प्रेमाचा चकवा भाग - १४

ही एक सामाजिक कथा आहेप्रेमाचा चकवा भाग १४

विषय- कथामालिका


ताईने रूमचे लाईट ऑन करताचं समोरचे दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली...

"निशूssss" ती मोठ्याने किंचाळली कारण जेव्हा ती रूममध्ये गेली तेव्हा निशा फॅनला तिची ओढणी गुंडाळून तिच्या गळ्याला फास लावला होता आणि खाली टेबल पडून तिचे तडफडणे सुरू होते. तिच्या ताईने क्षणाचाही विलंब न करता तिच्या पायाला जाऊन पकडले. तिच्या आवाजाने भाऊजीसुद्धा पळत निशाच्या रूममध्ये आले. ते पण ते सगळं बघून हादरले होते, ते जागीच थिजले.

"अहो... तुम्ही तिथे बघत का बसलात? या ना मदतीला उतरवू लागा ना, मी अशीच पकडून राहते या पटकन." ताई भाऊजीला म्हणाली.


"हो.. हो आलो" ते शॉक लागून समोर बघत होते पण ताईच्या आवाजाने ते भानावर आले.


त्यांचे हात-पाय लटपट कापत होते पण तरी ते पुढे गेले. ते टेबलच्या आधाराने वर चढले आणि निशाच्या गळ्याला बांधून असलेल्या ओढणीची गाठ सोडली आणि तिला मोकळे केले आणि दोघांनीही तिला पकडून बेडवर ठेवले. गळा आवळल्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होत होता त्यामुळे ती खोकू लागली.


"निशू... निशू.... तू ठीक तर आहे ना?" ताईने काळजीने तिला विचारले.


"ताई कशाला वाचवलंस मला?  मला नाही जगायचे, मला मारायचे आहे, सोड मला" निशा रडत रडत  ताईच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. ताईला मात्र तिचे शब्द खूप लागले आणि रागसुद्धा खूप आला त्यामुळे तिने एक जोरदार तिच्या कानाखाली लगावली.


"इतका जीव वर आला आहे का तुझा? तुला लहानाचे मोठे केले ते ह्यासाठी काय? असा कुठला डोंगर कोसळला आहे तुझ्यावर कळू दे मला?" ताईने रागारागात तिला विचारले.


ताई आणि निशा बोलत असतांना भाऊजी आजूबाजूला बघू लागले. त्यांचं लक्ष टेबलावरील एका कागदावर गेलं आणि ते त्या दिशेने चालू लागले. त्यांनी तो कागद पाहिला तर त्यावर निशाचे अक्षरं होते. त्यांनी तो कागद हातात घेतला आणि वाचू लागले-


आई- बाबा मला माफ करा, मी खूप टोकाचं पाऊल उचलत आहे पण खरंच आता माझं प्रेम आणि लग्न या गोष्टीवरून विश्वास उडाला आहे, माझ्यापासून तुम्हाला नेहमी त्रास सहन करावा लागला, माझ्यामुळे तुमची मान शरमेने खाली झुकली, मी कधीच तुमची एक चांगली मुलगी ठरू शकले नाही. तुम्ही खूप विश्वास केला माझ्यावर पण मी त्या विश्वासाचा घात केला, आयुष्यात मी खूप अक्षम्य चुका केल्या आहेत.


ताई तुला पण सॉरी ग! तू खूप समजावले मला पण मी समजून घेतले नाही पण ताई आता माझी जगण्याची  इच्छा उरली नाही.


माझ्या मरणाला सर्वस्वी मी स्वतःचं जबाबदार आहे यात कुणाचाही दोष नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि जमल्यास आपल्या या नालायक मुलीला माफ करा.


तुम्ही घरी येणार तोपर्यंत मी या जगाचा निरोप घेतला असेन, माझ्या मरणाचं प्लिज जास्त वाईट वाटून घेऊ नका , माझ्या कर्माची फळं आहेत ही.


सगळे खुश रहा, मी तुम्हाला नाराज बघू शकत नाही. जमल्यास मला माफ करा...


तुमची नालायक मुलगी

निशा


भाऊजींना ते वाचताचं त्यांना सगळा प्रकार समजला होता. खरं तर ताई आणि भाऊजी यांना वाटलं की नितिन आणि निशामध्ये आता काहीच उरलेलं नाही परंतु ते चुकीचे होते हे त्या चिठ्ठीवरून समजून येत होते. भाऊजींना माहीत होतं नितिनच्या लग्नाबद्दल परंतु त्यांना या दोघांचे अजूनही संबंध असतील यापासून ते अनभिज्ञ होते त्यामुळे त्यांनी निशाला ते सांगितले नाही. त्यांना नितिनचा खूप जास्त राग आला. इकडे निशा ओक्साबोक्शी रडत होती आणि ताई तिला रागाने बोलत होती.

"काय झालं सांगशील का आता? अगं तुला इतके टोकाचे पाऊल घेतांना आमचा विचार आला नाही काय? जर आता मी वेळेवर आली नसती तर?" हा विचार करूनच ताईच्या अंगावर सरसरून काटा आला.

"ताई माफ कर मला, मी खूप चुकले, खूप चुकले ग! तुझं ऐकायला हवं होतं मला पण मी नालायक कधीच तुझं ऐकलं नाही, माफ कर मला आणि म्हणूनच माझ्या कर्माचे फळं म्हणून मला मरण हवं ग! मला नाही जगायचं आहे, माझी लायकीच नाही तुझी बहीण, आई-बाबांची मुलगी म्हणून घेण्याचा. मला मरायचं आहे ग! मला मरायचं आहे" निशा रडता - रडता ओरडून ओरडून म्हणत होती.


"अगं पण झालं तरी काय इतक्या टोकाचं पाऊल उचलायला ते तर सांग." ताईने पुन्हा ओरडून विचारले.


भाऊजीने ताईच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या हातात ती चिठ्ठी दिली. ताईने आधी नजरेने त्यांना काय आहे म्हणून विचारले तर त्यांनी सुद्धा नजरेने तिला वाच अशी खूण केली. ताई डोळे पुसत निशाच्या बाजूला बसली आणि ती चिठ्ठी वाचू लागली. चिठ्ठी वाचल्यानंतर तिला पण सगळा प्रकार समजून आला.


"निशा हे काय? यावरून वाटतं की नितिन आणि तुझे संबंध अजूनही होते पण मी त्या दिवशी विचारले तर तू नकार दिला, खोटं बोलली तू माझ्यासोबत? तुझे अजूनही त्याच्यासोबत भेटीगाठी सुरू होत्या काय, सांग मला?" ताईने निशाला पकडून रागात विचारले.


"हो ताई, आमचे कधीच संबंध संपले नव्हते ग कधीच. मी खोटं बोलले तुझ्यासोबत म्हणूनच म्हणते आहे ना की मला माझ्या कर्माचे फळं हवं आहे . फसवलं मला त्याने, त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं.  तो फक्त उपभोगत राहिला मला आणि मी पण त्याला उपभोगू दिलं. त्याच्या बोलण्या मागची कुटीरता नाही समजू शकले ग मी. त्याच्या मनातील घाणेरडेपणा पण नाही कळला मला कधी. आता सगळं संपलं ग. त्याचं लग्न पण झालं आणि त्याने मला वापरून टाकून दिले." तिने रडत रडत ताईला नितिनने तिला काय म्हटले ते सगळं सांगितले. भाऊजीच्या डोळ्यात रक्त संचारले.


"नालायक नितिन इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागेल असं वाटलं नव्हतं. मी सोडणार नाही त्या हरामखोराला...." भाऊजी रागारागात म्हणाले आणि आपल्या हाताच्या मुठी आवळत ते जाण्यासाठी वळले.

"कुठे निघालात तुम्ही? या सगळ्यामध्ये तुमचा पण तितकाच दोष आहे ना. जर पहिल्यांदाच तुम्ही त्याला संधी दिली नसती तर ही वेळ आली नसती पण दारूच्या हव्यासाचा पोटी आणि दारूच्या आधीन जाऊन तुम्ही त्या नालायक नितिनला सामील झाले आणि मला सुद्धा सोडून देण्याची धमकी देऊन मला माझ्या मनाविरुद्ध काम करायला भाग पाडले. तुमची बहीण असती तर असेच वागला असता का? माझी बहीण होती म्हणूनचं तुम्ही हे सगळे केले ना? त्यामुळेच या सगळ्यात तुम्ही पण गुन्हेगार आहात. नशेच्या आहारी जाऊन तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट माझ्या बहिणीचा सौदा  केला त्याच्यासोबत. लाज नाही वाटली तेव्हा तुम्हाला? आणि आता त्याचा जीव घेतो म्हणून निघाले. एवढीचं तळमळ तेव्हा दाखवली असती तर माझ्या बहिणीवर आज ही वेळ आली नसती. सुखी असती ती तिच्या जीवनामध्ये. तिला बरबाद करण्यामागे तुमचा पण तेवढाच हात आहे, समजलं." ताई रागामध्ये भाऊजीला बोलू लागली.


"सॉरी ग चुकलं माझं, मला नव्हतं माहित असं काही घडेल म्हणून." भाऊजी खाली मान घालून म्हणाले.


"तुमचं सॉरी ठेवा तुमच्याजवळ. तुमच्या सॉरी बोलल्याने सगळं काही व्यवस्थित होणार नाही आहे. तुम्हाला जाणीव आहे काय आज जर आपण वेळेवर पोहोचलो नसतो तर माझी बहीण जिवानिशी गेली असती म्हणूनच मला मगाशी थोडी शंका आली आणि तुम्हाला घरी घेऊन आले. बरं झालं मला ते सुचलं, नाही तर आज ही आपल्या डोळ्यांसमोर दिसली नसती.

आणि तू ग, कोणासाठी स्वतःला मारायला निघालीस त्या नालायक नितिनसाठी? तुझ्या जीव देण्याने त्याच्यावर काही फरक पडणार नाही कारण की तुझ्याविषयी त्याच्या मनात काहीच भावना नाहीत परंतु तुला अशा तरुण वयात पंख्याला लटकलेलं बघून आम्हाला किती वेदना होतील याचा विचार केला आहेस काय? आज आई - बाबा तुझं लग्न ते खूप चांगल्या व्यक्तीसोबत ठरलं म्हणून किती आनंदी आहेत, त्यांना हा धक्का सहन झाला असता काय याचा विचार केलंस? ज्या व्यक्तीला तुझी काडीचीही किंमत नाही त्या व्यक्तीसाठी तू सर्रास तुझा जीव द्यायला निघालीस पण आमचं काय ग? आमचं प्रेम तुझ्यासाठी कवडीमोल आहे काय? त्याची काहीच किंमत नाही?" ताईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.


" ताई मला माफ कर ग परंतु त्याच्यासाठी नाही मी तुमच्यासाठीच जिव द्यायला निघाले होते. मी किती चुकीचे होते हे आज मला समजले आहे आणि त्यामुळेच मी कुठल्या तोंडाने तुम्हाला सामोरे जाऊ हाच विचार करत होते. मी खचले आहे ग ताई, माझ्यात आता उभं राहण्याची ताकत नाही, या सगळ्याला सामोरे जाण्याची माझी हिंमत नाही म्हणून मला मरायचं होतं ग!" निशा रडत- रडत म्हणाली.


"पण जीव देणे हा एकमेव पर्याय नाही ना कुठल्याही गोष्टीचा. तू जीव देशील ग आणि मोकळी होशील पण ज्याने अपराध केलं त्याचं काय? तो पुन्हा अशीच दुसरी निशाच्या शिकारीला मोकळा फिरेल. त्याला असचं मोकाट सोडून तू आम्हा सर्वांना दुःखात टाकून निघाली होती... जरा थंड डोक्याने विचार कर." ताई तिला शांत करत म्हणाली. निशा थोडी शांत झाल्यानंतर ताईच्या बोलण्यावर विचार करू लागली.


क्रमशः

✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग

🎭 Series Post

View all