प्रेम हे.. बावरे..!

A Beautiful Love story Of Nil And Radha.


प्रेम हे.. बावरे!
(लघुकथा स्पर्धा - प्रेम )




बसस्टॉप वरची चिकार गर्दी.. लोकांचा कलकलाट. त्यातच सुरु झालेला पाऊस.
तिथेच ती उभी होती.. कडेवर वर्षभराचं लेकरू.

बस आली नी त्या तोबा गर्दीतुन पावसाला चुकवत कशीबशी आत शिरली ती..

एका रिकाम्या सिटवर पटकन जावून बसत सुटकेचा निःश्वास सोडला.

" एक्सक्यूज मी.. प्लीज थोडं सरकता का? "

कानावर पडलेल्या आवाजानं तिची नजर वर गेली.
पावसात थोडा भिजलेला तो..

केसांवरून चेहऱ्यावर ओघळणारे काही थेंब..!

क्लीन शेव केलेला गुळगुळीत गोऱ्या कांतीचा चेहरा.. आणि आशेने तिच्याकडे बघणारे बदामी घारे डोळे..!

काहीसा ओळखीचा वाटला तो..
पण कोण..?  अंदाज लागेना.


अंग चोरत ती सरकली.


थँक्स म्हणत तो बसला शेजारी…


आणि नजर गेली त्याची  स्कार्फने गुंडाळलेल्या तिच्या चेहऱ्यावरच्या थेट त्या काळ्या डोळ्यांत..!


काहीसा गोंधळला तो.. काहीसा बावरला.
ही तर तीच नजर.. हे तेच डोळे..!


मग तीच का ही??


मनातील विचाराआधीच मुखातून शब्द उमटले..

" राधा ..? अनुराधा..? "

तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं.

" म्हणजे राधाच ही! "

मनानं कौल दिला.

"अगं मी.. "

काही बोलणार तो , तोच तिच्या कडेवरचं लेकरू रडायला लागलं.
ती त्याला शांत करण्यात गुंतली.दहा मिनिटांनी बाळ झोपी गेलं. ही दहा मिनिटं त्याला कितीतरी मोठी वाटली.

तिच्याशी कसं नी काय काय बोलू असं होत होतं त्याला.
तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.
थोडंसं बोलून त्यानं कंडक्टरला बस थांबवायची विंनती केली.

"राधा … मी निलय. निल. कदाचित ओळखलं नसशील मला.
माझं इथेच अर्ध्या तासाच्या अंतरावर.. "

" ओ साहेब.. थांबलीय बस. उतरा आता. "
कंडक्टर ने आवाज दिला.
तिला बाय करून तो खाली उतरला.
बरंच बोलायचं होतं तिच्याशी..पण बस त्याच्या मालकीची नव्हती.

एका कारमधून पुढे निघून गेल्याचं त्याला पाहिलं तिने.. आणि डोळे मिटून घेतले.

" निल तूला विसरेन असं कसं वाटलं तूला ..?? "

तिच्या डोळ्यात आठवणीचं आभाळ दाटलं.

स्टॉप आला नी ती उतरली.
पाऊस थांबला होता. बऱ्यापैकी ऊनही पडलं होतं.
ती रिक्षाने इच्छित स्थळी पोहचली.

आर एन ग्रुपच्या न्यू ब्रँच च्या स्टॉफ साठी इंटरव्ह्यू ठेवलेला होता. तिथेच ती आली होती.
आज पहिल्यांदाच हे सगळं बॉस बघणार होते त्यामुळं आलेल्या कॅन्डीडेट्स मध्ये दडपण जाणवत होतं. कारण आर एन ग्रुपच्या बॉसची छापच वेगळी होती.
वयाच्या पस्तीशीतच त्याचा बिजनेस मध्ये बसलेला जम. नावाभोवती निर्माण झालेलं प्रसिद्धीचं वलय..
त्याच्याशी काम करायला इंडस्ट्रीमध्ये चढाओढ असायची .
आणि असा तो आज स्वतः मुलाखती घेणार होता.

चार कॅन्डीडेट्स झाल्यानंतर तिचा नंबर.

" अनुराधा पाटील.. "

नाव पुकारल्या गेलं.

एका हातात कडेवरचं बाळ आणि दुसऱ्या हातात फाईल सांभाळत ती आत गेली.

" मे आय कम इन सर..!"

"येस "

समोर न बघताच तो बोलला.

" प्लीज सीट "

आताही त्याचं लक्ष त्याच्या समोरच्या लॅपटॉपकडे होतं.

" सोs मिस.."

तो वरती नजर करून बोलला आणि एकमेकांकडे पाहून दोघांनाही आश्चर्य वाटलं.
बॉसच्या खुर्चीवर तोच बसला होता…
बसमध्ये तिच्या बाजूला बसलेला..
निल..!


"राधा तू..? तू काय करते आहेस इथे? "

त्याच्या त्या घाऱ्या डोळ्यातील आश्चर्य कायम होतं.

" मुलाखतीला आलेय मी सर. "
तिचा स्वर शांत.


" तुझ्यासारखी टॉपर मुलगी माझ्या ऑफिसमध्ये..?
सगळं काही ठीक आहे ना राधा..?? "

डोळ्यात काळजी होती त्याच्या.

" सर कॉल मी अनुराधा. मुलाखत सुरु करायची..?"

तिनं शांतपणे विचारलं.

डोळे तसेच.. भावहीन ..!

" हिने अजूनही ओळखलं नसावं का मला?
शक्य नाही ते..! "

त्याच्या मनात असंख्य विचार .

फार्मल इंटरव्ह्यू झाल्यानंतर ती बाहेर आली. रिजल्ट उदयाला कळणार होता.

बाळाला सांभाळत ती निघाली.

तो मात्र तिच्याच विचारात गुंतला.

…अठरा वर्षांपूर्वीचा हाच तो पाऊस..! श्रावणातला..!
क्षणात सरसर बरसणाऱ्या सरी तर क्षणात पडणारं लख्ख ऊन!

त्याचं उन्हापावसातल्या श्रावणात भेटलेली ती..!

कॉलेज मध्ये बारावीला लेट ऍडमिशन म्हणून आलेली..

नाजूकशी.. सावळीच पण चेहऱ्यावर तेज असलेली. लांबसडक केस.. मध्यम बांध्याची.
साधीशीच..तरीही तो अडकला तिच्यात.. तिच्या त्या काळ्याभोर पाणीदार डोळ्यात.

बारावीत दोनदा नापास झालेला तो..
मित्रांचा निल्या...
गोरापान.. घाऱ्या डोळ्यांचा..

चेहरा दाढीमीशांनी वेढलेला.
अगदी टपोरी गुंड्याटाईप..!

अख्या कॉलेजमध्ये गुंडगिरी करण्यात फेमस. वडिलांविना पोर म्हणून मोठया कष्टानं आईनं वाढवलं त्याला.. पण पोरगं पार वाया गेलेलं.
आईच्या कष्टाचं खायचं नी कॉलेजमध्ये येऊन मजा करायची एवढंच त्याचं काम.
आणि अशा या निल्याच्या बदामी घाऱ्या डोळ्यात तिचे ते काळेभोर डोळे घर करून गेले.
रोज तिच्या वाटेवर गुलाबपाकळ्या टाकून वाट बघायचा तो.
त्याच्यासमोर तिच्याकडे वाकडी नजर करून कोणी पाहील तर शपथ!

हळूहळू तिलाही हे जाणवयला लागलं.
एक दिवस हिम्मत करून विचारलंच तिनं..

" काय रे काही कामधंदे नसतात का तूला? का उगा मागे लागलाहेस माझ्या..?? "

" आवडतेस तू आपल्याला. दिलात बसली आहेस एकदम."

तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.

" शी.. काय भाषा आहे तुझी.
ती सुधार आधी. नी मग बोल माझ्याशी. "

त्याच्या नजरेला भाव न देता ती तुसडेपणाने म्हणाली.

"तुझ्यासाठी काय पण. तू म्हणशील ते करायला तयार आहे आपण."

त्याची ती नजर तशीच स्थिर.


" हो..? मग या खेपेला बारावी पास होऊन दाखवायचं तेही फर्स्ट क्लास घेवून…
नंतरच यायचं बोलायला माझ्याशी ."

आपले लांबसडक केस हलवून ती निघाली.

" राधा… ऐक ना.
तुझं चॅलेंज स्वीकारलं मी. सत्तर च्या वर पर्सेंटेज नाही मिळालेत ना तर नाव नाही लावणार निलय म्हणून. "

तिच्याजवळ जात तो म्हणाला.

" राधा नव्हे अनुराधा आहे मी."

ती चिडून .

" ते इतरांसाठी. माझ्यासाठी फक्त राधाच. राधानील काय मस्त वाटतं ना..? "

तो हसत म्हणाला.

" आता माझ्याशी डायरेक्ट बारावीच्या रिजल्टनंतरच बोलायचं कळलं? "

त्याच्यासमोर बोट दाखवून ती निघून गेली.

कॉलेजच्या फेऱ्या आता कमी झाल्या होत्या त्याच्या. तिला वाटलं.. घाबरला असेल तो. ती गुंतली अभ्यासात.

त्यानंही रात्रंदिवस एक करून अभ्यास केला पहिल्यांदा ..

आणि खरंच आश्चर्य…

एव्हरीबडी गेट शॉक्ड..!
निल्याभाई एकदम रॉक..!!
पंच्याहत्तर परसेन्टेज..!

अनुराधा टॉपर होतीच. तिनं बी.कॉमला ऍडमिशन केलं. तिथेही तो आला तिच्या मागोमाग…

फायनल इयर अर्ध्यावर आलं होतं.

" राधा.. आता तरी बोल ना. तू फर्स्ट क्लास म्हंटलंस मी डिस्टीनक्शन मिळवलं आणखी काय हवंय..??"

निल विचारत होता.

" म्हणजे मी जे मनेल तेच करशील का तू..?? "
ती.

"हो तू म्हणशील तेच. फुल एन फायनल."

"ग्रॅज्युएशन नंतर MBA कर नी खुप कोणीतरी मोठा हो. "


" डन! पण तेव्हाच लग्न करशील का माझ्याशी?? "
तो.

" लग्नाचं कुठे आलं मधेच? मी केव्हा म्हणाले असे? "

ती आश्चर्याने म्हणाली.

" मग म्हण ना केव्हातरी..!"
ती जायला वळली.

" राधा s.."

जवळजवळ खेचलंच त्यानं तिला. एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसऱ्या हातात तिचे हात..

" प्लीज बोल ना काही. तूला काहीच वाटत नाही का माझ्याविषयी? "
तिच्या डोळ्यात डोळे घालून तो विचारत होता.


ती शहारली त्या स्पर्शाने.. हृदय धडधडायला लागले.


" निल.. प्लीज सोड मला..!
भीती वाटतेय तुझी मला."

त्याची पकड ढिली झाली.

" प्रेम केलंय मी राधा तुझ्यावर ..! कधी चुकीचं नाही वागलो तुझ्याशी..
तरी भीती वाटावी तूला माझी?"
डोळ्यात पाणी घेवून तो निघाला तिथून.

दोन तासांनी घरी पोहचला.. अस्वस्थ मनाने.

आतून हसण्याचा आवाज कानी पडला.

" अरे कुठे होतास इतक्या वेळचा? आमच्या लहान मालकीणबाई आल्या आहेत घरी. ये तूला भेटवून देते.. "

त्याची आई म्हणाली.

"राधा? "
चेहऱ्यावर आश्चर्य होतं त्याच्या.


" ही अनुबेबी. ज्यांच्याकडं मी कामाला जाते ना त्या साहेबांची भाची आहे."


आई कौतुकाने सांगत होती.

" आई अगं तुझी होणारी सुन आहे ती.. माझी राधा. "

तो आईकडे बघत म्हणाला.

" काय? साहेबांच्या पोरीकडं वाकड्या नजरेनं पाहतोस? थांब चांगली हासडतेच तूला."

ती मारायला धावली.

" काकी अगं.. मलाही आवडतो तो. " ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.

" काय..? "
मायलेकं एकमेकांकडे पाहू लागले.

" मी निघते आता. उशीर होतोय.. निल सोडशील मला..?"

त्याला पुन्हा धक्का बसला.

" काय बोललीस तू राधा आईसमोर..? "

तो तिच्या मागे जात म्हणाला.

" मी कुठे काय बोलले..? "

ती गालात हसली.


" राधा.. "


त्यानं तिचा हात पकडला.


तिनं पाहिलं त्याच्याकडे तसं त्यानं सोडूनही दिला. तिचं घर येईपर्यंत चकार शब्दही बोलली नाही ती .


दोन दिवसांनी त्याचा वाढदिवस.
ती केक घेवून आली.गल्लीतल्या पोरांना सोबत घेवून छान सेलेब्रेशन केलं.पोरं केक खाऊन परतली. त्याच्या त्या झोपडीवजा घरात ते दोघेच उरले होते.


" राधा थँक यू.. " तो.

ती हसली गोड.

" निल.. हॅपी बर्थडे..!"

एक छोटासा हातरूमाल दिला तिने. त्यावर " राधानील" नावाची एम्बरायडरी केलेली.. स्वतःच्या हातांनी.

" राधा.. हे आजपर्यंतचं सगळ्यात भारी गिफ्ट. मी जपून ठेवेल शेवटच्या क्षणापर्यंत..! "

तो हळवा होत बोलला.

काही कळायच्या आत तिनं त्याला आवेगानं मिठी मारली..

" निल मला प्रॉमिस कर मी असेन नसेन पण तू खुप खुप मोठा हो.. आणि काकीला कामं होत नाही रे आता.. तिला सुखाचे दिवस दाखव. "

" राधा अशी का बोलतेस तू..?"

तिचा चेहरा ओंजळीत घेत तो म्हणाला.

" माहित नाही.."

एवढंच बोलली ती. पण डोळ्यात काहीतरी खोल दडल्यासारखं होतं.

" निल.. आय लव्ह यू! "

त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली.

ती तिची पहिली मिठी..
तो तिचा पहिला स्पर्श..
ती कबुली पहिल्या प्रेमाची..!

त्यानंतर पुढे ती भेटलीच नाही कधी त्याला… तेव्हाची आज भेटतेय..
ह्या अवस्थेत..!

… सार काही आत्ताच घडल्याप्रमाणे निलच्या डोळ्यसमोरून सगळं चित्र सरकलं..

इतर कॅन्डीडेट्स च्या मुलाखती आपल्या एका सहकाऱ्याकडे सोपवून तो धावतच बाहेर निघून गेला.
तिच्यामागोमाग तोही पोहचला बसस्टॉपला .

"राधाs…!"

त्याच्या हाकेसरशी ती वळली.

" निल प्लीज..! का असा मागे करतोहेस??"

" थँक गॉड..! म्हणजे ओळखतेस तू मला."

ती गप्पच होती.

" राधा.. "

त्याच वेळी पुन्हा श्रावण बरसायला लागला.


" पाऊस लागलाय..चल ना माझ्या कारमध्ये बसून बोलूया. निदान या बाळाचा तरी विचार कर. "


काही नं बोलता ती त्याच्यासोबत कारमध्ये बसली.


" कुठे होतीस इतके दिवस..? "
त्यानं अपेक्षित प्रश्न विचारला.


" निल मला नाही करायची तुझ्याकडे नोकरी. "

ती बाहेर बघत म्हणाली.

" आय नो. म्हणूनच तर मी आलोय माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला. सांग ना कुठे होतीस तू. "


" तूझ्या प्रश्नांची उत्तर दयायला मी बांधील नाहीये निल. "


" आहेस राधा…
कारण तुझंही प्रेम होतं माझ्यावर.
हा रुमाल... तूझी प्रेमाची पहिली भेट… अजूनही आहे माझ्याकडे."


" तू तिथेच अडकलाहेस. पण मी खुप पुढे निघून गेलेय निल. एका बाळाची आई आहे आता. "


डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती.


" तिथेच अडकलो म्हणून हा निल बनू शकलो ना..? तूला हवा असणारा.
राधा.. कसल्या बोचऱ्या दुःखात जगते आहेस तू..? "


त्यानं कार ब्रेक करत हळूच तिच्या हातावर हात ठेवून विचारलं.
त्याचा तो स्पर्श..

आजही तसाच होता पूर्वीप्रमाणेच निर्मळ..इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा एक मायेचा आश्वासक स्पर्श तो.
इतकावेळ अडवून ठेवलेला बांध फुटला तिचा..


वडिलांच्या मृत्यूनंतर आई तिला घेवून मामाकडे आलेली. मामा श्रीमंत… पण तेवढाच लालची.
फायनल कम्प्लिट व्हायच्या आतच तिचं लग्न ठरवलं.एका गर्भश्रीमंत घरच्या वेडसर मुलाशी. लग्नाची बक्कळ रक्कम अदा करून घेतली नी मग दोघीं मायलेकीना वाऱ्यावर सोडलं.
रोज मानसिक आणि शारीरिक आत्याचार.. प्रेमाचा साधा लवलेशही नाही कुठे. कशीतरी एवढी वर्ष काढली पण जेव्हा तिच्या गर्भारपोटावर नवऱ्याची लाथ पडली.. त्याच क्षणी तिनं ते घर सोडलं.पोलिसांत तक्रार केली. एकटी होती तोवर ठीक पण आता बाळाला इथे नाही वाढवायचं हे पक्क झालं होतं तिचं. यथावकाश काडीमोड झाला.

आता लेकरू वर्षाचे होत आले म्हणून ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली…


तर..


नशिबानं पुन्हा तिला उभं केलं नीलसमोर.. इतक्या वर्षांनी…
त्याच श्रावणात.


तिचा स्टॉप आला तसं तिनं कार थांबवायला सांगितली.


आसू पुसून बाहेर निघणार तोच तिचं बाळ बा.. बा.. करत त्याच्याकडे झेपावलं. ह्या एका वर्षाच्या काळात त्याच्या तोंडून निघालेला पहिला शब्द…

दोन दिवसानंतर सायंकाळी घरासमोर एक कार थांबली.


दारात निल उभा होता त्याच्या आईसोबत.


" निल मला तुझी नोकरी नकोय हे सांगितलं होतं ना..? का आलास मग..?"


ती.


" तूला नोकरीची काय गरज? RN ग्रुपची पार्टनरशिप आहे तुझी. तुझं नाव माझ्यापूर्वी केव्हाचंच लागलंय.
"राधानील" तीच आपली कंपनी. RN ग्रुप त्याच्या आद्यक्षरावरून तयार झालाय.
मी तूला मागणी घालायला आलोय राधा.. ह्या बाळासकट होशील तू माझी??"


त्याच्या डोळ्यात आर्जव होतं.


माझी तेवढी पात्रता नाहीये निल. प्लीज सोडून दे नाद माझा..!"
डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली.


" अनुबेबी.. तो नादखुळाच झालाय. आणि पात्रता ठरवणारी तू कोण गं? माझा हा नालायक गुंड मुलगा एवढा मोठा माणूस बनलाय.. तुझ्यामुळे.
दुसर्यांच्या दारात काम करणारी मी आज राणीसारखी जगतेय तुझ्याचमुळे..!


पण माझं हे लेकरू तूझ्या वाटेवर आस लावून बसलंय गं..!


अनुबेबी.. या निल्याच्या विराण आयुष्यात त्याची राधा बनून ये ना गं परत..!  मी पदर पसरते.. "


तिनं आपल्या आईकडे पाहिलं.. आईनं डोळ्यांनीच होकार दिला.


" काकी एकाच अटीवर.. अनुबेबी न म्हणता तुही मला राधा म्हणशील तरच लग्न करेन मी ह्याच्याशी..!"


राधा डोळे पुसत म्हणाली.


...दोनच दिवसात रजिस्टर पद्धतीने त्यांनी लग्न केलं.

RN ग्रुपची R म्हणजे राधा हे जगाला कळलं होतं..


कुणाकडे नं जाणारे तिचे बाळ त्याच्या खांद्यावर झोपले होते..


...राधा आज हक्काने निलच्या कुशीत विसावली होती…!


       ******समाप्त ******