प्रेमा तुझा रंग कसा? भाग (1)

प्रेमाचा एक अनोखा रंग.

प्रेमा तुझा रंग कसा?
भाग-एक.

"सुर्जी" एक छोटंसं पण टूमदार गाव. जेमतेम पंचवीस-तीस हजार वस्तीचं.गावात फार सुखसुविधा नसल्या तरी मध्यवर्ती एक छोटी बाग, एक सिनेमागृह होतं. त्याचबरोबर दोन कॉलेज होती एक आर्ट्स कॉमर्सच आणि दुसरं विज्ञानशाखेच पदवी पर्यंत शिक्षण देणारं. ही दोन कॉलेज म्हणजे गावची जमेची बाजू. या कॉलेजच्या पोरापोरींनी गाव कसं हलतं फिरतं राहत असे. कट्यावर पोरींचा विषय निघाला कि गप्पा रंगत. विज्ञान शाखेच्या पोरी भाव खाऊन जात.चोरून लपून कॉलेज जीवनातील गुलाबी दिवसाची मजा चाले. 

तारुण्यातील सहज सुलभ प्रेम फुलतांना या कॉलेजनी पाहिलं. त्यातली अर्धी तर इथेच विरून गेलेली तर कांहीनी आपलं प्रेम लग्नापर्यंत पुढे ओढलेलं,पण घरच्यांनी कान पिरगाळून बंद पडलेलं. यशस्वी प्रेम कहाणी बघण्याचे भाग्य या कॉलेजच्या नशिबी कमीच म्हणजे नगण्यच म्हणा ना. 

जेमतेम एका महिन्यापूर्वी या गावात वीज वितरण विभागात इंजिनीअर म्हणून विक्रांतची बदली झाली.पुर्वी याच गावात शिक्षण घेतांना त्यानेही कॉलेजचे गुलाबी दिवस अनुभवले होते. लपूनछपून सिगारेटच्या धुरावर संसाराचे स्वप्न बघितले होते. तेव्हाचं संमोहित करणारं कॉलेज आज मात्र नुसत्या आठवणीने अंगावर काटा आणत होतं. काहीही झालं तरी कॉलेज परिसरात फिरकायचं नाही आणि जुन्या आठवणी काढायच्या नाहीत,असा पूर्ण निश्चय करून विक्रांत नोकरीवर हजर झाला.
 सर्व सुरळीत चालू असताना काल अचानक अख्खं गाव अंधारात बुडालं.तेव्हा पासून वीज मंडळाची यंत्रणा कामाला लागली. गावा बाहेरून मुख्य वीज पुरवठा करणाऱ्या मोठया वीज वाहिन्या आहेत,त्यातच बिघाड झाला होता. दुपारपासून सर्व फौजफाटा घेऊन विक्रांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होता.
 एव्हाना मावळतीचा सूर्य उंच टेकडी उतरून गेला आणि मघापासून दबा धरून बसलेला अंधाराचा सर्प गावाच्या पायथ्याशी घुटमळू लागला. हळूहळू उजेडाने कासवासारखे अंग चोरून घेतले आणि अंधार धीट राक्षस बनून समोर आला. सावकाश या अंधारी राक्षसाने पूर्ण गावास आपल्या सहस्त्र बाहूंच्या पाशात जखडले. हे  काय कमी होते म्हणून आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले. कसेबसे आपले काम संपवून हाताखालील लोकांना पुढचे काम सांगून विक्रांत घराकडे निघाला.


ज्याची भीती होती तेच झालं विक्रांतची दुचाकी गावात शिरली आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. टपोरे थेंब चेहऱ्यावर डोक्यावर तडतडू लागले. पावसाचा जोर इतका वाढला की गावच्या कच्या रस्त्यावर गाडी चालवणे कठीण झाले. कुठेतरी आश्रयाला थांबावे म्हणून एका छोटया घरासमोर विक्रांतने गाडी थांबवली.

दार वाजवावं का? त्याच्या मनात प्रश्न येऊन गेला, पण पावसाचा वाढलेला जोर आणि जवळपास दुसर कांही ठिकाण दिसत नाही म्हटल्यावर त्याचा नाईलाज झाला आणि त्यानं दार वाजवलं एकदा नव्हे दोनदा,...तीनदा,... चारदा ....... आणि मग तो वाजवत राहिला दार उघडे पर्यंत.....
दार उघडले घरात कुठं प्रकाशाची तिरीप दिसत नव्हती म्हणून त्यानं जरा जास्तच आत डोकावलं तेव्हा आत एक मेणबत्ती लावलेली दिसली, " काय हवंय? " प्रश्नावरून एका स्त्रीने दार उघडल्याचे विक्रांतच्या लक्षात आले.
"बाहेर खूप पाऊस सुरु आहे तो ओसरे पर्यंत मी घरात येऊ शकतो का?" चेहऱ्यावरचे पाणी पुसत त्याने विचारले.
ती काही न बोलता मागे वळली इतके त्याच्या लक्षात आले आणि तिच्या उत्तराची वाट न बघता तो घरात गेला. पावसाचा जोर वाढला होता. एकमेकांवर घासणाऱ्या झाडांच्या फांदया आणि घोंगावणारे वारे याचा संमिश्र आवाज वातावरणाची भयानकता वाढवत होता. रस्त्यावरून वाहणारे पाणी आणि साचलेल्या पाण्यात पडणारा पाऊस जीवघेणा वाटू लागला. काही काळासाठी त्याचे स्नायू थिजल्या सारखे झाले. मन स्थिरावण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी संवाद साधावा तर अंधुक प्रकाशात काही दिसत नव्हते. नाईलाजाने तो त्या जळत्या मेणबत्तीकडे अधिक टक लावून पाहू लागला.
मेणबत्ती थोडीच जळली होती, तिचे खाली सांडलेले मेण बघून तिचे वितळणे क्षणभर दुःखदायी वाटले.
"काळजी करू नका पाऊस थांबताच लाईट येईल. मी गावात नवीनच आलोय, मी इंजिनीअर आहे.आताच हे लाईटच काम करून आलोय,पण या पावसानं घोटाळा केला." त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीच उत्तर दिल नाही. पावसाच्या भयाण आवाजात घरातील स्मशान शांतता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. समोरची स्त्री दिसत नसली तरी तीच अस्तित्व जाणवत होतं. तो कावरा बावरा होऊन नाईलाजास्तव तसाच उभा राहिला.
थोडया वेळात पाऊस कमी झाला. "आता लाईट पण येईल." त्याने पुन्हा  बोलण्याचा प्रयत्न केला.
"नाही, इथे लाईट येणार नाही. तुम्ही लाईटची वाट बघू नका." तिचे थंड उत्तर.
"का? काही प्रॉब्लम असेल तर मी चेक करू का?"
"नको मी लाईट लावत नाही. किंबहुना मला प्रकाश नकोय. "
आता मात्र विक्रांतची उत्सुकता शिगेला पोचली.
गावाच्या जवळपास बाहेर अशा छोटया घरात ही बाई राहते. आजूबाजूला एक दीड किलोमीटर अंतरावर वस्ती नाही तरी म्हणते प्रकाश आवडत नाही. अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते.
"पाऊस थांबला आहे तुम्ही निघू शकता." तिच्या या सूचनेने तो भानावर आला.
"ओके निघतो मी. तुमच्या घरात थोडयावेळ थांबता आले, त्याबद्दल आभारी आहे." वरवर विक्रांत बोलला तरी नकळत थोडा रेंगाळला. डोळे जरा बारीक करून त्या मिणमिणत्या प्रकाशात तो तिला बघण्याचा प्रयत्न करू लागला.

ती दार लावायला पुढे सरकली आणि नेमकी त्याच वेळी आकाशात वीज चमकली, प्रकाशाचा एक लघु किरण परावर्तीत होऊन चमकला आणि विक्रांतला जे हवे होते ते बघायला मिळाले.पण तो मनातून चरकला तिचे ते भयाण रूप बघून तशाही परिस्थितीत त्याला घाम फुटला.
गरुडाने आपल्या दोन्ही पायाच्या साह्याने पकडलेला सर्प घेऊन आभाळी उडत असतांना नेमका तो सर्प निसटून नेमका आपल्याच अंगावर पडला कि काय?असे विक्रमला वाटले.
एक मोठी किंकाळी आपल्या तोंडातून बाहेर पडेल असे त्याला झाले. नकळत तो मागे सरकला. अंधारात हाताशी लागलेल्या खुर्चीला घट्ट धरून त्याने बसण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या धांदली मध्ये काहीतरी पडझड झाली आणि तो अधिकच गांगरून गेला.
अंधुक प्रकाशात अस्पष्ट पाहिलेली ही स्त्री म्हणजे जिवंत बाई आहे कि कोणी भूत पिशाच्य?आपण चुकून एखाद्या हडळनीच्या घरात थांबलोय कि काय? ही हडळ नक्कीच आपल्या मानगुटीवर बसणार.भीतीने विक्रांतची पाचावर धारण बसली.
" तू तू.... तुम्ही कोsss ण?" कसेबसे त्याने विचारले.
विक्रांतची पार बोबडी वळली पण तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्याने पडझड केलेल्या वस्तू ती पुन्हा ठिकाणावर ठेवत होती. पूर्ण मनोबल एकवटून त्याने पुन्हा तिच्याकडे बघितले.
आता ती मेणबत्तीच्या प्रकाशाजवळ आल्याने अधिक स्पष्ट दिसू लागली. डोक्यावरचा कपडाही बराच दूर झाला होता. त्यामुळे तिच्या चेहऱ्याचा अधिक भाग उघडा पडला. बिना भुवयीचा, जळक्या नाकाचा, खोल गालाचा विद्रुप मानवी चेहरा त्याने कधी बघितला नव्हता. जळकी त्वचा असणाऱ्या हातावर लाल रक्त बघून तर  विक्रांतचे पाय लटपटू लागले.
"र sss क्त.....?" तो परत एकदा किंचाळत धडपडू लागला.
"रक्त नाही हा रंग आहे, मघाशी तुमच्या धक्याने माझे आजच्या कामाचे पोट्रेट आणि रंग खाली पडले, रंग ही सांडले  नुकसानही झालं आणि सर्व काम वायाही गेलं."
"तू ssss म्ही"...
"घाबरू नका. जीवंत बाई आहे मी, पण तुम्ही आता निघा.मी कोणाशी बोलत नाही आणि आता फार वेळ तुम्हाला ठेवून घेऊ शकत नाही."
विक्रांत आता जरासा सावरला होता. कसाबसा आधार घेत उठून उभा राहिला. त्याच्याही हातापायाला कसा काय रंग लागला त्याला कळले नाही.म्हणजे ही बाई सांगते ते खरेच असावे आपण उगाच रक्त समजून घाबरलो. एरव्ही इतकी हिमंत आपण दाखवतो मग नेमके आता कसे काय घाबरलो?असे प्रश्न त्याच्या डोक्यात येऊ लागले आणि मग पुन्हा एकदा तो भेसूर चेहरा नजरे समोर आला. सर्रकन त्याच्या अंगावर परत काटा उभा राहिला. या.. याच भयानक दिसणाऱ्या चेहऱ्याला आणि त्या जळक्या हाताला घाबरलो मी. आणि मीच काय कोणीही घाबरेल असेच चित्र आहे हे.झालं तेव्हढं बस झालं आता मात्र इथून लवकर काढता पाय घेतलेला बरा. ती कोणी हडळ भूत असो कि कोणी खरी बाई असो, आपण अधिक अडकण्यापेक्षा लवकर यातून बाहेर पडावं हेच खरं. असंही ती आपल्याला जायला सांगते आहे म्हणजे ती काही आपल्याला अडकवणार नाही. चला बाबा पळा आता.
मोठया हिंमतीने त्याने एकदा वळून तिच्या कडे बघितलं. तिने नुकत्याच काढलेल्या चित्राचा कॅनव्हास हाती धरलेला होता. नाजूक मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली दोन हाताची सुंदर ओंजळ..... असं ते चित्र आता त्याला स्पष्ट दिसत होत.पण हे काय मघाच्या आपल्या धांदरटपणा मुळे लाल रंग सांडून तीच हे चित्र पूर्ण खराब झालं होत. कांही सेकंद तो तसाच बघत उभा राहिला. तिने ते चित्र बाजूला ठेवले.
" मला याची सवय आहे.......कोणाच्या तरी चुकामुळे कोणाची तरी चांगली कलाकृती खराब होते आणि त्या व्यक्तीला त्याची जाणीव ही नसते." तिच्या दुःखी बोलण्याला कारुण्याची झालर होती. 
"अहो तस नाही. मला....."
" मी म्हटलं ना तुम्ही निघा आता."
ती जवळपास त्याला हाकलून देत होती.
तो जाण्यासाठी दारात आला पण इतक्यात........

क्रमशः

लेखिका- अंजना भोकरे भंडारी.

🎭 Series Post

View all