प्रेमा तुझा रंग कसा? भाग (6) अंतिम

लेखक-सारंग चव्हाण.

अंतिम भाग 

विक्रांतने सांगितलेली हकीकत ऐकून सुमतीला क्षणभर काहीच सुचेना. एक गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा व्हावी अशीं अपेक्षा करावी की आपला नवरा म्हणून त्याच्या गुन्ह्यावर पांघरून घालावं?अशा द्विधा मनःस्थितीत ती सापडली.
पण समोर बसलेला विक्रांत अश्रू ढाळत होता, यावरून त्याला त्याच्या वर्तवणुकीचा पश्चाताप झाला आहे याची तिला खात्री झाली होती.
विक्रांतला धीर देत सुमती म्हणाली,
"हे पहा जे व्हायचं ते होऊन गेलं. आता झालेल्या गोष्टीवर अश्रू ढाळण्यापेक्षा पुढे तिच्यासाठी काय करता येईल हे पाहूया.मी स्वतः तिला भेटून तिच्याशी बोलेन.आता तुम्ही निश्चिन्त व्हा."

सुमतीने आपल्यावर दाखवलेला विश्वास विक्रांतसाठी लाखमोलाचा होता.
तो तिला म्हणाला,
"सुमती आदर्श बायको कशी असावी?याच तू जिवंत उदाहरणं आहेस.मला तुझा अभिमान वाटतो."

त्यांनतर दोघेही झोपेच्या अधीन झाले आणि मध्यरात्री अचानक विक्रांत ओरडत उठला,
"नाही……..असं नको करू. सोड तिला. मी तुझ्या पाया पडतो, सोड तिला सोड…………"

सुमतीच्या हृदयाचा ठोका चुकला तिने लाईट लावून पाहीले तो काय,
विक्रांतला दरदरून घाम फुटला होता. त्याची छाती लोहाराच्या भात्यासारखी फुलत होती.
सुमती म्हणाली,
"अहो काय झालं? काय होतय तुम्हाला?"
विक्रांतने शेजारी झोपलेल्या आपल्या मुलीला म्हणजे गौरीला मिठी मारली आणि म्हणाला,
"बाळ तू ठीक आहे ना? तुला भाजलं नाही ना?"
गौरीला पण विक्रांत काय म्हणतोय कळेनासं झालं.

सुमतीने त्याला गदागदा हलवत भानावर आणलं आणि म्हणाली,
"काय झालंय आम्हाला कळेल काय? काय बडबडताय?"

विक्रांत म्हणाला,
"अगं सुमती,मी पाहिलं की आपल्या गौरीवर कोणीतरी ऍसिड……….."

सुमती त्याच्या तोंडाला हात लावत म्हणाली,
"बस्स!असं अभद्र बोलू नका,असं काही नाही होणार.आपण इथून पुढे कोणाला असं होऊ द्यायचं नाही."

 विक्रांतने सुमतीच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास पाहिला आणि त्याला तीच पाठबळ अजस्त्र सह्याद्रीपर्वतासारखं भक्कम जाणवल.

आपण कोणकोणत्या मार्गाने सायलीला मदत करू शकतो या विचारात उर्वरित रात्र सरली आणि डोंगराआड लपलेल्या रविराजाने आपल मुखदर्शन द्यायला सुरवात केली. समस्त धरतीने तिमिराच्या काळ्या छायेची चादर फेकून दिली आणि अगणित तेजोमय किरणांची नवीन वस्त्रे अंगावरती धारण केली.

अशा प्रसन्न सकाळी नवी स्वप्न,नव्या इच्छा आणि नवीन योजनेसह सगळी दुनिया आपल्या ध्येयाकडे झेपावू लागली.
विक्रांतही पाठीवर सॅक अडकवून बाईकवरून ऑफिसच्या दिशेने निघाला होता.
आज त्याच्या मनात काय आला काय माहित? आणि त्याने कॉलेजच्या रस्त्याने आपली बाईक पुढे घातली.
कॉलेजच्या आवारात प्रवेश करताच त्याला आपली कॉलेजलाईफ आठवू लागली आणि त्याच्या चेहऱ्यावर कधी हसू,तर कधी दुःख उमटू लागलं आणि समोरच्या चौकात पाहतो तो काय?
एक मुलगी जीवाच्या आकांताने धावत होती आणि पाठोपाठ चार-पाच नराधम तिच्या पाठीमागे लांडग्यासारखे लागले होते.
वाटेतील गर्दी पायात साप आल्यासारखी बाजूला पळत सुटली.
इतक्यात ती मुलगी येऊन विक्रांतच्या बाईकला धडकून खाली कोसळली.
तोवर ते नराधम अगदी जवळ येऊन पोहोचले होते, त्यांच्या हातात ऍसिडची बाटली दिसत होती.
ती पाहिल्यावर विक्रांतचे डोळे चमकले, त्याच सर्वांग थरथरू लागलं. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या.त्याच्या अंतर्मनातून आवाज आला,
"धाव विक्रांत धाव, हीच खरी वेळ आहे स्वतःच्या पापाच प्रायश्चित करण्याची.आज तूझ्यामुळे एका निरागस मुलीचं आयुष्य वाचणार आहे. वाचव तिला या नराधमांच्या तावडीतून."
आणि त्याच्या डोळ्यासमोर सायली दिसू लागली,
 आणि तो जोरात ओरडला,
"सायली पळ……...पळ सायली….. मी आहे तुझ्याबरोबर. मी अडवतो या हरामखोरांना.तू लांब पळ…….."

आणि त्याने त्या ऍसिड हातात असणाऱ्या मुलाच्या अंगावर झेप घेतली.
दोघेही खाली कोसळले आणि ऍसिडची बाटली रस्त्यावर पडून फुटली.
त्यातून उडालेला फवारा विक्रांत आणि त्या मुलाच्या अंगावर उडाला. दोघेही वेदनेने कळवळु लागले.
विक्रांतचा एक हात खांद्यापासून कोपरापर्यंत गंभीररित्या भाजला होता आणि चेहऱ्यावरपण काहीठिकाणी ठिबक्या उडाल्या होत्या.

उपस्थित लोकांपैकी कोणीतरी 108 नंबर डायल करून रुग्णवाहिका बोलावून घेतली.विक्रांतसह त्या हल्लेखोर मुलाला त्यात घालून सरकारी इस्पितळात दाखल केल. काही वेळातच तिथे पोलीस हजर झाले. त्यांनी चौकशी करताच विक्रांत म्हणाला,
"साहेब हाच तोच नराधम आहे,जो त्या मुलीच्या मागे ऍसिड घेऊन धावत होता. मी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर ती बिचारी आयुष्यातून उठली असती. तुम्ही याला कठोर शिक्षा करा म्हणजे पुन्हा असं अघोरी धाडस कोणी करणार नाही."

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढील कारवाईसाठी ते निघून गेले.
तोपर्यंत ही बातमी विक्रांतच्या घरी आणि नातेवाईकांना समजली आणि त्यांनी इस्पितळाच्या आवारात गर्दी केली. सुमती धावतच विक्रांतच्या वार्डात गेली आणि तिने भाजलेल्या विक्रांतकडे पाहिलं आणि म्हणाली,
"कस झालं हो हे? कोणी केल? कुठाय तो हरामखोर? बघतेच त्याला."

विक्रांत तिला हाताने थांबण्याचा इशारा करून म्हणाला,
"सुमती, त्याला कायदा कठोर शासन करेलचं, त्यामुळे आपण त्यात लक्ष नको घालायला.आणि मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं,माझ्या चुकांच प्रायश्चित होतं."

हे ऐकून सुमती शांत झाली आणि विक्रांतला काय हवं नको ते पाहू लागली.

इतक्यात जिच्यावर तो हल्ला होणार होता ती मुलगी विक्रांतकडे येताना त्याला दिसली. तिच्या पाठोपाठ एक व्यक्तीही येताना दिसला आणि विक्रांत आश्चर्यचकित होऊन म्हणाला,
"अरे मन्या!तू इथे कसा? तुला कोणी सांगितलं मी इथं आहे?"

तसा मनोजही अवाक होऊन म्हणाला,
"विक्या तू? म्हणजे साक्षीचा जीव तू वाचवलास?"

विक्रांत प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाला,
"हीच नाव साक्षी आहे का? आणि तू हिच्याबरोबर कसाकाय आलास?"

मनोज हसत म्हणाला,
"अरे ही माझी छोटी बहीण आहे.मी तुझे उपकार कसे मानू विक्या?"

विक्रांत त्याच्याकडे नजर रोखून म्हणाला,
"मन्या मी उपकार नाही केले,मी केल ते प्रायश्चित होतं.मी केलेल्या पापामधून माझं थोडस तरी पाप नक्की वजा होईल."

यावर मनोज म्हणाला,
"विक्या आपण खूप चुकीचं वागलो रे,त्यातून तू प्रायश्चित म्हणून माझ्या बहिणीला वाचवलंस. आपल्या जवळच्या माणसांवर संकट आल्याशिवाय आपल्याला त्याची जाणीव होतं नाही रे.आज माझेपण डोळे उघडले बघ.मलापण प्रायश्चित म्हणून काहीतरी करायचं आहे."

बराच वेळ या दोघांचं बोलणं ऐकणारी सुमती मध्येच म्हणाली,
"तुम्हाला दोघांनाही आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आहे आणि सायलीसाठी काहीतरी करायची इच्छा आहे,तर आपण नक्कीच यातून चांगल काहीतरी करू."

यावर मनोज म्हणाला,
"सायली! ती कुठे आहे तुम्हाला माहित आहे काय?"

विक्रांत म्हणाला,
"हो ती कुठे आहे मला माहित आहे."

यावर सुमती म्हणाली,
"यांना डिस्चार्ज मिळाला की मग आपण प्रत्यक्ष कामाला लागू."
सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

हे पाहून साक्षी म्हणाली,
"विकीदादा लवकर बरे व्हा आणि तुम्ही बरे होईपर्यंत मी रोज तुमचं जेवण घेऊन येईन."
सुमतीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

असेच काही दिवस गेले.
विक्रांत आता बरा झाला होता.
त्यानंतर विक्रांत, सुमती आणि मनोज एकत्र चर्चेला बसलेत.
सुमती बोलत होती,
"हे पहा आपण सायलीची सर्वोतोपरी मदत करूच, पण माझ्या डोक्यात आणखी काही वेगळ्या कल्पना आहेत.
त्यानुसार आपण गावोगावी, शाळा,कॉलेजात जाऊन मुलींच्या छेडछाडी विरोधात जनजागृती करू. मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवू. एकतर्फी प्रेम आणि छेडछाडसंबंधित हल्यात जखमी झालेल्या निष्पाप जीवांना हक्काचं छप्पर देऊ.त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी लघुउद्योग सुरु करून देऊ.ज्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलंय त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करू."

सुमतीच्या डोळ्यातली चमक पाहून विक्रांत आणि मनोजच्याही अंगात उत्साह संचारला आणि त्यांनीही दृढनिश्चय केला.
योजना तयार होती पण आता त्यावर लवकर अंमल करणं गरजेचं होतं.

विक्रांतने सायलीच्या घरापासून थोड्या अंतरावर एक मोकळं असणार घर पीडितमुलींसाठी विकत घेतलं.त्याची थोडीफार डागडुजी करून ते राहण्यायोग्य बनवलं.घर खूप मोठं होतं त्यामुळे त्यात कोणाला काहीच अडचण होणार नव्हती.तसेच घराच्या बाजूला जो जनावरांसाठी गोठा होता तोपण मोकळाच होता. त्यात अगरबत्ती, धूप बनवण्याची मशिन्स आणून बसवलीत. हळूहळू विविध भागातील पीडित मुलींची तिथे व्यवस्था लावण्यात आली. ज्यांना शिकायचं होतं त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आलं.तसेच दर शनिवार आणि रविवारी त्यांचे वर्ग भरवून त्यांना शिकवलं जात होतं. गावोगावी, शाळा, कॉलेजात स्वरक्षणाचे महत्व आणि गरज याविषयी जनजागृती करण्यात येत होती.लाठीकाठी, तलवारबाजीसह कराटेचसुद्धा प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली होती.

आता या कामात त्यांचा बऱ्यापैकी हात बसला होता. अगदी योग्यप्रकारे नियोजनबद्धरित्या कामकाज चाललं होतं.

आता बाकी होतं एक अग्निदिव्य,होय अग्निदिव्यच.
ते म्हणजे सायलीसमोर गुन्ह्याची कबुली द्यावी काय? त्यावर तिची नक्की काय प्रतिक्रिया असेल? ती आपली मदत स्वीकारेल काय?त्यांनी सुमतीजवळ अशी भीती व्यक्त केली.
तेव्हा सुमती म्हणाली,
"तुम्ही घाबरून जाऊ नका,मी स्वतः तिला भेटून समजावण्याचा प्रयत्न करेन."
विक्रांत आणि मनोज दोघेही या गोष्टीला तयार झाले. विक्रांतने संकेतला कॉल करून आपली बायको सायलीला भेटायला येणार असल्याची माहिती दिली.
ठरवल्याप्रमाणे सुमती सायलीच्या घरी पोहोचली.
सुमती येणार असल्याने संकेत घरीच थांबला होता. त्याने सायलीला सुमतीला भेटण्यासाठी तयार केल होतं.
सायली आपला चेहरा ओढणीआड लपवत सुमतीच्या समोर येऊन बसली.
सुमती तिला म्हणाली,
"सायलीताई मी तुझी पेंटिंग्स पाहिलीत आणि मी त्यांच्या प्रेमातच पडले. तुझ्या हातात जादू आहे आणि माझी अशीं इच्छा आहे की तू इतर मुलींना ही कला शिकवावी. इथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या इमारतीत आम्ही काही पीडित मुलींचा आश्रम चालवत आहोत. त्यांनाही तुझ्यासारखं स्वावलंबी बनता यावं अशी आमची इच्छा आहे आणि तू तिथे शिक्षका म्हणून रुजू व्हावं असं मला वाटत.तुला त्याचा मोबदला देण्यात येईल."

सायली म्हणाली,
"मी आणि शिक्षिका?मला नाही जमणार.मी बाहेरच्या जगाला तोंड नाही दाखवू शकत.तो त्रास,समाजाची हीन नजर आणि सर्वत्र अवहेलना.नको नकोच ते." 

सुमती तिला समजावत म्हणाली,
"ताई तू एकदा माझ्याबरोबर आश्रमात चल.तेथील परिस्थिती एकदा बघून घे आणि मग ठरव."
अजून सायलीचा नकाराचाच सुर होता, पण संकेतने समजावल्यावर ती तयार झाली. सुमतीच्या गाडीत बसून ती आश्रमात पोहोचली, तिथे आपल्यासारख्याच समदुःखी मुलींना पाहून तिला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली आणि आतापर्यंत नकारघंटा वाजवणारी सायली त्यांच्यासाठी काम करायला तयार झाली.तिच्यात एक वेगळी ऊर्जा जाणवू लागली.
हळूहळू सायली त्या मुलींच्यात रमली, हसू लागली, बागडू लागली.
तिला तीच आयुष्य जणू नव्याने गवसलं. अंधारात चाचपडणाऱ्या तिच्या आयुष्यात चैतन्याची नवीन पहाट आणणारा विक्रांत मात्र तिच्यासमोर कधीच आला नाही. सायलीने आजवर आपल्या घरी येणाऱ्या विक्रांतकडे वर मान काढून कधीच पाहिलं नव्हतं आणि म्हणूनच तो पडद्याआड राहून तिच्यासाठी काहीतरी करू शकला होता. म्हणतात ना,
"कधीकधी अज्ञानातच सुख असत." अगदी तसच आश्रमाची सगळी जबाबदारी आणि मालकी सायलीच्या हातात देऊन त्याने स्वतःची बदली दूर करून घेतली आणि सायलीसाठी कायमचा अनोळखी झाला.

(वाचक मित्रांनो या स्पर्धेचा विजेता वाचक संख्येवरून ठरणार आहे,पण तरीही फक्त गुलाबी प्रेमकथा न लिहिता आम्ही हा थोडा वेगळा विषय निवडला.आपल्यासारखे सुज्ञ वाचक आम्हाला लाभलेत यातच आमचा विजय आहे. तरी कथेचा शेवट कसा असायला हवा?हे तुमच्यावरच सोपवतो आहे,कायदेशीर शिक्षा भोगून मोकाट फिरणं योग्य होतं की,पश्चाताप होऊन प्रायश्चित म्हणून पीडित मुलीला सर्वोतोपरी मदत करणं योग्य होतं?)

©®सारंग चव्हाण

टीम-दुनियादारी.

🎭 Series Post

View all