प्रेम की यातना? भाग ५

काय वाढून ठेवलंय स्मिता पुढे???


"अहो, लेकीच्या बोटात अंगठी किती शोभून दिसते ना!"


"हो, लग्नाचं तेज चढलंय तिच्या चेहऱ्यावर. चला आता जास्त उशीर नका करू, हळदीसाठी सगळी खोळंबली आहेत."


"हळदीचा पिवळा रंग,रात्र झाली दंग....
स्मिता तुझ्या हळदिमागे योगेश झाला दंग..."

पिवळी साडी नेसून स्मिता गिरीशरावांसोबत खाली आली.
सिंधुताई,आज्जी,गिरीशराव, महेश काका- काकू,मैत्रिणी....सगळ्यांनी स्मिताला हळद लावली. हळदीच्या रंगाने स्मिताचं रूप आणखी खुलून दिसत होतं. जेवणाच्या वेळी स्वतः गिरीशरावांनी स्मिताला त्यांच्या हाताने भरवलं मग सिंधुताईंनी आणि मग आज्जीने.
सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, गालावर हसू होते,मुलीच्या पाठवणीचं दुःख होतं पण काय करणार... जगाची रितचं आहे ती..


लग्नाचा दिवस उजाडतो. सगळीकडे गडबड चालू असते. जेवण,चहा-नाश्ता, सरबत-पाणी.. सगळ्याची पाहणी स्वतः गिरीशराव करत असतात. जराही उसंत नसते त्यांना. एकुलत्या एक लाडक्या लेकीच्या लग्नात कसलीचं कमी पडू द्यायची नव्हती त्यांना. सनई चौघडे वाजत होते. मुख्य दाराजवळ केळीचा मांडव सजला होता, दोन बायका मुख्य दाराजवळ आतल्या बाजूला गजऱ्याचं ताट आणि अत्तराची कुपी घेऊन पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज होत्या. लग्नाचा मांडव चाफ्याच्या फुलांनी सजवला होता. मध्यभागी अग्निकुंड होतं. बायका आतमध्ये लग्नाची गाणी म्हणत होत्या.

"पिंपळाच्या झाडामागे कोकिळेचे रान गं बाई...आणि तिचे गाणे..
स्मिता तुझी सासू आली....स्मिता तुझी सासू आली...नमस्कार कर गं त्यांचा, आशीर्वाद घे गं.....नमस्कार कर गं त्यांचा, आशीर्वाद घे गं.....
पिंपळाच्या झाडामागे कोकिळेचे रान गं बाई...आणि तिचे गाणे..

सगळं वातावरण अगदी सुरेल झालं होतं. लग्नघटिका समीप आली होती. बाहेर सगळी पाहुणी मंडळी येऊ लागली होती. स्मिता पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून तयार झाली होती. पायात पैंजण,जोडवी,मासोळ्या,हाताला बाजूबंद,हळदीच्या पिवळ्या हातांवर मेहंदीचा रंग अगदी गडद दिसत होता त्यात दडून बसलेलं योगेशचं नावं.... कपाळावर चंद्रकोर,नाकात नथ..कानात कुड्या आणि बुगडी... नवीन लग्न होऊन घरी आलेली दुसरी सिंधूचं भासत होती जणू..आज्जीने नातीची दृष्ट काढली.
बाहेर योगेश वरात घेऊन आला होता त्याच्या राणीला घ्यायला. स्मिताला भाऊ नसल्याने घरात काम करणाऱ्या मंदारला.. गिरीशराव भावाचा मान देऊन नवरदेवाचा कान पिळायला लावतात. सगळ्यांचे मानपान करून स्वागत करण्यात येतं.

योगेश स्टेजवर जातो मध्ये अंतरपाठ धरायला सांगून गुरुजी मंगलाष्टकांना सुरुवात करतात.

।।स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धीदं।।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामनिस्थेवरं।।
लेण्यांद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं।।
ग्रामो रांजण संस्थितो गणपति: कुर्यात सदा मंगलम्।।१।।
शुभ मंगलम्... सावधान...

स्मिता स्टेजवर येते. शुभमंगल सावधान म्हणत शेवटची मंगलाष्टका पूर्ण होताचं टाळ्यांचा कडकडाट होतो. नवरा नवरी वर पुष्प सुमनांचा वर्षाव होतो.(कृपया नवरा नवरी वर अक्षता म्हणून तांदुळाचा वापर करू नये.जेवढे तांदूळ आपण अक्षता म्हणून वापरतो त्यात एखादं कुटुंब एकवेळचं जेवण जेवू शकतं त्यामुळे शक्यतो फुलांचा वापर करावा.?)

दोघेही एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालतात आणि एकमेकांना पुष्पगुच्छ देतात. मंगळसूत्र घालण्याचा विधी पार पडतो. गिरीशराव आणि सिंधुताई भरल्या डोळ्यांनी लेकीचं कन्यादान करतात.

पाहुणी मंडळी जेवणाच्या ठिकाणी निघतात. सगळ्यांची जेवणं होईपर्यंत नवरा नवरी रिसेप्शनसाठी तयार होऊन येतात. छानसा चिंतामणी रंगाचा शालू,त्यावर हिऱ्यांचा नाजूक इमिटेशन हार आणि मॅचिंग कानातले,केसांची सैलसर वेणी घालून त्यावर मोगऱ्याचे गजरे घातलेले आणि दुसरीकडे योगेशने पण नेवी ब्लु कलरचा कोट घातला होता आणि त्यावर डाव्या बाजूला मरून रंगाचा डायमंड चा ब्रॉच लावला होता. नवरा नवरी स्टेजवर येताच पाहुण्यांचा गलका झाला. दोघेही खूप छान दिसत होती. सगळे पाहुणे नव्या जोडीला आशीर्वादरूपी भेटवस्तू आहेर करत होते. सगळं झाल्यावर नवरा नवरीची आणि सोयऱ्यांची खास पंगत बसली. ताटाभोवती फुलांची आरास केलेली उत्सवमूर्तीची पानं आकर्षक अशी वाढली होती. घास भरवण्याआधी सगळ्यांचा आवाज सुरू झाला उखाणा झाला पाहिजे म्हणे. मग काय घेतला स्मिताने उखाणा...

\"पानाभोवती केली फुलांची आरास.. पानाभोवती केली फुलांची आरास.. योगेशरावांच नाव घेते भरवून गुलाबजामचा घास...\"
नाव घेऊन स्मिता एक गुलाबजाम योगेशला भरवते. आता योगेशला नाव घ्यायला सांगतात पण पटठ्याला नाव येईना मग काय घेतलं सोप्प नाव..

\"भाजीत भाजी मेथीची स्मिता माझ्या प्रीतीची.... \"

जुनं तर जुनं पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. जेवणं उरकून झाली पाठवणीची वेळ आता जवळ आली होती. नकळत सगळ्यांचे डोळे पाणावले होते. गिरीशराव मांडवाच्या कोपऱ्यात उलट दिशेला तोंड करून बसले होते. लेकीचं बालपण त्यांच्या समोर येत होतं तिची प्रत्येक गोष्ट आज त्यांना खूप वेदना आणि आनंद देत असते. त्यांच्या खांद्यावरं हात पडतो तसे ते भानावर येतात.

"गिरीश.. मित्रा,असं उदास होऊ नको.आपली लेक फार लांब नाही रे जात. हाकेच्या अंतरावर तर आहे. असं करून कसं बरं चालेल. लेकीच्या पाठवणीचं दुःख काय आहे हे मी समजू शकतो. स्मिता माझी पण लेकचं आहे रे..!!"
गिरीशराव महेशला मिठी मारून रडू लागतात. आज पहिल्यांदा महेशने त्याच्या जिवलग मित्राला एवढं रडतांना पाहिलं होतं. महेश पण त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना शांत करत होते.


"चला चला जाऊ आपण,माझी लेक वाट बघत असेल." गिरीशराव दोन्ही हातानी डोळे पुसत बोलले.

इकडे खोलीमध्ये स्मिता आज्जीच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असते. आज्जी पण तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करत असते. सिंधुताई खिडकी जवळ उभ्या राहून आसवं गाळत असतात. त्यांची चिमणी आज तिच्या घरट्यात जाणार असते म्हणून त्यांना भरून येत असतं. स्मिताच्या मैत्रिणी बेडवर तिच्या भोवती बसून तिला धीर देत स्वतः रडत असतात. गिरीशराव आणि महेश दोघेपण वरती स्मिताच्या खोलीत येतात वरचं दृश्य बघून तर दोघांनाही आतमध्ये जाण्याचा धीर होत नसतो. पाहुण्याकडे लक्ष द्यायला घरातलं कोणी नसतं म्हणून काकू त्यांना काय हवं नको स्वतः बघत असतात.


"स्मिता...."गिरीशराव आवाज देतात. त्यांचा आवाज ऐकून स्मिता पळतचं जाते आणि त्यांना गच्च मिठी मारते. स्मिताच्या रडण्याचा आवाज आता खाली हॉल मध्ये बसलेल्या पाहुण्यांपर्यंत पोहोचतो. सगळे वरती येतात. सिंधुताई पण स्मिताला मिठी मारून रडू लागतात. स्मिता आईवडिलांच्या मिठीत असते आज. काकू तिघांची मिठी सैल करण्याचा खूप प्रयत्न करतात पण काही केल्या ती मिठी सैल न होता आणखी घट्ट होतं असते. शेवटी सिंधुताई स्वतः डोळे पुसून लेकीला देवघरात घेऊन जातात. स्मिता आणि योगेश दोघेही देवाचा आशिर्वाद घेतात. सिंधुताई स्मिताला देवीच्या चरणाजवळचं हळदी कुंकू लावुन तिची ओटी भरतात. योगेश आणि स्मिता सगळ्यांचे आशिर्वाद घेतात.

बाहेर नारळ भेटवणीसाठी पाट मांडले जातात. नवरा नवरीला नारळ भेटवला जातो.
लाऊड स्पीकरला गाणं लागतं..

" आईबापाची लाडाची लेक ही निघाली नवऱ्याघरी, माया मायेची डोळ्यात वाहे आसवापरी...माया मायेची डोळ्यात वाहे आसवापरी....."

सगळ्यांचे डोळे झरतं होते. गिरीशराव सिंधुताई आज्जी सगळ्यांचा कंठ दाटून आला होता. आसवं पुसतंच गिरीशरावांनी लाडक्या लेकीला गाडीत बसवलं.


"बाबा... तुम्हाला शुगर आहे हे विसरू नका हं.. नाहीतर मी नाही म्हंटल्यावर आईला सांगाल सारखा चहा करून दयायला आणि आई तू पण जरा आराम करत जा... आज्जीचा हात हातात धरत स्मिता तिला तिच्या गुडघ्यांची आणि आजोबांची काळजी घ्यायला सांगते. जड अंतःकरणाने सगळे तिला निरोप देतात. गिरीशराव रिकाम्या मांडवाकडे बघत उभे असतात.


"अहो... येताय ना आत?"


"घर सूनं करून माझी लेक गेली.. आता मन कसं गं लागेल माझ्या चिमणीशिवाय?"

गिरीशराव रडतचं बोलत होते.

"अहो, आपल्याला सांभाळावं लागेल स्वतःला आणि असं करून कसं बरं चालेल... चला...आत चला..."

सिंधुताई त्यांना आत घेऊन जातात.

इकडे नवरा नवरी घरी पोचतात. चाळीतली लोकं दोघांच जंगी स्वागत करतात. सगळे खूप उत्साहात नाचत असतात. नवरा नवरी दारात येतात. योगेशला बहीण नसल्याने शेजारच्या काकूंची मुलगी श्रद्धा.. बहिणीचा मान घेऊन दार अडवते.

"ए थांब हं.. असचं आत येऊ नाही देणार.." ती दार अडवत बोलते.


"हो का? मग कसं आत येऊ देणार?"योगेश विचारतो.


"आधी तुझी लेक मला देशील का बोल?"


"शीssss तुझा लेक पण तुझ्यासारखा नकटा आणि बटाट्या डोळ्यांचा असणार. नको रे बाबा तुझा मुलगा माझ्या लेकीला."योगेश तिला डीवचतं बोलतो तसा एकच हशा पिकतो.


"हां हां.. मला पण हौस नाही... माझ्या मुलासाठी तुझी लेक मागायचा.. मी तर आधीच मावशीला सांगत होते दुसरं काही तरी विचारते.. पण काय? रीत असते म्हणून विचारलं.. शेम्बड्या..."ती पण तोऱ्यातचं बोलते.


"अरे भांडू नका.. नवरी कंटाळली असेल सकाळपासून आवरत घ्या लवकर."शांता ताई बोलतात.


"हम्म, चल बोल पटकन. जाऊदे त्याला राहूदे. ए वहिनी तू सांग गं. देशील का गं तुझी लेक मला?"


"हो देईन.."स्मिता लाजतचं उत्तरते.


"आई गंsssss वहिनी कसली गोड लाजते गं. कशी या गावठीला पटलीस काय माहीत?" ती योगेशला टपली मारत बालते. तशी शांता ताई तिला बोलतात. अगं आजच्या दिवशी तरी सोड माझ्या लेकाला..ती हसते आणि दार सोडते.

शांता ताई आरतीचं तबक घेऊन येतात दोघांना ओवाळून नजर उतरवतात. मागून सगळे उखण्यासाठी कल्ला करत असतात तशी मग स्मिता उखाणा घेते.

"चांदीच्या वाटीवर स्वस्तिकाची खूण योगेशरावांचे नाव घेते देसायांची सून.."

"वाह वाह.... टाळ्या......
ए भावड्या... आता तू घे..."

"परत?"

"हो...आता वर्षभर तुला उखाणेचं घ्यायचे आहेत परत आणि परत..." मित्र बोलतात.


"घेतो घेतो....शांत रहा पण, घसा खाकरत योगेश बोलतो. \"भाजीत भाजी मेथीची, स्मिता माझ्या प्रीतीची\"


"अरे काय यार तू पण.. पुन्हा तेच.....तोंड कडू झालं आता त्या मेथीच्या भाजीने..."एक मित्र बोलतो. तसा दुसरा लगेच री ओढत बोलतो. "होउदे की तोंड कडू.... नंतर गोडचं होणार आहे."

सगळ्यांच बोलणं ऐकून स्मिता नजर खाली करून गालातच हसते.


"ए पोरांनो.. पुरे झाला तुमचा चावटपणा.. आता बस करा.. ये गं स्मिता.. आत ये.. हे माप उजव्या पायाच्या अंगठ्याने हलकेचं पुढे ढकल आणि तुझ्या हक्काच्या घरात हक्काच्या माणसासोबत गृहप्रवेश कर आणि मग या कुंकवाने भरलेल्या तबकात दोन्ही पाय ठेवून तुझी लक्ष्मीची पावलं या आपल्या छोट्या घरात उमटू दे...धन संपत्ती आणि मनाचा मोठेपणा घेऊन आपल्या या नवीन घरात ये.."

स्मिता माप ओलांडून आत येते. दोघेही देवाच्या पाया पडून देवाचा आणि घरातल्या मोठ्यांचा आशिर्वाद घेतात.
सगळे रात्री उशिरापर्यंत नाचगाणी करतात आणि मग घरातली आवरा आवर करून रात्री दीड दोन वाजता सगळे झोपतात. नविन जागा असल्याने स्मिताला झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण असल्याने सगळे इच्छा नसतांना देखील लवकरचं उठतात.


"आई...योगेश नाही का घरी?"


"हो अगं, तो मगाशीच बाहेर गेला आहे. तुला चाफ्याची फुलं आवडतात ना तिचं आणायला गेला आहे. बरं तुला रात्री नीट झोप लागली नाही का? कारण तुझी तळमळ दिसत होती."


"हो, जागा नवीन असल्याने तसं झालं."


"बरं....होईल सवय हळूहळू. योगेश आला की दोघे तयार व्हा म्हणजे हळद उतरणीचा कार्यक्रम आटोपून घेऊ आणि मग पूजेसाठी छान तयार व्हा दोघेपण. माझ्या लग्नाचा शालू काढला आहे मी खास तुझ्यासाठी. थोडा जुना आहे पण माझी इच्छा होती की माझ्या सुनेने तो शालू नेसून सत्यनारायणसाठी बसावं .तुला आवडलं असेल तरचं नेस हो माझी काही जबरदस्ती नाही आणि सासुला नाही कसं म्हणू असा विचार पण करू नको." शांता ताई शालू दाखवत बोलल्या.


"अहो नाही आई.. चालेल मला,त्यात काय न आवडण्यासारखं. माझ्या आईच्या साड्या पण नेसते मी इच्छा झाली तर आणि बघण्याच्या कार्यक्रमाल मी आईची साडीच नेसले होते.."


"हो का? छान दिसत होतीस आणि आईच्या साड्यांवर मुलींचा जास्तचं हक्क असतो."शांता ताई बोलतात आणि बाकी दागिने काढायला किचनमध्ये जातात. वन रूम किचन असल्याने कपाट आतमध्ये असतं. इतक्यात योगेश येतो.


"योगेश.. काय झालं? तुझे डोळे का असे सुजलेत?" स्मिता विचारते.


"अगं काही नाही झोप पूर्ण नाही झाली माझी म्हणून."


"नाही हं योगेश..तू खोटं बोलतोयस.. तुझे डोळे रडून सुजलेत हे दिसतंय मला. काय झालंय सांग."

दोघांच्या बोलण्याचा आवाज ऐकून शांता ताई कामाचं निमित्त काढून बाहेर जातात. स्मिता किचनमध्ये जाऊन ग्लासात पाणी आणते.


"हे घे, पाणी पी आधी!"

योगेश पाणी पितो.


"काय झालंय योगेश? खरं सांग तुला माझी शपथ आहे."


"मानसीचा फोन आला होता."


"कोण मानसी?"


"आपल्या कॉलनी मध्येचं होती. गेली चार वर्षे आम्ही एकत्र होतो. तिच्या घरच्यांना आमचं लग्न मान्य नव्हतं कारण मी गॅरेजमध्ये कामाला होतो. आम्ही वेगळं होण्याचं ठरवलं. बोलणं वैगरे आम्ही पूर्णपणे बंद केलं होतं. कॉलेजमध्ये मग तू भेटलीस. चार वर्षे सोबत असल्याने एक हळवा कोपरा तिच्यासाठी आहे पण आता तिचा माझा काही संबंध नाही. खरचं सांगतोय."


"हे तू मला आधी का नाही सांगितलंस?"


"हे ऐकून जर तू मला सोडून गेली असतीस तर .. या भीतीने नाही सांगितलं."


"मग आत्ता ती फोन का करते?"


"माझं लग्न झालं आहे समजलं तिला, म्हणून तिने फोन केला होता. मला म्हणे तुझ्याशी लग्न करायचं आहे नाही तर मी विष पिऊन आत्महत्या करेन."


"काय? हे मला आधी सांगितलं असतं तर मी या सगळ्यात पडलेच नसते रे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हे सत्य मला सांगतोयस.उद्या तिच्या बद्दल पुन्हा तुझ्या मनात काही आलं तर मी काय करावं?" स्मिता दोन्ही हात टेकून मटकन खाली लादिवरचं बसली. डोळ्यातून तिच्या पाणी येत होतं.


"आता असं काहीच होणारं नाही आहे.तुझी शपथ."
इतक्यात शांता ताई येतात.

"काय गं काय झालंय? आणि अशी का बरं खाली बसली आहेस? उठ बरं आधी आणि वर बैस.." शांता ताई तिला उठवतात आणि बघतात तर स्मिता रडत असते.
"काय गं काय झालं? बरं वाटतं नाही का तुला?"


"आईची आठवण येते."


"अगं मग येणारच आहेत की ते आज. आपली सत्यनारायणची पूजा झाली की आठ दिवसांची जा हो माहेरी. आपलं घर, आपली माणसं सोडून येणं इतकं सोप्प नसतं हे मला पण माहीत आहे. आज तुझ्या घरचे पूजेला आले ना की आपल्या रीतीप्रमाणे ते तुला पाचपरतावनासाठी घेऊन जातील, मग ये आठ दिवसांनी... माहेरच्या आठवणींच गोड गाठोडं घेऊन. काय?"

स्मिता मान डोलावून हो म्हणते पण तिच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलं होतं.
सगळे चाळीतले जमतात, नवरा नवरीची हळद उतरवण्यासाठी. दोघेही पाटावर बसतात. स्मिता पाटावर बसते पण तीच मन कुठे तरी भलतीकडेच असतं. सगळे खेळ खेळून होतात आणि मग दोघेही कपडे बदलायला घरात जातात. स्मिता तिच्याच विचारात गढलेली असते.
क्रमशः

(काय होईल पुढील भागात? कोण आहे ही मानसी?)

🎭 Series Post

View all