Login

प्रेम एक अधुरे स्वप्न (भाग - २)

अधुरे स्वप्न
प्रेम एक अधूरे स्वप्न (भाग - २)

✍️नम्रता जांभवडेकर

भूतकाळ.. (काळ - १९७२)

सावि.. अग कॉलेजच्या पहिल्याच दिवशी पुस्तक परत करायला कोण येतं लायब्ररीमध्ये? अजून अख्खं वर्ष पडलंय. चलना उद्या येऊया. विजया जबरदस्तीने लायब्ररीचा जिना चढत बोलत होती. सावित्रीने तिचा हात पकडून ओढत तिला घेऊन जातं होती.

अजिबात नाही हा. ग्रंथपाल सरांची रितसर परवानगी घेऊन ह्या पुस्तकाची जबाबदारी मी घेतली होती आणि दोन महिन्यांसाठी पुस्तक कोण कोणाला देतं? सरांनी एवढ्या विश्वासाने माझ्याकडे पुस्तक दिलं होतं मग ते त्यांना परत करायला नको! आणि मला ह्या पुस्तकाचा दुसरा भाग सुद्धा घ्यायचाय सावित्रीने डोळे मिचकावले. तसा विजयाने डोक्याला हात मारून घेतला.

अच्छा म्हणून तू एवढी घाई करत होतीस का? पहिल्याच दिवशी लायब्ररीत जायची विजया

तशी सावित्री तिच्याकडे बघून निरागसपणे हसते

दोघीही लायब्ररीमध्ये येतात. सावित्री आत लायब्ररीमध्ये जाते, तर विजया थकली असल्याने बाहेरचं बाकावर काहीवेळ बसते.

सर.. हे घ्या तुम्ही एप्रिल महिन्याच्या १५ तारखेला मला वाचायला दिलेलं पुस्तक सावित्रीने पुस्तक लायब्ररीयन समोर धरलं

मला खात्री होतीच! तू पहिल्याच दिवशी येऊन पुस्तक परत करणार. लायब्ररीअनने त्यांच्याकडे असलेल्या तिच्या लायब्ररी कार्डवर रिटर्न बुकच्या रकान्यात आजची तारीख लिहिली आणि शिक्का मारून लायब्ररी कार्ड तिच्या हातात दिलं आणि पुस्तक घेतलं.

ह्या पुस्तकाचा दुसरा भाग मिळेल ना? सावित्रीने एक नजर पुस्तकांच्या रखाण्यात फिरवत विचारलं

हो मिळेल ना, मगाशीच एका तृतीय वर्षातल्या मुलाने वाचून परत आणलय. त्या बाजूच्या रखाण्यात ठेवलंय लायब्ररीयन बोलले तसं सावित्री पुस्तक बघण्यासाठी त्या बाजूला जाऊन पुस्तक शोधू लागली. कॉलेजचा पहिलाच दिवस असल्याने लायब्ररीमध्ये फारशी वर्दळ नव्हती.

साधारण दहा मिनिट शोधल्यानंतर सावित्रीला पुस्तक सापडलं तसं तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल पण त्याचवेळी दुसरीकडून एक मुलगा आला आणि तो  पुस्तक घ्यायला जाईल ह्या भीतीने धावत जाऊन तिने पुस्तक पकडलं पण ह्या सगळ्या नादात खालच्या फरशीवरून तिचा पाय घसरला आणि ती पडणार तेवढ्यात, त्या मुलाने तिला सावरलं. पडण्याच्या भीतीने सावित्रीने डोळे बंद केलेले.

तो मुलगा सुद्धा एक नजर सावित्रीकडे बघतच राहिला. पंजाबी ड्रेस घातलेली डोळ्यांवर फ्रेमचा चष्मा असणारी सावित्री त्याला पहिल्याच नजरेत आवडलेली.

मी अजून पडले कशी नाही ह्या विचारातच तिने डोळे उघडले तर ती त्या मुलाच्या बाहुपाशात होती. सावित्रीने एक नजर त्या मुलाकडे पाहिलं. लायनिंगचा शर्ट घातलेला आणि खाली राखाडी रंगाची पँट घातलेली.

अह्ममम.. सावी.. पुस्तक सापडलं असेल तर निघायचं का? सावीला शोधत आलेली विजया विचारते

तशी सावित्री भानावर येतं त्या मुलाच्या बाहुपाशातून बाजूला होते

तुम्ही ठिक आहात ना? तो मुलगा विचारतो

मी हे पुस्तक तुम्हाला देणार. मी पहिलं घेतलय हे पुस्तक ती पुस्तक हातात घट्ट धरत म्हणाली

काय? काहीसा हसत तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी हे पुस्तक घ्यायला नव्हतो आलो तर ह्याचं पुस्तकाचा तिसरा भाग शोधत होतो. हे पुस्तक गेला महिनाभर मी वाचलय खूप छान आहे तुम्हालाही आवडेल. तो मुलगा म्हणाला

ते आम्ही वाचल्यावर ठरवू. विजया हाताची घडी घालून म्हणाली आणि सावित्रीला घेऊन जाऊ लागली. तसं सावित्रीने वळून एक नजर त्या मुलाकडे पाहिलं जो तिच्याकडेच बघत होता.

अमर.. मिळाला का तुला ह्या पुस्तकाचा तिसरा भाग त्या मुलाच्या मित्राने त्याला आवाज देऊन विचारलं. त्यावर त्याने होकारार्थी मान हलवली आणि निघून गेला.

काय ग तू त्याने तुला विचारलं तू ठिक आहेस का? आणि तू काय म्हणालीस मी तुम्हाला हे पुस्तक देणार नाही आणि ते पुस्तक घ्यायला एवढ धावायची काय गरज होती. तो काय पळवून नेणार होता का ते पुस्तक? किती तो हावरटपणा विजया

आता मला काय माहिती ते पुस्तक त्याचं वाचून झालय ते आणि हो आहे मी हावरट पुस्तकांच्या बाबतीत. माझी इस्टेट कोणी मागितली ना मी स्वखुशीने देईन पण पुस्तक नाही आणि दिलीच तर परत करण्याच्या बोलीवर देईन सावित्री म्हणाली

तसा विजयाने कपाळाला हात मारला.

आज विजयाला बर नसल्यामुळे ती कॉलेजला आली नव्हती. त्यामुळे सावित्रीला एकटीला करमत नव्हतं. कॉलेज सुटल. तसं थोडावेळ वाचत बसावं म्हणून ती लायब्ररीमध्ये आली. नेहमीप्रमाणे आजही लायब्ररीमध्ये तुडूंब गर्दी होती. सगळे बाक विद्यार्थ्यांनी भरून गेलेले. तशी सवित्री तिथून नाराजीने बाहेर पडणार तेवढ्यात,
एक हात उंचावला. तिने पाहिलं तर तो हात त्याचं मुलाचा होता ज्याने तिला पडण्यापासून सावरलेलं. त्याने तिला त्याच्या बाजूची एक जागा खाली होती तिथे बसण्यासाठी बोलवलं. तिने एक नजर आजूबाजूला पाहिलं. सगळेजण वाचण्यात मग्न होते.

काय करायचं सावी. एकतर तुला वाचल्याशिवाय राहवत नाही आणि लायब्ररी इतकी शांतता दुसरीकडे कुठे मिळणारही नाही, पण मी त्याच्या बाजूला बसले आणि त्याने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तर. तर तू बोलू नको तू आपल वाचनाचं काम कर. सावित्री मनाशीच बोलली आणि एक दिर्घ श्वास घेत थोडचालतं जाऊन त्याच्या बाजूला बसली. तिला समोरून येताना पाहताच तोही थोडा सरकला.

ती आधी थोडी अवघडून बसली आणि पर्समधून पुस्तक काढून वाचू लागली, पण नकळतपणे तिचं लक्ष त्याच्याकडे जातं होतं. तो मात्र स्वतःच पुस्तक वाचण्यात मग्न होता. घसा कोरडा पडल्याने तिने थोडसं पाणी पिऊन घेतलं. कालच्या गैरसमजाबद्दल सावित्रीला त्याची माफी मागायची होती.

हम्म.. तुम्ही त्यादिवशी मला पडण्यापासून वाचवलं त्यासाठी आभार! आणि तुम्ही ते पुस्तक घेतं आहात हा माझा गैरसमज झाला त्यासाठी माफ करा. सावित्रीने दिलगिरी व्यक्त केली

तुम्ही माफी मागू नका. तुमच्याजागी मी असतो तर मीही असाच वागलो असतो पण ज्याप्रकारे तुम्ही धावत येऊन ते पुस्तक हातात घेतलं त्यावरून तुम्ही ऑलिंपिकमध्ये असायला हवं. तो हसत बोलला, त्याच्या बोलण्यावर तीही हसली अन् तो तिच्या गालावर पडलेली खळी पाहण्यात हरवला.

तू सुद्धा माझ्यासारखी वाचनवेडी आहेस तर! मग ह्या वाचन वेड्या दोन जीवांची मैत्री सुद्धा होऊ शकते ना. मी अमर त्याने मैत्रीसाठी हात पुढे केला.

तसं तिने एक नजर त्याच्या हाताकडे आणि एक नजर त्याच्याकडे बघितलं

मी सावित्री सावित्रीने काहीश्या लज्जतेने त्याच्या हातात हात मिळवला. त्याने हाताची पकड अधिक घट्ट केली आणि त्यांच्या मैत्रीचे बंध देखील हळूहळू घट्ट होत गेले.

क्रमशः

(ह्यांच्यात झालेल्या मैत्रीबद्दल विजयाला कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल? ह्यांचं नात कोणत वळण घेईल? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all