प्रेम की यातना?भाग 3

कश्या पद्धतीने होईल योगेश आणि स्मिताच लग्न?


अहो, काय बनवू संध्याकाळी. म्हणजे पाहुणे येतील म्हणून विचारते."


"जास्त काही बनवू नका. कांदेपोहे आणि चहा एवढंच ठेवा. सगळं पक्कं झालं की नंतर मिठाई देऊ."


"एवढं साधं?"


"आपण गरिबीतून इथवर आलोय. आपल्या गरिबीची झळ लेकीला माहीत नसली तरी आपल्याला माहीत आहे आणि ज्या घरात ती जाणार आहे तिथलं वातावरण जेमतेम आहे त्यामुळे जास्त मोठेपणा आणि आवभगत करू नये. त्यांनी मोठ्या मनाने आपल्या मुलीचा स्वीकार करावा एवढीच बाप म्हणून इच्छा आहे नाकी आपली मुलगी मोठ्या घरची आहे म्हणून त्यांनी तिला सून म्हणून स्वीकारावे."


"आई, बाबा अगदी बरोबर बोलताहेत. मला ही असचं वाटतं की आपण सगळं एकदम साधेपणाने करावं."


"बघा, माझ्या लेकीला ही गोष्ट उमगली पण तुम्हाला नाही!"


"अहो, मी आई आहे शेवटी. मला थोडी काळजी असणारचं की."


"आई, आता काळजी नको करू. तू तयारीला लाग मी आज्जीला भेटून येते."


"हो जा, आणि आज्जी कडे मी दागिने आणि साडी दिली आहे ती कशी वाटते बघ एकदा, नसेल आवडली तर दुसरी तुझ्या आवडीची घेऊन येऊ."


"हो बघते आणि सांगते."

*********************

"या या नमस्कार! सिंधू.. बाहेर या पाहुणे आलेत!" गिरीशराव हॉल मधून आवाज देतात.


"हो आले आले" म्हणत सिंधू ताई पण हॉल मध्ये पोचतात.


"या बसा, बसा ना ताई!" सिंधुताई हात जोडून नमस्कार करत योगेश आणि त्याच्या घरच्यांना बसायला सांगतात.


"ह...." योगेश चे बाबा घरावरून चौफेर नजर फिरवत बोलतात.


"मंदार दादा.. पाहुण्यांसाठी पाणी आणि सरबत घेऊन या!"
सिंधुताई त्यांच्या बंगल्यात स्वयंपाक करणाऱ्या दादांना सांगतात.


"सिंधू, आईला घेऊन ये बाहेर आणि स्मिताला पण!"


"हो!"


"तुमचा बंगला फार छान आहे आणि एकदम शांत ठिकाणी आहे."
औपचारिकता म्हणून योगेश चे बाबा बोलले


"हो.. मुद्दामच घेतला आहे शहरापासून एवढ्या दूर. येण्या- जाण्यासाठी प्रत्येकाची एक गाडी आहे आणि प्रत्येकाचा वेगळा ड्राइव्हर आहे."


"हो ते तर असणारचं. सिंधू उद्योजकाचे मालक तुम्ही. घरात चार पाच गाड्या असणं फार मोठी गोष्ट नाही."
योगेशच्या वडिलांच्या बोलण्यावर गिरिशरावांनी स्मित केलं.


"सावकाश ये! थांब इथे बस आई!"
गिरीशराव आईचा हात धरून तिला बसवत बोलले.


"मी ओळख करून देतो. ही माझी आई यशोदा चिपळूणकर, या माझ्या पत्नी सौ. सिंधू चिपळूणकर, आणि ही माझी मुलगी स्मिता....!"

गिरीशरावांच्या आईने आणि सिंधुताईंनी हात जोडून नमस्कार केला तर स्मिताने पाया पडून नमस्कार केला.


"ही माझी बायको शांता आणि हा माझा मुलगा योगेश तसे दोघेही हात जोडून नमस्कार करतात. आई आहे पण ती गावी असते तिला मुंबई जमत नाही." योगेशचे बाबा बोलले.


"अच्छा! घ्या सरबत घ्या...."
गिरीशराव मंदारला ट्रे पुढे करायला सांगतात. सगळेच एक एक ग्लास उचलतात.


"बरं ज्यासाठी भेटलो आहोत त्या बद्दल बोलू आणि मग नाश्ता करता करता ठरवू कस काय करायचं ते. चालेल ना!" आज्जी बोलली.


"हो आई चालेल..."योगेशचे बाबा बोलले.


"बरं, आता मुलांनी एकमेकांना आधीच पसंत केलं आहे तर आपण मोठ्यांनी फक्त \"आयुष्यभर सुखी राहण्याचा आशिर्वाद द्यायचा\" पुढे संसारात चढ- उतार येतील ते दोघांनी मिळून एकमेकांच्या सोबतीने सर करायचे. काय? समजलं का बाळांनो."
आज्जीने प्रेमाने आणि थोडक्यात आयुष्याचं सार सांगितलं होतं.


"हो, हे अगदी बरोबर. आम्ही कुठल्या परिस्थितीमधून इथवर आलो हे आम्हाला माहीत. त्यामागची मेहनत, एकनिष्ठता,समर्पण,विश्वास आणि सगळ्यात महत्वाचं आईचा आशिर्वाद जो नेहमी होता आणि आहे."गिरीशराव बोलले.


"हो, आणि माझ्या सिंधूने दहा बाय दहा च्या खोलीतून सुरू केलेला व्यवसाय दोघांनी मिळून एवढा मोठा केला की आता सिंधू हे नाव उद्योगात खूप पुढे आहे." आज्जी अभिमानाने बोलल्या.


"बरं चला ते राहुद्या आपण मुलांच्या लग्नाचं बोलू. तुम्हाला स्मिताला काही विचारायचं असेल तर विचारू शकता." सिंधुताई बोलल्या.


"हो चालेल की, त्यासाठीचं तर भेटलोय आज आपण."योगेश ची आई बोलली.


"ये बाळा, इकडे बस माझ्या बाजूला."

स्मिता योगेशच्या आईच्या बाजूला जाऊन बसते.


"योगेशने तुला पसंत केली आहे म्हणजे काहीतरी छान असणार, पण बाळा.. आपलं घर या घराएवढं मोठं नाही. तुझ्या आईवडिलांनी गरिबीच्या झळा सोसल्या आहेत. तुम्हाला वयक्तिक खोली पण नसेल काय ते म्हणता तुम्ही... योगेशची आई आठवल्यासारखं करते आणि पटकन बोलते प्रायव्हसी की काय ते?? तुझं पोट भरू शकेल एवढं तो कमावतो पण विनाकारण पैसे खर्च करणे आम्हाला परवडणारं नाही. तुला थोडी का होईना तडजोड करावी लागेल लग्नानंतर. तुमचं घर मोठ्ठ आहे पैसा मोठ्ठा आहे तस आपलं नाही. तुला जर काम करून तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तुझी हौस मौज करायची असेल तर तू करू शकतेस. योगेशला गॅरेजमध्ये काम करून जेमतेम दहा हजार मिळतात. त्यातले पण पाच हजार तो घर खर्चाला देतो."
योगेशची आई स्मिताला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगत होती.


"तिला काही कमी झालं तर आम्ही आहोतचं की." सिंधुताई बोलल्या.


"सिंधू ताई, तुमची मुलगी आमची सून म्हणून जरी येत असली तरी ती तुमची मुलगी कायमचं असेल पण आमच्या सुनेने माहेरी राहून तिच्या गरजा पुरवल्या तर लोकं शेण घालतील आमच्या तोंडात. आधीच तुमची मुलगी आमच्या मुलासोबत असते तर लोकं म्हणतात योगेशने सोन्याचा मासा प्रेमाच्या जाळ्यात अडकवला आहे. तुम्ही जर तसचं केलात तर लोकांच्या बोलण्याला दुजोरा दिल्यासारखं होईल ते. माफ करा पण तुम्ही लेकीला आई म्हणून माहेरचं गाठोडं नक्की द्या पण त्यात आमची इभ्रत गुंडाळून देऊ नका."
शांता ताई हात जोडून बोलल्या.



"अगं असे हात नको जोडू तू! सिंधू.. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आपण आपली मुलगी देतोय त्यांच्याकडे आणि तिनेच पसंत केलयं योगेशला..तर पुढे कसं निभवायचं हे ती दोघे बघतील. त्यांना कसली अडचण आली तर आपण दोघांनाही आईवडील म्हणून मदत करूचं की."


"हो नक्की! आणि आम्ही तुमची लेकं..सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून नेणार आहोत." योगेशची आई स्मिताच्या पाठीवरून मायेने हात फिरवतं बोलल्या.


योगेशच्या आईचं बोलणं ऐकून गिरीशराव सिंधुताई आणि आज्जी अगदी निश्चिन्त होतात. मुलगी लहान घरात जाते यापेक्षा त्यांना जास्त आनंद होता ते, मुलगी मोठ्ठं मन असणाऱ्यांच्या घरात जातेय.


"चला तर मग काही तरी खाऊन घेऊ. आलोच मी जरा. सिंधू येताय ना सोबत."


"हो आलेच." सिंधुताई सगळ्यांना येते म्हणून किचनमध्ये जातात.


"अहो काय हे?"
सिंधुताई आश्चर्यचकित होऊन विचारतात.


"लेकीची सासरची मंडळी आहे नुसता कांदेपोह्यांनी पाहुणचार करायचा का?"


"अहो, हेच मी सकाळी म्हणत होते."
सिंधुताई चेहऱ्यावर खोटा राग आणत बोलल्या.


"हो पण आज मुलीच्या सासरच्या मंडळींना भेटून अस वाटतंय की आपली मुलगी योग्य घरात जातेय. चला आता पटापट आवरा प्लेट भरा."
गिरशरावांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.


"अहो.. लग्नाची तारीख अजून ठरली नाही."
सिंधुताई गिरीशरावांच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या.


"हो,पण तरी..लेक आता रोज डोळ्यांसमोर नसणार ना!" एव्हाना गिरशरावांचा कंठ दाटून आला होता.


"शुsssss शांत व्हा... असं करू नका बरं. चला पाहुणी खोळंबली असतील."
सिंधुताई गिरशरावांना समजावत बोलल्या.


"हो हो चला.... "

गिरीशराव आणि सिंधुताई दोघांनी पटापट फराळ भरला.
समोसे, कचोरी, ढोकळा, बदामी शिरा, गुलाबजाम, काजूकतली, मोतीचुरचे लाडू एक ना अनेक प्रकार लेकीच्या सासरच्यांच्या पाहुणचाराखातिर ठेवल्या जातात. टेबल पंचपकव्वानानी भरलेला असतो.
गिरीशराव मंदार ला आवाज देऊन सगळ्यातलं थोडं थोडं प्लेट्स मध्ये भरून प्लेट्स तयार करायला सांगतात.


स्मिता फार खुश असते. तिला हवं असलेलं सगळं तिच्या समोर होतं. चोरट्या नजरेनी ती योगेशकडे बघते तर तो सगळ्यांच्या नकळत तिला डोळा मारून फ्लाईंग किस करतो. स्मिता ते बघून लाजते आणि इकडे तिकडे बघून आपल्याला कुणी बघितलं नसल्याची खात्री करून गालातल्या गालात हसते.


"लग्नाची तारीख कधीची काढायची? म्हणजे मुलांच्या आता परीक्षा आहेत त्या झाल्या की मगच काढू म्हणतोय, कारण परीक्षेच्या अभ्यासामुळे त्यांना हे गोड क्षण जगता नाही येणार." गिरीशराव बोलले.


"हो आपण दहा एप्रिल नंतरची तारीख काढू."योगेशचे बाबा बोलले.


"चालेल आणि देण्याघेण्याचं कसं काय?"


"आम्हाला मुलगी आणि नारळ एवढंच द्या. तुमच्या मुलीला जे द्यायचं असेल ते देऊ शकता. आणि आम्हाला झेपेल एवढंच द्या नाहीतर लोकं म्हणतील सुनेकडून राशी घेऊन आलेत." योगेशची आई बोलली


"लोकांचं काय ओ.. दिलं तरी बोलणार आणि नाही दिलं तरी बोलणारचं. श्रीमंतांची लेक लंकेची पार्वती बनून आली आहे." आज्जी बोलल्या.


"हो ते तर आहेच! बरं एक काम करा, आमच्या माणसांचं आम्ही बघतो, तुमच्या माणसांचं तुम्ही बघा.. आणि आपण सोयरी माणसं म्हणून एक करू..एकमेकांचा मान आपण आपापल्या परीने करू. आता आम्ही तुमच्या इतकं महाग काही देऊ शकत नाही पण आमच्या ऐपतीप्रमाणे नक्कीच देऊ."शांता ताई बोलल्या.


"अहो ताई असं नका बोलू आपण आता एकच कुटुंब आहोत. जे करू योग्य करू. सगळ्या नात्यांना योग्य न्याय देऊ."
सिंधू ताई बोलल्या.


"चला तर मग येऊ आम्ही. आता भेटू पुढच्या बोलणीला. आमच्या कडून जास्त माणसं नसतील. गावावरून आईला घेऊन येऊ आणि इथली आमची मित्रमंडळी असतील. गावच्या माणसांचा ने आण करण्याचा खर्च परवडणार नाही आम्हाला. त्यामुळे लग्नानंतर सुनेला गावी कुलदैवतेच्या दर्शनाला घेऊन जाऊ तेंव्हा गावात लाडू वाटू तिच्या हातून." योगेशचे बाबा बोलले.


सगळ्यानी त्यांच्या निर्णयाचा मान ठेवत होकार दर्शवला. सोयऱ्यांनी गळा भेट घेऊन निरोप घेतला.

(पुढच्या भागात बघू योगेश आणि स्मिताच्या लग्नाची तयारी.)

क्रमशः.............





🎭 Series Post

View all