प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग ४

किशोरीताईंचं 'सहेला रे' वाजत होतं. अशाच रागदारीने भरलेल्या गाण्यांच्या सोबत तिने घरापर्यंत प्रवास केला.

प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग ४


कथेचे नाव:- प्रेम रंग
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (नोव्हेंबर २०२२)
विषय:- सांग कधी कळणार तुला?

भाग ४


इंटरव्ह्यू तर संपला पण एक्झिबिशन ऑर्गनायझरने शार्दूलला एका ग्रुपची ओळख करून दिली. तीन चार जणांचा तो घोळका इंटरव्ह्यू संपता संपता त्या ठिकाणी आला होता.

शहरातील प्रसिद्ध अशा मोहताज आर्ट गॅलरीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रसिद्ध कलाकारांची कलाप्रदर्शनं भरत असत. तिथे नेहमी येणाऱ्या काही दर्दी रसिकांपैकी काही रसिक आज आले होते. शार्दूलची आणि त्या रसिकांची ओळख करून देऊन ऑर्गनायझर इतर व्यवस्था पाहण्यासाठी निघून गेले.

आता शार्दूल आणि ते व्हिझिटर्स एकत्र प्रदर्शन बघू लागले. पहिल्या पेंटिंगसमोर उभं राहून त्यांची काही मूक चर्चा चालू होती.

शार्दूलची नजर आता मित्राला शोधत होती. इंटरव्ह्यू तिने पूर्ण ऐकला होता आणि ती हॉलमध्येच आहे हे त्याला माहित होतं. हॉलच्या विरुद्ध बाजूला असलेल्या एका पेंटिंगसमोर ती उभी असलेली त्याला आढळली. शार्दूलने काढलेलं बेधुंद पावसात समुद्रकिनारी बसलेल्या एका पाठमोऱ्या कपलचं पोर्ट्रेट. मित्रा बराच वेळ ते पोर्ट्रेट निरखत होती. तिला ते कपल फारच ओळखीचं वाटत होतं.

शार्दूल मधून मधून तिला पाहत होता. त्याला अपेक्षित होतं; त्याप्रमाणे ती नेमकं तेच पेंटिंग बघत होती अगदी मन लावून.

\"तुला हा मोमेंट आठवतोय तर.\" त्याचं अर्ध लक्ष मित्राकडे तर अर्ध लक्ष त्या व्हिझिटर्स ग्रुपकडे होतं.

एव्हाना व्हिझिटर्स ग्रुप दुसऱ्या पेंटिंगकडे वळला होता. शार्दूल आता त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त झाला.

मित्रा आता पुढच्या पेंटिंगकडे वळली. तिथे फार न थांबता ती पुढचे पेंटिंग बघू लागली.

त्यात एक मुलगी काही लिहीत होती नि तिच्या बाजूला एक मुलगा वाकून तिच्या चेहऱ्यावर येणारी बट तिच्या कानामागे सारत होता. मागच्या बाजूने काढलेलं हे पोर्ट्रेट. तिची छबी अगदी सुस्पष्ट पण तो मुलगा मात्र बऱ्यापैकी धूसर काढलेला, जणू तो आहे की तो असल्याचा भास आहे.

बराच वेळ तिथे रेंगाळून मग ती पुढे गेली. पुढची २ - ३ पेंटिंग तिने बघून न बघितल्यासारखी केली आणि पुढच्या पेंटिंगकडे सरकली.

शार्दूल अजूनही दुसऱ्या पेंटिंगकडे थांबून होता. एवढ्यात त्याच्या २ पेंटिंग विकल्या गेल्याची घोषणा करण्यात आली. त्या व्हिझिटर्सपैकी दोघांनी त्याची २ पेंटिंग घेतली होती.

मित्राचं इतक्या भरभर पुढे सरकणे त्याला अस्वस्थ करत होतं. तिने खूप वेळ लावून बघितलेली ती दोन्ही पेंटिंग त्याने नोटीस केली होती.

पण त्याने काढलेलं सर्वात खास पेंटिंग मात्र ती चुकवून पुढे जाते की काय असे त्याला एक क्षण वाटून गेलं.

ती मात्र त्या पेंटिंगकडे थांबली.

नकळत त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या.

त्याचं लक्ष आता त्या व्हिझिटर्स ग्रुपकडे गेलं. तो त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त झाला.

मित्रा एक पेंटिंग बघत होती.

एक पाठमोऱ्या उभ्या मुलीचं ते चित्र. एक मुलगा मागून तिच्या खांद्यावर हात ठेवायला उभा. पण त्याच्या हातात आणि तिच्या खांद्यात थोडं अंतर होतं. तिने ते पेंटिंग नीट निरखून बघितलं. ते पेंटिंग पाहून झाल्यावर मात्र ती तिथे थांबली नाही.

_______________________


पार्किंगमध्ये येऊन तिने आपली कार बाहेर काढली आणि शांतपणे घराच्या दिशेने ड्राईव्ह करू लागली.

मनात पेंटिंग घोळत होती, शार्दूलचं "घरी भेटू," सांगणं घोळत होतं. त्याने एकट्यानेच तिथे जाणं घोळत होतं. एखाद्या व्हिझिटरसारखं तिथे जाणं आणि ते प्रदर्शन बघणं, सगळेच विचार तिच्या डोक्यात फिरत होते.

ड्राईव्ह करताना लक्ष भरकटू नये म्हणून तिने म्युझिक प्लेयर चालू केला.

किशोरीताईंचं \"सहेला रे\" वाजत होतं. अशाच रागदारीने भरलेल्या गाण्यांच्या सोबत तिने घरापर्यंत प्रवास केला.

_______________________


शार्दूल मात्र तिला बराच वेळ तिथे शोधत होता. आज बरीच गर्दी होती तिथे. थोड्या वेळाने ती तिथून निघून गेल्याचं लक्षात आलं त्याच्या. मग मात्र त्याने पूर्ण लक्ष तिथे असलेल्या कलारसिकांवर केंद्रित केलं.

_______________________


ती घरी येऊन हॉट शॉवर बाथ घेऊन डिनरसाठी त्याच्या आवडीच्या पिंक सॉस पास्ताची तयारी करू लागली.

क्रमशः


- © मयूरपंखी लेखणी

Copyright notice:

वरील साहित्याचे संपूर्ण कॉपीराईट्स मयुरपंखी लेखणीकडे रिझर्व्ह्ड आहेत. हे साहित्य वा या साहित्यातील मजकूर, भाग वा साहित्याचा आशय कोणत्याही प्रकारे (ऑडिओ, विडिओ, कॉमिक) व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साहित्यचोरी हा कॉपीराईट ॲक्ट, १९५७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

🎭 Series Post

View all