प्रीती... भाग- 11

Soniya Tells About Her To Radhamawshi...

आपण वाचत आहात..

प्रेम.. तडजोड... नात्यातील गुंतागुंत उलगडणारी कथामालिका... प्रीती..!


( मागील भागात आपण बघितलं शालिनीची लग्नाला मागणी घातल्यामुळे मोहनची झालेली कोंडी..

आजच्या भागात अनुभवा त्यांच्या मनाची घालमेल....)



                         ************


"... विश्वास ठेव...

तुझी बायको बनण्याचा मी कधीच प्रयत्न करणार नाही... आपलं लग्न केवळ लोकांना दिसण्यासाठी असेल.. "


तिनं त्याला आश्वस्त केलं...


" आता जाते मी बाहेर...  नाहीतर सगळ्यांना वाटेल की लग्नाची बोलणी झाल्याबरोबर मी तुझीच झाले..!"


हसून बोलत ती बाहेर जायला निघाली...


तसा त्यानं तिचा हात पकडला...
अन् एक घट्ट मिठी मारली...


ती शहारली...


" थॅंक यू.. शालिनी...! मला समजून घेतल्याबद्दल...!! "


तो म्हणाला.


"... अशी मिठी मारशील तर विचार बदलेल माझा..! "


त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली.


तसा तोही झटकन दूर झाला.
"... माफ कर गं..! भावनेच्या भरात कळलं नाही मला.."


आपली नजर चोरत मोहन म्हणाला.


"... अरे माफी कसली त्यात..?
एवढं समजू शकते मी..
आणि लक्षात ठेव... सोनियापासून तोडणार नाही मी तुला...
कधीच....!
एक मैत्रीण म्हणून सदैव तूझ्यासोबत असेन मी...!! "


ती म्हणाली.


" मैत्रीण म्हणतेस तर एकदा आईला मनव नं...  मला एकदा मुंबईला जाऊन येण्याची परवानगी घे ना आईकडून... प्लीज... "
तो हतबलतेने म्हणाला.


" हो... करते मी प्रयत्न..
आता जाते मी... आणि तुही ये थोडयावेळाने आवरून...! "


डोळ्यातील पाणी लपवत ती रूमच्या बाहेर निघाली....
.
.
.
".... आत्या जाऊन येऊ दे ना गं त्याला एकदा..! "
शालिनी आत्याला लोणी लावत म्हणाली....
"... नाही...!
हवं तर हट्ट समज माझा.. पण जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोवर मी मोहनला कुठेच जाऊ देणार नाही... "
त्याची आई म्हणाली.
"... आत्या... "
ती.
" शालू... तुझं ऐकते ना मी नेहमीच ...!

पण हे नाही ऐकणार...

माहित नाही गं पण असं वाटतं की जास्त दिवसांची सोबतीण नाहीये मी तुमची.."
कातर आवाजात ती म्हणाली.

"...या आठ दिवसात लग्न करून घ्या..
मग हवं तर जोडीनं जा मग मुंबईला...! "

बोलतांना पुन्हा धाप लागली तिला.

"... आत्या...
किती वेळा सांगितलं की असं नको बोलू... "
तिला पाणी देत ती म्हणाली.

"... शालू... ! एक आई म्हणून माझ्यावर तुझी जबाबदारी आहे गं...
तुझे हात पिवळे केल्याशिवाय मी वर तूझ्या आईला कसं तोंड दाखवेन...??"

तिच्या डोळ्यात पाणी होते...

त्या डोळ्यांत तिच्यासाठी असणारे प्रेम होते....ओतप्रोत भरून...
तिच्याबद्दल वाटणारी काळजीही होती... खूप सारी...

शालूनं तिला एक भरगच्च मिठी मारली...

"  आत्या.. तू कुठेही जाणार नाहीयेस मला सोडून... "
तिचा हुंदका दाटून आला...
.
.
.
... आईचा नकार ठाम होता. त्यामुळं मोहनचं मुंबईला परतनं...
...राहूनच गेलं...
.
.
.
.
.
..... इकडे सोनिया मनातल्या मनात झुरत होती.. त्याच्या वाटेकडे तिचे डोळे लागून होते...
"... काय झालं असेल तिकडे...??"
मनात एकच विचार...
.
.
... आणि पुढल्या चार एक दिवसात भर दुपारी दारावर थाप पडली..

"... मोहन...! "

ती पटकन बेडवरून उठून बसली..

" आँ ss "
वेदनेने विव्हळली ती..

पोटातील बाळ आता जास्तच त्रास द्यायला लागले होते.

" अगं.. थांब तू. मी बघते.. "

दराकडे जात राधामावशी म्हणाली.
दार उघडे पर्यंत सोनियाही पोचली तिथे...

" मोहन.. "

बाहेर बघत तिनं साद घातली..

पण...
तो नव्हताच तिथे..

" सोनियाच्या नावाने मनी ऑर्डर आणि पत्र आहे... पटकन सही करा.. "

बाहेर पोस्टमन उभा होता.

तिनं सही करून घाईघाईनं पत्र फोडलं.


"... सोनिया..
आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.. त्यामुळे मला इतक्यात तरी परतणे अशक्य आहे..
तू तुझी काळजी घे. इथलं टेन्शन घेऊ नकोस.. सोबत काही पैसे पाठवले आहेत.. दवाखान्यात वेळेवर जा.. औषधं नीट घे. राधामावशीला सोबत ठेव..
मी परत येईल लवकरच ...
तोवर तू जप स्वतःला...!  "

बस...
चार ते पाच ओळीचं ते पत्र...
तिनं कितीतरी वेळा त्याचे पारायणं केले.

त्या पत्रावर असलेले त्याचे सुकलेले अश्रू... तिच्या नजरेतून सुटले नाही. तिच्या डोळ्यातीलही दोन थेंब त्यात मिसळले...
ती ते पत्र दहादा उलटपालट करून पाहत होती.

" किमान दहा वेळा तरी ही चिट्ठी वाचून झाली तुझी...
मग पुन्हा पुन्हा काय शोधत आहेस..? "

राधमावशीने विचारलं.

"... त्याचा पत्ता...??..."
ती पटकन म्हणाली.
"...मावशी त्यानं आपला पत्ताच नाही टाकला गं पत्रावर... "
काही तरी हरवल्याचे भाव होते तिच्या चेहऱ्यावर..

मावशीने  तिच्या डोळ्यात पाहीले...

तिच्या निळ्याशार डोळ्यातील समुद्र पुन्हा तिला खुणावतोय असं तिला वाटलं.
त्याच निळ्या समुद्रात खोल पाहत तिनं सोनियाला विचारलंच...

" बाळा.. खरंच लग्न झालंय ना तुमचं..?
म्हणजे...
तुला त्याच्या घराचा पत्ता असेल ना माहिती...?? "

राधामावशीने नकळत तिच्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवला होता...
तिनं एकवार मावशी कडं पाहिलं.

"हे बघ... म्हणजे.. चुकीचं समजू नको मला... तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसतेय मला..
पण..
पण तुझे हे निळे डोळे काहीतरी वेगळंच सांगत आहेत..
मोहन गेल्यापासून त्याला हरवल्याची एक अनामिक भीती दिसतेय या डोळ्यात... रोज.!
 का  अशी भितेस..?
काय आहे तुझ्या मनात...
एकदा बोल तरी माझ्याशी...! तुलाही थोडं मोकळं झाल्यासारखे वाटेल.."
तिचा चेहरा ओंजळीत घेत राधामावशी म्हणाली. पण तिची नजर अजूनही सोनियाच्या डोळ्यांतच होती..
या क्षणी तिची ती नजर टाळणं नाही जमलं तिला ...
तिनं राधामावशीच्या कमरेला घट्ट विळखा घातला.. आणि हुमसून हुमसून रडायला लागली..
एवढ्या दिवसांचा बांध आज फुटला होता...
अथ पासून इती पर्यंत सोनियाने राधामावशीला सारं सांगून टाकलं.
एवढया श्रीमंतघरची लेक.... आणि आज तिच्यावर ही वेळ आली... राधामावशीन आपले डोळे पुसले. मग तिच्या चेहऱ्यावर आपला हात फिरवला.

"... सोनिया... मोहन सच्च्या दिलाचा आहे.. येईल तो नक्कीच.  आपण आता फक्त बाळाचा विचार करूया..
सारखी रडत राहशील तर बाळही रडके होईल.."
ती म्हणाली.

"... राधामावशी... "

तिनं डोळ्यांनीच खुणावून काय म्हणून विचारलं.

"... उद्या जर मला काही झालं तर तू संभाळशील ना माझ्या बाळाला...??"
हुंदका आवरत ती म्हणाली.

" सोनिया... तिन्ही सांजेचं काही काय बोलतेस गं..? कसले कसले विचार करत असते...
थांब देवापुढं दिवा लावून आधी तुझी नजर काढते.. "

मावशीनं देवापुढे दिवा लावला आणि तिच्या अंगावरून मिठमोहरी उतरवली...
.
.
.
.
"... शालू... देवाजवळ दिवा लावून घे गं बाई.."
स्वयंपाकघरात येत मोहनची आई म्हणाली.
" आत्या...
अगं तू कशाला आलीस इथे..? आणि दिवा लावलाय मी.. "

काहीशी नाराज होत शालू म्हणाली.

" अगं सकाळपासून एकटीच राबत आहेस घरात.. आता थोडं बरं वाटतेय तर आले मदतीला..! "   - आई.

"आत्या..! सवय आहे नं मला कामाची.. तू फक्त आराम कर.."
तिच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली.


तेवढ्यात पाणी प्यायला म्हणून मोहन तिथे आला.


"... आणि मदतीचं म्हणशील तर मोहन आहे ना तो करेल मला मदत.. हो ना रे..? "


त्याच्याकडे बघून ती.


" हो - हो.. करेल ना.. "  - तो.


" लबाड... सासूसमोर नवऱ्याला कामाला लावतेस होय..?? "


तिचा गालगूच्चा घेत ती म्हणाली.


शालू - मोहन दोघांनीही बघितलं एकमेकांकडे..

आणि हसले मग...
कसंनुस....!


"... पोरांनो... अशीच एकमेकांना नेहमी साथ द्या.. मोहना... माझ्या शालूला दुखावू नको रे कधी...! असेच आनंदी रहा..."
तिनं दोघांचे हात हातात घेतले आणि एकमेकांच्या हातात दिले..


"... आई.. चल बाहेर..! आराम कर.."


मोहन विषय बदलवून तिला छपरात घेऊन आला...
.
.
.
.
... शालूचा डोळा लागत नव्हता..मग ती हळूच दार उघडून बाहेर आलं. अंगणात शीतल चांदणं पडलं होतं. मंद मंद वारा सुरु होता.. आंब्याच्या झाडाआडून हळूच चंद्र डोकावत होता..
ती खुर्ची घेऊन अंगणात बसली... मनात विचारांचे काहूर माजले होते...
".. मी जे करत आहे.. ते बरोबर आहे ना..?"
एक मन विचारत होतं.
".. हो.. बरोबरच करतेयस तू.. आताच्या घडीला आत्याची प्रकृती बघता हेच योग्य आहे.. "
दुसरं मन.
"... पण मग मोहनचं काय..??"
पहिलं मन.
"... आत्या जास्त महत्वाची आहे या क्षणी..."
दुसरं मन.
"... आत्या बरी झाली की लगेच मी मोकळी करेल मोहनला.. त्याला असं तीळतीळ तुटतांना नाही बघू शकत मी..! "


"  आणि तुझं काय..?? तुझंही प्रेम आहे ना मोहनवर.. त्याला सोडून कशी राहशील..?? "


"... आत्याने सगळ्या प्रेमाची आधीच भरपाई केलीय माझी.. आणि... मोहन चं म्हणशील तर त्याच्यावर जबरदस्ती तर नाही ना करू शकत मी...


पण.. आत्या मोहनला माझ्यासाठी नेहमीच गृहीत धरते का...?? "


तीचं मनात स्वतःशीच द्वन्द्व सुरु होतं....
गालावर ओघाळलेले थेंब तिने हळूच पुसले..


"... शालू..."
खांद्यावर एक थाप पडली तसं दचकून तिनं बाजूला पाहिलं...

"... बाबा..


एवढ्या रात्री काय करताय  इथं.. झोप येत नाहीये का...?? "


तिनं विचारलं..

".. हेच तर म्हणतोय मी... झोप येत नाहीये का..?? काय झालं?"

तिचे वडील शेजारी बसत म्हणाले.


" कुठं काय..?? काहीच तर नाही..."


ती म्हणाली.
" डोळ्यात पाणी का मग तूझ्या..?? "
तिचा हात हातात घेत ते म्हणाले..


"... बाबा..! आता लग्न ठरलंय ना माझं... मग तुम्हाला सोडून जाईन मी.. खूप आठवण येईल तुमची..! "
ती म्हणाली तसं तिचे बाबा मोठ्यानं हसायला लागले..
तिनं प्रश्नार्थक त्यांच्याकडे पाहिलं..
" हळू... केवढं मोठयाने हसताय ..? "

- ती.
"... काय करू मग..??

अगं दोन घरं ओलांडली की ताईचं घर येतं तरीही तुला माझी आठवण येईल..?? "
ते पुन्हा हसत म्हणाले.
"... आणि आलीच आठवण तर मीही येईलच की तूझ्या मागे मागे माझं बिऱ्हाड घेऊन ...!
तसही तूझ्या शिवाय आहेच कोण माझं..??
आणि मी तरी राहू शकेल का तुला सोडून...? "
डोळ्यांच्या कडा पुसत ते म्हणाले.
" बाबा..!"
म्हणत ती त्यांना बिलगली.


"... शालू...! खूप भाग्यवान आहेस तू..! एवढं प्रेम करणारं घर मिळालंय तुला. ताईचा खूप जीव आहे गं तुझ्यावर.. तिच्या स्वतःच्या मोहनपेक्षाही काकणभर जास्तच...! तिला दुःख होईल असं कधी वागू नको. एवढे दिवस तिनं सांभाळून घेतलं तुला. आता तू तिला सांभाळ... लेकीची माया दे...!! "


ते तिच्या डोकयावरून हात फिरवत होते...


तिचं केवळ हूं -हूं चाललं होतं..


मिटल्या डोळ्यासमोर फक्त मोहन उभा होता..


".. बाबा म्हणतात तशी खरंच भाग्यवान आहे का मी... ?"
ती स्वतःला विचारत होती.
" मी जर भाग्यवान तर मग मोहनच्या नशिबाचे काय...?? त्याची काय चूक...?? "


तिच्या मिटल्या नयनातून एक थेंब खाली निसटलाच...!
.
.
.
"... काय घडतंय माझ्या नशिबात..??

कसलं प्राक्तन भोगतोय मी हे..?

माझं लग्न म्हणजे सर्वांना लहानपणीचा भातुकलीचा खेळ वाटतोय का.. आईला..??
साधं कुणी मला विचारलंही नाही की मला शालूशी लग्न करायचेय का नाहीय ते..
का सगळ्यांनी मला गृहीत धरलंय..??
ह्यात बिचाऱ्या शालूची काहीच चूक नाहीये ना..
आणि माझ्या सोनियाची..? आमच्या बाळाची..??
चूक तर कुणाचीच नाहीये...
मग का मला निर्णय घेता येत नाहीये..? ह्या प्रवाहसोबत असाच वाहत जाऊ... की फिरू असाच परत... प्रवाहाच्या उलट्या दिशेने...?? "
त्याने आपली कूस बदलली.
निद्रादेवी त्याच्यादेखील डोळयांवर कुठे स्वार झाली होती...??
त्याच्या मिटल्या डोळ्यासमोर तिघीही उभ्या होत्या...

आई...

शालिनी...

आणि..

त्याची सोनिया....

.

.

.

क्रमश :


          ***********************

निर्णयाची वेळ आली आहे....

कोणाला निवडेल तो... वाचा पुढील भाग...

आणि तोवर हा भाग कसा वाटला... नक्की कमेंट करा..

Like करा... share करा... आणि मला folllow करा...

🎭 Series Post

View all