विषय- कथामालिका
निशाचे बाबा विवाह मंडळाच्या ऑफिसमधून आनंदाने घराच्या दिशेने निघाले. ते घरी आले तेव्हा निशाची आई बाबाची वाट बघत बसली होती. बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांना स्थळ आवडलं असावं असं जाणवत होतं.
"काय झालं हो? काय म्हणाले मंडळवाले? कसा आहे मुलगा? कुठला आहे? काय करतो? नाव काय?"
आईंनी बाबांवर आल्या आल्या प्रश्नाचा भडिमार केला.
"अरे हो हो सांगतो सगळं आधी श्वास तर घेऊ दे मला." बाबा हसत म्हणाले.
"सॉरी." आई पण हसू लागली.
"तर मुलाचं नाव पंकज गायतोंडे, आपल्या गावातील तहसील कार्यालयात क्लार्क आहे...." असं म्हणून बाबांनी आईला मंडळाच्या ऑफिसमध्ये जे बोलणे झाले ते सांगितले.
"काय? अविवाहित आहे तरी बघायचं म्हणतो? नक्की मुलामध्ये काही तरी व्यंग असेल. लंगडा, लुळा, किंवा मग आंधळा? नाही तर मोठी बिमारी असेल त्याला, नाही तर पक्का व्यसनी असेल म्हणूनच तयार झाला." आईने एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित केले. बाबांनी तिच्या विचारांना बघून डोक्यावर हात मारून घेतला.
"अहो सौ, ब्रेक द्या जरा तुमच्या तोंडाला. वाटेल ते बोलतचं सुटलात." बाबा हसत म्हणाले.
" काय करू एकदा झटका बसल्यावर तसेच विचार येणार ना? आणि तसचं काही तरी घोळ नक्की असेल. नाही तर तितका जॉबवाला, अविवाहित मुलगा कसा काय आपल्या मुलीला होकार देणार? त्याला तर कोणीही मिळू शकते. अहो मी आधीच सांगून ठेवते, या वेळेस पूर्ण चौकशी केल्याशिवाय होकार कळवायचा नाही हा!" आई म्हणाली.
"अरे हो बाबा, कळते मला सगळं. आधी त्याला बघायला तर येऊ दे. फोटो बघून पसंत केले म्हणजे होकार दिला असा तर अर्थ होत नाही ना?" बाबा थोडे वैतागत म्हणाले.
"काय करणार शंका येते हो थोडी , असचं कुणाच्या बोलण्यावर फसू नये." आई म्हणाली.
"स्वतःच्या मुलीवर शंका नाही येत काय कधी तुला?" बाबा आईकडे रोखून बघत बोलले. त्यांना आईच्या बोलण्याचा थोडा रागच आला होता.
"म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला?" आईने न समजून विचारले.
"तुला चांगलचं कळतं मला काय म्हणायचे आहे ते?चारित्र्य हा स्त्रीचा सर्वात मोठा दागिना असतो. एकदा त्या मुलीने तो गमावला की तिचं समाजात स्थान कमी होतो. अशा स्त्रियांकडे समाज तुच्छ नजरेने बघतात म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपला हा दागिना जपून ठेवणे गरजेचे असते. एकदा चारित्र्य गमावले तर इज्जतही गमावली म्हणून समजा. ज्या मुलींचे बलात्कार होते त्यात त्या मुलीचा काही दोष नसतो तरी आपला समाज त्या मुलीला तुच्छतेची वागणूक देतात. तिच्या शरीरावर एकदा बलात्कार होतो पण समाजातील लोक तिच्या मनावर वारंवार बलात्कार करीत असतात. जेव्हा तिला सर्वात जास्त आपुलकीची, आपलेपणाची गरज असते तेव्हाच समाज तिच्याकडे पाठ फिरवतो. इथे तर तुमच्या मुलीने स्वतःच्या मर्जीने सगळं केलं आहे मग तिला सोडणार लोकं? पुरुष कसाही वागला तरी चांगलं पण स्त्री? स्त्री नेहमी चारित्र्यवान असायला हवी, ती धुतल्या तांदळासारखीं हवी असा विचार करणारा आपला समाज आहे मग तिला कलंकित करणारा पुरुषच असतो हे ते विसरून जातात.
लंकेत राहून आल्यावर सीतासारख्या पवित्र स्त्रीला सुद्धा अग्नी परीक्षेला सामोरे जावे लागले त्यात तुझी मुलगी तर दूर-दूर पर्यंत काहीच नाही. ज्या गोष्टीला लग्नानंतर समाज मान्यता असते तिचं गोष्ट तुमच्या मुलीने आधी करून मोकळी झाली आहे, ही चूक नाही तर गुन्हा आहे गुन्हा!
त्यात तितकं विचारूनही मुलाचं नावसुद्धा सांगायला तयार नाही तर तुम्हाला तिच्यावर शंका येत नाही काय?
आणि कशावरून ती सुधारली असेल? कशावरून तिचे अजूनही त्या मुलासोबत संबंध नसतील? जिने आधी तसं करतांना आपला विचार केला नाही ती आता तरी कशाला करेल?" बाबा परखड शब्दात पण खरं बोलत होते.
आणि कशावरून ती सुधारली असेल? कशावरून तिचे अजूनही त्या मुलासोबत संबंध नसतील? जिने आधी तसं करतांना आपला विचार केला नाही ती आता तरी कशाला करेल?" बाबा परखड शब्दात पण खरं बोलत होते.
"अहो हे काय अभद्र बोलत आहात तुम्ही? ती तसं काही करणार नाही आता." आई बाबाच्या बोलण्याने जरा घाबरून गेली.
"कशावरून म्हणजे? फक्त आपली मुलगी आहे म्हणून तिच्यावर इतका विश्वास? आणि फक्त तो मुलगा अविवाहित आहे म्हणून माहीती झालं तर इतके सारे प्रश्न निर्माण झाले तुझ्या मनात. एकदा आपल्या मुलीलाही विचारून बघ काही गोष्टी." बाबा रागात म्हणाले.
त्यांच्या बोलण्यावर आई निःशब्द झाली. तिने खाली नजर घातली.
तितक्यात बाबांचा फोन खणाणला.
" हा बोला साहेब." बाबा शक्य तेवढा नॉर्मल आवाज ठेवत म्हणाले.
" निमजे साहेब, मी हे सांगायला फोन केला की पंकज आणि त्याची फॅमिली या रविवारला कांद्या पोह्याचा कार्यक्रम करू म्हणत आहेत तर तुम्हाला जमणार काय? म्हणजे तुम्ही फ्री आहात ना? काही काम असेल तर त्यांना तसं निरोप द्यायला बरं." त्यांनी माहिती पुरवली.
"अहो चालेल, आम्हाला काहीच हरकत नाही, कळवा त्यांना तसं" बाबा खुश होत म्हणाले.
"ठीक आहे मग मी तुमचा नंबर त्यांना पाठवतो, नंतर तुम्ही परस्पर ठरवून घ्या कधी आणि कसं यायचं ते, चालेल ना?" त्यांनी पुन्हा एकदा बाबांना विचारले.
"हो चालेल, चालेल." बाबा हसतचं म्हणाले.
"बरं मग ठेवतो फोन." ते म्हणाले.
"ठीक आहे चालेल." असं म्हणून बाबांनी फोन कट केला.
"कुणाचा फोन होता हो?" आईने विचारले.
" संस्थेवाल्यांचा." बाबांनी सांगितले.
"काय म्हणाले?" आईने कुतूहलाने विचारले.
" येत्या रविवारी यायचं म्हणत आहेत पाहुणे मंडळी." बाबांनी सांगून टाकले.
" काय खरंच?" आईने अविश्वासाने विचारले.
"हो पण त्या आधी तुमच्या लेकीसोबत बोलायचं आहे, बोलवा तिला." बाबांनी निशासोबत बोलायचे ठरवून तिला बोलवायला सांगितले.
आई निशाला बोलवायला गेली, थोड्या वेळात आई आली आणि तिच्या मागे दबकत दबकत निशा आली.
" निशा ssss माझ्या समोर ये इकडे." तिला मागे लपलेलं बघून बाबांनी तिला म्हटले.
निशा खाली मान घालून बाबांसमोर जाऊन उभी झाली.
" मी तुला आज जे काही विचारेल त्याचं खरं खरं उत्तर देशील?" बाबांनी करारी आवाजाने तिला विचारले. त्यामुळे निशा चांगलीच हादरली.
"बोल पटकन..." बाबा ओरडून म्हणाले.
"ह... ह.. हो." निशाने घाबरत घाबरत उत्तर दिले.
" तुझे अजूनही त्या मुलासोबात भेटीगाठी सुरू आहेत काय?"
बाबांचा रोख बघता हा प्रश्न विचारल्यावर निशा हादरून गेली. तिच्या मनात भीती संचारली की आपण खरं बोललो तर बाबा आपल्याला आणि नितिनला जिवे मारणार तर नाही? म्हणून ती काय उत्तर द्यावे हा विचार करत गप्प बसली.
"मी काय विचारतो आहे?" ती काही बोलत नाही आहे म्हणून त्यांनी पुन्हा विचारले.
"ना.. नाही बाबा." ती घाबरत घाबरत म्हणाली.
"खरं ना?" त्यांनी पुन्हा एक भुवई उंचावून विचारले.
" हो बाबा...." ती खाली बघत बोलली कारण बाबाच्या नजरेत नजर मिळवून ती खोटं बोलू शकली नसती.
( कसं असतं ना, आपण एखाद्यावर एखाद्या गोष्टी बाबत बंधन घालत असलो की समोरची व्यक्ती ते बंधनाचे पाश तोडून मुक्त संचार करायचा प्रयत्न करीत असते.
आपण एखाद्याला अमुक अमुक गोष्ट करायची नाही म्हणून निर्बंध घातले की तो नेमकी तिचं गोष्ट करतो कारण त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते त्या गोष्टी बाबत की ही गोष्ट करण्यापासून आपल्याला का अडवले जात आहे? म्हणून मग तो तिचं गोष्ट करायला प्रवृत्त होत असतो , हा मानवी गुणधर्म आहे.
निशाच्या बाबतीत पण तसचं झालं. जर तिला प्रेमाने, विश्वासात घेऊन सगळं विचारलं असतं तर कदाचित तिने खरं सांगितले असते पण असं रागात विचारल्यानंतर भीतीपोटी तिने खोटं बोलणे पसंत केले. याचा परिणाम काय होणार ते येणारा काळचं सांगेल. )
"हेच योग्य राहणार तुझ्यासाठी कारण या रविवारी तुला बघायला पाहुणे मंडळी येत आहेत. जास्त नखरे न करता गपगुमान तयार राहायचं. आई जे सांगेल ते करायचं. एकदा माफ केलं तुला पुन्हा करणार नाही. जर त्या मुलाचा पत्ता मला लागला ना तर त्याचा आणि तुझा दोघांचा जीव घेईल. मग विसरून जाणार मी की तू माझी मुलगी आहे, समजलं ना?" बाबा दरडावत म्हणाले.
मुलगा बघायला येणार ऐकून निशाच्या पायाखालील जमीन सरकली कारण तिला वाटत होतं की आताचं घटस्फोट झाला तर इतक्यात तिच्या घरचे कुणी लग्नाचा विचार करणार नाही आणि तिला नितीनसाठी त्यांचे मन वळवता येईल पण इथे भलतचं घडत होते. ती काही न बोलता रूममध्ये निघून गेली पण तिच्या डोक्यात सारखे विचार सुरू होते.
निशा सतत बाबांच्या बोलण्याचा विचार करू लागली. तिला बाबाची भीती पण वाटायची आणि मला हे लग्न करायचं नाही. मला नितीनसोबतचं लग्न करायचं आहे असं ओरडून सांगावसं वाटत होतं पण तेवढी हिंमत तिच्यात नव्हती. तिची बुद्धी सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेली होती, ती प्रेमात पूर्ण आंधळी झाली होती, तिला नितिनशिवाय कुणीच सुचत नव्हतं.
आपण लग्न करू तर फक्त नितिनसोबतचं अशी गाठ तिने स्वताच्या मनाशी बांधली होती. अतुलच्या जाण्याने तिला आपला रस्ता मोकळा झाला असे वाटत होते. आता नितीनला आणि मला एक होण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही, देव आमच्या मदतीला आहे असे तिला वाटत होते पण आज तिच्यासमोर येणारा मुलगा संकट बनून उभा ठाकला होता. तिला तो आपल्या मार्गावरील अडथळा वाटायला लागला.
कसंही करून या संकटातून मार्ग काढणे गरजेचे होते पण तिला काय करू, काय नाही असे विचार तिच्या मनात येत होते पण कोणता मार्ग तिला सापडत नव्हता. विचार करून करून तिचं डोकं फुटण्याची वेळ आली होती.
ती देवाला मदतीसाठी धावा करत होती. रात्रभर विचार करून तिला कधी तरीच झोप लागली.
ती देवाला मदतीसाठी धावा करत होती. रात्रभर विचार करून तिला कधी तरीच झोप लागली.
क्रमशः
✍️ अश्विनी कांबळे
ठाणे विभाग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा