प्रीती.... भाग -13

Mohan's Mother's Death...

आपण वाचत आहात...

प्रेम.., तडजोड..., नात्यातील गुंतागुंत उलगडणारी कथामालिका....

प्रीती...!!



( मागील भागात आपण पहिला मोहन शालिनीचा लग्नसोहळा...!


आता पुढे...)



          *****************************

आजी हसली जराशी..


"... बाई.. ह्या सत्तर वर्षात माझ्या डोक्याचे केस असेच काळ्याचे पांढरे नाही झाल्ये..
रक्ताचं नातं ते रक्ताचंच रायते..
आता माझवालचं बघ.

माझ्या नातीच्या बाळतपणाले मीच आली का नाही..?

का आले कोणी  तिच्या सासरचे..??
मनून मनते...


रक्ताचं नातं ते रक्ताचंच रायते... "


ती बोलतच होती...



.. राधामावशीने तिथेच खाली पाठ टेकवली...


" ... खरंच रक्ताचं नातंच तेवढं श्रेष्ठ असते का..??
ही कोण माझी...?? का माझा जीव तुटतो हिच्यासाठी..
हिने मला मावशी म्हटले नी लगेच मी तिला माझी लेक मानले...
मग हे कोणते नाते आहे आमचे..?? "


मनात आलेले प्रश्न तिने झटकून टाकले..


रात्री उशिरा केव्हातरी तिचा डोळा लागला...
.
.
.
.
.
.
.... सकाळी सकाळी लग्नघरात सगळीकडे लगबग सुरु होती...

आज लग्नानंतरची नवदाम्पत्यांची पहिली पूजा...!

त्याचीच तयारी चालली होती.


घर सजले.. त्याबरोबर घरातील मंडळीही सजली..


मोहन होताच सुंदर..

आज तर अगदी राजबिंडा दिसत होता..
मात्र चेहऱ्यावरची कुठेतरी प्रसन्नता हरवली होती..


शालिनी...

साध्याशा तयारीनेही खूप गोड दिसत होती.. चेहऱ्यावर असलेले ( खोटे  का होईना ) हसू चेहऱ्याचे तेज वाढवत होते..


बाबा.., मामा..,

ते तर आपल्याच  नवीन नात्यात गुंतले होते..
व्हायीपणात रंगले होते..


आणि...


मोहनची आई....


तिला आज जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असल्याचा फील येत होता...



कदाचित सुख म्हणजे आणखी याहुन काही वेगळे असते का..???



" माझ्या दारात आलेलं सुख असंच राहू दे... अबाधित....!! "
ती मनोमन देवाला साकडं घालत होती...


... पण

खरंच  देव ऐकेल तिचं.....??
.
.
.
.
.
"... बरं वाटतंय का बाळा आता.."


राधामावशी सोनियाला विचारत होती.


"... नाही गं मावशी...


बघ ना दोन दिवसात शरीर कसं फुगून गेलंय...
आणि श्वास घ्यायला पण त्रास होतोय...
ओटीपोटातील दुखणं देखील वाढतच आहे.. "


बोलता बोलता तिला धाप लागली..

... बाई...

तरण्याताठ्या पोरीले मारते का वं...??
कशी करून ऱ्हायली ते..
डाक्टरले बोलव नं पटकन..! "


बाजूच्या पेशन्टची तीच नातेवाईक आजी म्हणाली तशी
मावशी वॉर्डमधल्या सिस्टर कडे धावत गेली.


" मॅडम... बघा नं माझ्या लेकीला काय होतेय..?
तुमच्या डॉक्टरांना बोलवा ना..."


सिस्टर पुढे ती हात जोडून उभी होती..


सिस्टरने तिला बाजूला सारून पहिले सोनियाची बीपी चेक केली..
आणि मग त्वरेने डॉक्टरांना फोन केला.


"... मॅडम.. ती पाच नंबरच्या बेडवरची पेशंट... हां तिच काल ऍडमिट झालेली..
बीपी जास्तच शूट झालीय मॅम तिची...
आणि pains देखील वाढत आहेत...
काय करायचं...?? "


पुन्हा थोडं बोलून तिनं फोन ठेवला.


".... काय म्हणल्या मोठया मॅडम....?? "


इतका वेळ आशाळभूत नजरेने तिच्याकडे पाहत असलेल्या मावशीनं तिला विचारलं.


" मॅडम येताहेत पाच मीनिटात..
त्याच सांगतील.. "


सिस्टर उत्तरली.


... पुढल्या पाच मिनिटात खरंच डॉक्टर तिच्या पुढ्यात उभ्या होत्या.


त्यांनी सोनियाला चेक केलं..


"... सिस्टर... पेशंटला OT मध्ये शिफ्ट करा.... लगेच.."


त्या म्हणाल्या. चेहऱ्यावर थोडे टेन्शन होते.


" सकाळपासून काही खाल्लंय का हिने..?? "


डॉक्टरांनी मावशीला विचारलं..


"... नाही .."
तीनं नकारार्थी मान हलवली.


" हम्म. ठीक आहे.. "
त्या म्हणाल्या.


" मॅडम...

काय झालंय तिला..?? "


राधामावशी तळमळीने विचारत होती..


".. हे बघा काकू.. तिचं ब्लड प्रेशर चांगलंच वाढलंय. आणि त्यात बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत आहेत..
त्यामुळं तिला लगेच ऑपेरेशनसाठी न्यावं लागेल..!"


डॉक्टर तिला सांगत होत्या..


त्या काय सांगताहेत... राधामावशीला तर फारसं काही कळलंच नाही..


" तिला काही होणार तर नाही ना..?? "


डोळ्यातील पाणी पुसून मावशीनं विचारलं..


"... त्यासाठीच तर प्रयत्न चाललेत ना...


तुम्हीही देवाजवळ प्रार्थना करा...! "


" सिस्टर... क्विक...! "


सिस्टर ला म्हणत त्या घाईत निघून गेल्या..


"... मावशी... काय चाललंय  हे...?


ओटी कडे जाताना सोनियाने तिला विचारलं.
डोळ्यात असंख्य प्रश्न होते..


" काही नाही गं बाळा...

सगळं ठीक होण्यासाठीच चाललंय...
तू फक्त हिम्मत ठेव.. देव आहे आपल्या सोबतीला..  आणि मीही आहेच की..! "


तिच्यासमोर उसने अवसान आणून ती बोलली..

" तू आहेस म्हणूनच तर मी तरले इतके दिवस..!  "


डोळे पुसत सोनिया म्हणाली..


" आता फक्त एकच ...

...मावशी...!

मला काही झालं तर माझ्या बाळाला सांभाळशील....???"


तिच्या डोळ्यात पाहत अगतिक नजरेनं तिनं प्रश्न केला.


"... काहीही काय बोलतेस बाळा...

देवाचं नाव घे.. सगळं ठीक होईल..! "


- मावशी.


माहित नाही का पण सोनियाने मावशीला एक घट्ट मिठी मारली..
तिला तरी कुठे ठाऊक ..?? एकदा OT मधे गेल्यावर पुन्हा जिवंत बाहेर परतेल की नाही ती...


"  देवा...!

अशी वेळ कोणत्याही मुलीवर आणू नकोस रे कधी..! "


आपले डोळे पुसत मनात म्हणाली ती.


तिचा उर दाटून आला...

.

.


"... काकू सही करा याच्यावर.."


नर्स तिला सांगत होती.


" काय आहे सिस्टर हे..?? काय लिहिलंय याच्यावर..?? "


तिनं विचारलं.


"  तुमच्या लेकीवर होणाऱ्या उपचाराबद्दल तुम्हाला माहिती आहे. आणि जर ऑपरेशन दरम्यान काही कमी जास्त झालं तर डॉक्टर जबाबदार राहणार नाही  आणि याला तुमची संमती आहे...

  असं  लिहिलंय यात.."


नर्स म्हणाली.


"... असं कसं..??

तिला काही कमिजास्त झालं तर मग कोण राहणार जबाबदार..??"


ती पटकन म्हणाली.


"... अहो काकू.. कायदा आहे हा. आणि जेवढे तुम्ही सही करायला उशीर करणार ना तेवढाच उशिर ऑपरेशन ला लागेल..

मग तेव्हा काही झालं बरवाईट तर कोण राहणार जबाबदार...??"


नर्स थोडी चिडलीच.


कोणत्या नात्याने करू मी सही ...??


तिच्या  मनाला प्रश्न पडला..



तरी भरल्या अंतःकरणाने तिनं आपलं नाव लिहिलं...


" राधा...! "


तिनं  आपलं नाव लिहितानाच वाचलं..


नातेवाईकाच्या रकाण्यात नर्सनी आधीच लिहिलं होतं ...


" आई..!!"



...आई...!!!


दोनच अक्षरांचा शब्द...!


पण त्या शब्दात जी जादू आहे... ते केवळ आईपण अनुभवणाऱ्यालाच ठाऊक..!


आजपर्यंत मातृत्वासाठी तळमळलेली ती...

आज तिच्या नावाखाली नर्सने चुकून का होईना पण आई लिहिलं होतं...


सोनियाची काळजी घेता घेता ती तिची आई केव्हा झाली... नाही कळलं तिला.


रात्री ती काकी म्हणत होती की रक्ताचं नातं तेच तेवढं श्रेष्ठ असतं...

...तेव्हा कुठेतरी मनाला टोचलं होतं ते...!


मात्र आता तिला पटलं ज्या नात्यात प्रेम आहे... तेच नातं सर्वश्रेष्ठ...!!


सोनियाने दाखवलेल्या एका माणुसकीच्या नात्यांनं दोघी एकत्र आल्या होत्या...


आणि आज...


ती सोनियाची आई झाली होती...!!

.

.
"... देवा..!

माझं काही चुकलं माकलं असेल तर ती चूक पदरात घे..पण सोनिया नी तिच्या लेकराला सुखरूप ठेव.


हवं तर माझं उरलसूरलं आयुष्यही घे पण तिला या त्रासातून मोकळी कर.. "


भरल्या मनानं ती देवाला विनवत होती..


ह्या क्षणी तिच्या मनात चाललेली कालवाकालव तिलाच ठाऊक..


.
.
.
.
.
... मोहन शालिनीच्या लग्नाची पूजा निर्विघ्नपणे पार पडली ..!

दक्षिणा घेऊन भटजी निघून गेले.


त्या दोघांनी जोडीनं सर्वांचा आशीर्वाद घेतला.


शेवटी दोघं आईच्या पाया पडायला आले..

तशी तीही अत्यानंदाने उठली.. त्यांना प्रेमानं कवेत घ्यायला..!


तोच तिच्या छातीत एक तीव्र स्वरूपाची कळ उठली..!



ती उठली... तशीच पुन्हा कोसळली..!!


.
.
.
.
.


" ... काकू..

बाळाला पुसायला कापड लागेल.. द्या लवकर.."


नर्स बाहेर येऊन घाईने मागत होती..


"... कापड..?? कापड नाही आणली मी.."

ती चाचरत बोलली.


बाळन्तपणाच्या तयारीने ती आलीच नव्हती.

तरीही दोन दिवस दवाखान्यात राहावं लागेल म्हणून तिनं आपलं एक पातळ सोबत आणलं होतं.


" हे चालेल..? "


पिशवीतून ते पातळ काढत ती म्हणाली.


नर्सने तिच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला आणि कैचीने टराटरा पातळ कापून आत घेऊन गेली..


नर्स का रागावली.. तिला कळलं नाही...

पण...

आत काय चालू असेल ह्या विचारानं तिच्या हृदयाची स्पंदने मात्र चांगलीच वाढली होती...


ती डोळे मिटून देवाचा धावा करत होती...


.
.
.
.
.
.


.... खाली कोसळणाऱ्या आईला सांभाळायला दोघांनीही तिला पकडलं.
बाबा आणि मामाच्या मदतीने तिला खाटेवर ठेवलं.


"... आई.. आई ... डोळे उघड ना.."


रडवेला मोहन तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होता..


"... आत्या.. ये आत्या.. बोल ना गं काही.. "


शालिनीही रडतच तिच्या छातीवर हलका दाब देत होती.


"... मी पाटलाकडं जाऊन दवाखान्यात न्यायला गाडीची काही सोय होते का ते बघून येतो.."


चपला पायात सरकवत बाबा बाहेर जायला निघाले..


"... नको..! "

तोच क्षीण स्वरात आईचा आवाज आला.


बारीक डोळ्यांनी ती बघत होती.


"... कुणीच कुठे नका जाऊ... मी नाहीये फार वेळ आता...


शालू...

हे घर मी तूझ्या हाती सोपवून चाललेय गं ...


माझ्या मोहनला कधीच


अ..न्त..र दे.. वू.. नं..को..स...! "


शालूच्या हातातील तिचा हात खाली निसटला...


" आत्या ss ..."


शालूनं हंबरडा फोडला...!


मोहनदेखील हमसून हमसून रडत होता..


.
.
.
.
.


क्याssवं..... क्याssवं...


...ऑपेरेशन थिएटर मधून छोटया बाळाच्या रडण्याचा आवाज राधामावशीच्या कानावर पडला...


तिचे मिटलेले डोळे खाडकन उघडले...


हृदयाची स्पंदनं आणखी जोरात धडधडू लागली...

.

.

.

.

.

क्रमश :


           ****************************

काय लिहू...???

शेवटी एकच सत्य...

मनुष्याचा जन्म आणि मृत्यूच तेवढा शाश्वत....!

बाकी सारे क्षणभंगूर...!!!

नाही..???

तुम्हाला कसा वाटला हा भाग...?? नक्की सांगा..

आवडला तर like, कमेंट आणि नावासह share करा...!

🎭 Series Post

View all