विषय - कथामालिका
पंकज आणि त्याची फॅमिली घरी निघून गेली. पंकजने तर त्याचा निर्णय दिला होता की त्यांना निशा पसंत आहे म्हणून बाबा खुश होते.
"काय हो? तुमचे काय विचार आहेत मुलाबद्दल?" ते जाताचं आईने विचारले.
"मला तर मुलगा आणि त्याची फॅमिली सज्जन वाटली." बाबांनी सांगितले.
"अहो दिसतं तसं नसतं बरं का! मी आधीही सांगितलं आहे की पूर्ण चौकशी केल्याशिवाय आपण काहीच निर्णय घ्यायचं नाही. जो अती गोड असतो तिथे नक्कीचं घोळ असतो." आई म्हणाली.
"हो रे बाबा, माहीत आहे मला. मी आधी चौकशी करणारचं आहे, माझ्या ओळखीतले एक तहसीलमध्ये आहेत आणि त्यांच्या भागातले पण आहेत. मी एक दोन ठिकाणी करतो विचारपूस. मी बस त्यांच्या होकाराची वाट बघत होतो, आता लागतो कामाला." बाबांनी सांगितले.
"हम्म..मला तर अजूनही काही तरी गौडबंगाल वाटते." आई शंकेने म्हणाली.
" तू झालीस पुन्हा सुरू, आता चौकशी करतो म्हंटलं ना मी मग बघू ना." बाबा थोडे वैतागून बोलले म्हणून आई गप्प बसली.
इकडे निशा पंकजच्या बोलण्यावर विचार करत बसली.
"किती छान विचार आहे त्याचे. मुलगा असूनही स्त्रियांचे दुःख किती चांगल्याप्रकारे समजतो. माझा घटस्फोट झाला पण मला त्याचं दुःख कधीचं झालं नाही कारण माझं प्रेम त्या व्यक्तीवर कधीचं नव्हतं. त्याने सगळं किती छान पद्धतीने समजावून सांगितले. मी मुलीच्या त्या दृष्टीने कधी विचार केलाचं नाही, ना मला काही फरक पडला.
माझं प्रेम फक्त आणि फक्त नितीनवर तर आहे. व्यक्ती आयुष्यात एकदाचं तर प्रेम करतो ना! नितीनचे पण किती प्रेम आहे माझ्यावर आणि पंकज ? तो तर मला खूप समंजस वाटतं आहे. खूप छान स्वभाव आहे त्याचा. इतक्या चांगल्या व्यक्तीला मी धोका नाही देऊ शकणार, मी कधी त्याला बायकोचं प्रेम नाही देऊ शकणार. मी त्याला नाही फसवू शकत. माझ्यापेक्षा चांगली बायको डिझर्व करतो तो. मी एक - दोन दिवसांत नितीनला लग्नाबद्दल विचारून बघते. एकदा आमचं लग्न झालं की सगळं ठीक होईल.
आई - बाबा थोडे नाराज होतील, रागावतील पण मी कसंही करून तयार करेन त्यांना. आई - बाबा आहेत माझे ते, कुठपर्यंत रागे भरणार? जेव्हा त्यांना मी नितीनसोबत खुश दिसणार तेव्हा त्यांचा राग नक्की जाणार. शेवटी मुलांच्या सुखात तर आई वडिलांचे सुख असते ना!
नेमका हा नितीन पण आता बाहेरगावी गेला आहे. नाही तर आताच लग्नासाठी विचारलं असतं त्याला म्हणजे बाबा पंकजला नकार द्यायला मोकळे." ती मनात बोलत होती. ती विचार करता करता झोपी गेली.
****************
पंकज येऊन ४-५ दिवस उलटून गेले होते. अजूनपर्यंत निशाच्या वडिलांनी काही निर्णय घेतला नव्हता. त्यांनी सगळीकडून विचारपूस केली होती. एका व्यक्तीकडून माहिती मिळवायची होती, ती मिळाली की ते निर्णय घेणार होते.
बाबा, आई आणि ताई पोर्चमध्ये बोलत बसले होते. तेवढ्यात बाबाचा मोबाईल वाजू लागला.
"हॅलो.... हा बोला रामटेके साहेब, मी तुमच्याचं फोनची वाट बघत होतो, काही माहिती मिळाली काय?" बाबांनी विचारले.
.............................
समोरच्याचे बोलणे ऐकून बाबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
"हो हो नक्कीचं! थँक्यु साहेब, तुम्ही माझं खूप मोठं काम केलंत." बाबा एकदम खुश झाले.
थोडं बोलून बाबांनी कॉल कट केला.
"काय हो, कुणाचा कॉल होता? खूप खुश दिसत आहात." त्यांना इतकं खुश झालेलं बघून आईने विचारले.
"आनंदाची गोष्ट आहे तर आनंद होणारचं ना?" बाबा म्हणाले.
"असं काय झालं बाबा? आम्हाला पण सांगा." ताईने कुतूहलाने विचारले.
"अग मी काही दिवसांपासून पंकजची चौकशी करायला घेतली होती. ऑफिसमधून, शेजारीपाजारी सगळ्यांनी त्याच्याबद्दल चांगलं सांगितलं आहे आणि त्याची फॅमिली पण छान आहे, सज्जन लोक आहेत म्हणून कळलं." बाबांनी सांगून टाकले.
" मला अजूनही गौडबंगाल वाटतोय", बाबाला पुढे बोलूही न देता आई मध्येच बोलली.
" झालं! अजूनही तुझं तेच बोलणं. गौडबंगाल त्याच्यात नाही तुझ्या डोक्यात भरलं आहे." बाबा काहीसे चिडत म्हणाले.
"मला असं का बोलता हो तुम्ही?" आई नाराजीने म्हणाली.
"मग काय बोलू? नेहमी तुझं तेचं ते सुरू आहे. मला काय बोलायचं आहे ते तरी ऐकून घे ना आधी" बाबा आवाज वाढवत म्हणाले.
"सॉरी..." आई खाली मान घालून म्हणाली.
"बाबा सांगा तुम्ही काय बोलत होते?" ताई गोष्ट आणखी बिघडण्याआधी विषय बदलवत म्हणाली.
"अग माझी सगळी माहिती तर काढून झाली होती पण तो ज्या एन. जी. ओ. साठी काम करतो तिथे भरपूर तरुण स्त्रिया असतात , पीडित असतात , मला हे जाणून घ्यायचे होते की तो तिथे त्यांच्यासोबत कसा वागतो? कसा राहतो?
त्याचे जे विचार त्याने आपल्या समोर मांडले होते, खरंच तो त्याप्रमाणे वागतो काय मला हे बघायचं होतं." बाबांनी माहिती पुरवली.
"मग काय कळलं तुम्हाला?" आईने विचारले.
"माझे एक परिचयाचे आहेत, रामटेके साहेब. त्यांच्या नात्यातले सुद्धा कुणी तरी त्या एन. जी. ओ. साठी काम करतो आणि पंकजला पण चांगल्याने ओळखतो म्हणून मी त्यांच्या करवी माहिती काढली. आता त्यांचाचं कॉल होता, ते बोलले मुलगा हा चमकदार हिरा आहे. साधी राहणी आणि उच्च विचासरणी असलेला आहे. त्याच्या बोलण्यात, वागण्यात सत्यता आहे. साहेब म्हणाले, अगदी डोळे मिटून द्या त्या मुलाला मुलगी, खूप सुखात ठेवेल तो तिला आणि घरचे लोक पण खूप समजदार आहेत. तर तेसुध्दा छान निभावून घेणार तिला, त्या घरात तिला काही त्रास होणार नाही. " बाबांनी माहिती पुरवली.
हे ऐकून आई आणि ताई दोघी पण खुश झाल्या.
"अग बाई देव पावला म्हणायचा." आईने दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार केला.
"बाबा हे तर खूप आनंदाची बातमी आहे हो, वाटलं नव्हतं असं झाल्यानंतर निशाला इतकं चांगलं स्थळ मिळेल म्हणून, पण खूप छान झालं." ताई म्हणाली.
"हो, मी आधी त्यांना कॉल करून होकार कळवतो म्हणजे घर बघायला यायचं आहे म्हणून सांगतो." बाबा म्हणाले.
"हो चालेल." दोघीही सोबत म्हणाल्या.
बाबांनी पंकजला कॉल केला.
" हा .. हॅलो काका..." फोन उचलताचं पंकज म्हणाला.
" हा पंकजराव मला थोडं बोलायचं आहे, वेळ आहे काय तुमच्याकडे?" बाबांनी विचारले.
" हो बोला ना!" तो म्हणाला.
"आम्हाला तुमचे घर बघायला यायचे आहे आणि शक्यतो तेव्हाचं लग्न पण ठरवू." बाबांनी सांगितले.
"चालेल, मी आई - बाबांना विचारून सायंकाळपर्यंत कळवतो, चालेल ना?" त्याने विचारले.
"हो चालेल, निवांत विचारा काही घाई नाही." बाबा म्हणाले.
" ठीक आहे, घरी गेल्यानंतर कळवतो." तो म्हणाला.
दोघांनी कॉल ठेवून दिला.
" काय बोलले हो?" आईने विचारले.
" घरी गेल्यावर कळवतो म्हंटले." बाबांनी सांगितले.
"यावेळी तरी सगळं निर्विघ्न पार पडू दे आणि माझ्या मुलीचं आयुष्य मार्गी लागू दे. मी देवाजवळ साखर ठेवून येते, आई लगेच देवघरात जाऊन देवापुढे साखर ठेवून हात जोडून प्रार्थना करू लागली." आई हात जोडत म्हणाली.
ताई, बाबा पण प्रार्थना करू लागले. या सगळ्यापासून निशा मात्र अनभिज्ञ होती.
सायंकाळी पंकजने घरी विचारून येत्या रविवारी त्यांना यायला सांगितले, बाबा खुश झाले.
निशा आणि ताई रात्री शतपावली करत होत्या.
"निशा, तुला एक सांगायचं आहे." ताई म्हणाली.
"हा बोल ना ताई" निशा हसत म्हणाली.
"या रविवारी आम्ही पंकजच्या घरी जात आहोत, कदाचित लग्न ठरवून येऊ." ताईने सांगितले.
"काय?" निशाला जबरदस्त शॉक लागला.
"हो आजचं बाबा त्यांच्यासोबत बोलले. " ताईने सांगितले.
निशा काहीच बोलली नाही, तिच्या मनात चलबिचल चालू झाली, तिला लवकरात लवकर पावलं उचलायची होती.
त्यासाठी तिला आधी नितीनसोबत बोलायचे होते पण तो काही दिवसापासून गावाला गेला होता म्हणून त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता.
निशा काही बोलत नाही आहे म्हणून ताई तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागली.
"एक विचारू निशा?", ताईच्या चेहऱ्यावर आता काळजी दिसू लागली.
"हो विचार ना." निशा म्हणाली.
"तुझं आणि नितीनचं अजूनही सुरू आहे काय?अजूनही तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात काय?" ताईने विचारले.
ताईच्या अचानक केलेल्या या प्रश्नाने निशाला धडकी भरली. ती बोटांशी चाळे करू लागली. तिचा घसा कोरडा पडला. काय उत्तर द्यावे म्हणून ती विचार करू लागली.
" ना... नाही ताई, आता आमचं काहीच कॉन्टॅक्ट नाही." ताईची नजर चोरत ती अडखळत बोलली.
" नाही आहे तेच बरं आहे. मला तो तुझ्या योग्य कधी वाटलाचं नव्हता पण तुझं प्रेम होतं म्हणून गप्प होते.
हे बघ निशु, पंकज खूप छान मुलगा आहे. तुला खूप खुश ठेवणार ग! सगळं विसरून दोघेही छान गुण्या गोविंदाने नांदा. आम्हाला आणखी काय हवं? आई - बाबा पण खूप खुश आहेत, पुन्हा अशी काही वागू नकोस ज्यामुळे ते दुखावले जातील, खूप प्रेम आहे आम्हा सगळ्यांचे तुझ्यावर, तुला नेहमी सुखात बघायचं आहे आम्हाला, आणि ते सुख तुला नक्की पंकज देईल असं वाटतं, बस तू त्याला प्रेम दे मग बघ त्या बदल्यात तो किती भरभरून प्रेम देतो तुला, भूतकाळात अडकून राहू नकोस काही मिळणार नाही, पंकजच्या रूपात उज्वल भविष्य तुझ्या समोर आहे त्याला लाथाडू नकोस... ताई तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती.
हे बघ निशु, पंकज खूप छान मुलगा आहे. तुला खूप खुश ठेवणार ग! सगळं विसरून दोघेही छान गुण्या गोविंदाने नांदा. आम्हाला आणखी काय हवं? आई - बाबा पण खूप खुश आहेत, पुन्हा अशी काही वागू नकोस ज्यामुळे ते दुखावले जातील, खूप प्रेम आहे आम्हा सगळ्यांचे तुझ्यावर, तुला नेहमी सुखात बघायचं आहे आम्हाला, आणि ते सुख तुला नक्की पंकज देईल असं वाटतं, बस तू त्याला प्रेम दे मग बघ त्या बदल्यात तो किती भरभरून प्रेम देतो तुला, भूतकाळात अडकून राहू नकोस काही मिळणार नाही, पंकजच्या रूपात उज्वल भविष्य तुझ्या समोर आहे त्याला लाथाडू नकोस... ताई तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती.
ते गाणे ऐकले आहेस ना?
जिवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे..
त्याप्रमाणे तू पण झालं गेलं विसरून जा आणि जीवनाची नव्याने सुरूवात कर." ताई तिला समजावण्याच्या सुरात म्हणाली.
निशाने फक्त मान डोलावली, त्या झोपायला निघून गेल्या.
रुममध्ये जाऊन निशाने नितिनला कॉल लावला पण लागला नाही, तिने वैतागून मोबाईल बेडवर फेकला.
"कुठं गेला नितिन तू ? आता तुझी खूप गरज आहे रे, ये ना लवकर... तुझ्या निशाला तुझी खूप गरज आहे रे! जिथं कुठं असशील प्लिज लवकर ये, वेळ निघून जायच्या आधी ये." निशा रडता रडता स्वतःशीच पुटपुटली.
ती बराच वेळ उशीत तोंड खुपसून रडत होती, रडता रडता कधी तरीच तिला झोप लागली.
क्रमशः
✍️ अश्विनी कांबळे
ठाणे विभाग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा