प्रेम की यातना? (भाग 2)

गिरीशराव स्मिताला लग्नासाठी परवानगी देऊन योगेशला आणि त्याच्या कुटुंबाला घरी बोलावतात.


"सरकार! आपल्या राजकुमारी कुठे दिसतं नाही."


"आहे तिच्या खोलीत."


"आज जेवायचं नाही का?"


"भूक नाही म्हणे. मगाशी लोण्यासोबत तिच्या आवडीचे थालीपीठ खाल्ले आहेत. जेवायला चल बोलले तर काय म्हणे....तू इतक्या प्रेमाने थालीपीठ बनवले होतेस की मन आणि पोट फुटेपर्यत खाल्ले आहेत."


"अच्छा! चला म्हणजे उपाशी नाही ना मग झालं तर?
बरं मी काय म्हणतोय तू सांगितलं का तिला?"


"हो सांगितलं आहे."


"मग काय बोलली?"


"आपण आधी जेवणं उरकून घेऊ, मग बोलू या विषयावर!"


"काही गंभीर?"


"हो पण आणि नाही पण."


"आता मी पुन्हा काही विचारलं तर तुम्ही हे अस कोड्यात उत्तर द्याल त्यापेक्षा आधी जेऊनचं घेऊ."
गिरीशराव नजर रोखत सिंधुताईंकडे बघून बोलले तश्या सिंधुताईंनी स्मित करत त्यांच्या बोलण्याला न बोलताच दुजोरा दिला.


"आई बाबा जेवले का?"


"हो जेवले बाबांना गोळ्या घ्यायच्या होत्या. मी काय म्हणते जरा चांगला डॉक्टर बघून बाबांचा इलाज होतोय का बघा ना!"


"सिंधू.. ते शक्य नाही आता. तुला माहीत आहे ना. दारू,सिगरेट,चिलीम,ताडी,बिअर,गावठी दारू अजून काय काय व्यसन केलीत त्यांनी त्या सगळ्याची किंमत मोजतायत ते. मी डॉक्टरांशी बोललो होतो. बाबा शेवटच्या टप्प्यात आहेत जिथे काही शक्य नाही. आई ही गोष्ट समजू शकते पण का नाही समजत. जे आहे ते आईने स्वीकारलं आहे. आईला मारझोड करतांना तिला शिवीगाळ करतांना पाहिलं आहेस ना तू?"


"अहो माहीत आहे मला पण तरी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे."


पानात वाढलेल्या भाकरीला गिरीशराव डाळीत चुरतात आणि ते पान सिंधुताईंना देतात.


"हे घे! डाळीत चुरलेल्या या भाकरीला पुन्हा आहे तशी बनव."


"अहो! काही तरीच काय? डाळीत चुरलेली भाकरी....एवढं बोलून सिंधुताई मध्येच थांबतात, कारण गिरशरावांनी भाकरी का चुरली होती ते त्यांना समजलं होत.


"समजलं ना मी काय म्हणतोय?"


"हो."


"आईची काळजी घे फक्त. बिचारी ने खुप सोसलंय."


"हो अहो..ते काय मला माहित नाही का?"


"बरं चला आवरून घ्या पटकन. मी ओटा साफ करायला मदत करतो. म्हणजे लवकर होईल."


"अहो राहुद्या मी करते."


"मी मदत करतो बोललो ना. चला लवकर गिरीशराव प्रेमाने दरडावत बोलले.


"तुम्ही काही ऐकणार नाही."
गिरीशराव आणि सिंधुताई दोघे मिळून सगळं किचन आवरून घेतात.


"आई जागी आहे का ते बघून येतो मी."


"हो चालेल."


"आई...आई..जागी आहेस का गं?"

गिरीशराव हळूच दारावर टकटक करत विचारतात.


"हो रे बाळा! जागीच आहे. थांब हं येते. आई गं...देवा..परमेश्वरा... विठ्ठला..गिरशरावांच्या आई गुढग्यावर हात देत कळवळत स्वतःशीच पुटपुटतं होत्या.

"काय गं आई काय झालं? त्रास होतोय का पुन्हा? गुढगे पुन्हा दुखू लागलेत का?"


"हो रे बाळा! वयाप्रमाणे आता हे त्रास होणारचं. तू काळजी नको करू. बरं बोल काय झालं?"


"अगं तुझ्याशी बोलायच होतं थोडं चलेतस का जरा?"


"हो चल. हात पकड हो जरा!"


"हो आई..सावकाश."

गिरीशराव आईला सोफ्यावर बसवतात. इतक्यात मागून सिंधुताई वाटीत मुखवास घेऊन येतात. हम्म हे घ्या... आई तुम्हाला जरा तेल लावून देऊ का?"


"नको गं बाई. दिवसभर कंपनीत जाऊन मग घरचं करून थकतेस, त्यात परत हे नको. ये तू, बस इथे माझ्या बाजूला आणि बोला,कारण काही तरी महत्वाचं असणार म्हणून यावेळी मला बाहेर यायला सांगितलं हे माहीत आहे मला."


"आई..आपला महेश आहे ना त्याचा मुलगा मंगेश...यंदाचं एम.बी.बी.एस. झाला आहे. दोन वर्षात स्वतःच क्लिनिक चालू करायचं म्हणतोय."


"हो का? छान आहे की मग!"


"हो आई छानचं आहे, पण यांचा विचार आहे की मंगेश आपल्या स्मितासाठी योग्य आहे. महेश भाऊंना पण आपण किती वर्षांपासून ओळखतो. यांचा विचार होता मैत्रीचे संबंध नात्यात करावे."


"ही तर छानचं बातमी आहे. आपल्या सोन्याला सांगितलं का?"


"हो आई सांगितलं पण...."


"पण काय सिंधु?"


"पण आई..तिला एक मुलगा आवडतो. योगेश नाव आहे त्याच, कॉलेज मध्ये आहे म्हणे. मी तिला मगाशीचं बोलले या बद्दल."


"गिरीशा... काय म्हणणं आहे तुझं?"


"सिंधू....एक काम करा... स्मिता जागी असेल तर तिला सांगा खाली यायला."


"हो सांगते. पण अहो.. चिडू वैगरे नका हं."


"अगं आजपर्यंत तो कधी लेकीला ओरडला आहे का? तू आई आहेस मी समजू शकते पण तो ही बाप आहे. त्याला त्याच्या पद्धतीने तिला विचारू दे."


"हो आई चालेल."


"स्मिता.....ए स्मिता...."


"काय गं आई आता या वेळी?"


"खोटारडे! झोपेत असल्याचं नाटक करू नको. तुझा फोन वर बोलण्याचा आवाज ऐकला मी. सिंधुताई तिचा कान खेचत बोलल्या.


"आई गं.. सॉरी सॉरी...बरं बोल..."


"खाली चल बाबा बोलावतायत."


"का? म्हणजे तू त्यांना बोललीस का?"


"हो, उद्या सांगायचचं होतं ना! ते आजचं सांगितलं. चल खाली आता इथेच सगळं विचारू नको."


"ए आई.. मला भीती वाटते."


"अगं घाबरायचं काय त्यात? बाबा तुझे काही वैरी नाहीत."


ए आई... तू माझ्या जवळच थांब हां." स्मिता जरा घाबरतच बोलत होती.


"हो गं बाई.. चल आता नाही तर बाबा येतील वर."


"नको नको....येते मी. चल."

स्मिता सिंधुताईंचा हात पकडून त्यांच्या मागे मागे चालत होती.


"काय गं अशी आई च्या पाठी लपून का बरं येतोय माझा सोन्या?"


"आई, अहो ती यांना घाबरते."


"हो का? चला बापाला घाबरायला लागली म्हणजे आमचा सोन्या आता मोठा झाला.."
गिरशरावांची आई वतावरण हलकं करण्यासाठी बोलल्या.


"ये बेटा.... बस माझ्या बाजूला."

स्मिता गिरशरावांच्या बाजूला बसते पण हातभर अंतर ठेवूनच. तीच वागणं बघून गिरीशराव गालातचं हसतात.


"कुठलेही आढेवेढे न घेता मी सरळ विचारतो. कोण आहे तो मुलगा? नाव काय त्याच? आणि कॉलेज व्यतिरिक्त काय कामधंदा करतो? आणि अजिबात घाबरू नको मी तुझा नेहमीचाचं बाबा आहे. रोज बोलतेस तशीचं बोल मोकळेपणाने. कुठलंही दडपण घेऊ नको."

गिरशरावांच्या बोलण्याने स्मिताला जरा हायसं वाटलं.


"योगेश नाव आहे त्याच. माझ्या वर्गातचं आहे. कॉलेजजवळचं गॅरेज आहे तिथेच काम करतो. आर्थिक परिस्थिती पोट भरण्याइतपत चांगली आहे. आई धुणी भांडी करते."

स्मिताच बोलणं ऐकून सिंधुताईंच्या काळजात धस्स झाले. जन्मापासून लाडात वाढवलेली पोर तडजोड करून संसार करणार हा विचारचं त्यानं करवेना.


"तुला हे सगळं मान्य आहे."


"हो बाब."


"सोन्या! आवडणं आणि प्रेम करणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत बरं. दोघांना एक करू नको."


"नाही आज्जी... आणि अगं तूच शिकवलं आहेस ना. परिस्थिती कशीही असली तरी तिच्याशी जुळवून घ्यायची सवय असावी. हां आता मला सवय नाही पण मी प्रयत्न नक्की करेन. तुमचे संस्कार विसरणार नाही मी."


"सिंधू! तुला काही बोलायचं नाही का?"
शांत उभ्या असलेल्या सिंधुताईंना बघत गिरीशराव बोलले.


"काय बोलू? पोरीने सगळं ठरवलं आहे तर, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे तिला आता अशी एकदम......सिंधुताईंचा कंठ दाटून आला होता पुढे काही बोलताचं येत नव्हतं.


"अहो! लेक तडजोड करून संसार करणार म्हणजे उपाशी रहाणार असं नाही, तिला गरज असेल तेंव्हा आपण असूच की तिच्यासोबत."
गिरीशराव सिंधुताईंना समजावत बोलत होते.


"बरं चला आताच रडून लेकीची पाठवणी करू नका. गिरीशा... उद्याच संध्याकाळी मुलाच्या घरच्यांना बोलावून घे. बसून सविस्तर बोलून घेऊ."



"हो आई चालेल. स्मिता.. योगेशचा नंबर दे. तू सांगून ठेव त्याला मी उद्या सकाळी दहा वाजता फोन करेन असं."


"हो बाबा! म्हणत स्मिताने नेहमी सारखी मिठी मारली आणि गिरशरावांच्या गालावर पप्पी दिली. स्मिताचा चेहरा खुलला होता. तिचा आनंद तिच्या डोळ्यात,चेहऱ्यावर तिच्या वागण्यातून दिसतं होता. आई आज्जी ला मिठी मारून स्मिता तिच्या खोलीत जाते आणि योगेशला उद्या बाबा दहा वाजता फोन करणार असल्याचे सांगते.


"काय ओ, तुम्ही लगेच उद्या भेटायला का बोलावताय. आपण आधी मुलाची चौकशी केली असती ना! "


"मुली एकदा कोणाच्या प्रेमात पडल्या की आईवडील त्यांना दुष्मन वाटू लागतात. आपण चौकशी करणारचं आहोत त्यात जर मुलगा चुकीचा आढळून आला तर त्याला आपण आधीच समज देऊन ठेऊ. चांगला असला तर अतिउत्तम."


"सिंधू, तुझं आईचं मन समजू शकते हो मी. काळजी करू नको. तो बसलाय ना वर, सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी तो परमेश्वरचं घडवून आणतो बघ. आपण फक्त त्यांनी आपल्यासाठी केलेल्या वाटेवर चालायचं असतं. कुठलीही शंका मनात न ठेवता. माझ्या बाळ गोपाळाचं नाव घे."


"हो आई! त्याच्यावर विश्वास आहे म्हणून आपण आज इथवर आलोय. \"देवा... माझ्या लेकीवर पण तुझी कृपा दृष्टी अशीच असुदे रे बाबा..\" सिंधुताई हात जोडून बोलत होत्या.


"तुम्ही प्रार्थना केली ना.. म्हणजे आता त्याची कृपादृष्टी राहणारचं."


"मस्करी करताय का माझी?" सिंधुताई चिडत बोलल्या.


"अगं तो मस्करी नाही करत."


"हम्म आई.. तुम्ही त्यांचीच बाजू घेणार."


"ए बाबांनो आता मला यात खेचू नका हो. तुमचं तुम्ही बघा काय ते. मी आपली जाते माझ्या खोलीत. हे राम कृष्ण हरि......चला तुम्ही पण लवकर झोपा."


"हो आई.. जा सावकाश."


"हम्म, जाते हो जाते..."

आई खोलीत गेल्यावर.


"काय ओ, उद्याच कसं काय करायचं? "


"ते उद्या बघू. आता निवांत झोपू."


"तुम्हाला निवांत झोप लागणार आहे? मला मगाशी शांत केलात पण तुमच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं होतं"


"तुझ्यापासून काही लपलं आहे का कधी? फुलासारखं जपलं आहे पोरीला. काळजाचा तुकडा आहे ती. असाच कसा कोणाला काढून देऊ? पोरीने निवडला आहे मुलगा. आपण नाही बोललो आणि तिने चुकीचं पाऊल उचललं तर? त्यांनंतर सगळं चांगलं झालं तर ठीक, नाहीतर आपल्याला दुखावलं म्हणून स्वतःला काही करून घेतलं.... तर काय करणार आपण? म्हणून हो बोललो. आपण सगळं राजी खुशी करून दिलं तर निदान पोर समोर तरी राहील. घरी येऊन जाऊन राहील."


"ते पण बरोबरचं आहे म्हणा...चला आता खूप उशीर झालाय. झोपुया आपण पण."


"हो चला.. सकाळी लवकरचं सगळं आटोपून मी दुपारी जेवायलाचं घरी येईन."


"हो चालेल."

क्रमशः.…



🎭 Series Post

View all