प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग २

क्षणभर तिला वाटलं, आपण असेच तर थांबून आहोत गेले दीड वर्ष. तिने एक उसासा सोडला आणि थांबून राहिली चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन.

प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग २


कथेचे नाव:- प्रेम रंग
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (नोव्हेंबर २०२२)
विषय:- सांग कधी कळणार तुला?

भाग २

हातातील सगळं सामान सांभाळत तिने दिमाखदारपणे केबिनमध्ये प्रवेश केला.

मित्रा म्हणजेच आपल्या कथेची नायिका मगाशी चेहऱ्यावर असलेले भाव जणू त्या केबिनबाहेर असलेल्या सोफ्यावर सोडूनच आत आली होती. आता तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती.

सर्व पेपर्स, फाईल्स, लॅपटॉप, सगळं काही तिने त्याच्या परवानगीची वाट न पाहता त्याच्या टेबलवर ठेवले. तिच्या त्या पसाऱ्याने तो त्रासला किंचित. त्याने नजरेनेच तिचे लक्ष तिनेच केलेल्या पसाऱ्याकडे वेधले. ती मात्र अजूनही कुठल्या खुर्चीत बसू या संभ्रमात होती. खरंतर त्याच्या खुर्चीसमोर असलेली खुर्ची तिची आवडती जागा पण आज मात्र ती सततच्या कामामुळे वैतागली होती आणि म्हणूनच ती शेजारच्या खुर्चीवर बसली. त्याने यावरही किंचित नाराजी व्यक्त केली पण ती सुद्धा फक्त डोळ्यांनीच. त्याचे शब्द हे जणू प्लॅटिनमपेक्षाही जास्त किमती होते.

तिने ना त्याच्या पसाऱ्याबाबतच्या नाराजीकडे लक्ष दिले; ना त्याच्या जागा बदलल्याच्या. तिने सरळ लॅपटॉप उघडून तो HDMI केबलने मोठ्या मॉनिटरसोबत जोडला आणि हातातील पहिला पेपर त्याच्या दिशेने सरकवला. त्यानेही ठरवले, काहीच व्यक्त व्हायचे नाही. पुढचा अर्धा तास ती अखंड बोलत होती आणि एक एक पेपर त्याच्या दिशेने पुढे सरकवत होती. त्याचा शब्दसंचय आज त्याला फक्त "हं" इतकाच शब्द वापरायची परवानगी देत होता.

डिस्कशन…. अहं, तिचं एकतर्फी डिस्कशन संपलं आणि तिने लॅपटॉप डिस्कनेक्ट केला. सगळं सांगून झालं होतं, किमान तिचं तरी. त्याला मात्र अजूनही काही सांगायचं असावं, असं तिला क्षणभर वाटून गेलं.

तिचं बोलून झालं तसं ती लॅपटॉप हातात घेत उठली आणि बाहेर जायला मागे वळली. आता मात्र त्याचा संयम संपला.

"एक मिनिट." बस इतकंच. ती वळून उभी राहिली, त्याच्या पुढे बोलण्याची वाट पाहत.

हे नेहमीचंच होतं तिच्यासाठी. वाट पाहणे; त्याच्या उस्फुर्त प्रतिसादाची, त्याच्या मोकळेपणाने बोलण्याची, त्याच्या व्यक्त होण्याची, त्याच्या प्रेमाच्या कबुलीची.

शार्दूल आणि मित्रा. एकाच ऑफिसमध्ये काम करणारे नवरा बायको. त्यांच्या बॉस आणि एम्प्लॉयी या नात्याव्यतिरिक्त असलेल्या या नवराबायकोच्या नात्याबद्दल मात्र ऑफिसमधले सर्वच अनभिज्ञ. तसंच ठरलेलं त्यांचं; किंबहुना त्याने ठरवलेलं आणि तिने मान्य केलेलं.

आताही वळून त्याच्या पुढे बोलण्याची वाट पाहत असलेली ती. लॅपटॉप पुन्हा डेस्कवर ठेवलेला आणि एक पाय किंचित दुमडून दुसऱ्या पायावर भार तोलून त्याच्या बोलण्याची वाट पाहत असलेली ती. क्षणभर तिला वाटलं, आपण असेच तर थांबून आहोत गेले दीड वर्ष. तिने एक उसासा सोडला आणि थांबून राहिली चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन.

त्याने उत्तरादाखल ड्रॉवरमधून एक एन्व्हलप काढलं आणि तिच्यासमोर सरकवलं.

"घरी भेटू," म्हणत त्याने बोलणं संपवलं. ती मग लॅपटॉपवर ते एन्व्हलप ठेऊन निघाली. दार उघडताना तिचा गेलेला तोल बघून तो उठून उभा राहिला आणि तो तिला मदत करायच्या आत तिनेच स्वतःला सावरलेलं. त्याचाही पुढे गेलेला हात पुन्हा मागे आला. ती केबिनमधून बाहेर जाऊन लिफ्टमध्ये शिरेपर्यंत तसाच उभा राहिला तो.

लिफ्टचं दार बंद झालं आणि त्याच्या मनात तात्पुरतं उघडलेलं काळजीचं दालनही. काहीच झालं नाही या अविर्भावात तो पुन्हा बसला आणि कामावर लक्ष केंद्रित केलं त्याने.

ऑफिस सुटायची वेळ झाली तसे तो निघाला. खाली पार्किंगमध्ये येऊन त्याने कार चालू केली. गेटबाहेर येऊन सफाईदारपणे यु टर्न घेतला आणि तो निघाला पण घराच्या विरुद्ध दिशेने.

क्रमशः


- © मयूरपंखी लेखणी

Copyright notice:

वरील साहित्याचे संपूर्ण कॉपीराईट्स मयुरपंखी लेखणीकडे रिझर्व्ह्ड आहेत. हे साहित्य वा या साहित्यातील मजकूर, भाग वा साहित्याचा आशय कोणत्याही प्रकारे (ऑडिओ, विडिओ, कॉमिक) व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साहित्यचोरी हा कॉपीराईट ॲक्ट, १९५७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

🎭 Series Post

View all