प्रेम एक अधुर स्वप्न (भाग - ३)
✍️नम्रता जांभवडेकर
सावी तुझ्यात आणि त्या अमरमध्ये मैत्री झाली. पुस्तकांची देवाणघेवाण सुद्धा झाली आणि तुला मला एका शब्दानेही सांगावं वाटलं नाही. त्या अमरच्या मित्राकडून अंकुश कडून मला समजलं. काल एक दिवस मी कॉलेजमध्ये आले नाही तर एवढ सगळं झालं आणि तू तर म्हणालेलीस मी माझी सगळी इस्टेट देईन पण पुस्तक कोणालाच देणार नाही. मग हे काय आहे? विजया चिडून म्हणाली
विजू.. चिडतेस काय ग. अग काल तू कॉलेजमध्ये आली नव्हतीस त्यामुळे मला करमत नव्हतं. सावित्री तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला लाडीगोडी लावत बोलली
सावी मस्का मारणं बंद कर आणि मूळ मुद्द्यावर ये. विजया तिचा हात खाली घेत म्हणाली
काल नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यावर मी लायब्ररीमध्ये गेलेले तेव्हा.. असं म्हणत सावित्रीने तिला सगळा प्रकार सांगितला
पण अंकुश मला म्हणाला, तुम्ही दोघंही लायब्ररीत एकत्र बसला होतात म्हणून विजया
तो तुला काहीही सांगेल पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना.. सावित्री
मला माफ कर. माझ्या मनात अमर विषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. मला वाटलं माझी जागा तो घेईल की काय म्हणून मी जरा जास्तच बोलले विजया नाराजीने बोलली
माझ्या आयुष्यातली तुझी जागा कधीचं कोणीच घेऊ शकत नाही. मी घेऊ देणार नाही सावित्रीने तिला आश्वस्त केले. तसं विजयाने तिला मिठी मारली.
हळूहळू दिवस सरत होते. अमर आणि सावित्रीची मैत्री दिवसेंदिवस अधिक फुलत होती. साध्या राहणी मानामुळे एकही मित्र नसणाऱ्या सावित्रीला अमरची मैत्री आवडू लागलेली. आता लायब्ररी व्यतिरिक्त त्यांची भेट कॅन्टीन आणि कॉलेजच्या ग्राउंडवर होऊ लागलेली. पुस्तकांच्या देवाणघेवाणा व्यतिरिक्त आता वेगवेगळ्या विषयांवर तासंतास चर्चा चालायच्या. एकमेकांच्या घरच्यांविषयी जाणून घ्यायला दोघेही उत्सुक असायचे, पण ह्या सगळ्यांत दोघांनीही अभ्यासाला नेहमीचं प्राधान्य दिलं होतं. हे सगळं विजया पाहत होती पण सावित्रीचे बोल आठवून ती शांत राहायची आणि स्वत:च्या मनाला समजवायची.
आज सावित्री कॉलेजमध्ये आल्या आल्या बाथरूमला जाते सांगून निघून गेली. इथे सगळे लेक्चर्स झाले तरी सावित्री आली नव्हती. तिला बघण्यासाठी विजया बाथरूममध्ये गेली पण तिथे सावित्री नव्हती. तिने ग्राउंडवर पाहिलं. तर तिथेही सावित्री नव्हती.
सावित्रीला शोधतेस? ती इथे नाही सापडणार तुला. तिच्या आवडत्या जागी जाऊन शोध. मित्रांसोबत बसलेला अंकुश बोलला
तसं तिला आठवलं लायब्ररी! विजया तिला शोधत लायब्ररीमध्ये गेली. कॉलेज सुटल्यामुळे लायब्ररीमध्ये फारशी वर्दळ नव्हती. ती सगळीकडे पाहत होती, पण सावित्री तिला कुठेच दिसत नव्हती. ती निराश मनाने तिथून निघणार तेवढ्यात, तिला दोन माणसांच्या लहान स्वरात बोलण्याचा आवाज ऐकू आला. तशी ती त्या आवाजाच्या दिशेने गेली आणि समोरचं दृश्य पाहताच आश्चर्यचकित झाली.
समोर सावित्री आणि अमर खाली बसून एकमेकांच्या हातात हात घालून पुस्तक घेऊन बसले होते. सावित्रीने त्याच्या खांद्यावर निश्चिंतपणे डोकं ठेवलं होतं.
सावी.. हा काय प्रकार आहे? विजयाने मोठ्या आवाजात विचारलं
समोर विजयाला पाहताच सावित्री अमर पासून लांब झाली.
विजू.. तू इथे काय करतेयस? आणि थोडं हळू आवाजात बोल आपण लायब्ररीमध्ये आहोत सावित्री आजूबाजूला बघत म्हणाली
ओह.. म्हणजे आपण लायब्ररीत आहोत हे तुम्हाला माहितीये तर.. तू बाथरूमला गेलेलीस ना मग इथे काय करतेयस? विजयाने जाब विचारण्याच्या सुरात विचारलं
ते.. मी सावित्रीला काय बोलावं ते सुचेना
ती बाथरूमला गेलेली तेव्हा येताना आमची भेट झाली आणि मीच म्हणालो तिला. मला जरा अस्वस्थ वाटतंय तर लायब्ररीमध्ये जाऊया. म्हणून आलो इथे. सावित्री
मग गेला का अस्वस्थपणा विजयाने भुवई उंचावत विचारलं
तो तर सावीला पाहताक्षणी निघून गेलेला अमर सावीकडे पाहत बोलला, तसं सावीने लाजून नजर खाली घेतली.
सावी, त्याला लेक्चर्स असतील नसतील मला माहिती नाही पण आपल्याला तर लेक्चर्स होते आणि आज सरांनी महत्वाच्या नोट्स सुद्धा दिल्यात. त्या नोट्स मी तुला देऊ शकते पण त्यांनी तोंडी सांगितलेलं तर मी कुठे रेकॉर्ड करू शकत नाही ना. त्यासाठी प्रत्यक्षात तूच हवीस, पण तू इथे टाईमपास करत बसलेलीस. विजया
विजया.. सावित्री थोड मोठ्या आवाजात बोलते ज्याने एक क्षण विजया दचकते
काय बोलतेयस तू.. आमच्या नात्याला टाईमपास बोलू नकोस. मुळात तू इथे का आलीस? कॉलेज सुटल्यावर जायचं होतं ना घरी. मी आले असते माझी.. माझी.. सावित्री चिडत म्हणाली
तसे विजयाचे डोळे पाणावले
सावी मी इथे तुझ्यासाठी.. विजया अडखळत बोलली
हो ना मग माझ्यासाठी अमर सुद्धा महत्वाचा आहे जितकी तू आहेस. त्यामुळे ह्यापुढे त्याला काही बोलायचं नाही. सावित्री एक नजर अमरकडे बघत विजयाला बोलली
आय एम सॉरी. मला माहिती नव्हतं. तुला जितका वेळ थांबायचा असेल तेवढं थांब. माझी हरकत नाही. विजया डोळे पुसत जायला वळणार तेवढ्यात,
सॉरी मला नाही तर अमरला बोल. सावित्री बोलली तसं विजयाने एक नजर थक्क होऊन सावित्रीकडे बघितलं आणि अमरकडे बघू लागली.
सावी.. अग सॉरीची काहीचं गरज नाहीय अमर
मला आहे.. सावित्री
विजया म्हणतेयस ना सॉरी! सावित्री म्हणाली
तसं विजयाने अमरकडे बघत नजर खाली घेतं त्याची माफी मागितली आणि पाण्याने भरलेले डोळे पुसतच तिथून निघून गेली.
सावी तू विजयाला माझी माफी मागायला का सांगितलीस. त्याची काहीचं गरज नव्हती. अमर
गरज होती अमर. मला नाही आवडणार तुला असं कोणी बोललेल. अर्थात मला वाईट वाटलंय तिला असं बोलल्याच पण मी समजावेन तिला सावित्री म्हणाली तसं अमरने तिला मिठीत घेतलं तशी सावित्री घाबरून आजूबाजूला बघू लागली.
अमर आणि सावित्रीच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होऊ लागलं होतं. दोघेही नजरेनेच एकमेकांशी संवाद साधायचे. विजयाला सार कळत होतं पण ती काही न बोलता शांत राहायची.
अशातच एके दिवशी कॉलेज सुटल्यानंतर सावित्री लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत बसलेली असताना एक मुलगा तिच्याजवळ अभ्यासा संदर्भात बोलायला आला. ते दोघं बोलत असताना तिथे अमर आला.
सावित्री.. अमर मोठ्याने ओरडला.
अमर काय झालं? सावित्रीने घाबरून विचारलं
लायब्ररीत उपस्थित असलेले सगळे दोघांकडे बघू लागले
काय झालं? हे तू मलाच विचारतेस! इथे मी तुला पूर्ण कॉलेज शोधतोय आणि तू ह्या मुलासोबत इथे काय करतेस? अमरने सरळ जाऊन त्या मुलाची कॉलर पकडली
अमर सोड त्याला. अरे ह्याला अभ्यासात अडचण येतं होती म्हणून मी त्याला फक्त मदत करत होते सावित्री अमरपासून त्या मुलाला सोडवत बोलली, तसा तो मुलगा घाबरून निघून गेला.
तू काय मक्ता घेतलाय का सगळ्यांची मदत करण्याचा. अमर तिच्या अंगावर ओरडला, त्याच्या ओरडण्याने सावित्री दचकली
हे बघ, सावी मी तुला शेवटचं सांगतोय. जी काही मदत करायचीय. ती मला कर, पण तू माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या मुलांसोबत बोललेली मला आवडणार नाही. कळलं? अमरने भुवई उंचावत विचारलं, तशी सावित्रीने भांबावून होकारार्थी मान हलवली. तसा अमर तिथून निघून गेला.
सावित्री मात्र अमरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. अमरच हे रूप ती पहिल्यांदा पाहत होती.
क्रमशः
(त्यांचं नातं पुढे काय वळण घेईल? वाचूया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा