Feb 26, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रेमाचा चकवा भाग -४

Read Later
प्रेमाचा चकवा भाग -४

प्रेमाचा चकवा भाग - ४

विषय - कथामालिका
दोन दिवसांनी निशाचा साखरपुडा असल्यामुळें दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी पै पाहुणे येवू लागले. निशाची स्थिती तर समजण्यापलीकडे गेली होती.


ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचे होते त्याच्यासोबत घालवू शकत नाही आणि ज्याच्याशी जन्मगाठ बांधली जाणार होती त्याला धड तिने मान वर करून बघितले पण नव्हते पण तिचे आई बाबा खूप खुश होते त्यामुळे त्यांच्यासाठी ती आपण पण खुश आहोत हे दाखवण्याचा अतोनात प्रयत्न करीत होती.

तिच्या मनाची सल फक्त तिच्या ताईला समजत होती पण तिचे हात पण दगडाखाली होते. उद्या साखरपुडा असल्याने निशाला मेहंदी लावण्यात आली. मेहंदीच्या हाताने तिला नितिनसोबत चॅटिंग करता येणार नव्हते त्यात पाहुण्यांनी घर गजबजले होते. पूर्ण रीतीनुसार होणारा त्यांच्या घरचा हा पहिलाच समारंभ होता.


दिवस असाच निघुन गेला, रात्रभर निशाच्या मनात फक्त नितीनचे विचार सुरू होते. त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिला आठवत होते आणि त्या आठवणींनी तिच्या अश्रूंनी उशी भिजून निघाली होती.अखेर साखरपुड्याचा दिवस उजाडला. त्यांच्या दरवाज्यासमोर मंडप उभारण्यात आले. दुपारपर्यंत नवरा मुलगा आणि त्यांच्याकडील पाहुणे आले. पार्लरवाली निशाला तयार करीत होती. निशाचे बाबा आणि भाऊजी पाहुण्यांचे पाहुणचार करण्यात व्यस्त होते.तितक्यात निशाच्या मोबाईलवर नितीनचा मेसेज आला.


नितिन :- ऑल दि बेस्ट माय लव. मिस यू अँड लव यू


निशाने तो मेसेज वाचून मोबाईल ठेवून दिला.

तिला पुन्हा त्याची आठवण येत होती, तिला रडावं वाटलं पण बाहेर पाहुणे होते त्यामुळे ती रडू पण शकत नव्हती.


थोड्या वेळाने तिचे मामा तिला मंडपमध्ये घेऊन जायला आले. त्यांनी तिला एका पाटावर बसवले, ती खाली मान घालुन बसली होती. मुलाकडचे वयस्कर मंडळीनी तिचे पाय धुतले, पाच सुवासिनींनी तिची ओटी भरली.मुलाचाही असाच विधी करण्यात आला नंतर त्यांनी एकमेकांना अंगठी घातली. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुलाचे मित्र निशा आणि मुलाला म्हणजेच अतुलला एकमेकांच्या नावाने चिडवत होते, निशा पूर्ण वेळ खालीच मान घालून होती. जसकाही तिला त्या मुलाचा चेहरा बघायचा नव्हता. त्याला मात्र तिच्यासोबत बोलायचे होते पण तशी संधी काही त्याला मिळत नव्हती.


थोड्या वेळाने त्याचे मित्र जेवायला गेल्यावर त्याने संधी साधून तिच्याजवळ सरकला. तिला थोडं अवघडल्यासारखं झालं. ती थोडी बाजुला सरकली.


"निशा तू खुश तर आहेस ना म्हणजे मी तुला आवडलो आहे ना?" त्याने विचारले."ह्मम." निशा हुंकारली."अग एकदा माझ्याकडे बघ तरी, किती लाजतेस. मी कधीचा तुझ्या एका नजरेसाठी आतुर झालो आहे. प्लिज एकदा बघ ना!" तो म्हणाला.


तिने एक नजर त्याच्याकडे बघितले आणि पुन्हा खाली बघू लागली. तिला तिथून उठून जायची इच्छा झाली, पण जावू शकत नव्हती.


"खूप सुंदर दिसत आहे तू आज." तो तिच्या चेहर्‍याकडे एकटक बघत म्हणाला."हम्म..." ती खाली बघत म्हणाली."काय ग नुसतीच हम्म करीत आहे, काहीतरी बोल ना." तो तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला."सॉरी पण माझं डोकं खूप दुखतं आहे." तिने खाली बघूनच सांगितले."ठीक आहे काही हरकत नाही, तुझा नंबर दे ना!" अतुल म्हणाला."कशाला?" तिने विचारले."कशाला काय? बोलायला. तुझी इच्छा नाही काय बोलायची? मग असू दे." तो नाराज होत म्हणाला.निशाने थोडा वेळ विचार केला आणि नंबर दिला, त्याने लगेच सेव्ह करून घेतला. नंतर दोघांना जेवायला बोलवायला आले तसे दोघे जेवायला निघून गेले.लग्नाची दोन महिन्यानंतरची एक तारीख काढण्यात आली. मुलाकडचे काही वेळाने निघुन गेले, गावातले एक एक लोक जेवायला येतच होते. सगळं करता करता थोडा उशिर झाला.

निशाने लग्नाची तारीख नितीनला मेसेज केली आणि झोपायला म्हणून बेडवर आडवी झाली तर तिचा मोबाईल वाजला. तिने बघितले तर अनोळखी नंबर होता. तिने काही सेकंद विचार केला आणि कॉल उचलला."हॅलो sss" तिने जरा कचरत म्हटले."हाय मी अतुल, काय करीत आहेस?" त्याने विचारले."काही नाही." ती म्हणाली."मला मिस करीत आहेस काय?" त्याने विचारले.निशाला काय उत्तर द्यावे कळत नव्हते."मी तर खूप मिस करतो आहे तुला." तो बेडवर आडवा होत बोलला."रोज मी या बेडवर एकटाच झोपायचो पण आता हा एकांत नको वाटत आहे. आता हा दुरावा खूप छळतो आहे मला, लवकरात लवकर तू माझ्या मिठीत यावी असे वाटते आहे, मिस यू सो मच जान." तो रोमॅंटिक होत मोबाईलवर ओठ टेकवत म्हणाला.निशाने मोबाईल लगेच बाजूला केला. मनातल्या मनात त्याला शिव्या घालू लागली. त्याचे बोलणे तिला किळसवाणे वाटले.

"अरे बोल ना, कधीचा मी एकटाच बोलतो आहे." ती काहीही बोलत नाही आहे बघून अतुल म्हणाला."अतुलजी माझं डोकं खूप दुखत आहे प्लिज मी झोपू काय?" ती डोक्याला हात लावुन त्याला विचारू लागली."ओह सॉरी सॉरी, झोप तू आपण उदया बोलू. गुड नाईट." अतुलने मोबाईलवर आपले ओठ टेकवले." गुड नाईट." निशा निर्विकारपणे म्हणाली.


निशाने फोन ठेवून दिला आणि झोपून गेली.

****************

अतुल तिला रोज कॉल करायचा, ती पहिल्या कॉलला कधीच त्याचं कॉल उचलायची नाही आणि उचलला तरी मोजके बोलून ठेवून द्यायची. लग्नाला कमी वेळ असल्यामुळे निशाच्या घरी कामाची गडबड होती.आधी हॉल ठरवण्यात आले, नंतर पत्रिका, केटरर्सवाले सगळे झाले. तर दुसरीकडे लग्नानंतर भेटता येणार नाही म्हणून नितिन तिला आठवड्यातून दोनदा भेटायला बोलवायचा. ती पण त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा म्हणून तो जेव्हा बोलवायचा तेव्हा घरी काहीतरी कारण सांगून त्याला भेटायला जायची.त्याचे भेटणे म्हणजे एकच काम असायचं, स्वतःची वासना शमविणे पण ती मात्र ते क्षण मनापासून जगत होती. ती त्याच्यापासून दुर जाणार म्हणून दुःखी असायची तर तो तिला आता तुझी मजाच मजा आहे असं म्हणून चिडवायचा.पत्रिका वाटून झाल्या, लग्नाला काहीच दिवस बाकी होते म्हणून कामाला जोर आला होता. मधल्या काळात अतुल आणि त्याच्या घरचे नवरा नवरीचे कपडे घ्यायला आले होते. निशासाठी बाकी खरेदी पण झाली.लग्नाला चार दिवस बाकी असताना नितीनने निशाला भेटायला बोलावले. त्याचे काम झाल्यानंतर तो निशासोबत बोलत बसला.
" हे घे मंगळसूत्र, तुला हवं होतं ना." त्याने एक साधेसे मंगळसूत्र तिच्या हातात ठेवला."सॉरी हा साधंच आहे, माझी ऐपत तुला हे नकली मंगळसूत्र देण्याचीच आहे." तो तोंड पाडून बोलला.


"असू दे रे, तू दिलं हे महत्वाचं आहे मला." ती मंगळसूत्र बघून खुश होत बोलली.


"नाही ग पण काय आहे ना, तुझा नवरा तुला सोन्याचे मंगळसूत्र घालेल ना, मग त्या समोर तर हा मातीमोल आहे." तो म्हणाला."घालू दे ना पण त्याला या मंगळसूत्राची सर थोडी ना येणार आहे, ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे. या समोर कितीतरी सोन्याची मंगळसूत्रे फिकी आहेत माझ्यासाठी."

तिने मंगळसूत्रावर आपले ओठ टेकवले."मी नेहमी जपून ठेवेन याला." तिने मंगळसूत्र हृदयाशी कवटाळून धरले.नितिनने तिला मिठीत घेतले.


"ही आपली शेवटची भेट आहे ना, यानंतर आपण कधीच भेटणार नाही ना!" तो डोळ्यांत पाणी आणत बोलला.त्याच्या त्या वाक्याने निशाच्या मनात धस्स झाले. तिने तिची मिठी आणखी घट्ट केली. थोड्या वेळाने ती घरी जायला निघाली, तिला आज त्याला सोडून जावं वाटतं नव्हते.दुसऱ्या दिवशी तिला मेहंदी लावण्यात आली. मेहंदी काढून झाल्यानंतर ती किती तरी वेळ मेहंदीच्या हाताकडे बघत होती."काश ही मेहंदी नितीनच्या नावाची असती, किती स्वप्न बघितली होती मी लग्नाची." ती स्वतःशी पुटपुटत तिने एक सुस्कारा टाकला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली.हळदीच्या दिवशी घरी पाहुण्यांची लगबग सुरू होती.
घर पाहुण्यांनी भरले होते, सायंकाळी निशाला हळद लावण्यात आली. सगळेजण धमाल मस्ती करण्यात गुंग होते, सगळे डीजेच्या तालावर थिरकत होते.
तितक्यात निशाला कॉल आला, स्क्रीनवर नितिनचे नाव दिसताच ती टेरेसवर गेली.

सगळे नाचण्यात मग्न होते म्हणून कुणाचे तिच्याकडे लक्ष गेले नाही. ती लगबगीने टेरेसवर गेली आणि कॉल उचलला."हॅलोsssss" निशाने फोन कानाला लावताच म्हणाली." हॅलो निशा..." तो रडत म्हणाला."अरे नितिन काय झालं? तू रडतोस काय असा?" तिने विचारले.त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचं हृदय जोराने धडकू लागले, नेमके काय झाले असेल तिला समजत नव्हते."निशा, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर निशा...मला नकोय ग कुणीच, मला बस तू हवी आहेस, मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न नाही करू शकत. आय लव यू सो मच निशा. मी कसा जगणार ग तुझ्याशिवाय? मला तर आता हे जीवन पण नकोसे वाटते आहे. मी.... मी काय करू काही समजत नाही. मला बस तू दिसते आहेस. त्या पलीकडे हे जगणे नको आहे मला, स्वतःला संपवून टाकावं वाटतं आहे." तो म्हणाला."प्लिज नितिन असं काही बोलू नकोस, असं काही करायचा विचारही मनात आणू नकोस, तुला माझी शपथ! तू नाही तर मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे! मी कशी या लग्नाला तयार झाली माझं मलाच माहिती आहे. रोज तीळ तीळ मरत आहे मी, बस तू सुखात राहावा एवढंच वाटायचं म्हणून बस तुझ्यासाठी तुझ्या सुखासाठी मी तयार झाले." निशा रडत त्याला सांगू लागली."सॉरी निशा, मला तेव्हा नाही समजले पण आता जाणिव झाली. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ग! मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय." तो रडू लागला.


"मी पण तर नाही राहू शकत, आपण पळून जाऊया का? मी येते आता थांब." निशा म्हणाली."नाही नको ग, तू नको येऊ, तू जर आता आली तर तुझ्या घरच्यांची किती बदनामी होईल. त्यांना ती बदनामी सहन होणार नाही, आधीच ताईने तसं केलं आता तू पण करणार तर त्यांना खूप मोठा आघात होणार, जर त्यांनी टेन्शनमध्ये स्वतःच्या जिवाचे काही बरं वाईट करतील तर तुला आवडेल काय? आपल्या आई वडिलांच्या मृत्यूचं कारण बनून तू सुखाने राहू शकणार काय, सांग?" त्याने विचारले."नाही कधीच नाही पण आता काय करायचं?  तू..." ती बोलता बोलता थांबली.


"माझा विचार नको करुस ग! मी राहीन कसातरी, आपलं भेटणं नशिबात नव्हतं असं समजेन, तुझ्या आठवणी पुरेशा आहेत मला आयुष्य काढायला. जगेन तुझ्या आठवणीत. बस तू एक प्रॉमिस कर." तो म्हणाला.


"काय? तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे तुझ्यासाठी." निशा भावनिक होत म्हणाली."बाकी काही नको ग! बस तू माझ्यासोबत संपर्क तोडू नकोस. मला प्रॉमिस कर की जेव्हा पण तू गावी येशिल तेव्हा तेव्हा मला भेटायला येशिल. प्लिज बस एवढं कर माझ्यासाठी प्लिज.." तो रडत रडत म्हणाला."ठीक आहे मी प्रॉमिस करते, मी जेव्हा पण येणार तुला भेटल्याशिवाय नाही जाणार पण प्लिज तू रडू नकोस." निशा पण रडू लागली."तू पण मला प्रॉमिस कर की माझ्या लग्नानंतर तू स्वतःला त्रास करून घेणार नाही." ती हमसून हमसून रडत म्हणाली." ठीक आहे नाही करणार, बस तू तुझ प्रॉमिस लक्षात ठेव." नितीन म्हणाला." हो ssss" निशा."ठीक आहे ठेवू फोन, तुझ्या घरचे शोधत असतील तुला." तो म्हणाला"हो ठीक आहे." ती म्हणाली."लव यू." नितीन म्हणाला." लव यू टू." निशानिशाने फोन ठेवला आणि तडक आपल्या बेडरूममध्ये जाऊन दरवाजा लावला आणि बेडवर स्वतःला झोकून देवून उशीत तोंड खुपसून कितीतरी वेळ ओक्साबोक्सी रडत राहिली.
 


क्रमशः


✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Kamble

House Wife

मी एक गृहिणी आहे

//