(मागील भागात आपण पाहिलं... मोहनच्या आईने मोहनसाठी शालिनी... तिच्या भाचीला मागणी घातली...
सगळे खूप आनंदी असतात..
आता पुढे....)
" अगंबाई... लग्नाची बोलणी झाल्याबरोबर त्याची बाजू घेतेस होय? लबाड....! जा त्याला समजाव जरा.. "हसून आई म्हणाली.
" खरंच जाऊ..? "
बाबांकडे बघून ओढणीशी खेळत तिने विचारलं.
" हो.. जा. अगं हक्क आहे तो आता तुझा.. "
बाबांनीही होकार दिला.
ती लाजून त्याच्या खोलीकडे पळाली...
आई , बाबा, मामा... सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते...
.
.
.
.
..... दारात उभी राहून आशाळभूत नजरेने सोनिया बाहेर बघत होती....
आठ दिवस उलटले होते... दोन दिवसांसाठी म्हणून गेलेला अजूनही परतला नव्हता...
"... त्याला पाठवून चुकले तर नाही ना मी...?? "
सारखं मनाला ती विचारत होती.
डोळ्यात अश्रुंनी गर्दी केली होती...
"... सोनिया बाळा... अगं किती वेळ अशी दारात उभी राहशील..? त्रास होईल बाई तुला...
ये, आत बस.."
राधामावशी तिला आत घेऊन आली.
डोळ्यातल्या अश्रुंना तिने तिथेच थोपवलं.
आत येऊन ती बेडवर बसली.. आठ दिवसांपूर्वी असलेले तिच्या चेहऱ्यावरचे तेज जणू गायबच झाले होते..
"... मोहन येशील ना रे परत... "
तिचं मन आर्त साद घालत होतं...
राधामावशी वाटीत कोमट तेल घेऊन आली. तिच्या सुजलेल्या पायांना हलक्या हातानं मालिश करत म्हणाली,
"... हो गं बाई... येईल तो लवकरच... "
जणू काही सोनियाच्या मनाची साद हिच्या मनानं ऐकली होती..
तिनं चमकून राधामावशीकडं पाहिलं. राधामावशीही तिच्याचकडे पाहत होती. दोघींची नजरानजर झाली...
तिच्या निळ्याशार डोळ्यातील समुद्र जणू काही आपल्याला खुणावत आहे असं राधामावशीला वाटलं...
".... पोरी... तूझ्या डोळ्यात खूप काही दिसतंय मला पण त्याचा थांग लागत नाहीये बघ... "
तिच्याजवळ बसत ती म्हणाली.
सोनिया काहीच न बोलता नुसती शून्यात बघत होती.
".. एवढा कसला विचार करतेस बाळा..? अगं आईची तब्येत जास्त बिघडली असेल म्हणून नाही जमलं असेल यायला त्याला.
... आणि तुला माझ्यावर सोपवून गेलाय ना तो तर निश्चिन्त राहा..
मी आहे ना....? होईल सगळं ठीक..! "
राधामावशी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.
तिला आठवलं...
मोहनही तिला हेच म्हणाला होता जेव्हा ते दोघे पहिल्यांदा इथे आले होते.
ती सगळ्यांना सोडून याच विश्वासावर तर आजवर जगत होती...! तो आहे सोबत हेच पुरेसं होतं तिच्यासाठी...
तिला मावशीचं म्हणणं पटलं. आईला जास्तच नसेल बरं म्हणून तो येऊ शकला नाही इतक्यात...
पण येईल तो... नक्कीच....!
" राधामावशी... चहा देतेस का गं थोडासा... ?? "
तिनं विचारलं.
" हो गं बाळा.. आणतेच बघ. "
राधामावशीनं चहाचं आधन ठेवलं....
.
.
.
.
.
.
" ... आत येऊ का..?? "
चहाचे कप हातात घेऊन शालिनी दारात उभी होती.
मोहन आईच्या बोलण्याचा विचार करत होता... तिच्या आवाजाने त्याने मागे वळून बघितलं. ती दारातच उभी होती.
त्यानं ईशाऱ्यानेच तिला आत बोलावलं.
तिनं त्याला चहा दिला... स्वतःही घेतला.
दोघे काहीच न बोलता शांतपणे चहा पीत होते...
" मोहन... तू आनंदी नाहीयेस का..? "
शांततेचा भंग करत शालिनी म्हणाली.
" हं... काही म्हणालीस का..?? "
आपल्या तंद्रीतून बाहेर येत तो म्हणाला.
"... मोहन... तुला मी आवडते ना..? "
तिने प्रश्न केला.
" हो... आवडतेस ना...! "
त्याच्या ओठांवर फिक्कट हसू होतं आणि डोळ्यात विषण्णता....
"... मग चेहऱ्यावर आनंद का नाहीये तूझ्या..??
अरे आपलं लग्न ठरलंय... ही आनंदाची गोष्ट नाहीय का..?? तू का इतका खिन्न आहेस..? "
त्याच्या डोळ्यात एकटक बघत ती म्हणाली.
तिची ती नजर....
त्यात काळजी होती. प्रेम होतं..
होतं आणखी बरंच काही....
आणि त्याच्या डोळ्यात...?
त्याच्या डोळ्यात होता एक महासागर.... अथांग...!!
त्याच्या मनातली घालमेल त्याच्या डोळ्यात वाचण्याची तिची धडपड चालली होती.
केविलवाणी....
पण थांग लागत नव्हता...
तरीही ती त्याच्या डोळ्यात तशीच बघत होती...
स्थितप्रज्ञ....!!
तिची ती स्थिर नजर त्याच्या डोळ्यातून गेली आरपार...
अन् थेट त्याच्या काळजात घुसली... !
त्याच्या हृदयात पुन्हा कालवाकालव सुरु झाली...
" आता नाही सांगितलं तर पुन्हा संधी नाही मिळणार... मोहन मोकळा हो.. आत्ताच... "
त्याच्या अंतर्मनाने कौल दिला.
ती उठली.
" नाही थांब ना... आत्ता मी हे फक्त तुझ्याशीच बोलू शकतो... "
तिचा हात पकडत त्यानं तिला जाण्यापासून रोखलं..
त्याच्या त्या स्पर्शानं एक गोड शिरशिरी उमटली तिच्या सर्वांगावर....
" तेच तर ऐकायला आले आहे.. सांग ना..!"
त्याच्याकडे वळून ती म्हणाली.
चेहऱ्यावर एक गोड हसू होतं तिच्या.
तिचा तसा चेहरा पाहून बोलू की नको असं झालं पुन्हा त्याला. तरी धीर एकवटून बोललाच तो,
"... शालिनी... मला लग्न नाही करायचे हे... " - तो.
" का पण..? मोहन... तुला मी आवडत नाही का रे..? "
तिचा स्वर थिजला होता... "
"… आवडतेस अगं... पण लग्नाच्या दृष्टीकोनातून मी कधीच तुझ्याकडे पाहिलं नाही गं...! "
तो पटकन बोलून गेला..
"... असा कसा बोलतोयस मोहन तू...?? अरे लहानपनापासून भातुकलीच्या खेळात बायको म्हणून तुला मीच तर हवी असायचे ना..??
तेव्हा सगळ्यांशी किती भांडायचास तू..! आता काय झाले..?? "
बोलताना डोळे ओले झाले तिचे.
"... लहानपणीचा तो फक्त एक खेळ होता शालू...! ते तेवढ्यापुरतंच राहू दे ना... आता आपण मोठे झालोत.. "
- तो.
" तुझ्यासाठी असेल तो फक्त खेळ .पण मी मात्र पूर्णपणे तुझ्यात गुंतले होते अरे...!
तुला नाही का आठवत...?
नवरा म्हणून मलाही केवळ तूच हवा असायचास ना रे ...? "
ती हळवी झाली होती.
" तेव्हा लहान होतो गं आपण... "
- तो.
" हो... होतो आपण लहान...
प्रेम वगैरे काय असते नाही कळायचं आपल्याला...
पण त्या नकळत्या वयापासूनच प्रेम करायला लागले होते मी तुझ्यावर...
मी फक्त तुझी आहे नी तू माझा...! एवढंच कळत होतं मला..
जशी वयात येऊ लागले तसं कळायला लागलं की मनात येणाऱ्या या भावनेलाच कदाचित प्रेम म्हणत असतील...!
आत्याने माझे मन केव्हाच वाचले.. पण तुला याची जाणीव कधीच नाही का रे झाली..??
मनाने मी केव्हाच तुला वरलेय मोहन...! कसं कळत नाहीये तुला.. खूप प्रेम आहे रे माझं तुझ्यावर... "
ती भावनाविवश झाली.
"... तुला कसं कळत नाहीये शालू... माझ्या मनात असं काहीच नाहीये अगं.. "
- तो.
"... का नाहीये..?? शहरात राहिलास म्हणून शिंग फुटली का तुला? का माझ्यापेक्षा जास्त शिकलायस म्हणून भाव वाढलेत तुझे..?
मीदेखील शिकलेय ना बारावीपर्यंत..! अभ्यासामध्ये हुशारही होते.. म्हणशील तर शिकेन मी पुढे.. शहरातल्या मुलींप्रमाणे राहायलाही शिकेन...
सांग ना तू काय कमी आहे माझ्यात..?? मी बदलेन स्वतःला... "
- ती.
" तुझ्यात काहीच कमी नाहीये अगं.. "
- तो.
"... मग काय प्रॉब्लेम आहे..??
अरे मनाने मी केव्हाच तुझी झालेय.. तू नसतोस इथे तेव्हा तीळ तीळ काळीज तुटत असते तूझ्या आठवणीत.. आत्यासारखेच माझेही डोळे तूझ्या वाटेवर लागले असतात.
तू नसशील तर मी केवळ शून्य आहे मोहन.. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत..
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर...! "
स्वतःच्या भावना ती त्याच्यासमोर ठेवत होती...
" पण माझं प्रेम दुसऱ्या कुणावर तरी आहे.. "
तिचे बोलणे मध्येच तोडत तो म्हणाला.
शालिनी सुन्न होऊन खुर्चीवर बसली...
इतके दिवस तिचा वाटणारा मोहन तिचा नव्हताच मुळात.. काय बोलावे तिला कळेना.
" केव्हाचं तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी...
खूप प्रेम आहे गं माझं तिच्यावर... नाही जगू शकत मी तिच्याशिवाय...
सर्व ऐश्वर्य सोडून ती माझ्यासोबत आली ... मुंबईला..
कसं दुखावू तिला..?? "
तिच्यासमोर बसून तो सांगत होता..
" विश्वासघात केलास तू मोहन... सगळ्यांचाच..."
ती म्हणाली.
"... नाही गं. मी सांगणारच होतो.. पण आईचं आजारपण आलं मध्ये..
आई सगळं ऐकते ना तुझे... तू सांग ना आईला.. "
तो पुढे म्हणाला.
"... अरे आत्यानी केव्हाच मला सून म्हणून स्वीकारलंय..! आता ती फक्त वाट बघतेय आपल्या डोक्यावर अक्षता पडण्याची..
काय सांगू मी तिला..? आणि तेही तिच्या ह्या अवस्थेत.. नाही जमणार मला.. "
ती म्हणाली.
" आमचं बाळ वाढतंय सोनियाच्या उदरात... "
तो अगतिक होऊन म्हणाला.
" तूझ्या चुकीची शिक्षा मी आत्याला भोगू देणार नाही.. "
तीही ठाम होती.
" तुला मी नवऱ्याचं सुख कधीच देऊ शकणार नाही... "
तो म्हणाला.
"... नकोय मला.. तुझ्याशी लग्न मी केवळ आत्यासाठी करेल.. "
-ती.
"... आमचं बाळ केव्हाही या जगात येईल अगं.. "
- तो.
" मी बनेल ना त्याची आई...! प्रेमाने करेन सगळं... "
- ती.
" आणि सोनिया..?? तिचं काय..? " त्याचा स्वर कातर झाला होता.
" ती जाईल ना तिच्या घरी... श्रीमंत आहे ती. आपल्यासारखी नाहीय. तसही तिच्या घरच्यांना तिचं बाळ नकोय...
तिला ते सहज परत स्वीकारतील.. "
-ती.
" खूप हळवी आहे गं ती.. नाही जगू शकणार माझ्याशिवाय... "
त्याच्या डोळ्यातले थेंब गालावर ओघळले.
"... आणि आत्या....?? ती जगेल तुझ्याशिवाय..??
अरे तुझी बायको म्हणून ती माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीची कल्पनाही करू शकत नाही..
ती सहन करेल हा एवढा मोठा धक्का..?? "
ती त्याला विचारत होती.
"... काय करू गं मी..?? सगळीकडून कोंडी झालीय माझी... "
तो आता अक्षरशः रडायला लागला.
"... मोहन शांत हो ना.. हे बघ आताच्या घडीला आत्या महत्वाची आहे आपल्यासाठी.. तिची तब्येत नाजूक आहे. तिच्या समाधानासाठी करूया ना आपण लग्न..
काय माहित त्यानंतर कदाचित बरीही होईल ती.. तेव्हा सत्य सांगू आपण. हवं तर मोकळं करेन तुला आपल्या नात्यातून मी.. मग तू कर सोनियाशी लग्न..! "
ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
" एवढं सोप्प आहे का गं हे.. "
तिच्याकडे बघत तो म्हणाला.
" नक्कीच नाही...! पण आपण करू ना सोपं..
मोहन माझी आई मी लहान असतांना वारली तेव्हा आत्यानं मला आईचं प्रेम दिलं. आई गेली रे माझी पण मला तिची कधी आठवनही येऊ दिली नाही आत्याने...
आता आईसारख्या आत्याला नाही गमवायचेय मला... "
त्याचे डोळे पुसत ती म्हणाली.
" ... सोनियाशिवाय माझ्या आयुष्यात मी दुसऱ्या मुलीची कल्पनाही नाही करू शकत गं.. "
तो म्हणाला.
"... विश्वास ठेव... तुझी बायको बनण्याचा मी कधीच प्रयत्न करणार नाही... आपलं लग्न केवळ लोकांना दिसण्यासाठी असेल.. "
तिनं त्याला आश्वस्त केलं...
" आता जाते मी बाहेर... नाहीतर सगळ्यांना वाटेल की लग्नाची बोलणी झाल्याबरोबर मी तुझीच झाले..!"
हसून बोलत ती बाहेर जायला निघाली...
तसा त्यानं तिचा हात पकडला...
अन् एक घट्ट मिठी मारली...
.
.
.
.
क्रमश :
************************************
खरंच असेल का हे एवढं सोप्प...??
वाचा पुढील भागात...
आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा