Jan 26, 2022
स्पर्धा

प्रेम हे 10

Read Later
प्रेम हे 10

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिकला घरी जायला उशीर झाला म्हणून मनस्वी थोडी नाराज झाली होती.. कारण आता तिलाही कार्तिक आवडू लागला होता..तिला कार्तिकशी खूप गप्पा मारायच्या होत्या.. इकडे शरयूला देखील कार्तिक चांगला वाटत होता.. आता पुढे..

सकाळी कार्तिक लवकरच उठला.. कारण त्याला प्रोजेक्टसाठी लवकर जायचं होतं.. तो नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर पेपर शोधू लागला.. त्याला वाटले मनस्वीनेच पेपर घेतला आहे म्हणून तो रागातच तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला, "पेपर कुठे आहे??"

"माहित नाही.." मनस्वी

"तुलाच तर सकाळी पेपर वाचायला लागतो.. तूच घेतली असणार.." कार्तिक

"अरे, पण आज मी पेपर घेतलेच नाही तर.. कशाला खोटं सांगू तुला?." मनस्वी

कार्तिक थोडा वैतागून पेपर शोधायला गेला.. खरंतर त्याला लवकरच ऑफिसला जायचे होते.. पण पेपरमधील त्याच्या आवडीचा लेख वाचल्यानंतर.. कारण तो लेख वाचल्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नव्हता.. कार्तिक पेपर शोधत असताना त्याला तो पेपर त्याचे शिरीष काका वाचत असल्याचे दिसले..
"काय यार? आता पेपर कसा घ्यायचा?" असा तो मनातच विचार करत होता..

इतक्यात त्याला एक कल्पना सुचली..आणि तो लगेच शिरीष काकांकडे गेला..
"काका, तुम्हाला काकू बोलावत आहेत?" कार्तिक

"का? रे.. मी तर सगळं आवरून चहा नाष्टा करून आलो आहे.. मग कशाला बोलावत आहे?" शिरिष काका

"काय माहित? तुम्हीच जाऊन बघा.." कार्तिक

"हं..." म्हणून शिरीष काका तिथेच बसले.. कार्तिकला उशीर होत होता.. "आता काय करायचे?" असा विचार करत तो परत तिथेच उभा राहिला.. पण काका जायच नावच घेईनात..

"हा काकू.. अहो काका काकू बोलावत आहेत बघा.. जा पटकन नाहीतर ओरडतील हं तुम्हाला.." कार्तिक

"अरे, पण मला ऐकूच आले नाही तिने हाक मारलेली.. तुला कसे ऐकू आले.." शिरीष काका

" काका, जा.. नाहीतर काकू ओरडतील हं.. जाऊन तरी बघा.. मला तर हाक ऐकू आली बघा.. काय जायचं नसेल तर नका जाऊ मग.. माझं काय?" कार्तिक

"बरं बाबा जातो.. मला हाक ऐकू आली नसेल तर.. नंतर आणि उगाच ओरडत बसायची.. चल मी जातो.." असे म्हणून शिरीष काका हातातील पेपर तसाच घेऊन आत जाऊ लागले..

"काका, पेपर घेऊन कशाला घेऊन जाता.. पेपर इथेच ठेवून जा.. नंतर येऊन परत वाचा.." कार्तिक

"बरं.." म्हणून काकांनी पेपर तिथेच ठेवला आणि ते आत गेले.. कार्तिक लगेच अधाशासारखा पेपर घेऊन एक एक पान भरभर करून पलटू लागला.. पण त्याला आज पेपर मध्ये त्याच्या आवडीचा लेख कुठेच दिसला नाही.. कार्तिक थोडा नाराज झाला आणि परत परत पेपर पलटू लागला.. चार-पाच वेळा बघितले तरीसुद्धा त्याच्या आवडीचा लेख त्याला दिसला नाही..

"ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला.. तो लेख शेवटी आज पेपरमध्ये आलाच नाही.." कार्तिक मनातच बडबडून निघून गेला..

नंतर तो त्याचे सगळे आवरून ऑफिसला जायची तयारी करू लागला.. आवरल्यानंतर तो डबा घेऊन ऑफिसला गेला.. ऑफिसमध्ये देखील त्याचे मन कशातच लागत नव्हते.. तो त्याच्या आवडीचा लेख वाचला की, त्याचा दिवस चांगला जायचा.. पण आज त्याच्या आवडीचा लेखच आला नाही.. त्यामुळे तो मनातच विचार करत होता.. "आज का लेख आला नसेल? परीला काही झालं असेल का? की कोणतं महत्वाचं काम असेल? की तिच्या आयुष्यात कोणी आलं असेल?" असे एक ना अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते..

थोड्यावेळाने शरयू तेथे प्रोजेक्ट करण्यासाठी आली.. दोघांनी मिळून बनवायला प्रोजेक्ट सुरू केला.. पण कार्तिक थोडा नाराजच होता..
"काय झालं कार्तिक? आज तू नेहमीसारखा दिसत नाहीस.." शरयू

"काही नाही.. मी व्यवस्थितच आहे.." कार्तिक

"नाही.. काय झालंय सांग? मैत्रीण समजतोस मला.. आणि मनातलं लपवून ठेवतोस होय.. धिस इज नॉट फेयर.. सांग लवकर.." शरयू

"अगं, तसे काहीच नाही म्हणालो ना मी.." कार्तिक

"खोटं.. तुझा चेहराच स्पष्ट सांगतोय.." शरयू

"अग, काही नाही.. मला रोज प्रेम हे हा एक लेख वाचायची जणू सवयच लागली आहे.. जर मी तो लेख वाचलो नाही तर मला करमतच नाही बघ.. आणि आज तो लेखच छापून आला नाही.. त्यामुळे थोडासा नाराज झालोय.. बाकी काही नाही.." कार्तिक

"अरेच्चा, काल लिहायला जमलंच नाही.. खूप काम होतं ना.." शरयू

"म्हणजे?? तुला काय माहित??" कार्तिक

"अरे, मी अंदाज बांधला.. कदाचित तिला काम असेल महत्त्वाचं.. म्हणून लिहायला जमलं नसेल.. मला सुद्धा तो लेख खूप आवडतो मी सुद्धा म्हणून रोज न चुकता वाचते.." शरयू

"अरे वा! तू देखील परीची फॅन आहेस.. मला सुद्धा परी खूप आवडते.. एकदा तिला भेटायला हवं.. पण काही केल्या ती भेटतच नाही.." कार्तिक

"हो का? मला पण आवडते परी.." शरयू

"बर चल आपण प्रोजेक्ट बनवायला सुरू करूया.. आज प्रोजेक्ट पूर्ण करून द्यायचा आहे वेळ झाला तर सर ओरडतील.." कार्तिक

"हो चल.." म्हणून दोघेही प्रोजेक्ट बनवायला लागले.. वेळेत प्रोजेक्ट झाला.. प्रोजेक्ट करताना दोघेही एकदाही जागेवरून उठले नाहीत.. डबा देखील आहे तिथेच बसूनच खाल्ला.. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर दोघांनी मिळून तो प्रोजेक्ट सरांना नेऊन दाखवला.. सरांना तो प्रोजेक्ट खूप आवडला त्यांनी प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन त्या दोघांनाच करायला सांगितले आणि त्या प्रोजेक्ट संदर्भात मिटिंगसाठी त्या दोघांना जायला सांगितले..

दुसऱ्या दिवशी या प्रोजेक्टसाठी मिटींग ठरवण्यात आली आणि तिथे कार्तिक आणि शरयुला जायचे होते.. परंतु प्रोजेक्ट दोघांनी बनवला तरी निम्मा निम्मा बनवला होता.. त्यामुळे दोघांना प्रोजेक्ट संदर्भात अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ हवा होता.. पण दुसऱ्या दिवशी मीटिंग असल्याने एक रात्रच त्या दोघांसाठी वेळ होता.. कारण अभ्यास करूनच मीटिंगसाठी त्यांना जायचे होते..

ऑफीस सुटल्यावर दोघेही घरी गेले.. कार्तिक त्याच्या सगळे आवरून जेवून त्याच्या रूममध्ये गेला.. त्याला प्रोजेक्टचा अभ्यास करायचा होता.. तसा त्याचा अभ्यास झाला होता पण प्रोजेक्ट एकदा नजरेखालून घालवायचा होता.. पण तो प्रोजेक्ट बघाला बसला आणि त्याच्या मनात शरयूविषयीचे विचार घोळू लागले..

शरयू किती चांगली आहे.. प्रत्येक कामात मदत करते.. आधी तर तिचा राग येत होता पण आता तिच्याविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाटत आहे.. हे मला नेमके काय होत आहे.. आधी परी झाली नंतर मनस्वी आणि आता शरयू.. प्रत्येक जणी मला का आवडत आहेत? याच्या आधी तर मला कोणी आवडत नव्हतं.. पण आता मला असे का वाटत आहे? कार्तिक रात्रभर याचाच विचार करत बसला होता..

वाचकहो.... तुम्हाला काय वाटतं? कार्तिकच नेमकं कोणासोबत खरं प्रेम असावं.. परी, मनस्वी की शरयू.. कमेंट मध्ये नक्की सांगा..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..