प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग ३

"तुम्ही विवाहित आहात का?" त्याने हा प्रश्न विचारताच मित्राच्या हृदयाची बुलेट ट्रेन शार्दुलचं उत्तर ऐकायला उत्सुक झाली.
प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग ३

कथेचे नाव:- प्रेम रंग
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (नोव्हेंबर २०२२)
विषय:- सांग कधी कळणार तुला?

भाग ३


मित्रा ते एन्व्हलप लपवण्याच्या धावपळीतच दरवाजात अडखळली होती. कसेबसे ते एन्व्हलप तिने लॅपटॉप आणि पेपर यांच्यामध्ये दडवले.

पुन्हा त्याच्या केबिनपासून तिच्या डेस्कपर्यंत जाणारा तो नजरांनी वेढलेला बोचरा मार्ग.

आता तिच्यासाठी काही नवीन नव्हता म्हणा. ती जॉईन झाली तेव्हापासून ते आजमितीपर्यंत या सगळ्या अडथळ्यांची तिला सवय झाली होती.

तिने ते एन्व्हलप मुद्दामच त्याच्यासमोर अतिउत्साह दाखवत न घेता शांत निर्विकार चेहऱ्याने उचलले होते. तो जर आपल्या तिच्याबद्दलच्या भावना, ज्या आहेत हे न दाखवता तिच्यासमोर वावरू शकतो; तर तीही काही मागे हटणारी नव्हती.

याच चढाओढीत दोघेही वावरत होते.

मित्राने डेस्कजवळील डेस्क वॉच चेक केलं. ते करण्याच्या बहाण्याने तिने ते एन्व्हलप सराईतपणे तिच्या मेकअप पाउचमध्ये लपवलं.

सावकाश डेस्क आवरायला सुरुवात केली. तिच्या चाणाक्ष नजरेतून त्याच निघणं सुटलं नव्हतं. सुटेल तरी कसं तो बाहेर पडताच ऑफिस त्याच्याविषयीच्या कॉमेंट्सनी जे गजबजलं होतं.

\"ऑफिसमध्ये सगळ्यांना माहित आहे की; ही इज मॅरीड मॅन. तरीही एवढं गॉसिप! डिस्कस्टिंग!\" मित्रा मनात म्हणतच होती की शेजारच्या डेस्क वरील कलीगच्या प्रश्नाने ती भानावर आली.

"कशावरून त्यांचं लग्न झालंय? आय डोन्ट बिलिव्ह इट. व्हॉट यू फिल मित्रा?" तिच्या प्रश्नाने मित्रा आतून गोंधळली तरी चेहऱ्यावर न दाखवता लगेच त्याचं उत्तर देणार होती; की तेवढ्यात दुसरी म्हणाली,

"तिला काय विचारते? तिचं कुठे एवढं लक्ष असणार! तिचं लग्न झालंय ना!" त्या दोघींमध्ये हशा पिकला आणि टाळ्यांची देवाणघेवाण ही झाली.

मित्रा त्यांच्या गप्पा ऐकून मनोमन चरफडली. पण तिथे थांबून वेळ घालवण्यापेक्षा ही महत्त्वाची कामं होती तिला.

ती फ्रेश होऊन आली. डेस्कवरची पर्स घेतली आणि एक लास्ट नजर डेस्कवर फिरवून पार्किंगकडे जायला निघाली.

गाडी सुरू करून नेहमीप्रमाणे एसी टेम्परेचर सेट केलं. तिला त्या एन्व्हलपमध्ये काय आहे, हे शांत चित्ताने पाहायचे होते.

तिने ते आधी ओपन केलं.

"अखेर मला तिथे जाता येईल तर. आम्ही एकत्र गेलेलं साहेबांना चालणार नव्हतं, असं दिसतंय." तिच्या ओठांचे रुंदावलेले कोपरे पुन्हा पूर्ववत झाले.

तिने पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि मार्गस्थ झाली.

मनात आनंद होताच; पण कुठेतरी एक दुखरी सल सलत होती.

ड्राईव्ह करत असताना मध्येच सिग्नलला तिची गाडी स्लो झाली. सहज काचेतून बाहेर नजर गेली आणि अवघडून तिने पुन्हा ड्रायव्हिंगवर लक्ष वेधलं. तिच्या शेजारीच एकमेकांना खेटून बाईकवर बसलेलं एक कपल येऊन थांबल होतं.

पुन्हा त्या दिशेने पहायचं नाही हे मनाला बजावलं आणि नुकत्याच झालेल्या ग्रीन सिग्नलनेही तिच्या मनाचा कौल मान्य केला.

मानेला एक झटका देत ती लेफ्ट साइडला वळत असताना तिची नजर तिच्याकडे रोखून पाहणाऱ्या त्याच्यावर गेली.

सिग्नल हिरवा होताचं. ते एकाच बाईकवरचं जोडपं उजवीकडे तर वेगवेगळ्या कारमधले हे दोघे डावीकडे निघाले.

_______________________


तो तिची वाटही न बघता सरळ आत निघून गेला.

ती मात्र स्वतःला एकदा आरश्यात न्याहाळून आत निघाली.

आतील वातावरण आणि सजावट त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी होती.

ती जरा अजून पुढे गेली आणि तिची भिरभिरणारी नजर एका ठिकाणी येऊन स्थिरावली.

मोठमोठ्या लेन्सेस आणि दहा बारा माईक त्याचा इंटरव्ह्यू कव्हर करत होते.

तो अगदी बिनधास्त आणि शांतपणे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. त्याच्यापेक्षा त्याची आर्ट जास्त बोलकी होती. खूप काही सांगून जात होती. फक्त ती समजणारी नजर असणं आवश्यक होतं.

तीही त्या गर्दीतून शार्दुलकडेच बघत होती.

\"हा तोच आहे का? शब्दांना जास्त वापरलं तर ते नष्टच होतील अश्या आविर्भावात वावरणारा तो. किती मनमोकळेपणाने त्या रिपोर्ट्सना उत्तर देतोय. मघाशी मला इन्विटेशन देताना सांगता नाही आलं; की त्याच्याबरोबर मीही यावं.\"

तिच्या मनात हा विचार यायला आणि तिची आणि त्याची नजरानजर व्हायला एकच गाठ पडली. त्याने चेहऱ्यावरचे हावभाव न बदलता पुन्हा उत्तर द्यायला सुरुवात केली.

पण तो तिला हसतोय, असं उगीच तिच्या मनाला वाटून गेलं.

"सर, तुमची प्रेरणा कोण आहे? यावेळी तुम्हाला कोणी इन्स्पायर केलंय?" पत्रकारांनी नेहमीचे ठेवणीतले प्रश्न विचारायला सुरुवात केली.

"दरवेळी असंच असायला हवं का? की कला प्रेरित होऊन निर्माण व्हावी. कधी कधी कला ही तुम्हाला प्रेरित करून जाऊ शकते." तो आणि त्याची फिलॉसॉफी; दोन्ही जगावेगळी.

प्रश्नोत्तरे सुरू असताना मध्येच कोणीतरी त्याला विचारलं, "सर, या वेळचं एक्झिबिशन नेहमीपेक्षा वेगळं आहे. यात काहीतरी दडलंय. ते प्लीज आम्हांला सांगाल का?"

उत्तरादाखल तो गूढ हसला आणि म्हणाला, "कलाकाराच्या भावना या त्याच्या शब्दातून नाही; तर त्याच्या कलेतून समोर येतात. त्या ओळखण्याची जबाबदारी ही तुमची असते." हे उत्तर जरी त्या पत्रकारासाठी असले तरी ते तिच्यासाठी होतं असं तिला उगीचच वाटून गेलं.

"सर, एक पर्सनल क्वेशन होता. विचारू का?" पत्रकार घाबरतच बोलला.

"येस."

"तुम्ही विवाहित आहात का?" त्याने हा प्रश्न विचारताच मित्राच्या हृदयाची बुलेट ट्रेन शार्दुलचं उत्तर ऐकायला उत्सुक झाली.

"मी याचं उत्तर देईन पण हा या इंटरव्ह्यूचा शेवटचा प्रश्न असेल." त्याने आवाजातला मिश्कीलपणा जराही कमी न करता उत्तर दिलं, "होय, माझं लग्न झालंय."

त्याने सुचवल्याप्रमाणे हा इंटरव्ह्यू तिथेच संपला. कोणाच्या कुठल्याही प्रतिक्रियेची वाट न बघता तो तिथून निघून गेला.

ती मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.


क्रमशः


- © मयूरपंखी लेखणी

Copyright notice:

वरील साहित्याचे संपूर्ण कॉपीराईट्स मयुरपंखी लेखणीकडे रिझर्व्ह्ड आहेत. हे साहित्य वा या साहित्यातील मजकूर, भाग वा साहित्याचा आशय कोणत्याही प्रकारे (ऑडिओ, विडिओ, कॉमिक) व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साहित्यचोरी हा कॉपीराईट ॲक्ट, १९५७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

🎭 Series Post

View all