प्रेम एक अधुरे स्वप्न (भाग - ४)
✍️नम्रता जांभवडेकर
त्या प्रकारानंतर सावित्री खूप शांत राहायला लागली होती. विजया सुद्धा तिच्याशी खूप कमी बोलायची त्यामुळे स्वतःच मन ती कुठेच मोकळं करू शकत नव्हती.
अशातच फर्स्ट सेमीस्टर आलं आणि सावित्रीने बाकी सगळे विचार बाजूला ठेवून स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. ती अमरशीही जास्त बोलत नव्हती खरतर त्याने असं सगळ्यांसमोर तिच्यावर आवाज चढवून बोलल्यामुळे तिला राग आलेला.
फर्स्ट सेमीस्टरचा रिझल्ट लागला आणि ती पास झालेली. तोच रिझल्ट सांगण्यासाठी आनंदाने ती लायब्ररीत आली पण लायब्ररीत तो नव्हता. तिने ग्रंथपालाकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून कळलं, तो गेला आठवडाभर लायब्ररीत आलाच नव्हता. तसं तिला आठवलं. तिची परिक्षा सुद्धा आठवडाभर होती. त्यामुळे ते दोघेही आठवडाभर भेटले नव्हते आणि तो तिच्याशिवाय एकटा लायब्ररीत येणार नाही ह्याची तिला खात्री होती. तिने ग्राउंड, वॉशरूम सगळं चेक केलं, पण तो कुठेच नव्हता. तशी ती कॉलेजमधल्या फुटबॉल कॅम्पसमध्ये गेली. तिथेही तो नव्हता. तिथून निघतांना तिला अंकुश भेटला.
सावी, तू इथे काय करतेयस? फुटबॉल खेळून दमलेल्या अंकुशने पाणी पित विचारलं
अमर कुठे आहे गेला एक तास मी त्याला शोधतेय. तो कुठेच सापडत नाहीय मला सावित्री
सापडत नाहीय. अग तो इथे असेल तर सापडेल ना अंकुश
म्हणजे सावित्रीने गोंधळून विचारलं
एक मिनिट तुला काहीचं माहिती नाहीय का? अंकुश
काय माहिती नाहीय मला.. अंकुश काय झालंय. अमर.. ठिक आहे ना? सावित्रीच्या मनात भीतीची लहर उठली
हो, तो ठिक आहे. फक्त इथे नाहीय. गेल्या आठवड्यातच त्याने कॉलेज बदललं. अंकुशने माहिती पुरवली आणि सावित्री स्तब्धच झाली
कॉलेज बद.. बदललं म्हणजे? असं कसं तो सोडून जाऊ शकतो ह्या कॉलेजला आणि मलासुद्धा! आमचं प्रेम.. बोलता बोलता सावित्री शांत झाली. तिच्या ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता.
सावित्री, शांत हो. तुला काय वाटतं त्याचं तुझ्यावर प्रेम होतं. रोज कॉलेजला येण्यासाठी त्याला फक्त कारण हवं होतं जे तू बनलीस आणि आता त्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये अजून छान कारण मिळालं असेल म्हणून तो तिकडे.. बोलता बोलता अंकुश मोठमोठ्याने हसू लागला
ए.. काय बोलतोयस तू कळतय का तुला माझा अमर असा नाहीय सावित्री मोठ्याने ओरडली
तुझा अमर कसा आहे हे तुझ्यापेक्षा जास्त मला माहितीये आणि हा आवाज अमरवर चढवायचा माझ्यावर नाही. अंकुश रागाने म्हणाला
तशी सावित्री तिथून रडतच बाहेर पडून लायब्ररीमध्ये आली आणि बाकावर डोक ठेवून रडू लागली. सावित्रीच्या अश्या रडण्याने तिच्याच काही अंतरावर बसलेल्या विजयाच्या मनात चलबिचल सुरू झाली. तिला सावित्रीच रडणही बघवत नव्हतं आणि सावित्रीचा रागही आलेला, पण काही क्षणातच त्या रागावर त्यांच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीने मात केली आणि विजया तिला सावरण्यासाठी पुढे आली.
सावी.. विजयाने सावित्रीच्या खांद्यावर हात ठेवला तसं रडणाऱ्या सावित्रीने मान वर करून पाहिलं आणि समोर विजयाला पाहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटून ती रडू लागली. काही क्षण असेच गेले.
सावी काय झालंय? विजयाने तिच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं
विजू.. अमर.. अमर हे कॉलेज आणि मला सोडून गेला ग. असं म्हणत सावित्रीने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला
सावी तू रडू नकोस. आपण त्याचा शोध घेऊया. विजयाला हे सगळं असं होणार हे आधीपासूनच माहिती होतं, पण सावित्रीच्या समाधानासाठी ती अमरचा शोध घ्यायला तयार होते.
सावित्री आणि विजयाने आधी ग्रंथालयात चौकशी केली तिथून त्याचा फोन नंबर मिळाला जो अस्तित्वात नाही असं दर्शवत होता. सावित्री आणि विजयाने अंकुश मार्फत अमरच्या घराचा पत्ता मिळवला अन् त्या पत्त्यावर जाऊन पोहोचल्या पण तिथे घराला कुलूप होतं आणि आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं तो आठवड्या भरापूर्वीच कुटुंबीयांसह हे घर आणि शहर सोडून गेला. तरीही सावित्रीने आपले प्रयत्न सुरूच ठेवले पण प्रत्येक वेळी तिच्या हाती निराशाच पडत गेली.
ह्यात तिच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला. ती लायब्ररीत गेली त्यांचा बाक तिला खुणावत होता. अमर सोबत घालवलेले क्षण तिला आठवायचे. ज्याचा त्रास तिला व्हायचा. त्यामुळे तिने तृतीय वर्षाची परीक्षा बाहेरून द्यायची ठरवली आणि घरीच अभ्यास करू लागली. ह्यात विजयाची तिला पुरेपर साथ मिळाली. जसे की, नोट्स पुरवणे, अभ्यासक्रम शिकवणे.
बाहेरून परिक्षा देतं असल्यामुळे घरातली कामं आणि अभ्यासा व्यतिरिक्त बराचसा मोकळा वेळ तिला मिळायचा. त्या वेळेचा सदुपयोग करण्याचा तिने ठरवला आणि नोकरी शोधू लागली, पण त्यातही तिला यश मिळाले नाही.
तृतीय वर्षाची परीक्षा तिने तिच्याच कॉलेजमधून दिली आणि निकालाच्या दिवशी प्रिंसिपल सरांनी बोलवून तिचा इंटरव्ह्यू घेतला आणि ग्रंथपाल ही नोकरी तिला बहाल केली. ह्यादरम्यान तिला लग्नासाठी स्थळ येतं होती, पण एका घटनेने तिचं मन आणि आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं. कोणावरही पटकन विश्वास ठेवायला तिचं मन धजत नव्हतं. त्यामुळे तिने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्यामुळे घरात कोणाला त्रास नको म्हणून दुसरीकडे घर घेऊन राहू लागली.
वर्तमान काळ...
विचार असतानाच ब्रेकच्या आवाजाने सावित्री भानावर आली आणि समोर पाहिलं तर तिचं घर आलं होतं. तसं तिने रडून कोरड्या झालेल्या डोळ्यांवरून हात फिरवला.
नको जास्त विचार करूस. विजया तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली
विजू मनात एकच विचार येतो ग, त्यादिवशी त्या मुलाशी मी बोललेल्याचा अमरला एवढा राग आला की, तो मला कायमच सोडून गेला. ज्याच्यासाठी मी तुझ्याशी माझ्या जिवलग मैत्रिणीशी भांडले. तो माझ्याशी अस वागला. सावित्री खिडकीबाहेर बघत अश्रू लपवते, ते आठवून विजयाचे सुद्धा डोळे पाणावले
असो, माझं सुरूच राहील. आता मी जाते आणि उद्या भेटूच.. सावित्री गाडीतून उतरत पुढे काही बोलणार तेवढ्यात,
चहाच्या टपरीवर विजया हसून बोलली आणि गाडी सुरू करून निघून गेली.
तसं सावित्रीने एक नजर आपल्या घराकडे पाहिलं आणि दिर्घ श्वास घेत घराकडे वळली. घरात येताच तिने साडी बदलली दुसरीकडे आल्याचा चहा बनवला आणि चहाचा कप घेऊन सोफ्यावर येऊन बसली.
तिला रोजनिशी लिहायची सवय होती. तिने आज कॉलेजमध्ये घडलेला सकाळचा प्रकार जसाच्या तसा डायरीत लिहून काढला. जणू तो लिहिताना तिला भूतकाळाची पुनरावृत्ती होत होती.
खरचं माझी काय चूक झाली ज्याची तू मला एवढी मोठी शिक्षा केलीस. माझ्या मनात अजूनही आशा आहे, तू कधीतरी येशील आणि नेहमीसारखीच सावी अशी हाक मारशील आणि अलगद माझ्या खांद्यावर हात ठेवशील आणि मी नेहमीप्रमाणे घाबरून आजूबाजूला पाहीन. येशील ना मी वाट पाहतेय.
गेलास सोडूनी अचानक
काय मजकडून घडला गुन्हा
आतुरले हे नयन पाहण्या तुला
येशील ना तू परतूनी पुन्हा?!
काय मजकडून घडला गुन्हा
आतुरले हे नयन पाहण्या तुला
येशील ना तू परतूनी पुन्हा?!
समाप्त_
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा