प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग ५ अंतिम

तिने अखेर न राहवून स्वतःचे थरथरणारे ओठ त्याच्या मानेवर उमटवले. त्या स्पर्श अनुभूतीने त्या चित्रकाराचे डोळे मिटले.
प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग ५ अंतिम

कथेचे नाव:- प्रेम रंग
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (नोव्हेंबर २०२२)
विषय:- सांग कधी कळणार तुला?

भाग ५ अंतिम


तिचा आजचा दिवस जरी तितकासा खास गेला नसला तरीही संध्याकाळ मात्र अभिमानाने भरून गेली होती. तिने पेंटिंग विकल्या गेल्याच्या अनाउन्समेंट ऐकल्या होत्या. शार्दुलचं झालेलं कौतुक आणि त्याची पेंटींगची विशिष्ट शैली तिचा मूड चेंजर बनले होते.

या सगळ्यामुळेच तिने आज त्याच्या आवडत्या रेसिपीचा बेत आखला होता.

\"माझ्या शब्दांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व देणाऱ्या माझ्या नवऱ्याला माझ्या भावना या कृती कळतील ना?\"

ती विचारात असतानाच दरवाजा उघडल्याचा आवाज आला.

शार्दुल आला होता.

तिने पास्ताला फायनल टच देत बेडरूममध्ये जाणाऱ्या शार्दुलला पाहिलं.

त्याचं हे नेहमीचं होतं. साहेब आपल्याच विश्वात गुंतून असायचे. घरात आल्यावर कोणतीही चर्चा न करता फ्रेश होऊन येणं आणि सरळ जेवायला बसणं.

आजही त्याने तेच केलं. मित्रालाही आता या सगळ्या सवयी तोंडपाठ झाल्या होत्या. ती नेहमीप्रमाणे जेवण टेबलवर सेट करून त्याचीच वाट पाहत होती.

तिने एकवार शांतपणे त्याच्याकडे पाहिले. तो मन लावून पास्ता प्लेटमध्ये वाढून घेत होता.

न बोलता शांततेत जेवायला आवडणारा तो; आज मनातून तिने संवादाची सुरुवात करावी, अशी अपेक्षा करत होता.

तिला बोलायचं खूप काही होतं; पण त्याला जेवताना बोललेलं आवडणार नव्हतं. त्याचा आजचा एवढा मोठा दिवस तिला त्याच्या मनाविरुद्ध वागून खराब करायचा नव्हता आणि म्हणूनच तीही प्लेटमधला पास्ता गपचुप संपवत होती.

त्याने खाताना एक नजर तिच्यावर फिरवली, \"मित्रा, प्लीज यार, बोल ना काहीतरी.\"

"अहम अह." त्याने तिचं लक्ष वेधायला घसा खाकरला.

तिने तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, असं समजून नजर त्याच्याकडे वळवली.

तर साहेब पुन्हा पास्तात रममाण झालेले दिसले. मित्राला वाटलं; तिला भास होतायत. तिनेही मग दुर्लक्ष केले.

\"काय ही? हिला माझी एकपण पेंटिंग आवडली नाही का? हां, असं तर होणंच शक्य नाही. ती माझी पेंटिंग आहेत.\" विचार आणि खाण्याच्या एकत्र क्रियेत त्याला ठसका लागला आणि तो खोकु लागला.

मित्राने लगेच त्याला पाणी दिलं. मायेने पाठीवर थोपटलं.

"थँक्यू." त्याचा ठसका आवरला तस त्याने तिने बोलावं म्हणून शांततेला वाचा फोडली.

आतातरी ती काही बोलेल आणि मग आपण पेंटिंगवर चर्चा करू अशा आशेने तिच्याकडे बघणाऱ्या त्याच्याकडे बघून ती निव्वळ हसली.

\"काय?\" आता मात्र साहेबांची सहनशीलता संपली.

प्लेट आणि काट्याची युद्धभुमीच बनली.

त्यांच्या आवाजाने मित्राला त्याचा मूड बिघडल्याची जाणीव झाली.

\"कदाचित मी निघाले, त्यानंतर काहीतरी त्याच्या मनाविरुद्ध झालं असू शकतं. बिचारा काही सांगतही नाही.\" ती आपली स्वतःच्याच तंद्रीत जेवत होती. हा कधी आपल्या रूममध्ये निघून गेला, तिला कळलंच नाही.

तिचं जेवून झालं, तसं नेहमीप्रमाणे तिने सगळं आवरायला घेतलं.

\"किती छान संध्याकाळ होती आजची. शार्दुलचं किती कौतुक झालं. ही डीझर्व्हस् इट. मीही म्हणूनच आज त्याच्या आवडीचा मेनू बनवला; पण साधं कसा झालाय हे सांगणं ही नाही. रुल जो ब्रेक होईल ना त्याचा. त्याने कौतुक केलं असतं तर मलाही त्याच्या पेंटिंगचं कौतुक करता आलं असतं ना! त्याची ती मला आवडलेली पेंटिंग.\"

तिने आवरलेल्या रूममध्ये एक नजर फिरवली.

\"सांग कधी कळणार तुला? हे सगळं मी तुझ्यासाठीच तर केलं होतं.\"

_______________________


वैतागून बेडरूममध्ये निघून आलेल्या शार्दुलला त्या बंद खोलीत अजूनच घुसमटायला झालं.

त्याने गॅलरीचा दरवाजा उघडला आणि रेलिंगला टेकून आकाशातल्या चंद्राला पाहत उभा राहिला.

\"किती हिंट द्याव्यात या मुलीला! लहानपणी खूपदा डोक्यावरच पडली असावी. कामात अगदी चोख कशी राहते मग? तिथे मात्र सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात हिच्या. काय बोलतात हे सगळे ऑफिसमधले तिला मिसेस परफेक्ट.\"

त्याने केसातून हात फिरवला.

\"मिसेस.. मिसेस……\" शब्द मनात घोळवला तस नकळत ओठांवर मंद स्मित आलं.

\"मग या मिसेस परफेक्टला माझ्या एवढ्या सगळ्या हिंट कळायला नकोत का? सांग ना मित्रा, कधी कळणार तुला?\"

_______________________


आपण आवरलेलं किचन बघताना तिला परत त्याच्या पेंटिंगची आठवण आली. ती विसरलीच कुठे होती म्हणा. ती सगळी पेंटिंग तिच्या मनावर कोरली गेली होती.

\"किती रोमँटिक आहेत! त्या पेंटिंग मागची कल्पना आणि त्यातली मुलगी, किती लकी आहे ती! तो तिच्यावर किती प्रेम करतो.\"

मित्राच्या मनात ती पेंटिंग फिरत असतानाच ती बेडरूमच्या बंद दारापाशी येऊन पोहोचली.

\"ओह माय गॉड! मी हे कसं नाही समजले? त्या चित्रातली ती मुलगी, ते ऑफिस आणि त्या टेबलावरचा तो लकी चार्म. इट्स मी.\"

या विचाराने ती क्षणभर स्तब्ध झाली आणि झरझर सगळी पेंटिंग तिच्या डोळ्यांसमोर तरंगू लागली. प्रत्येक पेंटिंगमधील दडलेलं काही आता तिला उलगडत होतं.

तिने त्याच भारावलेल्या अवस्थेत दरवाजा उघडला.

तो अजूनही गॅलरीत त्याच्याच प्रश्नात अडकून उभा होता. त्याला पाठीमागून पाहून ती हसली.

तिने पाहिलेलं ते तिसरं पेंटिग जे तिच्यासमोर आता प्रत्यक्षात उलगडत होतं.

त्याच्याशेजारी अलगद जाऊन उभी राहिली. त्याला अजूनही तिची चाहूल लागली नव्हती.

तिने त्याच्याकडे एक नजर पाहिले. उंचपुरा तो, आकाशातल्या चंद्राकडे पाहत असलेला. तिला आज स्वतःकडे आकर्षित करत होता.

तिने अखेर न राहवून स्वतःचे थरथरणारे ओठ त्याच्या मानेवर उमटवले. त्या स्पर्श अनुभूतीने त्या चित्रकाराचे डोळे मिटले.

बंद डोळ्याआड त्या दोघांचे त्या अवस्थेतले अजून एक पाठमोरे चित्र रेखाटले गेले.

भावनेच्या भरात आपण काय करून बसलो याची जाण होताच, त्याचे डोळे उघडण्यापूर्वी ती खोलीत जायला निघाली आणि त्याचा हात तिच्या खांद्यावर विसावला. तिची पावलं थबकली आणि…

त्याचं ते अर्धवट स्वप्नचित्र अखेर पूर्ण झालं.


समाप्त.


- © मयूरपंखी लेखणी

Copyright notice:

वरील साहित्याचे संपूर्ण कॉपीराईट्स मयुरपंखी लेखणीकडे रिझर्व्ह्ड आहेत. हे साहित्य वा या साहित्यातील मजकूर, भाग वा साहित्याचा आशय कोणत्याही प्रकारे (ऑडिओ, विडिओ, कॉमिक) व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साहित्यचोरी हा कॉपीराईट ॲक्ट, १९५७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.


🎭 Series Post

View all