प्रीती... भाग - 14 (अंतिम )... पूर्वार्ध...!

Preeti... Last Part.

आपण वाचत आहात...

प्रेम..., तडजोड..., नात्यातील गुंतागुंत उलगडणारी कथामालिका.... प्रीती...!!


( मागील भागात आपण पाहिलंत... मोहनच्या आईचा अचानक ओढवलेला मृत्यू...!

अन त्याचवेळी सोनियाने दिलेला एका गोंडस बाळाचा जन्म...!

मनुष्याचा जन्म आणि मृत्युच तेवढं शाश्वत...!!

आता...

पुढे..... )

       *********************************





.....शालूच्या हातातील तिचा हात खाली निसटला...


" आत्या ss ..."


शालूनं हंबरडा फोडला...!


मोहनदेखील हमसून हमसून रडत होता..


.
.
.
.
.



"  क्याssवंss..... क्याssवंss..."


...ऑपेरेशन थिएटर मधून छोटया बाळाच्या रडण्याचा आवाज  राधामावशीच्या कानावर पडला...


तिचे मिटलेले डोळे खाडकन  उघडले...


हृदयाची स्पंदनं आणखी जोरात धडधडू लागली...

.

.
.
.
.


..... पंधरा - वीस मिनिटांनंतर नर्स तिच्यासमोर उभी होती..  कापडात गुंडाळलेल्या छोट्याश्या बाळाला घेऊन.


"... काकू..,

हे घ्या. पकडा तुमच्या नातीला.. "


बाळाला तिच्यापुढे पकडत नर्स म्हणाली..


" सोनिया...

सोनिया  कशी आहे सिस्टर...?? "


राधामावशीने घाबरतच प्रश्न केला..


" तिच्या पोटाला स्टीचेस मारताहेत डॉक्टर.. अर्ध्या पाऊण तासाने तिलाही इकडे शिफ्ट करू... "


- नर्स.


"... म्हणजे ठीक आहे ना ती..?? "


मावशीनं डोळे पुसत विचारलं.


" हो...!

बरी आहे ती. पुन्हा दोन तिन तास शुद्धीवर नाही येणार ती. तोवर बाळाला ह्या डब्यातल्या पावडरचं दूध करून पाजा...
पकडा ना...! "


येव्हाना बाळ चुळबुळ करायला लागलं होतं..



.. ती फक्त त्या बाळाकडे बघत होती.


"  काय बाई आहे..??

स्वतःच्या मुलीची तेवढी काळजी अन नात झाली तर तिला हातदेखील लावायला तयार नाही.. "


त्या रडणाऱ्या बाळाला तसेच बेडवर ठेऊन सिस्टर निघून गेली..

.

.


ती एकटक त्या रडणाऱ्या चिमण्या जीवाकडे पाहत होती..
त्याला हात लावायला तिचं मन धजेना...


...आजपर्यंत पांढऱ्या पायाची म्हणून तिच्याच कुटुंबियांनी तिची साथ सोडली होती..


चाळीतील पोटुशा बायका तिची नजर आपल्यावर पडू नये म्हणून स्वतःला जपत होती..


लहान लहान लेकरांच्या आया तिच्यापुढं यायला कचरत होती...


" ...अशी पांढऱ्या पायाची मी.. ह्या हाडामासाच्या नवजात गोळ्याला हात लावेल.... आणि त्याला काही झाले तर...??  "

 ह्या विचारानचं तिच्या काळजात चर्र झालं....


"... ये बाई...!

केव्हाचं ते लेकरू रडतंय..?

घे नं त्याले जवळ..
पोरगी झाली म्हणून राग आला काय तुला..


अवं...

पहिली बेटी धनाची पेटी रायते..


साक्षात लक्ष्मी आली तुया वाल्या घरी आनं तू कायले अशी उदास झाली ..??? "


तिच्या खांद्यावर हात ठेऊन शेजारची आजी  म्हणाली.


... राधामावशिनं अश्रू भरल्या नयनांनी बाळाकडं पाहिलं...

आणि मग मोठया हिमतीने तिनं त्या मऊसूत गोळ्याला हातात घेतलं.

भुकेने रडून रडून त्या चिमण्या जीवाचे आसू गालावर ओघळले होते.

तिच्याही डोळ्यातील एक थेंब त्यात मिसळला..


तिनं त्या बाळाला आपल्या छातीशी पकडलं..

चमच्याने पाजलेले दूध ती चिमणी गटागटा पीत होती.. तिची भूक शमली अन ती झोपीही गेली..


राधामावशीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेची लकेर उमटली...

.
.
.
.


".... राधामावशी ss ...


माझं बाळ...?? "


पोटावर हात लावून   सोनिया जराशी किंचाळली . . .


बेडवर शिफ्ट करून जवळपास दोन तास झाले होते.

हळूहळू तिला शुद्ध येत होती. आणि शुद्धीत आल्या आल्या पहिले तिनं प्रश्न केला..


राधामावशी हसली.. हलकेच.. गोड...


आपल्या हातातील तो इवलासा जीव तिनं तिच्या हातात दिला....


..... आणि.....


.
.
.


ती बघतच राहिली...


ती इवलीशी कळी...

अगदी तिचंच प्रतिरूप होती. गोरा वर्ण... कोरीव भुवया.. छोटंसं टोकदार नाक.. अन बारीकसे गुलाबी ओठ..

सोनियाच्या   स्पर्शाने त्या बाळाने आपले डोळे उघडले...


त्या निळ्याशार डोळ्यात हरवली ती काही क्षण...!

"..एवढं गोड पिल्लू कसं काय माझ्या पोटात राहत होतं..?? "

विचारकरून ती स्तिमित झाली..

तेवढ्यात भुकेने बाळ रडायला लागलं.. राधामावशीच्या आणि शेजारच्या आजीच्या मदतीने तिनं बाळाला दुधाला लावलं. दूध पिऊन बाळ तसंच झोपलं.. तिच्या छातीवर...



ति कृतार्थ झाली...!!

.

.
.
.
.
.
...... आज मोहनच्या आईला जाऊन तीन दिवस झाले होते...
तिसऱ्या दिवसाचा विधी करायला सर्व नदीकिनारी जमले...
त्याचे बाबा आणि मामा एकमेकांना हळूहळू सावरत होते. मोहनच्या डोळ्यातील पाणी अजूनही सुकले नव्हते...


आणि शालिनी....??


तीचं दुःख कोणाला सांगणार ती...???


नुकतेच लग्न झालेली  ती .. ..

पण नवरा तिचा नव्हताच मुळी..!


केवळ आत्या लवकर बरी व्हावी.. चिंतमुक्त व्हावी.. म्हणून तर मोहनसोबत लग्नाचा घाट तिने घातला होता.

स्वतःच्याच आयुष्यासोबत जुगाराचा डाव टाकला तिने आणि  त्या डावात सपशेल हरली ती..


लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आत्या सर्वांना सोडून निघून गेली..
आईसारखी तिची आत्या गेली.अन ती जणू पोरकीच झाली...


पण...


हे पोरकेपणही तिला नाहीच उपभोगता आलं....


घरातील साऱ्यांची जबाबदारी तिच्यावर आली होती...

सर्वांच्या मनाला सावरता सावरता ती स्वतःच्या दुःखावर साधी फुंकरही घालू नाही शकली...

.
.
.
.
..... पूजा झाली...

पिंडदानाचे ताट ठेवले होते...

कावळ्यांचा झुंड होता तिथेच.. पण एकही कावळा तिकडे फिरकेना...
बाबा , मामा काय काय बोलले...  कावळा बघतही नव्हता.


".... आई तूझ्या पूर्ण इच्छा पूर्ण करेन मी...."


रडतच मोहन म्हणाला..


तरी कावळा एकाच ठिकाणी....


.... शालिनी दुरून सारं बघत होती.

मनाशी काही निर्धार करून ती पुढे आली... तिनं मोहनचा हात पकडला होता.


" आत्या...
तूझ्या मोहनला सांभाळेन अगं मी..

त्याला कधीच अंतर देणार नाही... त्याच्या प्रत्येक निर्णयात साथ देईन मी...


वचन देते मी तुला....  "


ती  आपले डोळे पुसत म्हणाली.


... आणि काय आश्चर्य...??

क्षणार्धात त्या पिंडाला काकस्पर्श झाला...!!


एक छोटेसे फुलपाखरू तिच्या खांद्यावर बसले आणि उडून गेले...


"आत्या... "


तिला जणू भास झाला....!
.
.
कसं असतं ना...??


शेवटपर्यंत मोहनच्या आईला शालूची काळजी होती... पण शेवटच्या क्षणाला मात्र तिच्या मनात केवळ मोहनच होता...


शालूनं वचन दिलं... आणि तिचा जीव मुक्त झाला....!!


.
.
.
.
.
....  सोनियाने बाळाचं बारसं करण्याचं ठरवलं...

मोहनचा तर काही पत्ता नव्हता.. आजूबाजूच्याच बायकांना बोलावणं धाडलं..
तिच्या सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला चाळीतील बायका आल्या होत्या.. आताही येतील ही भोळी आशा होती तिला.


.... ह्या घडीला मात्र कोणीच आले नाही...!


कारण एकच.....राधामावशी...!!


पांढऱ्या पायाची राधामावशी सोनियाच्या घरात आली आणि त्यानंतर मोहन गेला तो अजूनपर्यंत  परतलाच नव्हता ...

सोनियाची प्रसूतीही तारखेच्या आधीच झाली...


एक ना दोन....

बायका आपापसात कुजबुज करायला लागल्या...


त्यामुळं साऱ्यांनी तिच्याकडे जाण्याचं टाळलं...

.

.


" ... राधामावशी....!


डोळ्यात पाणी नको ना आणू अगं..!!


तुला बाळ नाही झालं यात तुझा गं काय दोष..??
उलट तू माझ्या आयुष्यात येऊन किती मदत झाली मला..


मोहन गेला पण तू माझी आई झालीस अगं... आणि आता ह्या चिमणीची आज्जीदेखील झालीस...!


मावशी...


जग आता काहीही म्हणू दे.. पण आमच्या आयुष्यातील तुझं स्थान असंच राहील अबाधित ...


कायम...!! "


... तिच्या डोळ्यातील पाणी पुसत सोनिया म्हणाली.


"... तू आहेस ना आता माझी लेक .... आणि ही आहेच की चिमुरडी सोबतीला...! मग आता नाही रडणार मी..!!


तूझं जग तेच माझं आता...! तुला सोडून मी कुठेच जाणार नाही आता..! "


मावशीनं तिला एक घट्ट आलिंगन दिलं...

.
.
.
.
.
.
"... मोहन...!


इतका उदास नको ना रे राहू...!! बोलना काहीतरी... "


त्याच्या हातावर हात ठेवत शालिनी म्हणाली.


"... शालू... काय होऊन बसलं गं हे..!


आईसाठीच लग्न केलं ना गं आपण..? आणि तीच कशी काय सोडून जाऊ शकते गं मला..??


आज बारा दिवस झालेत तिला जाऊन... आणि माझ्या आयुष्याचेच बारा वाजलेत आता...


शालू... आपल्या आयुष्याचं गणित कसं बिघडून गेलं गं..??


कशी असेल माझी सोनिया...??? "


शून्यात बघत तो म्हणाला...



"... मोहन अजून काहीच नाही बिघडलं अरे..
तू जाऊन ये ना एकदा मुंबईला..
मी बघेल इथलं..!"


स्वतःला सावरत ती म्हणाली.


" ह्या अवस्थेत.. असा कसा जाऊ..??


एवढं सगळं सोप्प आहे का गं हे...??? "


- मोहन.


"... मोहन... तुला जे पटेल ते कर..


पण लक्षात ठेव... तूझ्या प्रत्येक निर्णयात मी कायम सोबत असेल तूझ्या...!! "


- शालिनी.


त्यानं एकवार तिच्याकडे पाहिलं.. आणि हसला... खिन्न..!


खरंच...

आयुष्याचं चुकलेलं गणित पुन्हा होईल का सुरळीत..??


.
.
.
.
.
.... पाळणा सजला होता...
झेंडूच्या फुलांच्या माळा खाली सोडल्या होत्या...
पाळण्याच्या वरती छोटुसं झुंबर फिरत होतं..
तिनं मऊशार सुती फ्रॉक बाळाला घालून दिलं.
मावशीनं बाळाला काळं तीट लावून दिलं..


ती नाजूकशी इवली परी.. काय गोड दिसत होती..


तिच्यावरून नजर हटतच नव्हती...


दोघींचीही...!!


दोघींचीही नजरानजर झाली...
आणि मग दोघीही हसल्या...


" आपलीच नजर लागायची आपल्या लेकीला..! "


सोनिया म्हणाली.


"... नाही गं बाळा....
आपल्याच प्रेमाच्या माणसाची नजर नाही लागायची हो आपल्या पिल्याला ...! "


मावशी हसून म्हणाली.
.
.
दोघीही थोडयाफार नटल्या होत्या... कित्येक दिवसानंतर...!


घरात दोघीच होत्या...
तरीही वातावरण आनंदी होते.. उत्साही होते..


"... अगं एवढी तयारी केलीय आपण...


पण बाळाचं नाव काय ठेवायचं ते ठरवलंय का...?? "


मावशी उत्साहाने विचारत होती.



"... हो अगं...!


जेव्हा मी जन्मले ना तेव्हा आप्पाना बिजनेस मध्ये खूप मोठा लाभ झाला....
पहिल्यांदा...!!


आप्पांनी मला हातात घेतलं आणि बोलले की लक्ष्मी आलीये आमच्या घरी....
सोन्याच्या पावलांनी...!!


आणि मग नाव ठेवलं सोनिया....! "


ती आपल्या विश्वात रमली....


"... हो... अगं..!
पण आत्ता आपण हिच्या नावाबद्दल बोलतोय.."


राधामावशी तिला हलकेच हलवत म्हणाली.


" हो मावशी...


पण आप्पानी सांगितलेली ही आठवण कायमची लक्षात आहे माझ्या...! "


डोळ्यातलं पाणी हलकेच खाली ओघळले तिच्या.



" सोनिया... "


" हो मावशी...
आज नाही रडायचे... माहित आहे मला..! "


अश्रू पुसून हलके हसत ती म्हणाली.


"... मग टाकायचे ना बाळाला पाळण्यात...?? "
मावशीनं विचारलं.


तिनं हसून होकारार्थी मान डोलावली.


" कुणी गोविंद घ्या.. "


" कुणी गोपाळ घ्या... "

दोघींनी मग आळीपाळीने बाळाला पाळण्याच्या खालून घेतले.
राधामावशीने बाळाला अलगद पाळण्यात टाकले..


सोनियाने हळूच बाळाच्या कानात नाव सांगितलं....



".... प्रीती...!! "


" मावशी...

ही  माझी लेक...  प्रीती..!

मोहन आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक...


..... माझी प्रीती....!!! "

ती म्हणाली...


" फक्त तुझीच नाही... माझी पण प्रीती..! "

राधामावशी म्हणाली.

"... आपली प्रीती...! "

दोघी एका सुरात म्हणाल्या....

त्यांच्या हसण्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होते...

पहिल्यांदा...!!

पाळण्यात झोपलेल्या त्या चिमण्या प्रीतीचेही ओठ रुंदावले....

आपसूकच....!!!



          ********** समाप्त...***********

अरे...? एवढ्यात संपली कथा...??

अजून तर मोहन - सोनिया  एकमेकांना भेटलेही नाहीत... शालिनीचं काय होईल पुढे...??

राधामावशीच काय...??

आणि मुख्य म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या प्रीतीचं काय...??

.

.

... असंख्य प्रश्न...!

उत्तर एकच.....



खरं तर कथा अजून संपली नाहीये...

हा तर फक्त पूर्वार्ध आहे... माझ्या प्रीतीचा..!

जवळपास पंधरा वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी ही कथा लिहिलेली तेव्हा वहीच्या तिसऱ्या पेजवर प्रीतीचा जन्म झाला होता...

पण आज परत  नव्याने लिहिताना प्रीती जन्मायला तब्बल तेरा भाग लागले...!

परत येईन लवकरच...  प्रीती चा उत्तरार्ध घेऊन... नव्या पर्वात...  "प्रीती... पर्व दुसरे...! " मध्ये.


तोपर्यंत.. भेटेनच अधेमध्ये... माझ्या " पारिजात.... गन्ध प्रेमाचा..! "  ह्या कथेत..!!

तोवर हया कथामालिकेचे सर्व भाग कसे वाटले ते नक्की सांगा...

लिखाणात काही सूचवायचं असेल तर तेही सांगा..! तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत..!!

🎭 Series Post

View all