प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग १

तिने त्या वाजणाऱ्या फोनकडे बघण्याऐवजी आधी तिच्या रिस्ट वॉचमध्ये पाहिलं; अजून वेळ शिल्लक होता.

प्रेम रंग (सांग कधी कळणार तुला?) भाग १


कथेचे नाव:- प्रेम रंग
स्पर्धा:- जलद कथालेखन स्पर्धा (नोव्हेंबर २०२२)
विषय:- सांग कधी कळणार तुला?

भाग १

कामांचा सपाटा लावला होता आज तिने. ती कामात गुंतली होती की कामं तिच्यात काहीच कळत नव्हतं.

वेळ काळ याचं भान न ठेवता ती झपाटल्यासारखे हातातले काम पूर्ण करत होती. असं करताना एक नजर सतत घड्याळाच्या पुढे सरकण्यावर होती. तिची घाई तिला यंत्रवत काम पूर्ण करायला भाग पाडत होती.

तिची ही कसरत पाहून इतरांना खूप वाईट वाटायचं. या सगळ्याला काही इलाज नव्हता. तिच्या नशिबाने तिला या दुष्टचक्रात अडकवले होते.

तिच्या डेस्कवरचा टेलिफोन रिंग झाला. त्याच्या रिंगने आजूबाजूला तयार झालेल्या नीरव शांततेला भेदलं. तिने त्या वाजणाऱ्या फोनकडे बघण्याऐवजी आधी तिच्या रिस्ट वॉचमध्ये पाहिलं; अजून वेळ शिल्लक होता.

तिला वाटलं, हा कॉल उचलू नये. त्याने काही मोठासा फरक पडणार नव्हता. तरीही तिचं मन, तिच्या हाताला रिसिव्हरपर्यंत जाऊ देईनात.

आता मात्र रिंगच्या आवाजाने पूर्ण स्टाफ तिच्याकडे बघायला लागला. नाईलाजाने तिने रिसिव्हर उचलून कानाला लावला.

"कम टु माय केबिन." एवढेच चार शब्द. तिचं "येस सर." ऐकायलाही तो कॉल थांबला नाही. बिचारा त्या आधीच पलीकडून कट झाला होता.

तिने तिच्या डेस्कवर होत नव्हतं तेवढं सगळं गरजेचं सामान एकवटलं आणि त्याच्या केबिनच्या दिशेने निघाली.

वाटेत काहींची सहानभुतीपूर्ण, तर काहींची कुत्सित नजर तिची सोबत ती दिसेनाशी होईपर्यंत करत होती.

अखेर ती दिसेनाशी झाली आणि सगळ्यांच्या नजरा पुन्हा त्यांच्या कामात गुंतल्या; पण त्या आधी एक चोरटा कटाक्ष रूममधल्या सीसीटीव्हीवर टाकायला विसरल्या नाहीत.

"हे मिस मार्गारेट, व्हॉट डू यू थिंक? आज बॉस, मिसेस परफेक्टला फैलावर घेतील? की रोजच्या सारखं…." दिपेश मार्गारेटच्या कानाकडे येऊन कुजबुजत होताच; की तेवढ्यात मार्गारेटने त्याला खुणेनेच गप्प करत, त्याचं लक्ष सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे वेधलं आणि मोबाईलमध्ये मेसेज टाइप करून तो त्याला सेंड केला.

त्याने लगेच आपला मोबाईल चेक केला.

"तिचं माहीत नाही; पण बॉसने जर आपल्याला त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून पाहिलं ना तर माझा जॉब जाईल आणि तू क्षणार्धात ॲश म्हणजेच भस्म होशील. पुढे काय घडेल ते कळेलच आपल्याला आणि ते कळण्यासाठी आधी आपण इथे जिवंत राहायला हवे ना? सो! बी अलर्ट! अँड डू युवर ओन वर्क."

त्याने हा मेसेज वाचून तिला \"व्हॉटेवर\" अश्या आविर्भावात डोळे फिरवून दाखवले. ती फक्त कुत्सित हसली.

दिपेश तिथे नवीन होता; पण मार्गारेट एक जुनी एम्प्लॉइ. ती बॉस आणि मिसेस परफेक्ट या दोघांनाही ओळखून होती; पण फक्त कामाच्या बाबतीत.


_______________________


एका प्रशस्त केबिनमध्ये बसून हे सगळं घडताना तो आरामात पाहू शकत होता. त्याच्या टेबलवरच्या डिस्प्लेवर त्याने थोड्या वेळापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज रन केलं होतं.

त्यात तिची कामाची पद्धत, व्यस्तता आणि त्याचा कॉल असतानाही तो उचलताना केलेली दिरंगाई; त्याच्या नजरेतून काही सुटलं नव्हतं.

आता तो चेअर पाठमोरी फिरवून फक्त तिच्या येण्याची वाट बघत होता.

_______________________


त्याच्या केबिनच्या दिशेने ती निघाली होती खरी; पण मनात सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची उजळणी सुरू होती. तो कधी काय विचारेल याचा नेम नव्हता. तिने लिफ्टच्या वॉलमध्ये स्वतःची अवस्था नीट असल्याची खात्री करून घेतली.

लिफ्ट थांबली आणि आता मात्र तिची पावलं जड वाटू लागली. लिफ्टच्या दारापासून जवळ असणारी त्याची केबिन तिला लांब का वाटत होती, देव जाणे.

तरीही सगळा कॉन्फिडन्स एकवटून तिने त्या भल्या मोठ्या दरवाज्यावर नॉक केलं.

"कम इन."

क्रमशः


- © मयूरपंखी लेखणी

Copyright notice:

वरील साहित्याचे संपूर्ण कॉपीराईट्स मयुरपंखी लेखणीकडे रिझर्व्ह्ड आहेत. हे साहित्य वा या साहित्यातील मजकूर, भाग वा साहित्याचा आशय कोणत्याही प्रकारे (ऑडिओ, विडिओ, कॉमिक) व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साहित्यचोरी हा कॉपीराईट ॲक्ट, १९५७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

fb.me/mayurpankhilekhani

mayurpankhlekhani@gmail.com


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.


🎭 Series Post

View all