प्रीती... भाग -8

प्रेम.. तडजोड... नात्यातील गुंतागुंत उलगडणारी कथामालिका... प्रीती..

( मागील भागात आपण पाहिलं... मोहन आणि सोनियाचा चाळीतील दहा बाय दहाच्या रूममध्ये सुरु झालेला संसार....

आता पुढे.... )




मोहन कामाच्या शोधात निघाला...

सोनिया घरी एकटीच होती... तिला घरच्यांची खूप आठवण येत होती.. आपला निर्णय चुकला तर नाही ना असं राहून राहून सारखं तिच्या मनात येत होतं.पण आता तो बदलता येणार नव्हता..
परखड स्वभावाच्या आईसाहेब, तिचा प्रत्येक शब्द झेलणारे तिचे लाडके आप्पा.. रजत , विश्वासदादा, वीरेन दा...
किती आनंदी कुटुंब होतं.. त्यांचं ते बंगलावजा टोलेजंग घर.. तिची ती स्पेशल रूम... सारं काही डोळ्यासमोर तरळत होतं तिच्या..
आणि मग तिनं ह्या आपल्या संसाराकडे पाहिलं... दहा बाय दहाची खोली.., दोन चार भांडी.., झोपायला चटई...!
" का मी सारे ऐश्वर्य सोडून आले...?
अजून जन्मालाही न आलेल्या बाळासाठी का मी माझी सर्व नाती तोडली..? "
ती स्वतःलाच विचारत होती.
उत्तर एकच होतं..
" बाळ.. माझं बाळ..! "
बाळाची चाहूल लागताच तिच्यातील आईपण जागं झालं होतं. मातृत्वाच्या भावनेने सर्व नाती तिने पणाला लावली होती..
"...पण मग आईसाहेब.. त्या देखील तर एक आईच आहेत ना... त्या का नाही समजू शकल्या माझ्या मातृत्वाला..? "
ती स्वतःलाच विचारत होती...
विचारानेच तिच्या डोळ्यात पाणी आलं... पण घेतलेला निर्णय बदलण्यासारखा नव्हताच आता... तिने डोळ्यातील पाणी डोळ्यातच रोखलं..
.
.
... टक.. टक..
दारावरच्या थापेने ती वर्तमानात परतली.. मोहन आला होता. तिने त्याला पाणी दिले.. त्याचा चेहराच सांगत होता की त्याला काम नाही मिळालं.. तिने  त्याच्यासाठी चहा टाकला..
... एक आठवडा असाच गेला... काम शोधण्यात...
आणि एका सायंकाळी तो आला.. पेढ्यांचा पुडका घेऊनच... आल्या आल्या त्यानं सोनियाला उचलून एक गिरकी घेतली..
" अरे हो हो.. कळलंय मला.. काम मिळालं ना..! "
तिने आनंदाने विचारलं.
" हो अगं.. "  तिला पेढा भरवत तो म्हणाला..
तिनेही त्याला भरवलं.
" चल मग आज कुठेतरी बाहेर जाऊ.. मस्त फिरून येऊया.. "
तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
ती त्याच्याकडे प्रश्नार्थक बघत होता.
"  अगं.., उद्यापासून मी जाईल कामाला.. मग तेवढा वेळ नसेल माझ्याकडे.. म्हणून आज जरा एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू.. "
तिला समजावत तो.
ती हसली.
" सांग कुठे जायचं..?   त्याचा प्रश्न.
" चौपाटी... "
ती नकळत बोलून गेली...
दोघे मस्त फिरायला गेले.. नारळ पाणी.. फुटाणे..
ती खूप खूष होती.. अनवाणी पायाने रेतीतून चालतांना होणारा पाण्याचा स्पर्श.. तिला खूप मज्जा वाटली.
घरच्यांसोबत मुंबई फिरायला आली तेव्हा पाण्यात किती मस्त्या केल्या होत्या सगळ्यांनी.. तिला आठवलं. कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येक गोष्टींशी घरच्यांच्या आठवणी जुळल्या होत्या त्या सहजासहजी विसरता येण्यासारख्या नव्हत्या..  ती त्या अथांग सागरात हरवली होती..
" भाऊ गजरा घ्या ना.. सुंदर दिसेल मॅडमला.. "

गजरेवाला मोहनला म्हणत होता.


त्यानेही घेतला आणि लगेच तिला माळलादेखील. त्या सुगंधाने ती सुखावली..
बाहेर खाऊनच रात्री दोघे घरी परतले.
" काय राणीसरकार खुश ना मग..? "
झोपताना तो विचारत होता.
" हो.. मी खुश आहे नी आपलं बाळ पण..
बाळा बाबांना धन्यवाद द्यायचे ना..? "

ती हसत म्हणाली.
" ये काय गं बाबा बाबा म्हणतेस... चांगलं पप्पा शिकव ना.. "   - तो.
"  का रे बाबा चांगलं नाहीये का..? "   - ती.
" आहे गं.. पण पप्पा ऐकायला फार भारी वाटतं मला... "   - तो.
" बरं.. थँक यू पप्पा..!"
ती लाडात येत म्हणाली.. त्याच्या कुशीत केव्हा झोप लागली तिला कळलंही नाही...
.
.
. म्हणता म्हणता चार महिने लोटले .. मोहनचे काम ठीक चालले होते.. सोनियादेखील आता घरातील कामं शिकू लागली होती.. जातांना तो तिला आवरू लागायचा. परत येईपर्यंत ती सायंकाळचं तयार करून ठेवायची. चाळीतल्या लोकांशी जास्त संबंध नव्हते त्यांचे , उगाच कोणाला बोलायला जास्त विषय नको म्हणून.. नाही म्हणायला एक पन्नास साठ वर्षांची स्त्री ... राधा.. होती चाळीत.

तिचं मात्र लक्ष असायचं सोनियावर.
मोहन अधूनमधून गावाला जाऊन येत होता. एकदा कोल्हापूरला गेल्यावर त्याला आप्पासाहेबांबद्दल कळले पण त्याने ते सोनियाला सांगितले नाही.. ह्या अवस्थेत तिला हे सहन व्हायचे नाही म्हणून..
.
.
.
... आता सोनियाला सातवा महिना महिना लागला होता. पोट चांगलेच वर आले होते. गर्भारपणाचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होते... त्यानं तिच्यासाठी त्यानं मस्तपैकी हिरव्या रंगाची साडी आणली. सातव्या महिन्याच्या कराव्ययाच्या कार्यक्रमाचा त्याने घाट घातला..
चाळीतल्या बायका घरी आल्या होत्या.. मोहनने रूम मस्त सजवली होती. सोनिया तयार होऊन आली.
गोऱ्या देहावर हिरवीकंचं साडी.., हातात हिरवा चुडा.., चेहऱ्यावरचे तेज.. जास्त न नटताही ती खूप सुंदर दिसत होती... पाच सवाष्णींनी तिची ओटी भरली.. ती खूप आनंदी होती..!

एक नजर तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद टिपत होती.., ती होती राधा.. दुरूनच ती हा आनंदसोहळा बघत होती. सोनियाने तिच्याकडे पहिले तशी तिने आपली नजर चोरली..
" राधा मावशी.. अगं ये ना.. तू देखील भर ना माझी ओटी.. "
सोनियाने तिला बोलावलं तशी इतर बायकांमध्ये कुजबुज होऊ लागली..
" तिला गं कशाला बोलावतेस... नजर बघितली का तिची.. "
- एकजण.
" तीन तीन वेळा गरोदर राहिली.. पण तिन्ही लेकरांना पोटातच मारलं तिने... "
- दुसरी.
" ऐन तारुण्यात आपल्या नवऱ्यालाही गिळलं.. "
-तिसरी.
हे सगळं ऐकून राधा बाहेर जायला वळली. तेवढ्यात सोनियाने तिचा हातनाही ला आणि तिला सर्वांच्या मध्ये आणलं..
" बघा हिच्या डोळ्यात...
काय वाईट दिसत आहे तुम्हाला त्यात..?? मला तर फक्त आणि फक्त प्रेमच दिसत आहे... तिची लेकरं पोटातच गेली ह्यात तिची काय चूक होती? मातृत्वासाठी तीदेखील आसूसली असेल न मग तिची नजर वाईट कशी होऊ शकते..?
मावशी तू भर गं माझी ओटी... मला काहीच हरकत नाहीये.. "
सोनियाने सर्वांदेखत तिच्यासमोर ओटी भरायला आपल्या साडीचा पदर पसरला.
राधाच्या डोळ्यात पाणी आलं.
" पोरी... पांढऱ्या पायाची म्हणून आजवर कोणीही माझ्याशी नीट बोलले नाही ह्या चाळीत. घरच्यांनी देखील माझ्याशी नातं तोडले पण तू कोण.. कुठली.. मला मात्र मावशीची जागा दिलीस. हेच खूप आहे माझ्यासाठी.. पण मला माफ कर. माझ्यामुळे तूझ्या लेकराला काही होण्यापेक्षा मी नाहीच भरणार तुझी ओटी..."
आपले डोळे पुसत राधामावशी म्हणाली.
" नाही गं मावशी काहीच होणार नाही बघ.. हवं तर माझा हट्ट समज पण तुझ्यासमोर पसरलेला पदर रिकामा नको ठेवूस.. भर माझी ओटी.. "
सोनिया पुन्हा म्हणाली...
" पस्तावशील गं बाई एक दिवस तू.. "
" भलाई चा तर जमानाच नाही राहिला आता.. "
एक ना दोन पुन्हा बरेच काही कुजबुजत तिथून सगळ्या बायका निघून गेल्या..
उरले फक्त तिघेजण... मोहन, सोनिया आणि राधामावशी...
सोनियाने आपल्या हट्टाने तिला ओटी भरायला भाग पाडले.. भरल्या डोळ्यांनी मावशीने तिचा हट्ट पूर्ण केला. सोनिया आणि मोहनने आग्रहाने तिला आपल्याकडेच जेवायला बसवले.
" आई गं ss... "
जेवतांना सोनिया कळवळली.
" काय झालं..? पोटात दुखत आहे का? "
काळजीने राधा मावशीने विचारलं. अपराधीपणाचे भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
" काही नाही गं.. हे लबाड बाळ पाय मारतंय म्हणून दुखलं जरा."
ती हसून म्हणाली.
" आं ss.. "
पुन्हा ती कळवळली. आता राधाच्या चेहऱ्यावर एक उत्सुकता होती.. तिच्याही नकळत सोनियाने तिचा हात आपल्या पोटावर ठेवला.. अजून बाहेरही न आलेल्या बाळाच्या स्पर्शाने राधा मोहरून गेली.
" बाळा.. ही तुझी राधाआजी.. "
सोनिया म्हणाली...
राधा तिच्याकडे बघतच राहिली..
" काय बघतेस गं असं..? "
सोनियाने विचारले.
" सोनिया बाळा.. कसं सांगू तुला आता काय चालेलंय माझ्या मनात..
आज पर्यंत मला स्वतःलाच वाळीत टाकल्यासारखे वाटत होते.. पण आज तू मला एक नव्हे दोन दोन नात्यांमध्ये बांधलंस..
खरचं.. आता असं वाटतेय की कुणाचीच नजर ना लागो ह्या बाळाला..! "
डोळ्याचं काजळ तिच्या पोटाला लावत राधामावशी बोलली...
दोघींनी एकमेकींना मिठी मारली.
" अरे.. अरे.. मला विसरलात का..?? मीदेखील इथेच आहे.. "
हसत त्यांच्या मिठीत जॉईन होत मोहन म्हणाला...
.
.
.
... आता आठवा महिना सुरु झाला होता. डॉक्टरांनी जरा जास्तच काळजी घ्यायला सांगितली.. राधामावशी होती सोबत त्यामुळे तेवढी काळजीची गरज नव्हती. सर्व मजेत चालले होते. मोहन कामावर गेला की सोनियाला मदत करायला ती यायची. तिला चांगलंचुंगल खायला आणायची.. दोघींचे चांगलेच गुळपीठ जमले होते..
एकदा कामावरून घरी परतताना नेहमीप्रमाणे मोहनने गावाकडे फोन केला... आणि फोनवर त्याने जे ऐकले त्याची पायाखालची जमीनच सरकली.. त्याच्या आईला ऍडमिट केले होते.. परत तिला अटॅक आला होता..
तो घरी आला ते टेन्शनमध्येच.
सोनियाने दहा वेळा विचारल्यावर त्याने काय झालं ते सांगितले.
" अरे.. मग जाऊन ये ना तू एकदा.. "
तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं..
" सोनिया अशा अवस्थेत तुला सोडून कसा जाऊ..?? "
त्याच्या डोळ्यात पाणी होते.
" दोन दिवसांचा तर प्रश्न आहे अरे .. आणि राधामावशी आहे ना सोबतीला.. तिला रात्रीचं बोलवत जाईल झोपायला.. "
ती म्हणाली.
" खरंच नक्की जाऊ...?? तू सांभाळशील स्वतःला.. ?? "
तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
" हो रे नको काळजी करू तू. सांभाळेन मी...! "
.
.
.
"....राधामावशी काळजी घेशील गं सोनियाची... " आपली ट्रन्क घेऊन तो निघाला.


त्यानं पुन्हा एकदा सोनियाला घट्ट मिठी मारली आणि तिच्या पोटाची पापी घेतली.
" बाळा येईल मी लवकरच.. "
तो म्हणाला..

आणि निघाला..

सोनिया आणि राधामावशी कितीतरी वेळ  जाणाऱ्या



त्याच्याकडे बघून हात हलवत होते...

.

.

.

क्रमश : ....


********************************************

कसा वाटला आजचा भाग... नक्की कमेंट करा आणि आवडल्यास like ने share करा..

ही कथामालिका शेवटपर्यंत फ्री आहे...

🎭 Series Post

View all