवरून कॉल आला त्यामुळे त्याने रिसिव्ह करताच विचारले.

"हॅलो पंकजजी, मी निशा बोलत आहे." निशा कचरत म्हणाली.

"अरे व्वा! आज सूर्य कुठल्या दिशेने उगवला म्हणायचं? आज चक्क तू फोन केलास तेही स्वतःहून." तो तिची मस्करी करत म्हणाला.

"पंकजजी ऐका ना मला तुम्हाला भेटायचे आहे. जरा अर्जंट काम आहे. तुम्ही भेटू शकता काय?" तिने थेट मुद्द्याला हात घातला.

"ठीक आहे चालेल पण आता सध्या मी ऑफिसला आलो आहे. लंच ब्रेकमध्ये येतो तुझ्या घरी नंतर बोलूया." तो घड्याळाकडे बघत बोलला.

"नाही नाही घरी नको,आपण बाहेर भेटूया का?" ती घाबरत म्हणाली कारण घरी आई - बाबा दोघेही होते. त्यांच्यासमोर तिला बोलता आले नसते म्हणून तिने बाहेर भेटण्याबद्दल विचारले.

"बरं ठीक आहे चालेल. एखाद्या गार्डन किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटायचं का?"

"हो चालेल, गार्डनमध्ये भेटूया." नंतर तिने एका गार्डनचा पत्ता सांगितला. दोघांनीही किती वाजता भेटायचे हे ठरवले आणि त्यांनी फोन ठेवून दिला.

निशा ठरलेल्या वेळेवर गार्डनमध्ये पोहचण्यासाठी  निघाली. जायच्या आधी तिने पंकजला मेसेज टाकला होता. त्याचा पण लगेच रिप्लाय आला त्यामुळे ती त्याला भेटायला गार्डनमध्ये गेली. ती जेव्हा गार्डनमध्ये पोहोचली तेव्हा पंकज आधीच तिथे हजर होता. ती दिसताचं त्याने तिला गोड स्माईल दिली. ती पण त्याच्याकडे बघून हसली.

"सॉरी पंकजजी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला." ती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली.

"अरे यात काय तेवढं. होणाऱ्या बायकोने पहिल्यांदा मला भेटायची इच्छा बोलून दाखवली मग यावं तर लागणारच ना!" तो गोड हसत म्हणाला.

"पंकजजी मला तुम्हाला काही सांगायचे आहे......" असं म्हणून तिने सुरुवातीपासून त्याला सविस्तर सगळे सांगितले. अगदी अतुलसोबत लग्न तुटण्यामागील खरं कारण सुद्धा तिने सांगून टाकले. ती सांगत असतांना पंकज शांतपणे तिचे ऐकत होता. तिचं सगळं सांगून झाल्यानंतर ती शांत बसली आणि त्याच्या निर्णयाची वाट बघू लागली. तो तिच्याकडे पाठमोरा उभा होता. ती त्याच्या उत्तराची वाट बघत होती. बराच वेळ होऊनही तो एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे तिने एक उसासा टाकला आणि ती जायला वळली.

"निशा....." त्याने तिला आवाज दिला. तिने वळून त्याच्याकडे बघितले तर तो अजूनही तिच्याकडे पाठमोरा उभा होता. ती काहीही न बोलता तो काय बोलतो याकडे लक्ष लावून होती.

"माझे उत्तर न ऐकता चालली होतीस का?" यावेळेस तो तिच्याकडे वळला आणि एक - एक पाऊल तिच्या दिशेने टाकत तिच्या नजरेत बघत तिला विचारू लागला.

"सॉरी. बराच वेळ तुम्ही काही बोलले नाही त्यामुळे मला वाटले की तुम्हाला माझ्यासोबत बोलण्यात रस नाही आणि हे नाते पुढे न्यायचे नाही म्हणून मी जात होते."

"मी असा बोललो काय तुला?" तिने नकारार्थी मान हलवली.

"मग तुझं तूच ठरवून मोकळी झाली काय? हा हात मी आपल्या हातात घेतला आहे तो सोडून जाण्यासाठी नाही तर आयुष्यभर साथ निभावण्यासाठी." तो तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला. त्याच्या उत्तराने तिची कळी खुलली. तो पण तिला नजरेने आश्वस्त कले. ते आणखी थोडा वेळ तिथे बसले. ऑफिसची वेळ झाल्यानंतर पंकज ऑफिसला निघून गेला आणि निशा घरी परतली.

निशाला पंकजची साथ मिळाली होती त्यामुळे अर्धी बाजी तर तिने मारली होती. आता अर्धी बाकी होती जी ती लवकरच पूर्ण करणार होती....


क्रमशः

✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग

🎭 Series Post

View all