प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३६

कथा सोनियाची... तिच्या प्रीतीची!
प्रीती..पर्व दुसरे!
भाग - छत्तीस.

"राधाई, ही निकी, आणि निकी ही माझी राधाई. तू सुद्धा तिला याच नावाने हाक मारू शकतेस." तिच्या खोलीत शिफ्ट केल्यानंतर राधाईला भेटवत तिने दोघींची ओळख करून दिली.

"राधाई, तुमच्या हातचं जेवण खूपच चविष्ट असतं." राधामावशीकडे स्मित करून निकी म्हणाली.

"आवडले ना तुला? आता रोज तुझ्या आवडीचे जेवण करून तुला खाऊ घालत जाईन. लवकर बरे होऊन आपल्या पायावर उभे व्हायचे आहे ना तुला?" राधामावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. निकीने मान हलवून होकार दिला. आज पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

"अरे, तुला रडायलाही येतं?" प्रीतीने मिश्किलपणे विचारले.

"निकी कधी रडत नसते. आत्ता माझ्या आईची आठवण झाली म्हणून थोडी भावुक झालेय, बस्स." डोळ्यातील पाणी हलकेच टिपून निकी उत्तरली.

"बस्स, एवढंच ना. हा घे मोबाईल आणि तुझ्या आईला कॉल कर." हातातील मोबाईल तिच्यासमोर धरत प्रीती.

"ऊहूं. मी यावेळी घरातून सिरीयसली पळून आलेय. तेव्हा मी नाही कॉल करणार." निकी.

"यावेळी म्हणजे? अशी कितीदा तू घरातून पळ काढला आहेस?" प्रीती आश्चर्याने.

"बऱ्याचदा." ती अगदीच निरागस चेहऱ्याने म्हणाली. तिचे बोलणे ऐकून प्रीती मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होती.

"मिन्स नॉट द्याट वे. म्हणजे मला राग आला, मनासारखं झालं नाही तर मी घरातून निघून जाते. दोन दिवसांचा राग असेल तर फ्रेंड्सकडे आणि आठ दिवसांपर्यंतचा असेल तर मग हॉटेल्समध्ये माझा मुक्काम असतो."
ती डोळे मिचकावत म्हणाली.

"मग यावेळेचा राग किती दिवसांचा आहे?" हसून प्रीती.

"आयुष्यभराचा. मी त्यांच्यावर फार रागावले आहे. या खेपेला मला त्यांच्याकडे परत नाही जायचेय." ती नाक फुगवून म्हणाली.

"आता गप्पा थांबवा आणि निकी तू जेवण करून घे बघू." राधामावशी तिचे जेवणाचे ताट घेऊन येत म्हणाली.

"हो राधाई, नुसत्या सुगंधानेच माझी भूक चाळवली बरं. ए दी, तू पण जेवणा गं. रादर राधाई आपण तिघी इथेच सोबत जेवूया ना." एकदा प्रीतीकडे आणि मग राधामावशीकडे बघून ती म्हणाली.

"सॉरी निकी, मी ना माझ्या माईसोबत जेवते, आणि राधाईसुद्धा. तू जेव. तुला औषधं घ्यायची आहेत ना?" प्रीती.

"हूं. तुझ्या माई खूप बिझी असतात ना गं? खूप मोठया बिझनेसवूमन आहेत ना त्या."
प्रीतीने नुसती मान हलवली.

"त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो का? मला एकदाही भेटायला आल्या नाही." निकीची तक्रार.

"तुला तिला भेटायचे असेल तर तुलाच लवकर बरे होऊन तिच्याकडे जावे लागेल." प्रीती हलके हसून म्हणाली.

निकीला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. ती प्रश्नार्थक प्रीतीकडे बघत होती.
"जास्त विचार करू नकोस, जेव तू. तुला खूप भूक लागली होती ना?" तिच्या डोक्याला हलकेच टपली देत प्रीती.

"दी, तुला एक विचारू?" जेवताना ती बोलली.

"काय?"

"तुझ्या माईवर तुझे खूप प्रेम आहे ना?" निकी.

"हम्म. शी इज एव्हरीथिंग फॉर मी." प्रीती.

"किती मस्त बॉण्डिंग आहे ना तुमचं?"

तिच्या बोलण्यावर प्रीती हसली. "का तुझ्या आईसोबत तुझी अशी बॉण्डिंग नाहीये का?" तिने तिलाच उलट प्रश्न केला.

"मी माझ्या पेरेंट्सना खूप त्रास देते यार." तोंडाजवळ नेलेला घास निकीने खाली ठेवला.

"जेवणासोबत नो कंप्रमाईज हं. तुला हे पूर्ण संपवावेच लागेल नाहीतर राधाई ओरडेल तुझ्यावर. ती जितकी प्रेमळ तितकीच स्ट्रिक्ट आहे बरं." तिने खाली ठेवलेला घास तिला भरवत प्रीती म्हणाली.

"मी नर्सला पाठवते. ती तुझे आवरायला मदत करेल. आत्ता मला माईकडे गेले पाहिजे हं." निकीचे जेवण झाल्यावर प्रीती उठत म्हणाली.

सोनियाच्या दिमतीला नर्स घरात होतीच तीच आता निकीच्या प्राथमिक गोष्टी करण्यात मदत करत होती.


सोनियाच्या खोलीत येऊन राधामावशी आणि प्रीतीने जेवण केले. दिवसभरात घडलेल्या गोष्टींची उजळणीही केली. आत्तापर्यंत निकीबद्दल सांगून झाले होतेच. त्या बिचारीच्या मेंदूत या सगळ्या गोष्टी कुठपत शिरत होत्या हे दोघींनाही माहिती नव्हते, पण ती लवकर बरी व्हावी म्हणून त्यांचे हे प्रयत्न सुरूच होते.

"राधाई, तू अंथरुण नीट करून घे, मी निकीला एकदा भेटून आलेच." निकीच्या खोलीकडे जात प्रीती म्हणाली.
निकीने औषधं नीट घेतले की नाही हे बघून झाल्यावर तिने नर्सला निकीच्या खोलीत झोपायला सांगितले आणि मग ती सोनियाकडे गेली.

"सिस्टर, तुम्हाला माझ्यासाठी दी ने अपॉइंट केलंय का?" निकीने नर्सला विचारले.

"नाही, मी दोन महिन्यापासून मोठ्या मॅडमसाठी इथे आहे."
"म्हणजे?" निकीचा प्रश्न.

उत्तरादाखल तिने सोनियाच्या अपघाताची आणि तिच्या अवस्थेची हकीकत निकीला सांगितली. ते ऐकून निकीच्या डोळ्यात पाणी आले. स्वतः इतक्या दुःखात असूनही प्रीती तिच्या मदतीला धावून आली याबद्दल तिच्याविषयीचा अभिमान डोळ्यात दाटून आला आणि तिच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या तिच्या आईबाबांची आठवण झाली.

*******

"कृष्णा, सोशल मीडियावर तू फोटो टाकलेस त्याला आठवडा लोटलाय त्यावर अजून कुणाचा काही मेसेज आला नाही का रे?" प्रीती तिच्या केबिनमध्ये बसून कृष्णाशी मोबाईलवर बोलत होती.

"नाही, अजूनपर्यंत तर नाही आलाय. पण आपण होप सोडायला नको. कोणीतरी अशी व्यक्ती असेलच जी त्यांना या घडीला ओळखत असेल, ती व्यक्ती लवकरच भेटेल आपल्याला." कृष्णा.

"कृष्णा, किती रे आशावादी बोलतोस? तुझ्याशी बोलून मूड एकदम फ्रेश झाला."

"उम्मीद पे दुनिया चलती है मॅडम, त्यामुळे आशावादी राहायलाच हवे." तो हसून म्हणाला.
"बरं, ती वेडूली निकी बरी आहे ना आता? काही प्रोग्रेस?" त्याने प्रश्न केला.

"हो, ती बरी आहे आता."

" तिच्या फॅमिलीबद्दल काही कळले की नाही?" तो.

"खूप बोलघेवडी आहे रे ती. मात्र नेमका तो विषय सोडून इतरच बोलत असते. आता मीही तिच्या कलाने घ्यायचे ठरवलेय. तू बघ, काही दिवसात ती स्वतःच सगळं सांगते की नाही ते."

"इतक्या कमी दिवसात खूप ओळखायला लागलीस गं तिला." तो.

"हम्म. कधी कधी काही व्यक्ती आपल्या आयुष्याशी एकदम जुळून जातात नाही? मग त्यांच्या मनात काय आहे हे न सांगताही आपल्याला आपसूक कळायला लागतं. निकीशी माझं कसलं नातं नाहीये पण आता तिच्या मनात काय चाललंय ते मला लगेच कळतं." ती भरभरून बोलत होती.

"काही नाती अशीच असतात, ती थेट आपल्या हृदयाशी जुळलेली असतात. अशा वेळी काही बोलायची गरजच नसते. आपल्या हृदयाची स्पंदनच आपोआप दुसऱ्याच्या मनातील भाव कथन करायला लागतात." तो हळवे होत बोलत होता.

"किती छान बोलतोस कृष्णा तू. असं वाटतंय की मी कोल्हापूरला आहे. आपण रंकाळा तलाव बघायला गेलोय. अस्ताला गेलेल्या सूर्याच्या सानिध्यात आकाशात झालेली रंगाची उधळण आणि तुझ्या इतक्या सुंदर बोलण्यातून उधळलेले आनंदाचे रंग यांचा जणू मिलाफ होऊन नवीन रंगसंगती निर्माण झालीये." ती वाहवत मनाने तिथे पोहचली सुद्धा.

"आपण तिथे घालवलेले क्षण तुझ्या आठवणीत आहेत?" त्याने अलवारपणे विचारले.

'हो तर. कृष्णा ती सायंकाळ माझ्या आयुष्यातील संस्मरणीय अशी आहे. तुझ्यासमवेत घालवलेले प्रत्येक क्षण हृदयाच्या कुपीत जपून ठेवलेत. त्यांचा विसर मला कसा पडेल?' ती भावनिक झाली होती खरी, पण मनातले ओठावर येऊ न देण्याची कला तिला अवगत झाली होती.

"अरे, काय बोलत बसलोय. चल तुलाही कामं असतील नी इथला माझ्यादेखील व्याप खूप वाढलाय. नंतर बोलूया, बाय." त्याच्या 'बाय' म्हणण्यापूर्वी तिने कॉल कट करून टाकला.

'प्रीती, तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळतंय ना. माझ्या हृदयाची स्पंदन सांगतात की मला सगळं. पण तुझ्याकडून एकदा ऐकायचं होतं गं.'
मोबाईलमधील तिचा फोटो बघून तो स्वतःशी म्हणाला.

'उम्मीद पे दुनिया चलती है ऑफिसर. चला आपणही आशावादी राहूया.' त्याच्या ओठावर हलके स्मित आले.

**********
"नॉक नॉक..
मे आय कम इन?" केबिनच्या दारावरची ठकठक आणि मग दारात उभा असलेल्या समीरला बघून तिच्या गालावरची खळी एकदम खुलली.

"समीर? तुला आत यायची परमिशन केव्हापासून घ्यायला लागतेय?" ओठ रुंदावत तिने विचारले.

"अरे, एच आर मॅडमच्या परवानगीशिवाय आत पाऊल टाकायची कुणाची हिंमत आहे का?" तो मिश्किल हसत म्हणाला.

"ओहो, आज मुडमध्ये दिसतोस." ती हसून.

"कसला मूड गं? मूड पार गेलाय माझा."

"का रे?" आश्चर्याने ती. "आपली सगळी कामं तर व्यवस्थित सुरू आहेत, मग मूड जायला काय झालेय?"

"तुझ्यामुळे" तो.

"अरेच्चा! मी काय केलंय आता?" ती.

"अरेच्चा! मी काय केलंय आता?" तो तिची नक्कल करत म्हणाला. "काय केलं नाहीस ते सांग. इतक्यात सदानकदा दुर्मुखलेली असतेस. डोळे बघितलेस का तुझे? गोऱ्यापान चेहऱ्यावरचे तुझे निळेशार डोळे आणि त्याखाली आलेली काळी वर्तुळं.. सुट तरी होतं का गं ते तुला?"
तो गंभीर चेहरा करून म्हणाला तसे तिने बॅगेतून आरसा काढून चेहरा बघितला.

"सम्या, कुठे आहेत रे काळी वर्तुळं?" एकवार आरशात आणि मग त्याच्याकडे नजर टाकत तिने विचारले.

"तुझ्या चेहऱ्यावरच्या मेकअपखाली लपलेली आहेत." त्याचा चेहरा अजूनही गंभीर होता.

"समीर तू माझी खेचतो आहेस ना? मी कुठे मेकअप करते?"त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून ती म्हणाली तसा तो मोठ्याने हसायला लागला.

"काय रे घाबरवलंस ना मला?"तिने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. आता तीही त्याच्या हसण्यात सामिल झाली होती.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all