Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रेमाचा चकवा भाग - ९

Read Later
प्रेमाचा चकवा भाग - ९


प्रेमाचा चकवा  भाग - ९

विषय - कथामालिका


निशाचा घटस्फोट होऊन ६ महिने उलटून गेले. तिचे आणि नितिनचे रोज भेटणे व्हायचे कारण बाबांनी तिच्या वरचा पहारा कमी केला होता. ती त्याला भेटायची ह्यापासून घरचे सगळे अनभिज्ञ होते अगदी ताईसुद्धा. सगळ्यांना ती सुधारते आहे असचं वाटलं. निशाचा घटस्फोट झाल्याने तिच्या आई - बाबांच्या चिंतेत भर पडली होती.


आई - बाबा सोफ्यावर बसून चर्चा करत होते.


"अहो ६ महिने उलटून गेले हो. तरूण मुलीला असं घरी तर बसवून नाही ना ठेवू शकत आपण?" आई म्हणाली."हो बरोबर बोलत आहेस तू." बाबाला पण आईचे म्हणणे पटले."आपल्याला आता घाई करावी लागेल, स्थळं बघावी लागतील, आता परिस्थिती पण वेगळी आहे." आई म्हणाली."हो ना, आता योग्य वर मिळेल काय असा पण विचार येतो आहे." बाबा हताशपणे म्हणाले."यात काय हो विचार करायचा? आता आपलीच मुलगी घटस्फोटित आहे म्हंटल्यावर तिच्यावर डाग लागला आहेच तर आता बीजवर बघावं लागेल. तुमच्या ओळखीत कुठल्या विवाह संस्थेवाले असतील तर विचारून बघा कुणी घटस्फोटित किंवा विधुर मुलगा. मुलं असतील त्याला तरी चालेल. बस दोन वेळचं पोटभर अन्नपाणी मिळेल अशा घरातील मुलगा बघा आणि आपल्या निशाला खुश ठेवू शकेल असा बघा." आईने सुचविले."हो आहेत एक - दोन विवाह मंडळवाले लक्षात. उद्याच जाऊन त्यांना निशाचा फोटो आणि बायोडाटा देऊन येतो, बघू काय म्हणतात तर.  पूर्व कल्पना पण देऊन येईन, जे होईल ते बघू." बाबा काहीसं ठरवून म्हणाले."हो बरोबर बोलत आहात, पण या वेळेस पूर्ण माहिती काढूनच लग्नाला होकार द्यायचा असं माझं मत आहे, मागच्या वेळेसारखं नको." आईने सांगितले."काय झालं मागे? त्याचा दोष नव्हताच मुळी. शेण आपल्या मुलीने खाल्लं होतं, त्याला बोलून काय फायदा जेव्हा आपलेच नाणे खोटे निघाले." बाबा भडकत बोलले."अहो मान्य आहे मला आपली मुलगी चुकली तेव्हा पण म्हणून तेच ते घोळत बसण्यात तथ्य आहे काय? तिला सुधारण्याची संधी तर द्यायला हवी आणि तसंही मला नाही वाटत आता तिचं बाहेर काही असेल म्हणून. तिला पण आई - बाबाच्या इज्जतीची काळजी असेलचं ना!" आई निशाची बाजू घेत बोलली."इतकीचं काळजी असती तर आधी तशी वागलीचं नसती." बाबा तिरसटपणे म्हणाले."अहो चुकली हो ती पण आपलंच लेकरू आहे ना ती मग तुम्ही तरी एकदा मोठं मन करून माफ करा तिला.  असं तिरसटपणे नका हो वागू. खूप प्रेम आहे तिचं तुमच्यावर. कोमेजून जाईल ती पोरं." आई त्यांना विनवू लागली." बघू, तुम्ही काय आई ना तिचे, मुलींचे हजार चुका पदरात घेणार तुम्ही पण माझं तसं नाही ना, मला वेळप्रसंगी कणखर होऊन निर्णय घ्यावा लागतो, दोघेही सारखं वागून चालत नाही. अशाने ती आणखी चुका करत जाणार." बाबा म्हणाले परंतु त्यांच्या बोलण्यातील ओलावा आईला जाणवला.तेसुद्धा निशावर खूप प्रेम करत होते. जरी व्यक्त करत नसले तरी ते समजत होते. तिच्यासोबत असं वागतांना त्यांना पण त्रास होत होता परंतु ती जे वागली ते चुकीचे होते याची तिला जाणीव करून देणे त्यांना गरजेचे होते त्यामुळे ते तसे वागत होते."बरोबर आहे तुमचं. पण..."आईने एक उसासा घेत म्हटले.दोघेही काही वेळ शांत बसून विचार करत होते. बाबांनी मनाशी काहीतरी निर्धार केला आणि उठून बाहेर निघून गेले. बाबा घरून सरळ विवाह मंडळाच्या ऑफिसमध्ये गेले.  तिथे एका टेबलवर एक गृहस्थ बसून होते. त्यांनी बाबांना बघून स्मित हास्य केले."अरे या या निमजे साहेब. कसं काय येणं केलं इकडे? बसा आधी, मी चहा मागवतो." कार्यकारी अधिकारी म्हणाले.निशाचे बाबा त्यांच्या समोरच्या चेअरवर बसले." काही नाही हो साहेब, जरा मुलीच्या लग्नासाठी स्थळ बघत आहे म्हणून तुमच्याकडे आलोय." बाबांनी सांगितले."अच्छा! मुलीचा बायोडाटा आणि पासपोर्ट साईज फोटो आहे काय जवळ?" त्यांनी विचारले."हो आहे ना."  असं म्हणून बाबांनी खिशातून बायोडाटाची झेरॉक्स प्रत आणि एक फोटो काढून दिला."हा फॉर्म घ्या आणि इथे माहिती भरा आणि ५०० रु. फी लागेल." ते त्यांच्यापुढे एक फॉर्म सरकवत म्हणाले.बाबांनी फॉर्म घेतला आणि माहिती भरायला सुरुवात केली."हे घ्या फॉर्म झाला भरून आणि ही फी." असं म्हणून त्यांनी फॉर्म आणि पैसे दिले."ठीक आहे....त्यांनी फॉर्मवर एक नजर टाकली."हे काय? तुम्ही मुलीचं वैवाहिक स्थिती \"घटस्फोटीत\" लिहिले आहेत?" त्यांनी आश्चर्याने विचारले." हो बरोबर आहे. घटस्फोट झाला आहे तिचा." बाबांनी सांगितले."माफ करा पण घटस्फोटाचे कारण कळू शकेल काय?" त्यांनी विचारले."हो, ते म्हणजे हे... हे.."  बाबा थोडे कचरत बोलत होते. आपल्या मुलीची बदनामी आपल्याच तोंडाने कशी करणार ना?"अहो समोरच्या पार्टीने विचारल्यानंतर सांगायला तर हवं ना? म्हणून विचारतो आहे. लग्नानंतर कधी झाला घटस्फोट?" त्यांनी बाबांची चलबिचल लक्षात घेऊन सांगितले."४ महिन्यात." बाबा म्हणाले."बापरे! इतक्या लवकर. का?" त्यांनी कुतुहलाने विचारले."ते मुलाच्या घरची मंडळी बरोबर नव्हती." बाबा अडखळत खोटं बोलले."बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. हल्ली घटस्फोट पण कॉमन झाले आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून हल्लीची मुलं घटस्फोट घेतात." ते म्हणाले."हम्म्म." बाबा कसंनुसं हसले."तुमचं फोन नंबर तर आहेच ना इथे, वरून तुम्ही अपेक्षा पण लिहिल्या आहात. त्या अपेक्षेप्रमाणे स्थळ आले की तुम्हाला कळवतो." त्यांनी सांगितले."ठीक आहे साहेब चालेल, बरं आता येऊ मी?" बाबांनी विचारले."हो ठीक आहे." ते म्हणाले.निशाचे बाबा तिथून निघून घरी गेले.  घरी जाऊन आईला सगळं सांगितले. आता दोघेही कधी एकदा मंडळातून फोन येतो म्हणून वाट बघू लागले.पंधरा दिवस असेच निघून गेले. या दिवसात त्यांना एक पण कॉल आला नव्हता म्हणून आई थोडी चिंतेत होती."अहो काय झालं हो? त्या मंडळवाल्यांची काही खबर?""नाही हो, धीराने घ्या जरा. उचित स्थळ मिळालं तर करतील कॉल ते."


"तुम्हाला नाही कळणार हो आईची काळजी. खूप अपेक्षेने लग्न करून दिले मुलीचे. दोन दिवस होत नाही तर मुलगी घरी बसली. आता कधी एकदा का ती मार्गी लागली  की मी मोकळी."


"होईल सगळं ठीक." बाबा म्हणाले.तितक्यात त्यांचा फोन वाजू लागला. मंडळाच्या ऑफिसमधून होता कॉल. बाबांनी लगेच कॉल उचलला."हॅलो निमजे साहेब, अहो तुमच्या मुलीसाठी एक स्थळ आलं आहे, तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकता काय आता? म्हणजे सविस्तर बोलता येईल."" हो हो येतो, लगेच येतो."बाबांना बातमी ऐकून आनंद झाला. त्यांनी हसत फोन ठेवून दिले आणि आईला पण ही माहिती दिली.
आई पण ऐकून खुश झाली. तिने देवाजवळ साखर ठेवून प्रार्थना पण केली की हे योग जुळून येऊ दे म्हणून.बाबा मंडळाच्या ऑफिसमध्ये जायला निघाले. थोड्या वेळात ते ऑफिसमध्ये पोहचले."या या, मी तुमचीच वाट बघत होतो.""तुमचा फोन आला मी तसाच निघालो." बाबा चेअरवर बसत बोलले.


"हा बघा, हा त्या मुलाचा फोटो आणि बायोडाटा." त्यांनी एक फाईल काढून तिथल्या एका मुलाच्या फोटोकडे बोट दाखवत सांगितले.बाबांनी मुलाचा फोटो बघितला, नाकी डोळी नीटसं होता मुलगा. नंतर ते त्याचा बायोडाटा वाचू लागले. नाव, वय, जॉब पण तहसीलमध्ये क्लार्क होता , हेही चांगलं होतं.
माहिती जसे जसे वाचत होते बाबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत होता. ते समोर वाचू लागले, समोर वाचून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.


"हे काय? हा मुलगा तर अविवाहित आहे." बाबांनी विचारले."हो..."


"अहो पण आमची मुलगी तर..."


"हो माहीत आहे त्याला तुमच्या मुलीचा घटस्फोट झाला आहे ते."


" मग तरीही ?"

"हो, तरीही तो तयार आहे."


"पण का? त्याला तर एखादी चांगली अविवाहित मुलगी भेटू शकते ना? मग तरीही त्याला आमच्या मुलीमध्ये इंटरेस्ट का?"


"तुमचं बरोबर आहे, त्याला कोणतीही चांगली मुलगी मिळूच शकते, मी पण त्याला हाच प्रश्न केला होता."


" मग काय बोलला तो?"


"तो बोलला की जॉबसोबत तो जनजागृती करण्याचे काम पण करतो. त्यात विधवा पुनर्विवाह, घटस्फोटित महिला, बलात्कारी महिला यांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी तो कार्य करीत आहे. त्याने खूप आधीच निर्णय घेतला होता की या तीन प्रकारच्या कोणत्याही पीडित महिलासोबत तो लग्न करणार. दया म्हणून नाही तर तो जनजागृती करतो म्हणून जनजागृतीची सुरूवात त्याला त्याच्यापासूनच करायची आहे. जर तो दुसऱ्यांना सांगेल आणि स्वतः जर चांगल्या मुलीसोबत लग्न करणार तर लोकं त्याचे का म्हणून ऐकणार? ते तर बोलणार ना, इतकंच होतं तर तुम्ही का लग्न केले नाही? स्वतः चांगली मुलगी बघितली आणि आम्हाला ज्ञान शिकवायला आले."


"हम्म..."


"तो अजून बोलला की आपल्या समाजात स्त्री आणि पुरुषांसाठी किती वेगवेगळे नियम आहेत. एका मुलीचे दोन दिवसात घटस्फोट होऊ दे की दोन वर्षाने किंवा एखादीचा नवरा लवकर मरण पावलेला असू दे. आपण जेव्हा तिच्या लग्नाचा विचार करतो तेव्हा एखादा घटस्फोट झालेला, विधुर, मुलं असलेला पण चालेल बोलतो. अविवाहितवाला तर ऑप्शन नसतोच तिला दूरदूर पर्यंत पण पुरुषाच्या बाबतीत रूल वेगळे आहेत. पुरुष मंडळी कितीही वर्षाने लग्न करायला निघू दे , त्याला मुलं जरी असले तरी तो आधी एखादी अविवाहित मुलगी लग्नासाठी बघतो आणि आश्चर्य म्हणजे त्यांना मिळतात देखील मुली. मग हाच रुल मुलीसाठी का नाही? तिला का अविवाहित पुरुष मिळू नये? तिने स्वतःला डाग लागला म्हणून मिळेल त्याच्यासोबत लग्न करावं काय? तिला तिच्या मनाने जगायचा अधिकार नाही का? त्याला आपल्या लोकांचे हेच विचार मोडून काढायचे आहेत असं तो म्हणतो. मग बोला कसे आहेत मुलाचे विचार? समोर बोलणी करायची काय तुम्ही सांगा. तुम्ही हो बोलले तर कांद्या पोह्याचा कार्यक्रम करता येईल. योग जुळून आला तर आणखी परस्पर माहिती काढू शकता तुम्ही."


" विचार तर उत्तमच दिसत आहेत. आम्ही तयार आहोत. तुम्ही त्यांना विचारून समोरची बोलणी करा म्हणजे बघायचा कार्यक्रम वगैरे."


"हो करतो आणि तुम्हाला कळवतो तसं."" हो, येतो मी."बाबा  तिथून आनंदात घरी निघून गेले.   मुलाचे विचार ऐकून बाबा खूश झाले होते. जाता जाता ते मिठाई  घेऊन गेले.क्रमशः

✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Kamble

House Wife

मी एक गृहिणी आहे

//