Feb 23, 2024
प्रेम

प्रेम हे बावरे! भाग - एक

Read Later
प्रेम हे बावरे! भाग - एक

प्रेम हे.. बावरे!
भाग -एक.

बसस्टॉप वरची चिकार गर्दी. लोकांचा कलकलाट. त्यातच सुरु झालेला पाऊस. तिथेच ती उभी होती, तिच्या कडेवर वर्षभराचं लेकरू.

बस आली आणि त्या तोबा गर्दीतून पावसाला चुकवत कशीबशी ती आत शिरली. एका रिकाम्या सिटवर पटकन जावून बसत सुटकेचा निःश्वास सोडला.

"एक्सक्यूज मी, प्लीज थोडं सरकता का?" कानावर पडलेल्या आवाजाने तिची नजर वर गेली.

पावसात थोडा भिजलेला तो. केसावरून चेहऱ्यावर ओघळणारे काही थेंब. क्लिन शेव केलेला गुळगुळीत गोऱ्या कांतीचा चेहरा आणि आशेने तिच्याकडे बघणारे बदामी घारे डोळे!
काहीसा ओळखीचा वाटला तो. पण कोण? अंदाज लागेना. अंग चोरत ती सरकली.

"थँक्स." म्हणत तो तिच्या शेजारी बसला आणि त्याचवेळी त्याची नजर स्कार्फने गुंडाळलेल्या तिच्या चेहऱ्यावरच्या थेट त्या काळ्या डोळ्यात गेली.

काहीसा गोंधळला तो, काहीसा बावरला. \"ही तर तीच नजर, हे तेच डोळे. मग तीच का ही?\" मनातील विचाराआधीच मुखातून शब्द उमटले, "राधा? अनुराधा?"

तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. 'म्हणजे राधाच ही!' त्याच्या मनाने कौल दिला.

"अगं मी.." तो काही बोलणार, तोच तिच्या कडेवरचे लेकरू रडायला लागले. ती त्याला शांत करण्यात गुंतली.
दहा मिनिटांनी बाळ झोपी गेले. ही दहा मिनिटं त्याला कितीतरी मोठी वाटली.

तिच्याशी कसे नी काय काय बोलू असे त्याला झाले होते.
तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यावर थोडेसे बोलून त्याने कंडक्टरला बस थांबवायची विंनती केली.

"राधा, मी निलय. निल. कदाचित ओळखलं नसशील मला. माझं इथेच अर्ध्या तासाच्या अंतरावर.."

"ओ साहेब, बस थांबलीय. उतरा आता." त्याचे तिच्याशी बोलणे संपण्यापूर्वीच कंडक्टरने आवाज दिला.

तिला 'बाय' करून तो खाली उतरला. तिच्याशी बरेच बोलायचे होते, पण बस त्याच्या मालकीची नव्हती.

एका कारमधून पुढे निघून गेल्याचे तिने त्याला पाहिले आणि डोळे मिटून घेतले.

'निल तुला विसरेन असं कसं वाटलं तुला?' तिच्या डोळ्यात आठवणीचे आभाळ दाटले. स्टॉप आला आणि ती उतरली.

आता पाऊस थांबला होता. बऱ्यापैकी ऊनही पडले होते. ती रिक्षाने इच्छित स्थळी पोहचली. आरएन ग्रुपच्या न्यू ब्रँचच्या स्टॉफसाठी इंटरव्ह्यू ठेवलेला होता. तिथेच ती आली होती.

आज पहिल्यांदाच हे सगळे बॉस बघणार होते त्यामुळे आलेल्या कॅन्डीडेट्स मध्ये दडपण जाणवत होते. कारण आर एन ग्रुपच्या बॉसची छापच वेगळी होती.

वयाच्या पस्तीशीतच त्याचा बिजनेस मध्ये बसलेला जम. नावाभोवती निर्माण झालेले प्रसिद्धीचे वलय. त्यामुळे त्याच्याशी काम करायला इंडस्ट्रीमध्ये चढाओढ असायची आणि असा तो आज स्वतः मुलाखती घेणार होता.

चार कॅन्डीडेट्स झाल्यानंतर तिचा नंबर होता.

"अनुराधा पाटील." नाव पुकारल्या गेले. एका हातात कडेवरचे बाळ आणि दुसऱ्या हातात फाईल सांभाळत ती आत गेली.

"मे आय कम इन सर." दारातून तिने विचारले.

"येस." समोर न बघताच तो बोलला.

"प्लीज सीट." आताही त्याचे लक्ष त्याच्या समोरच्या लॅपटॉपकडे होते.

"सो, मिस.." तो वरती नजर करून बोलला आणि एकमेकांकडे पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले. बॉसच्या खुर्चीवर तोच बसला होता, बसमध्ये तिच्या बाजूला बसलेला. निल!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
कोण आहे हा निल? आणि राधा त्याला ओळख का दाखवत नाहीये? वाचा पुढील भागात.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//