प्रेम की यातना? भाग 8

योगेश मानसचं बोलणं ऐकून स्मिताचे बाबा काय निर्णय घेतील?


"स्मिता.. ए स्मिता.. काय होतंय तुला? ए अगं बोल ना! असं नको ना गं करू..बोल ना काहीतरी.."
स्मिता मात्र शांत असते ती काहीच बोलत नाही.

"ए स्मिता... बोल ना गं काहीतरी."


"काय बोलू? काय बोलू हां... या मॅसेजचा काय अर्थ समजायचा मी? आणि अजून तुला काय समजून घ्यायचं मी? मागच्यावेळी माझी चूक असेल अस समजून मी डोक्यातून काढून टाकलं सगळं आणि परत तेच! आणि तरी तू अजून सारवासारवचं करतोयस."


"अगं खरचं असं काही नाही आम्ही जस्ट फ्रेंड्स आहोत."


"योगेश.. जस्ट फ्रेंड्सची व्याख्या तू मला नको शिकवू. आणि हे जे काही आहे ना ते न समजण्याएवढी मूर्ख नाही मी. आताच्या आता निघ तू माझ्या नजरेसमोरून."
स्मिता रागात बोलते. योगेश पण आणखी काही समजवण्याच्या भानगडीत पडत नाही कारण चूक त्याचीच असते.
योगेश गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मॅसेज येतो.
\"मला उद्याच त्या मानसीला भेटायचं आहे.\"

समोरून मॅसेजचा रिप्लाय येतो.

\"ओके चालेल.\"

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी योगेश,स्मिता आणि मानसी तिघेही एका गार्डनमध्ये भेटतात.


"काय चाललंय तुमचं सांगा आता! आणि दोघेही खरं बोला."


"अगं स्मिता तू समजतेस तस काही नाही आमचं!"


"तू त्याला रात्री मॅसेज केलास त्याचा अर्थ काय गं?"


"कुठला मॅसेज?"


\"हाय जानू.. चार दिवस तुझ्या कुशीची सवय झाली होती. आजची रात्र झोप नाही लागणार मला. सासूला भेट आणि लवकरचं ये. मी वाट पाहते तुझी. लव्ह यू सो मच जानू..\" असा मॅसेज तू काल रात्री त्याला केला होतास बरोबर ना? की तू तो मॅसेज झोपेत केला होतास?"


"अगं, मी सहज केला होता तो मॅसेज!"


"हे बघ खोटं बोलू नको. सहज आणि जाणूनबुजून मला कळत नाही असं वाटत का तुम्हा दोघांना? मूर्ख आहे का मी? काय संबंध हिचा तुझ्याशी?कोण लागते ही तुझी? आणि परपुरुषासोबत कसं बोलायचं याची अक्कल नाही का हिला?"


"हे बघ तोंड सांभाळून बोल! मी काही बोलत नाही याचा अर्थ मला बोलताच येत नाही असं नको समजू. मी शांत बोलते ना तर शांतचं बोल."


"धमकी देतेस मला?"


"हे बघ माझ्याशी नीट बोलायच आणि त्याच्याशी पण."


"त्याच्याशी मी कसं आणि काय बोलावं हे सांगणारी तू कोण गं?"


"स्मिता प्लिज शांत हो ना यार... काय करताय दोघी? लोकं बघताहेत."


"अरे पण कशी बोलते बघ ही! माझी अक्कल काढणारी ही कोण?"


"तुझी अक्कल काढणारी मी कोणी नसले तरी माझ्या नवऱ्याशी कस आणि काय बोलाव हे तू नाही सांगायचं मला समजलं ना!"


"सांगणार मी. ना तू त्याच्याशी वाद घालायचा,ना भांडायचं, समजलं"


"तू कोण गं मला हे सांगणारी?"


"बायको आहे मी त्याची... नवरा आहे तो माझा समजलं.. तुझ्या आधीपासून मी ओळखते त्याला. कॉलनीमध्ये रहात होतो तेंव्हा कॉलनीमागच्या शंकराच्या मंदिरात लग्न केलं होतं आम्ही. समजलं तुला. तुला काही अधिकारी नाही त्याला अस घालून पाडून बोलण्याचा."


स्मिता हे सगळं ऐकून स्तब्ध होते. तिच्याकडे बघता बघता एक नजर योगेशवर टाकत विचारते.


"योगेश.. काय बोलते ही? खर आहे का हे?"


"अगं मानसी.. ते लग्न आपण गंमत म्हणून केलं होतं त्याचा इथे काय संबंध? आणि तू तिला काहीही सांगू नको प्लिज....स्मिता.. अगं, मी श्रद्धा आणि कॉलनीमधली सात आठ फलटण घेऊन सप्तपदी घेतली होती गं आम्ही आणि ते पण असचं..सहजच. लग्न जमलं तर आपण काय करणार? कसं करणार? याची स्वप्न बघत केली होती ती गंमत. मानसी अगं बोल ना काहीतरी!"


"हो, गंमत म्हणून केलं होतं पण मी गंमत म्हणून नाही केलं ते सगळं. मी अजूनही माझा नवरा मानते तुला आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मी माझ्या नवऱ्याला आजतागायत स्पर्श देखील करू दिला नव्हता स्वतःला म्हणूनचं त्याने मला सोडली. मी अजूनही फक्त तुझी स्वप्न पाहते रे योगेश!"

हे सगळं ऐकून योगेशला धक्का बसतो आणि स्मिताच्या तर डोळ्यांपुढे अंधारी येते आणि ती तिथेच कोसळते. योगेश तिला दोन्ही हातांवर उचलून घेतो आणि जवळचं असलेल्या क्लिनिक मध्ये नेतो. डॉक्टर चेक करतात.


"बीपी लो झाला आहे यांचा.. ऍडमिट कराव लागेल लगेच."

योगेश एकदम घाबरतो आणि लागलीच ऍडमिट करण्यासाठी डॉक्टरांना परवानगी देतो. सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण करून योगेश स्मिताच्या घरी तिच्या बाबांना कळवतो तसे ते लगेच येतात. स्मिताचे हातपाय बर्फासारखे थंड पडलेले असतात. योगेश आणि गिरीशराव स्मिताला शुद्ध येण्याची वाट पाहत असतात.


साडे चार तासांनी स्मिताला शुद्ध येते. योगेशला समोर बघून तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि ती वेड्यासारखी त्याची कॉलर पकडून रडत असते त्याला जाब विचारत असते. हे सगळं काय चाललंय काही समजत नसत म्हणून गिरीशराव फक्त लेकीची अवस्था बघत शांत उभे असतात.

स्मिताच्या रडण्याच्या आवाजाने डॉक्टर लगेच रूममध्ये येतात. स्मिताची अवस्था बघून त्या थोड्या चक्रावतात. तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण काही केल्या ती शांत होईना म्हणून नाईलाजाने स्मिताला झोपेचं इंजेक्शन देतात.

"मिस्टर योगेश.. काय प्रकार आहे हा? तुमच्या मिसेस एवढ्या हायपर का झाल्या आहेत? जे काही असेल ते प्लिज खरं सांगा. पेशंटची कंडिशन अशीच राहिली तर त्यांच्यासाठी चांगलं नाही ते."


"हो योगेशराव! स्मिता अशी का वागते आहे? आणि कसला जाब विचारते आहे ती तुम्हाला? काय झालंय नक्की? तुमचं काही भांडण वैगरे झालंय का? जे काही असेल ते स्पष्ट सांगा?"


"बाबा.. ते.. काही नाही तिला राग आला आहे माझा. आमचं भांडण झालं मगाशी म्हणजे फार काही नाही."


"ठीक आहे बोलू नंतर, मी बसतो आता इथे. नाहीतर परत तुम्हाला बघितलं तर चिडेल. तिला शुद्ध आली की समजावेन मी. काळजी नका करू तुम्ही."


" हो बाबा.." योगेश रूममधून बाहेर पडतो. तिथे मानसी येते.


"काय गरज होती जुन्या गोष्टी तुला आत्ता उगाळायची. तेंव्हा मी बोललो होतो तुला पळून जाऊन लग्न करू तू ऐकलं होतं का माझं? नाही ना? मग आता या गोष्टी तिला का सांगितल्या.
आणि तू मला खोटं का सांगितलं? नवरा तुला त्रास देत होता म्हणून सोडलं तू त्याला? मुळात हे सगळं तिला सांगायला नको होतं तू."


"योगेश.. माझं प्रेम आहे अजूनही तुझ्यावर. मला माहित आहे तुझं पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर गेले चार दिवस आपण एकत्र होतो ना!"


"नाही मानसी.. तू चुकीचा विचार करतेस. मी आता फक्त आणि फक्त मानसीवर प्रेम करतो, आणि गेल्या चार दिवसांच बोलशील तर तू जवळ आलीस माझ्या, मिठी मारणं म्हणजे काही पाप नाही आणि मी काहीही चुकीचा वागलो नाही तुझ्याशी."


"हो पण मला हे सगळं हवंय. तेंव्हा नाही पण आता देऊ शकतोस ना?"


"नाही मानसी हे कधीच शक्य नाही. खरतरं चूक माझीच आहे मी बोलायलाच नको होतं तुझ्याशी. मानसी... तू आता जा इथून आधीच स्मिता मला बघून हायपर झाली आहे मगाशी तुला बघितलं तर काय करेल माहीत नाही. प्लिज मी पाया पडतो तुझ्या जा तू इथून."


"तू मला असं अर्ध्यात टाकू नाही शकत योगेश. तू फक्त माझा आहेस समजलं तुला. मी आता जाते पण परत येईन मी लक्षात ठेव."

मानसी योगेशला धमकावते आणि निघून जाते. योगेश डोक्याला हात लावून बसतो. त्याच आणि मानसीचं बोलणं गिरीशरावांनी ऐकलेलं असतं. जे ऐकून त्यांना धक्काचं बसतो आणि स्मिताच्या आत्ताच्या अवस्थेचं कारण समजतं.

क्रमशः..




🎭 Series Post

View all