प्रेमाचा चकवा ( भाग ७ )

ही एक सामाजिक कथा आहे

 प्रेमाचा चकवा  भाग ७


विषय- कथामालिका




बाबा हताश मनाने परतीच्या प्रवासाला लागले. घरी आई बाबांची काळजी करत होती. तिकडे काय झालं असेल? काय बोलणे झाले असेल? असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात घोळत होते.


बाबांना जाऊन बराच वेळ होऊनही ते अजूनही आले नाही म्हणून आई चिंतेत हॉलमध्ये येरझाऱ्या मारत होती. तेवढ्यात बाबा गेटमधून आत येताना दिसले. आईने लगेच त्यांना हात - पाय धुवायला पाणी आणून दिले.




बाबा हात - पाय धुवून आत आले. आईने टॉवेल दिला आणि प्यायला पाणी दिले. बाबा निवांतपणे बसून घटाघटा पाणी प्यायले, त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होते. आईने त्यांना थोडं रिलॅक्स होऊ दिलं. तोपर्यंत तिने चहा टाकला आणि त्यांच्यासाठी घेऊन आली.



"काय हो, काय झालं तिकडे? काय बोलले जावईबापू?"



" काही बोलायला भेटायला तर हवेत ना?"


" म्हणजे?"



"तिथे कुणीच नव्हतं."


नंतर बाबांनी तिथे गेल्यापासून काय काय झालं ते सांगितले फक्त ते भोवळ येऊन पडण्याचे सोडून.



"आता ग बाई!" आईने तोंडावर हात ठेवला.


"अहो म्हणजे आपण फसले गेलो काय?" आईने विचारले.


"मला पण तसचं वाटतं." बाबांनी हताशपणे म्हणाले.



"तरीच मला लग्न ठरलं तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटत होते, आपण घाई करत आहोत काय असं वाटलं, ना त्या मुलाची चौकशी, ना विचारपूस केली. बस नोकरी आहे आणि एकुलता एक आहे म्हणून होकार दिला. आता कसं होणार हो आपल्या निशुचं?"


"मी पण तोच विचार करत आहे."



"अहो सहारे भावोजींना विचारा ना, त्यांना माहिती असेल. त्यांनीच तर स्थळ सुचवलं होतं ना!"



"हो हो त्यांना विचारून बघतो, त्यांना बोलावून घेतो घरी."


असं म्हणून बाबांनी सहारे सरांना कॉल लावला. एक - दोन रिंगमध्ये त्यांनी कॉल उचलला.


"बोला निमजे साहेब, कशी काय आठवण आली आज?" सहारे सर हसून म्हणाले.



"सर सॉरी तुम्हाला थोडी तसदी देतोय पण वेळ असेल तुम्हाला तर घरी येऊ शकता काय? थोडं बोलायचं होतं."



"हो येतो ना पण काय झालं? सगळं ठीक आहे ना म्हणजे असं अचानक बोलावलं"



"घरी या मग बोलू यावर."



"ठीक आहे पंधरा मिनिटात पोहचतो तिकडे."



"ठीक आहे." एवढं बोलून त्यांनी कॉल कट केले.



"काय म्हणाले हो भावोजी?"



"येत आहेत थोड्या वेळात."



आई - बाबा बोलत असताना सहारे सर आले. आई आत चहा पाण्याचं करायला किचनमध्ये गेली.



" या सर, या बसा."



"काय झालं हो निमजे साहेब, असं तडकाफडकी का बोलावलं?"



"कुठून सुरुवात करू काही कळत नाही."



"जे असेल ते नि:संकोच बोला."




बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागले. अगदी लग्नापासून ते फोनवरचे बोलणे, त्यानंतर गावाला गेल्यावर मिळालेली माहिती, फोन न लागणे सगळं सांगितले.



"बाप रे इतकं सगळं झालं? मला तर खूप सज्जन वाटले होते ते सर. जेव्हा आमची एका ट्रेनिंगमध्ये ओळख झाली तेव्हा एक तर कास्ट सारखी होती वरून त्याचा स्वभाव पण मला आवडला म्हणूनच तर तुमच्या मुलीसाठी त्याचं स्थळ सुचवलं तुम्हाला. अरे देवा! हा तर आतल्या गाठीचा निघाला, आता काय करायचं?" ते काळजीत बोलले.


"आमचं पण चुकलं म्हणा, आम्ही पण माहिती काढायला हवी होती. तुमच्या संपर्कात त्यांच्या शाळेतील दुसरे सर नाहीत काय? म्हणजे त्यांचा पत्ता तरी मिळाला असता तर."



"नाही हो, त्यावेळेस त्या शाळेचे प्रतिनिधी म्हणून तेच आले होते म्हणून माझी काही ओळख नाही बाकीच्यांसोबत, मी एकदा कॉल करून बघतो त्याला."


सरांनी कॉल केला पण नॉट रीचेबल आलं.


"नाही लागला, आता एकच पर्याय दिसतो, पोलिस कंप्लेंट."


"नाही हो सर, मुलीच्या संसाराचा नाजूक विषय आहे हा, मला वाटतं आपण असं घाई करून निर्णय घेणे उचित नाही. थोडं धीराने घेऊया असं मला वाटतं. थोडे दिवस वाट बघू, काही माहिती मिळाली नाही तर मग वाटल्यास तुम्ही म्हणाल तसं करू, तुम्हाला काय वाटतं?"


"ठीक आहे थांबून बघुया काही दिवस. तोपर्यंत मला काही माहिती हाती लागते काय ते बघतो."


"हो सर नक्की."



थोड्या वेळ आणखी गप्पा मारून चहा - नाश्ता करून सहारे सर निघून गेले. ते गेले आणि पुन्हा आई -बाबा विचारात पडले.





         ******************






दिवस असेच जात होते, आई - बाबा सतत मुलीच्या टेन्शनमध्ये असायचे पण त्यांनी दोन्ही मुलींना याबद्दल कळू दिले नाही. असेच ४ महिने उलटून गेले. जे शेजारी आधी पाठीमागे कुजबुजत होते ते आता डायरेक्ट तोंडावर पण बोलू लागले  मुलीला टाकली म्हणून.




निशा आणि नितिनचे रोज रात्री भेटणे सुरूच होते. तिने कधी विरोध केला तर तो अगदी प्रेमाने गोडगोड बोलून तिला आपल्या जाळ्यात बरोबर खेचायचा. त्याला तिचे विक पॉईंट माहीत झाले होते. ते म्हणजे ती त्याच्यावर आंधळं प्रेम करायची.



निशा त्याच्यावर फक्त आंधळं प्रेम नाही तर आंधळं विश्वास पण करू लागली होती.




एके दिवशी निशाच्या घरचे सगळे गप्पा मारत हॉलमध्ये बसले होते. तेवढ्यात पोस्टमन आला.



"निशा निमजे इथेच राहतात काय?" पोस्टमनने विचारले.


निशाचे नाव घेतले म्हणून ती पुढे गेली. बाकी सगळे त्यांच्याकडे बघत होते.


"हो मीच आहे निशा."


"हे घ्या." असं म्हणून त्याने तिच्या हातात एक लिफाफा टेकवला आणि तो निघून गेला.



निशा त्या लिफाफ्यावरील नाव वाचत होती.



"काय आहे बेटा?"



"माहीत नाही बाबा, इथे अतुलचे नाव दिसत आहे."



अतुलचं नाव ऐकून बाबाच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या.


"आण इकडे, बघू दे मला."


निशाने तो बाबाला नेऊन दिला. बाबांनी लिफाफा उघडून आतील मजकूर वाचू लागले, मजकूर वाचून त्यांचे डोळे विस्फारले गेले. त्यांनी लगेच अतुलचा नंबर डायल केला, या वेळेस तो लागला. थोडी लांब रिंग गेल्यावर फोन उचलण्यात आले.



" हॅलोssss" फोन उचलून अतुल म्हणाला. 




"अतुलराव ही काय थट्टा चालवली आहे तुम्ही?" लग्न म्हणजे पोरखेळ वाटलं की काय तुम्हाला. जेव्हा वाटलं तेव्हा करायचं आणि वाटलं तेव्हा तोडायचं." बाबा चांगलेच गर्जत बोलत होते.


"माझी मुलगी काही रस्त्यावर पडली नाही आहे, समजलं ना!" ते ओरडले.


"हाच आवाज जर आधी आपल्या मुलीवर चढवला असता तर ही वेळ आलीच नसती." तो पण तितक्याच रागात बोलला.


"आणि काय बोलले? तुमची मुलगी रस्त्यावर पडून नाही. रस्त्यावर पडली जरी नसली ती तरी रस्त्यावर बसून मात्र नक्कीच होती." तो तिरसटपणे म्हणाला.


"अतुलराव तोंड सांभाळून बोला."


"काय चुकीचं बोलत आहे हो मी? जी मुलगी लग्नाआधी प्रेग्नंट असते तिच्याबाबत आणखी काय अपेक्षा करता बोलण्याची? मी सभ्य आहे म्हणून सभ्य भाषेत बोलत आहे. तुम्हाला तुमची मुलगी सांभाळता आली नाही आणि माझ्यावर काय रोब झाडत आहात? बरं झालं मला वेळेवर कळलं. फसवलं तुम्ही सगळ्यांनी मला, आपली चारित्र्यहीन मुलगी माझ्या गळ्यात बांधून दिली होती."


"शांत आहे म्हणून काहीही बोलत सुटू नका अतुलराव. स्वतःला प्रामाणिक ठेवण्यासाठी तुम्ही काहीही बिन बुडाचे आरोप करू नका, समजलं ना!" बाबा दर्डावत बोलले.



"बिन बुडाचे आरोप करीत नाही आहे मी, संशय तर मला तेव्हाच आला जेव्हा ती लग्नाआधी माझे कॉल उचलत नव्हती, नीट बोलत नव्हती पण विचार केल की नवीन नवीन आहे म्हणून असेल पण जेव्हा ती चक्कर येऊन पडली आणि तुमचे मोठे जावई आणि मुलगी खुसुर-फुसुर करीत होते तेव्हा माझा संशय जास्त बळावला. इतकीच प्रामाणिक वाटते तुमची मुलगी तर तिलाच विचारा ना खरं- खोटं. इतके दिवस मी माहिती गोळा करीत होतो म्हणूनच गप्प बसून होतो. तुम्हाला तुमची बदनामी व्हावी असे वाटत नसेल तर मुकाट्याने तिला त्या घटस्फोटाच्या  पेपर्सवर सही करायला सांगा आणि पोटगीची अपेक्षा करू नका कारण दोष माझ्यात नाही तुमच्या मुलीत आहे, मी फसलो गेलो आहे ती नाही, यानंतर कॉल करायची तसदी घेऊ नका, ठेवा आता फोन." अतुलने कॉल कट केला.


बाबाला तर त्यांनी जे ऐकले त्यावर विश्वास बसत नव्हता. ते थोड्या वेळ सुन्न होऊन तसेच बसले होते.

बाकीच्यांना तर कळतं नव्हते काय झाले ते.



"अहो काय बोलले जावई? कशाचे पेपर्स आहेत?"


बाबा अजूनही स्तब्ध बसून होते.


"अहो सांगा ना, असे बसून का आहात?" आईने बाबाला हाताला धरून हलवत विचारले.


बाबाच्या कानात गरम तेल ओतल्यासारखे \"तुमची मुलगी चारित्र्यहीन आहे\" हे अतुलचे शब्द घोळत होते.


"निशा ssssss" बाबांनी रागात निशाकडे कटाक्ष टाकला आणि जोरात ओरडले.




क्रमशः


✍️ अश्विनी कांबळे


ठाणे विभाग 



🎭 Series Post

View all