प्रेम,नैराश्य आणि तिरस्कार

Passion

 हल्लीच काही शब्द कानी पडले "नको वाटतं जगायला"समोर हुंदक्यापेक्षा जास्त तिरस्कार आणि नैराश्याचा आवाज ऐकू येत होता. आणि त्या आवाजाची सूरवात झाली ती प्रेमापासून.... 

राग किंवा हसू येण्यापेक्षा आश्चर्य वाटत होत, किती लवकर आपण एकमेकांना गृहीत धरतो ना? कोण कुठली व्यक्ती आयुष्यात येते काय आणि जाते काय ज्याच त्यालाच ठाऊक. मग प्रेम एकतर्फी असो की दोघांचंही. 

प्रेम म्हणजे नक्की काय?

लग्न? सोबत असण? की आणखी काही? म्हणायला किती सोप वाटतं ना "प्रेम" जिथे प्रेम असत तिथे खरचं कुणी कुणाला सोडून जाऊ शकत का? ब्रेकअप हा शब्द तर अजूनही पचनी पडत नाही. कारण आजपर्यंत एवढंच समजले प्रेम म्हणजे आदर, विश्वास, आपुलकी, जिव्हाळा, सुखात नसेल पणं दुःखात मात्र ठामपणे असलेली सोबत, आनंद, समोरच्यासाठी केलेली प्रार्थना... मग ते कुणासाठी का असेना प्रेम म्हणजे हीच व्याख्या... कुणी सोडून गेलं तर सतत तिरस्कार करण्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण आठवणीत ठेवून नाही का विसरता येत त्याचा किंवा तिचा राग? आणि मुळात आहे ना प्रेम मग तिरस्कार येतोच कसा? आठवणीच्या कप्प्यात बऱ्याच चांगल्या आठवणी जपता येतात मग आपण वाईटच आठवणी का जपायच्या? जगण्याला पंख हवे असतील तर सोडून द्यायला काय हरकत आहे? मान्य आहे की कुणाची जागा कुणीच घेऊ शकणार नाही आणि का घ्यावी ? प्रत्येकाची जागा ही वेगळीच असते. आणि ती ज्याची त्याला निर्माण करायची असते. मग कुठून आले हे शब्द मी जगूच शकत नाही? अरे! ती किंवा तो यायच्या आधीही जगतच होतो की मग अचानक एवढा बदल? सवयीचा भाग म्हणायला हरकत नाही आणि ती बदलणे आपल्याच हातात नाही का? दुसऱ्यांसाठी जीव देण्यापेक्षा जीव लावून आनंदाने जगण्यात मजा नाही का? मुळात जीव देणे हा प्रेमाचा नाही तर नैराश्याचा भाग आहे त्याला प्रेमाचं नाव देणं म्हणजे चुकीच ठरेल. विचार करण्याची क्षमता कुठेतरी कमी पडली की असले विचार येणं स्वाभाविक. खरतर जिथे प्रेम असत तिथे कधीच दुरावा नसतो, हल्ली लग्नाची कित्येक वर्षे सोबत घालवलेली जोडपी सुध्दा वेगळी होतात मग त्याला प्रेम म्हणावं?की झालेली सवय जी कालांतराने बदलली? प्रेम हा शब्द जरा जास्तच स्वस्त झालेला दिसतोय. एक व्यक्ती गेली की दुसरी तयार आणि दुसरी आली की समजून चला पहिले होत ते प्रेम नाही. एकतर सवय किंवा होत ते आकर्षण बसं. आज कुणीच कुणासाठी थांबत नाही आणि न चुकून कुणी थांबलच तर नशीबच म्हणावं लागेल.... आणि प्रेमात सोबत नसली म्हणून काय झालं? आयुष्यात प्रत्येकच हवी असलेली गोष्ट मिळते असं नाही मग नको तेवढा विचार करून चुकीचे पाऊल उचलण्यात काय अर्थ आहे? आयुष्य एकच तर आहे मनसोक्त जगता यायला हवं. वेळ लागेल पण होईल सर्व नीट यावर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालायचं बस.