प्रेम की यातना? भाग 6

कोण असेल ती? आणि योगेश का बरं त्या व्यक्तीसाठी खोटं बोलला असेल?


"या या.... लेकीच्या सासरी स्वागत आहे!" योगेश चे बाबा गिरीशरावांच आणि बाकी मंडळीच हात जोडून स्वागत करतात.


"नमस्कार, कसे आहात सगळे? गिरीशराव योगेशच्या बाबांची गळा भेट घेत विचारतात.


"आम्ही मस्त! आमची लक्ष्मी घरात आली आमच्या.. आता आम्ही मजेतचं असणार." योगेशचे बाबा बोलतात.


"हो, आहे कुठे आमची चिमणी?"


"ती शेजारी गेली आहे तयार व्हायला.. येईलच इतक्यात." शांताताई बोलतात.
दोघी विहिणी एकमेकींना भेटतात. शांता ताई आज्जीच्या पाया पडतात.


"रात्री उशिरा झाला असेल ना?" आज्जी विचारतात.


"हो मग, ही पोरं काय ऐकताहेत होय? नाचगाणी चालू होती.रात्री दोन वाजले तरी झोपायला." शांताताई


" ए मावशी.. अगं तुझ्या शालूमध्ये वहिनी किती सुंदर दिसते बघ." श्रद्धा ओरडत उडया मारत बोलत होती. श्रद्धा च्या दिशेने सगळे बघत होते. शालू जुना असला तरी नेसणारी नवी होती आणि तो शालूही तिच्यावर खुलून दिसत होता. गोरी गोमटी असलेली स्मिता लाल रंगाच्या शालू मध्ये जणू अप्सराचं भासत होती. भरगच्च हिरवा चुडा केसात चाफ्याच्या फुलांचा गजरा, सासूची नथ, लक्ष्मी हार आणि गळ्यात असलेले काळी मणी.. तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते.
आईबाबांना.. आज्जीला, बघताच स्मिता घरात येते आणि आईला मिठी मारते. आज्जी स्मिताच्या डोळ्यावरून हात फिरवत कडाकडा बोटं मोडतं बोलते \"कुणाची दृष्ट नको हो लागायला माझ्या सोन्याला..\"


"आज्जी.. तू दृष्ट काढलीस ना मग आता नाही लागणार मला नजर." असं म्हणत स्मिता आज्जीला मिठी मारते. लेकीला नव्या नवरीच्या रुपात बघून गिरीशरावांचे डोळे आपसूक ओले होतात. स्मिता पण बाबांना बघून त्यांना बिलगते. एकचं रात्र ती घरच्यांपासून लांब राहिली होती पण तिला खूप दिसवसांनी सगळयांना बघितल्या सारख वाटत होतं.इतक्यात शांता ताई चहा घेऊन येतात.


"उभं राहूनच लेकीला बघणार का?"शांता ताई बोलतात तसे सगळे हो नाही म्हणत सोफ्यावर बसतात.


"तुमच्या घराइतकं मोठ्ठ घर नाही हो आमचं.. सांभाळून घ्या थोडं." शांता ताई बोलतात.


"अहो ताई.. काही तरीच काय म्हणताय. आम्ही पण एवढ्याचं घरात राहून आपला व्यवसाय सुरू केला होता. ही खोली मोठी तरी आहे. नाही का ओ..."


"हो ना... ही खोली मोठी आहे, शिवाय सगळी सोय घरातच आहे. आम्हाला तर पाणी आणि इतर सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन कराव्या लागत होत्या. आमची लेक खुश आहे ना मग आम्हाला काही टेन्शन नाही. " गिरीशराव बोलतात.


"हो ना! शांताताईंच्या साडीत फार छान दिसतेस हो.. योगेशराव कुठे दिसत नाहीत?"सिंधुताई


"अगं तो बाहेर गेला आहे. येईलचं इतक्यात."


"बरं, अम्म मी काय म्हणते काही मदत करू का मी? म्हणजे काही असेल तर सांगा अनायसे गुरुजी यायला अजून वेळ आहे ना म्हणून म्हंटल." सिंधुताई


"हो या ना... तेवढ्याच गप्पा पण मारता येतील."शांताताई

दोघी विहिणी घरात पूजेची तयारी करतात, म्हणजे काय हवं नको..काय राहील आहे, याची यादी करतात. तेवढ्यात गुरुजी येतात. योगेश पण पंचा नेसून तयार होऊन येतो. स्मिता आणि योगेश दोघेही पूजेसाठी बसतात. तासाभराने पूजेची सांगता होते. नवरा नवरी गुरूजींचा आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद घेतात. चाळीतल्या माणसांच्या आणि घरातल्यांच्या पंगती उठतात.


शांताताई आणि योगेश चे बाबा सोयऱ्यांना आहेर भेटवतात. सिंधुताई आणि गिरीशराव लेकीला घेऊन घरी जाण्यासाठी सगळ्यांचा निरोप घेतात. स्मिताला योगेशची नवीन ओढ असली तरी तिच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. लेकीच्या मनात काहीतरी चाललंय हे सिंधुताईंच्या एव्हाना लक्षात आलं होतं, त्या तिच्या हातावर हात ठेवून थोपटतात. लेकीचा उदास चेहरा कुठल्या तरी गंभीर गोष्टींमुळे पडला आहे हे त्यांना जाणवत होतं.


घरी आल्यावर स्मिता तिच्या खोलीत जाऊन फ्रेश होते.

"ये का गं आत?"


"आई! अगं ये ना.. आणि परवानगी कसली मागतेस गं? एका दिवसात मी परकी झाली का?"


"अगं आता तू मोठी झालीस.. संसाराला लागलीस.. परकी कशी असशील तू. आमचा जीव की प्राण आहेस आणि कायम राहशील. ते सगळं सोड.. काय झालयं? मी आले तेंव्हापासून माझं लक्ष आहे तुझ्याकडे काहीतरी झालयं ज्यामुळे तू विचारात आहेस. सांग मला." सिंधुताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात.

स्मिता सकाळी घडलेला सगळा वृत्तांत सांगते. सिंधुताईना यावर काय बोलावं हेच सुचेना. संसाराला सुरुवात होण्याआधी हे काय? असं त्या मनातच विचार करू लागल्या...

"आई.. अगं काय झालं बोल की काहीतरी."


"काय बोलू.. आपण तिला ओळखत नाही योगेशराव ओळखतात. मला वाटतं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि भलतेसलते विचार डोक्यात आणू नको. कोणा एका मुलीसाठी आता सुरू झालेल्या सांसारावर अशी लगेच रुसू नको."


"बरं आई.. तू सांगशील तेच करेन मी."


"नाही हं... मी सांगेन ते मुळीच करू नको. लग्न झाल्यावर आईवडील मुलीच्या संसारात अडलंनडलं तर बोलू शकतात फक्त त्यांच्या संसारात हस्तक्षेप नाही करत. खूप काही गंभीर असेल तर निर्णय मोठ्यांसोबत बसून घ्यावा. एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या संसारात कधी कोणाला बोलू द्यायचं नाही आणि लोक काय बोलतात, काय सांगतात.. यावर मुळीच विश्वास नाही ठेवायचा. काही माणसं अशी असतात ज्यांना आपलं सुखंही खुपत असतं. नेहमी लक्षात ठेव. सासूसासऱ्यांना जप,त्यांची सेवा कर! काय? समजलं का बाईसाहेब!"


"हो आई.."


"चल बस इकडे.. जरा तेल लावुन देते. काय ते स्प्रे मारून मारून केसं बघ कसे रुक्ष झालेत!"
सिंधुताई स्मिता ला पुढ्यात बसवत बोलल्या. स्मिताच्या केसांची छान चंपी करून त्यांनी तिला झोपवलं.. लग्नाच्या दगदगीतुन तीन चार दिवस तिला पुरेशी झोप नव्हती भेटली म्हणून ती पडल्या पडल्याचं झोपली.
दुसरा दिवशी सकाळी स्मिताला लवकर जाग आली. सहज म्हणून फोन हातात घेतला तर रात्रीपासून योगेशचे बत्तीस मिसकॉल होते. स्मिता घाबरते घाईघाईत अंगावरची चादर बाजूला करून ती योगेशला फोन लावते.


"हॅलो.. काय रे काय झालं? तिकडे सगळं ठीक आहे ना?"


"नाही.. काहीच ठीक नाही तुझ्याशिवाय. काल गेल्यापासून एकदाही फोन नाही केलास आणि मी करत होतो तर उचलला पण नाहीस. माहेरी गेली तशी विसरलीस का मला?"


"नाही रे.. थकली होती खूप कधी झोप लागली ते कळलंच नाही. आईने केसांना तेल लावून मालिश केली तशी निवांत झोप लागली."


"सॉरी अगं, काल पहिलाच दिवस होता तुझा आणि काल जे झालं..."


"जाऊदे ना..सोड तो विषय! तू येणार आहेस ना आज?"


"हो आम्ही येऊ आज."


"बरं.. निघालात की फोन कर मला.."


"हो चालेल, चल मग ठेवतो बाय!"


"बाय."


पचपरतावनं होतं सगळे आपल्याला घरी जातात. स्मिता पण आठ दिवसांनी तिला हवं असलेले सामान घेते आणि योगेश सोबत तिच्या घरी जाते.

स्मिता आणि योगेशला प्रायव्हसी मिळावी म्हणून काही दिवसांनी योगेशचे आईबाबा पण गावी जातात. वर्ष सरत आणि स्मिताला ती आई होणार असल्याची चाहूल लागते. सगळे फार खुश असतात. योगेशचे आईबाबा पण पुन्हा मुंबईत येतात. स्मिताची चोर ओटी भरली जाते. सासू-सासरे आईवडील, आज्जी... सगळेच स्मिताचे डोहाळे पुरवतात. आंबट,गोड,तिखट,चटपटीत, हवं ते तिला सगळेजण मिळून देत असतात. योगेश पण स्मिताला खूप जपतं असतो. सातव्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात करून सिंधुताई स्मिताला पहिल्या बाळंतपणासाठी घरी घेऊन येतात. नऊ महिने होण्याआधीच स्मिताला कळा सुरू व्हायला लागतात. जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून स्मिताच्या सासरच्यांना कळवण्यात येतं. सगळी मंडळी येण्याआधीचं स्मिताची डिलिव्हरी होते. स्मिता एका गोंडस मुलीला जन्म देते. घरात मुलगी नसल्याने स्मिताची सासू तर फारच खुश होती. बारा दिवसांनी बाळाचं बारसं करतात आणि बाळाचं नाव ठेवतात समीक्षा...


समीक्षा तिच्या बाललीला दाखवत मोठी होत असते. स्मिताच संपूर्ण लक्ष तिच्या लेकीवर असतं. नकळतपणे योगेश जुन्या नात्याकडे वळला जातो. समीक्षा वर्षाची होते. पहिला वाढदिवस चाळीमध्ये साजरा होतो. योगेशचे आईबाबा सगळ्यांचा निरोप घेऊन पुन्हा गावी जातात. घरात आता योगेश,समीक्षा आणि स्मिता तिघेच असतात. योगेश कामाला जातो तर स्मिता घर आणि लेकीला सांभाळत आईची आणि एका गृहिणीची उत्तम भूमिका पार पाडत असते.


"हल्ली तुझं लक्ष नसत माझ्याकडे!"


"ओ रे बाळा.. आ कर आधी... एक घास चिऊचा...."


"मी काय बोलतोय तुला आणि तुझं काय चाललंय? चिऊ आणि काऊ?"


"अरे मी ऐकते.. तू बोल पुढे. काय करू म्हणजे तुला वाटेल माझं लक्ष आहे तुझ्याकडे?"


"मी काहीतरी बोलत असतो तुझ्याशी आणि तू मात्र समीक्षा एके समीक्षा...कधी जवळ आलो तर समीक्षा उठेल, कधी हात लावला तर समीक्षा पाहिलं, नाहीतर कोणीतरी येईल,दिवसा दार लावलं तरी लोक काय विचार करतील? अरे मला काय वाटत याचा कधीतरी विचार कर..."

स्मिता लेकीला घेऊन योगेशच्या शेजारी बसते आणि समीक्षाला त्याच्या मांडीवर ठेवते.

"कसं आहे ना बाबा... मम्माला खुप कामं असतात. मी अजून लहान आहे ना!मग माझं पण सगळं तिलाच करावं लागतं. मला खाऊ भरवण, माझी न्हाऊ,माझी शी-सु आणि घरातली कामं पण तिलाच करावी लागतात ना! समजून घ्या तिला...स्मिता लाडाने बोलते.


"घेतो रे समजून.. पण तू पण मला समजून घे ना! कधी तरी ये की जवळ. वर्षभर आईबाबा होते म्हणून नाही आलो जवळ पण त्यांना सगळं समजत होतं. आपल्याला एकांत नाही म्हणून ते गेले ना गावी! आता नाहीत ते मग जवळ यायला काय प्रॉब्लेम आहे? रात्री नको पण कामाला जाताना कधी तरी जवळ येऊन प्रेमाने बाय म्हणत जा."

स्मिता दोन्ही हाताने त्याचे फुगलेले गाल खेचत अलगदपणे त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. नकळतपणे त्याचे डोळे मिटले जातात. इवलीशी समू वर मान करून बघत हसत असते आणि दोन्ही हाताने टाळ्या वाजवत असते.


"खुश! स्मिता एक भुवई उडवत मिश्कीलपणे हसत त्याला विचारते. योगेश तिरक्या नजरेने तिच्याकडे बघून हसतो आणि लेकीच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो. बाबांनी तिला गोड पापा दिला म्हणून ती एवढी खुश होते की त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या गालावर पण एक छान गोड पापा देते. बापलेकीचं बॉंडिंग बघून तिला तिच्या बाबांची आठवण येते.


"योगेश! दोन दिवस बाबांकडे जाऊन येऊ का रे? खूप आठवण येते त्यांची."

योगेश थोडा विचार करतो आणि जा म्हणतो. दुसऱ्या दिवशी योगेशला डब्बा देऊन तो नेहमीसारखा कामाला जातो आणि स्मिता पण तिच्या घरी येते.स्मिता संध्याकाळी योगेशला फोन करते.


"कुठे आहेस?"

"ऑफिसमध्ये आहे राणी..."


"नक्की का?"

"हो अगं!खरचं...तुझी शपथ."

"माझी शपथ?"


"हो मॅडम.."


"योगेश..जिच्या हातात हात घालून गार्डनमध्ये बसला आहेस ना, तिचा हात सोडून जरा उभा रहा आणि मागे वळून बघ.."

योगेश मागे वळून बघतो तर स्मिता गार्डन बाहेर उभी असते...
क्रमशः...

🎭 Series Post

View all