प्रेमाचा चकवा भाग -२

ही एक सामाजिक कथा आहे




प्रेमाचा चकवा भाग - २


विषय:- कथा मालिका



नितिनला आता ती सवय लागली. जेव्हा जेव्हा निशाचे आई बाबा बाहेर गावी जायचे, तो तिला भेटायला जायचा. निशाला पण त्याचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला. यात बरेच दिवस निघून गेले, यातच एकदा निशाची पाळी चुकली. तिला खूप टेन्शन आलेलं, तिची शंका खरी तर नसेल ना असं तिला वाटू लागले. तिने लगेच नितिनला कॉल लावला.




"हॅलो नितिन.." तिने टेन्शनमध्ये नितीनला कॉल केला.



"हा बोल लवकर, वेळ नाही मला." तो तुटकपणे म्हणाला.



"अरे माझी पाळी चुकली." तिने नाराजीत सांगितले.



"तर डॉक्टरकडे जा ना, मी काय डॉक्टर आहे?" तो वैतागत बोलला.



"तसं नाही रे, मला वेगळीच शंका येत आहे." ती कचरत म्हणाली.



"कुठली?" त्याने न समजून विचारले.



"की मी.... ते मी.." ती अडखळत बोलली त्यामुळे त्याला समजलं तिला काय बोलायचं आहे.



"तू टेस्ट केली काय?" त्याने विचारले.



"नाही अजून." ती म्हणाली.



"मग आधी कर, मग बघू काय करायचं आहे ते." तो म्हणाला.



"ठिक आहे." 



निशाने फोन कट केला आणि मेडिकलमधून प्रेग्नंसी किट घेवून आली. इकडे नितिन पुर्ण सटपटला होता, त्याला आता काय करावं हेच सूचत नव्हते. निशाने प्रेग्नन्सी टेस्ट केली, तिचा अंदाज खरा होता.


तिने नितीनला कॉल लावला. नितिन तिच्याच फोनची वाट बघत होता, एका रिंगमध्ये त्याने कॉल उचलला.


"बोल केली काय टेस्ट?" त्याने अधिरतेने विचारले.



"हो पॉझिटिव्ह टेस्ट आहे." निशाने सांगितले.



"काय ?" नितीनने ओरडून विचारले. त्याला जबरदस्त शॉक लागला होता.



"आता काय करायचं?" तिने रडवेला चेहरा करून विचारले.



"थांब विचार करू दे मला, बघतो मित्राच्या ओळखीत कुणी डॉक्टर आहे काय?" तो गंभीर होत म्हणाला.



"कशाला?" तिने न समजून विचारले.



" पाडायला, अजून कशाला?" तो वैतागत म्हणाला.



"त्याची काय गरज आहे? आपण लग्न करूया ना! उद्या करायचे आहे ते आज करू. त्याने बाळ पण वाचणार, शेवटी आपलंच आहे ते." ती साधेभोळेपणाने म्हणाली.



"नाहीsss" तो रागात ओरडला. त्याच्या ओरडण्याने ती दचकली.


"म्हणजे असं अचानक कसं करू शकतो आपण लग्न? मी घरी काय सांगू?"  तो सावरासावर करत बोलला.


"आणि घरच्यांना कळलं की तुला लग्नाआधी दिवस गेलेत तर काय विचार करणार? जुन्या लोकांना नाही आवडतं हे लग्नाआधी. मला सोड, मी मुलगा आहे, मला काही म्हणणार नाही पण तुझ्या चारित्र्यावर प्रश्न उचलतील.

तुला कळत आहे मला काय म्हणायचे आहे?" त्याने तिला बरोबर शब्दात गुंडाळत विचारले.


"ह्मम" ती म्हणाली.



"मग बघू ना विचारून अबोर्शनसाठी?" त्याने प्रेमाने विचारले.



"ठीक आहे विचार." ती म्हणाली.



"बरं! विचारून करतो मी तुला कॉल, कधी जायचं आहे ते बघूया" तो म्हणाला आणि फोन ठेवून दिला.



निशाने ते पटत नसले तरी तो नकार देत आहे म्हणून ती तयार झाली अबोर्शनसाठी.



त्याने फोन ठेवून आपल्या मित्राला कॉल केला.



"हॅलो अज्या... अबे एक लोचा झाला यार, तुझ्या ओळखीचा एक डॉक्टर होता ना मागे तू तुझ्या गर्लफ्रेंडला नेले होते." तो त्याच्या मित्राला म्हणाला.



"हो त्याचं काय? कोणता लोचा केला तू?" त्याने न समजून विचारले.



"तेच जे तू केला होता." तो म्हणाला.



"पागल आहेस का बे? माहित आहे तरी सांभाळून करता येत नाही काय?" अजय म्हणाला.



"कर ना मदत." नितीनने विनवणी केली.



"का? मजा तू मारायचीस आणि लोचे करून मी आठवतो?" अजय भडकत म्हणाला.



"सॉरी यार sss बस एकदा मदत कर." नितीन विनवू लागला.



"थांब, बघतो डॉक्टर आहे काय?" अजय म्हणाला.



नितिनने फोन ठेवला आणि अजयचे फोनची वाट बघू लागला.



थोड्या वेळाने अजयचा फोन आला, नितिनने पहिल्या रिंगमध्ये कॉल उचलला.



"हा बोल." त्याने अधिरतेने विचारले.



"डॉक्टरने दूपारी बोलवलं आहे पण सांगून ठेवतो, तो या कामाचे पैसे खूप घेतो." अजयने त्याला माहिती पुरवली.



"ठीक आहे चालेल." नितीन म्हणाला.



"ठीक आहे पत्ता पाठवतो, पाहून घे." अजय म्हणाला.



"ठीक आहे." नितीन म्हणाला. त्याने कॉल कट केला.



अजयने पत्ता पाठवला. नितिनने निशाला कॉल केला. 



"हॅलो sss आपल्याला दुपारी जायचं आहे तयार रहा आणि तो डॉक्टर खूप फी घेतो, माझ्याकडे नाही तेवढे पैसे, तूझ्याकडे असतील तर घे." नितीन म्हणाला.



"हो आहेत." तिने सांगितले.



"घे मग." तो म्हणाला.



नितीनने फोन ठेवला पण निशा मात्र विचारात हरवली. आपली मस्ती करण्याची शिक्षा निष्पाप जीवाला द्यायची इच्छा नव्हती तिची पण पर्याय नव्हता. दोघे डॉक्टरकडे गेले, नितिनने पूर्ण पैसे निशाकडून घेतले. डॉक्टरकडून आल्यापासून निशा उदास राहू लागली. तिला आपण खूनी असल्यासारखं वाटत होते. नितिन एक महिना शांत बसून राहिला. त्यानंतर त्याचे प्रमाण जास्तच वाढले.



आधी तो तिच्याच घरी कधी तरी भेटायचा पण आता तो तिला आठवड्यातून कधी लॉजवर, कधी मित्राच्या रुमवर, निर्मनुष्य झाडी झुडूपामध्ये घेवून जावू लागला. तिने विरोध केला तर तिला इमोशनल ब्लॅकमेल करायचा.



             ******************



"निशू.... मला आज मार्केटमध्ये जायचं आहे, तू येते काय? खूप दिवस झाले आपण बाहेर गेलो नाही सोबत." ताई तिच्याजवळ येत म्हणाली.



"ठीक आहे ताई, चल जाऊया." निशा हसत म्हणाली.



"तयारी कर, थोड्या वेळाने निघू आपण." ताई म्हणाली.



दोघी तयारी करायला लागल्या. निशा तयारी करत असताना तिला नितीनचा कॉल आला.



"बोल." निशा म्हणाली.



"मला आता भेटायला ये, खूप इच्छा होत आहे." नितीन म्हणाला.



"मी आता नाही येऊ शकत, आता मला ताईसोबत बाहेर जायचं आहे." तिने सांगितले.



"माझ्यापेक्षा आता तुला बाहेर जाणे महत्त्वाचे झाले आहे हो ना! मग एक काम करुया, आपण ब्रेकअप करू." तो भडकत म्हणाला.



"अरे इतक्या क्षुल्लक कारणावरून तू हे काय बोलतोस? इतकं टोकाला जायची गरज आहे काय?" निशा म्हणाली. ती पूर्ण गोंधळून गेली होती त्याच्या बोलण्याने.



"मग तुला माझ्यासाठी वेळ नाही, माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही मग काय उपयोग या नात्याचा?" तो रागात म्हणाला.



"अरे असं कसं बोलतोस तू? मी नेहमी येते ना, तू जेव्हा बोलवतो तेव्हा. बस आज नाही म्हणत आहे." निशा त्याला समजावू लागली.



"ते मला काही नको सांगू, जर तू आज नाही आली तर विसरून जा मला. यानंतर मला तोंड दाखवू नको तुझं." त्याने रागात फोन कट केला.



निशाला समजत नव्हते काय करावं. तिला ना ताईला दुखवायचं होतं, ना नितीनला गमवायचं होतं. ती काही तरी ठरवून ताईकडे गेली.



"ताई..." तिने नाराजीने ताईला आवाज दिले.


"हा झाली तयारी, चल." ताई म्हणाली.



"ताई आपण उद्या जाऊया का?" तिने विचारले.



"का?" ताईने न समजून विचारले.



"ते मला आता...." ती अडखळत म्हणाली.



"नितीनला भेटायला जायचं आहे, हो ना?" ताईने रागात विचारले.



"होssss तू चिडू नकोस ना, आपण उद्या जाऊया पक्का." निशा तिला समजावत म्हणाली.



"काही गरज नाही, माझी मी जाईन. तुला काय आता फक्त नितीन सगळं झालं आहे. बाकी कुणाची आता गरज राहिली नाही. हो बाजूला, जावू दे मला." ताईने तिला रागाने बाजूला सारले आणि निघून गेली.



"ताई.. ऐकून घे ना.." निशा तिला आवाज देऊ लागली.



तिचं काही ऐकून न घेता ताई निघून गेली. निशा भरल्या डोळ्यांनी नितिनला भेटायला गेली.




    *************




निशाचे फायनल इयर झाले तसे तिच्या बाबांनी एक- दोन जणांना तिच्या लग्नासाठी कुणी लक्षात असतील तर  बघायला सांगितले. म्हणून तिच्याकरिता काही मुलांचे स्थळ आले होते जे काही दिवसांनी तिला बघायला येणार होते.



तिच्या ताईला निशाबद्दल सगळं माहीत असून ती बाबासमोर काही बोलू शकत नव्हती कारण तिने प्रेम विवाह केला होता. तिच्या बाबांना तो मुलगा आवडला नव्हता कारण तो टपोरी वाटायचा म्हणून त्यांचा विरोध होता लग्नाला म्हणून तिने पळून जावून लग्न केलं म्हणून बाबा नाराज होते तिच्यावर पण शेवटी मुलगी होती ती त्यांची, तिला त्या मुलाने त्रास देऊ नये किंवा तिची उपासमार होऊ नये म्हणून त्यांच्या मनात नसतानाही त्यांनी त्यांचा विवाह मान्य करून आणि आपल्या मुलीला सुखी आयुष्य मिळावं म्हणून तिला घरीच ठेवून घेतले आणि त्याला घर जावई करून घेतले. आता निशाबद्दल सगळं सांगितले तर ते पुन्हा दुखावले जातील म्हणून तिने गप्प राहणे पसंद केले.


निशाच्या कानावर ही गोष्ट पडली तेव्हा तिला टेन्शन आले. ती नितीनला भेटायला गेली तर तिच्या डोक्यात तेच विचार सुरू होते म्हणून ती त्याला काही प्रतिसाद देऊ शकत नव्हती.


"आपण लग्न कधी करणार नितिन? तुझ्यासोबत जर लग्न नाही झालं तर मी मरून जाईन." निशा म्हणाली.



तरी त्याचा काही रिप्लाय नाही. त्याचं फक्त तिच्या शरीरासोबत संवाद सुरू होता.



"बोल ना कधी करणार लग्न? तू जर माझा नाही झाला तर मी जीव देईन." निशा पुन्हा विचारू लागली.



नितीन ............




"एक-दोन दिवसात मला काही मुलं येणार आहेत बघायला. मला नको ते, मला तू हवा आहेस. आपण लग्न करूया चल.." ती म्हणाली.



तरी त्याचं फक्त तिच्या शरीरात इंटरेस्ट होता. तो तुटून पडला होता तिच्यावर, त्याला बाकी काही ऐकायचं नव्हतं. तो बोलत नाही बघून तिने त्याला ढकललं.



"काय आहे ? फक्त बघायलाच येत आहेत ना! लग्न करून घेवून तर नाही चालले ना? उगाच माझा मुड नको घालवू, समजलं ?" तो भडकत म्हणाला.



तो पुन्हा तिच्या शरीरावर तुटून पडला. तो पुन्हा रागवेल, त्याचा मूड खराब नको करायला म्हणून ती गप्प राहिली. त्याला जे करायचे ते ते करू दिले.



काही दिवसांनी तिला एक - दोन मुलं येवून बघून गेले. त्यापैकी एकाने तिला होकार दिला.






✍️ अश्विनी कांबळे


ठाणे विभाग














क्रमशः



🎭 Series Post

View all