शरद व श्रेया एकाच शाळेत शिकत होते. शरद त्या शाळेचा खेळप्रतिनिधी होता. श्रेयाला येणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता. तेव्हा त्यांची ओळख झाली. पंधरा-सोळा वर्षांची कोवळी मुलं. त्या वयात प्रेमात पडायला कुठं वेळ लागतो. बरीच मुलंमुली स्वतः ला सावरून घेतात पण प्रेमात पडणारे पण बरेच असतात. त्या वयात ना जीवनाबद्दलची पूर्ण समज असते ना भविष्याची तेवढी चिंता असते. असतात त्या फक्त गोड वाटणाऱ्या भावना.
श्रेया दिसायला खूप चांगली होती. शरद ही देखणा होता. त्या वयात प्रेमासाठी तेवढं पुरेसं होतं. त्यांचे संवाद वाढू लागले. भेटीगाठी वाढल्या. गावामध्ये तेवढी मोकळीक नसते पण तरीही ती दोघे लपून-छपून त्यांच्या प्रेमाचा अंकुर वाढवत होती. ती दोघे वेगळ्याच जगात वावरत होती. इतर काहीच नको होतं फक्त एकमेकांचा सहवास त्यांना हवा होता.
शरद व श्रेया आता दहावी पास झाले होते. श्रेया शाळेतून प्रथम आली होती. शरद खूप खुश झाला होता. पण तो दुःखी सुद्धा होता, कारण श्रेया गाव सोडून जाणार होती. श्रेयाची आणि त्याची भेटही झाली नाही. त्याला माहितही नव्हतं की ते कुठे गेले आहेत.
शरदला रोज तिची आठवण यायची; पण काय करणार? काही उपाय नव्हता. गावातही कुणालाच माहित नव्हतं ते कुठे गेलेत म्हणून.
बारावी झाल्यानंतर तो शिक्षणासाठी शहरात निघून आला. शिक्षण तर चालू होते पण त्याचं बिलकुल लक्ष लागत नव्हतं. त्याला कुठल्याच गोष्टीत आनंद मिळत नव्हता. फक्त श्रेयाचे विचार त्याच्या मनात खेळत होते.
दोन-तीन वर्षानंतर एके दिवशी श्रेया त्याच्या नजरेस पडली. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. श्रेयाही त्याला बघून खुश झाली.
बोलता-बोलता त्याला कळलं की श्रेयाला नोकरीसुद्धा लागली होती. ती स्वतः च्या पायावर उभी झाली होती. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारली होती.
शरद म्हणाला, "चल आता आपण आपल्या घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगूयात."
तिचा चेहरा थोडासा गंभीर झाला होता. ती त्याला काय उत्तर द्यावं या विचारात पडली होती. त्याला काय झालं ते समजेना.
ती म्हणाली, "हे बघ मी चांगल्या नोकरीला आहे आणि तू..... हे बघ त्या वयात मला तेवढी समज नव्हती. त्या वयात फक्त तुझं देखणं असणं माझ्यासाठी पुरेसं होतं. पण,आता......"
तो म्हणाला, "अगं पण आपलं तर प्रेम आहे ना एकमेकांवर. मला काही फरक पडत नाही. मला फक्त तू हवी आहेस."
ती म्हणाली, "प्रेम म्हणजे सर्वस्व नसतं. इतरही गोष्टी विचारात घ्यायच्या असतात. तुला नसेलही फरक पडत पण मला फरक पडतो."
ती तेथून उठून गेली. अवतीभोवतीचा आवाज त्याला ऐकू येत नव्हता. तो सुन्न झाला होता. कोणत्या भ्रमात होता तो? चित्रपटातील नायिका आणि श्रेयामध्ये किती फरक होता! काय करावं, काय नाही हे त्याला कळत नव्हतं. जीवनात प्रेमाव्यतिरिक्त पण इतर गोष्टी असतात हे तो पार विसरला होता.
त्याचे आईवडील त्यांच्या छोट्याश्या रेस्टॉरंट मध्ये किती मेहनत करत होते. हायवे लगत असलेल्या त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये गावातील विहिरीतून पाणी घेऊन येत होते. त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमा करत होते आणि तो. छे. आज पहिल्यांदा त्याला ह्या गोष्टी जाणवत होत्या. त्याची पण जबाबदारी होती. तो आता मोठा झाला होता. त्यानेही काहीतरी हातभार लावायला हवा होता. जबाबदारी, कर्तव्य, आर्थिक स्थिती या गोष्टी त्याला आता उमगत होत्या.
त्याने ठरवलं. बस झालं आता. त्याने त्याचं राहिलेलं हॉटेल मॅनेजमेंट चं शिक्षण पूर्ण केलं. तो लगेच गावी निघून आला. त्याने त्याचं पूर्ण लक्ष त्यांच्या रेस्टॉरंट वर केंद्रित केलं. तो नवनवीन कल्पना, योजना अंमलात आणू लागला. त्याने खूप मेहनत केली. त्याची मेहनत बघून त्याचे आईवडील खूप खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आपल्यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यात किती सुख असतं ते त्यानं आता अनुभवलं होतं.
त्यांचं छोटंसं रेस्टॉरंट एका मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतरित झालं होतं. त्यांच्या येथे प्रवासी नागरिकांची गर्दी व्हायला लागली. ते लग्नाचे सुद्धा ऑर्डर्स घेऊ लागले.
एके दिवशी श्रेयाच्या लग्नाची ऑर्डर त्यांच्याकडे आली होती. त्याने थोडा विचार केला व नंतर ऑर्डर स्वीकारली. त्याने तिला शुभेच्छा पण दिल्या. ती खुश होती आणि तो सुद्धा. तिच्या साठी त्याच्या मनात असलेल्या भावना पार बदलल्या होत्या. तो फार समजूतदार झाला होता.
नंतर त्यानेही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अगदी थाटात त्याचं लग्न पार पडलं. त्याला समजूतदार, प्रेमळ पत्नी मिळाली. सर्वजण खुश होते.
एके दिवशी सर्व भूतकाळातील गोष्टी त्याला आठवल्या. "किती फिल्मी होतो ना आपण!" असं तो स्वतःशीच पुटपुटला. स्वतः वरच त्याला हसू आलं.
आवडल्यास share नक्की करा.