प्रेम विवाह भाग -१ ( वादविवाद स्पर्धा)

प्रेम विवाह कसा उत्तम ठरतो ह्यावर थोडक्यात लेखण.


प्रेम विवाह-१

लग्न म्हणजे एक सुंदर प्रवास! लग्न म्हणजे दोन माणसांचं मिलन आणि सोबतच दोन कुटुंबांचं मिलनसुद्धा! विवाहामुळे आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते. भारतीय परंपरेत विवाह संस्थेला महत्वाचे स्थान आहे.
विवाहाचे प्रेम करून केलेला विवाह म्हणजेच प्रेम विवाह आणि ठरवून केलेला विवाह असे दोन प्रकार आपण पाहतो.


प्रेम ही भावना अगदीच सुंदर असते... एवढी सुंदर की सर्व प्रेमी लोकांना ही भावना अगदी सारखीच वाटते. सगळे प्रेमी या प्रेमात असतात तेव्हा \" प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं \" असाही उल्लेख कवितेत कवी व्यक्त करतात. 

प्रेम परिभाषित करणे कठीण आहे, मोजणे कठीण आहे आणि समजणेही कठीण आहे. ही एक भावना आहे जी आपल्या अंतःकरणात इच्छा, आकांक्षा आणि आदर निर्माण करते. प्रेमात कोणत्याही अटी, अपेक्षा नसतात.

प्रेम हे एक अनोखे नाते आहे ज्यामध्ये लोकांची मने कायम जोडलेली असतात. प्रेम विवाहात तर “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे एक लहान वाक्य आहे पण प्रत्यक्षात ते समुद्राच्या खोली इतकं खोल आणि आकाशाच्या उंचीइतकं मोठं, अनंत आहे. 

जोडीदाराची निवड करताना कागदावर ३६ गुण जुळले तरी मनाने आणि विचाराने पुरेसे विचार जुळत नसतानाही आयुष्यभरासाठी  ओळख नसलेल्या व्यक्तीशी लोकं लग्न करतात .अशा लोकांपैकी खरंच किती लोकं स्वतःच्या जीवनात आनंदी आहेत? तेव्हा एकमेकांशी जुळवून घेताना एकमेकांशी ओळख असणे आवश्यक आहे. हाच तर नात्याचा पाया असतो. अशा परिस्थितीत फक्त आई वडिलांचाच विचार करून इच्छा नसतांना देखील थाटलेला संसार हा फक्त दिखावा होऊन बसतो. 

आज परिस्थिती बदललेली आहे. धकाधकीच्या जीवनात सगळेच धावत आहेत. तेव्हा आपले सुख दुःख वाटून, आपल्याला समजून घेणारा जोडीदार फक्त कांद्या पोह्यांचा कार्यक्रमात फक्त १०-१५ मिनिटे बोलून कसा निवडणार आहे? मला अमूक एखादी गोष्ट करायला आवडते असे फक्त बोलण्यापुरतं आणि नंतर आवड  कधी नावडती होते कळतच नाही. अशातच हे नातं कसं जपून ठेवायचं हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. या उलट प्रेम विवाहात ती दोघे एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टी जाणून असतात, एकमेकांच्या मर्यादा ओळखून असतात तेव्हा फसवणुकीचा प्रश्न येत नाही.

ठरविलेल्या विवाहात वधू - वर अवघडलेल्या अवस्थेत असतात. लग्नाची उत्सुकता असली तरीही आपलं संपूर्ण आयुष्य थोड्या फार ओळख असलेल्या व्यक्तीसोबत कसं घालवायचं ह्याचे दडपण असते. प्रेम विवाहात आपल्या जोडीदारावर विश्वास दिसतो,  नविन कुटुंबाबद्दल उत्सुकता असते आणि येणाऱ्या अडचणीत एकमेकांची साथ देण्याची तयारी असते. 

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.

सगळं सहजतेने मिळविता येईल असे ह्या जगात काहीही नाही. तेव्हा विवाहात सगळचं चांगलं होतं असे नाही. कधी कधी जोडीदारावर आपली चिडचिड होते, भांडण होतं. एकमेकांच्या विरोधात अपेक्षांची पूर्तता न झाल्याने वाद विवाद होतात. परंतु  एकमेकांचे वेगळेपणं जपत जे नातं पुढे जातं तेच यशस्वी ठरतं.

 लग्नाआधी "मॅरेज काऊन्सिलिंग " कशाला हवी असा विचार केला जात नाही. जेव्हा लग्न अडचणीत येतं तेव्हा मॅरेज काऊनसेलिंगची गरज वाटते. लग्न अपयशी होण्याचं मुख्य कारण आपला जोडीदार कसा आहे हे आपल्याला न कळणे... प्रेमविवाहात हे असं होण्याची शक्यता अगदी अल्प असते.

प्रेम विवाहात संसारात जर अडचण आली तर फक्त मुलीलाच दोषी ठरविले जात नाही. कारण प्रेम विवाह दोघांनी केला असतो तेव्हा त्याची जबाबदारी सुद्धा दोघे स्वतः घेतात. 

नातं जीवनभर टिकविण्यासाठी त्याला कसे जपावे, हे थोडक्यात समजून घेण्याची दोघांचीही तयारी असायला हवी. स्वतःहून घेतलेल्या निर्णयानुसार  त्या नात्याला प्रेमाने वागवले तर संसाराचं नक्कीच सोनं होतं, ह्यात तिळमात्र शंका नाही...!

©®नेहा खेडकर 
जिल्हा नागपूर