Feb 23, 2024
कथामालिका

प्रीती... भाग - 7

Read Later
प्रीती... भाग - 7


( मागील भागात आपण पाहिले मोहन आणि सोनिया मुंबईला यायला निघाले ....     आता पुढे.....)


                 *********************************

.

.

.
" ... सोनिया... झोपली काय...?? उठ अगं.. !

उतरायचं आहे आपल्याला... "
विचारांच्या गर्तेत केव्हा डोळा लागला , तिला कळलंच नाही. मोहनच्या आवाजाने ती जागी झाली.
" पोहचलो आपण..? "

किलकिल्या नजरेनं आजूबाजूला बघत तिने विचारलं.
" हो... चल ये. अगं जरा सावकाश.... " त्याने तिचा हात पकडला..
इतका वेळ प्रवासाने अंग अकडल्या सारखे झाले होते. खाली उतरल्यावर मोकळ्या हवेत तिलाही थोडं मोकळं वाटलं. अंग झटकलं. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते.. त्यालाही भूक लागली होती.. तिथल्याच वडापाव सेंटर वर दोघांनी भूक भागवली.. मित्राच्या रूमवर पोहचे पर्यंत चांगलीच रात्र झाली होती..
.
.

टक...  टक...
मोहन नी दार वाजवल. पाच एक मिनिटांनी एका किडकीडीत देहयष्टी च्या तरुणाने दरवाजा उघडला.
" मोहन्या लेका ये.. "
त्याला मिठी मारत तो म्हणाला. तिच्याकडे लक्ष गेल्यावर तिलाही नमस्कार करून त्यानं आत बोलावलं.
" सोनिया ओळख करून देतो.. हा विक्या म्हणजे विकास.. माझा शाळेतील मित्र. तीन वर्षापासून इथंच मुंबईला असतो...
आणि विक्या ही.. "
मोहनचे बोलणे मध्येच तोडत विक्या म्हणाला ,

".. आणि ह्या सोनिया. माझ्या वाहिनी...
नमस्कार वहिनी.. संकोच करू नका. आपलंच घर समजा... "
तो आपली बत्तीशी दाखवत हसला. तिला त्याचे वागणे फारसे काही आवडले नाही. पण तरीही तिने त्याच्याकडे बघून स्मित केले.

आत येऊन ती घर न्याहळू लागली. घर...?? त्याचे घर म्हणजे साधी दहा बाय दहा ची छोटीशी खोली होती. आपल्या आणखी एका मित्रासोबत विकास तिथे राहत होता. हे येणारेत म्हणून त्यानं त्याला दोन दिवसांसाठी दुसरीकडे पाठवलं होतं.
तिने चौफेर नजर फिरवली. बेडवर त्याचे कपडे विखूरले होते.. सिंकमध्ये खरकटी भांडी पडली होती. सगळीकडे एक कुबट वास पसरला होता. हे सगळं बघून परत तिला मळमळायला झालं. बाजूच्या मोरीत ती ओकायला लागली. सर्वांग घामाने भिजले.
" सोनिया.. काय होतेय तुला..?? तू ठीक आहेस ना? "
पाठीवर हात फेरत त्यानं विचारलं.
" नाही रे.. ! मला खूप घाबरल्यासारखं होतंय. श्वास दाटतोय माझा... "
ती डोळे मिटत म्हणाली.
" वाहिनी.. पाणी घ्या. थोडं बरं वाटेल.. "
विकासनं तिच्या समोर पाण्याचा ग्लास धरला.
पाणी प्यायला ग्लास पकडला तिने.. पण त्या ग्लासाच्या वासाने पुन्हा तिला उलटी झाली.
तिची अवस्था बघून मोहन पुरता घाबरून गेला.
" मोहन्या... प्रकरण साधं दिसत नाहीये. वहिनीला ताबडतोब दवाखान्यात न्यायला पाहिजे.. "
विकासनी सुचवले.
पंधरा मिनिटांच्या अंतरावर एक छोटा दवाखाना होता. कसेबसे दोघे तिला तिथे घेऊन गेले. डॉक्टरने तिला एकवार वरून खालपर्यंत न्याहाळले. तिच्या  अंगावर लग्नाची एकही खुणगाठ नव्हती. प्रकरण काय आहे हे तो समजून गेला.
" खाली करायचं आहे का..?? "
त्यानं विचारलं.
" हं.. " त्याच्या बोलण्याचा रोख तिला कळला नाही. ती थोडी गोंधळली.
" पोट खाली करायचं आहे का..??
साफ करायचं आहे का?? " डॉक्टरने पुन्हा विचारलं.
आता तो काय बोलतोय याचा तिला अंदाज आला. तिला खूप राग आला पण स्वतःला सांभाळलं कसतरी.
"... नाही. श्वास घ्यायला त्रास होतोय.. सारखं मळमळतय म्हणून आलो आम्ही. काहीतरी चांगले औषध दया.. "
तिच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेवत मोहन म्हणाला.
डॉक्टरने तिला चेक केले.
" बीपी लो झालंय. उलट्यामुळे डीहायड्रेशन पण झालेय. ऍडमिट करावे लागेल... " - डॉक्टर.

मोहन आणि विकास एकमेकांकडे पाहत होते.
" काय करताय बोला पटकन.. दवाखाना बंद करायची वेळ झालीय... " -डॉक्टर.
" तात्पुरत्या उलटी थांबायला गोळी आणि ग्लुकोज पावडर दया ना. ऍडमिट व्हायला सकाळी येतो... "
सोनियाने ती वेळ मारून नेली.
डॉक्टरने मग काही गोळया आणि पावडर लिहून दिले आणि इमरजन्सी पेशंट म्हणून दुप्पट फी वसूल केली..

.

.

गोळी घेतल्यावर तिला थोडं बरं वाटायला लागलं. आता आरामाची गरज होती. एवढ्याशा खोलीत तिघे कसे झोपायचे..?? ती संकोचली. विकासने तिच्या मनाची अवस्था हेरली.
" वहिनी संकोचू नका.. आता दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही झोपा बेडवर.. आम्ही दोघे खाली पडतो.. "
त्यानं तिला आश्वस्त केले.
बेडवरचा पसारा सरकवून तिने अंग टाकले.. मिटल्या डोळ्यासमोर तिला दिसत होते तिचे आप्पा.. ! मुंबईला फिरायला आले तेव्हा त्यांनी बुक केलेली आलीशान हॉटेल मधील ती महागडी रूम... ! आप्पानच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले..
कितीतरी वेळानंतर ती झोपी गेली...
सकाळी जाग आली ती भांड्यानच्या आवाजाने .. किलकिल्या नजरेनं तिने पाहिलं. सिंकमध्ये मोहन भांडी विसळत होता..
" तू का भांडी घासतोस..?? आणि विकास कोठे आहे..?? "
तिने विचारलं.
" अगं.. तो भाजी घ्यायला गेलाय. आणि आता आपण इथे राहतोय तर एवढं करायलाच हवं ना.. "
तो हसत म्हणाला.
" हो अरे.. ! पण मला उठवायच ना. मी तूला मदत केली असती. "
-सोनिया.
" नको गं.. आधीच अशक्तपणा आलाय तूझ्यात. थोडा आराम कर तू.. "
खोलीतील केर काढत तो म्हणाला.
" ठीक आहे रे आता मी. नवीन ठिकाणी जुळवायला जरा वेळ लागतो मला.. पण आता ठीक आहे.. "
बेडवरून खाली उतरत ती म्हणाली. उभे राहताना तोल गेलाच तिचा. त्यानं लगेच तिला पकडलं.
" बघ.. म्हणालो होतो ना आराम कर.. आता पडली असती तर..?"
तो थोडया जरबेनं म्हणाला.
" कशी पडणार...? तू आहेस न सावरायला मला. .. "
त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली. त्यानेही तिला घट्ट पकडलं.
" हं s हं s ! मी आलोय.. "
घसा खाकरत आत येत विकास म्हणाला. तसे दोघे बाजूला झाले.
" अरे वा.. ! घर अगदी चकचकित दिसतेय... नक्की मी माझ्याच घरात आहे ना..? " तो म्हणाला.
सगळे हसायला लागले. वातावरण थोडं हलकं झालं. ती फ्रेश व्हायला निघून गेली..
चहा झाला. स्वयंपाक देखील मोहन विकासनी मिळून बनवलं. जेवण आटोपले. तिला आता थोडं बरं वाटत होतं.
" तू आराम कर.. आम्ही बाहेर जाऊन येतो.. " - मोहन.
" कुठे..?? " - सोनिया.
" अहो वहिनी... तिकडे समोरच्या गल्लीत एक खोली रिकामी होती.. ती बघून येतो.. तुम्ही आराम करा बिनधास्त.. मी बाहेरून कुलूप लावून घेतो. "

- विकास.
दोघे बाहेर पडले. आत ती एकटीच होती. बाहेरून कुलूप असले तरी तिने आतूनही कडी लावली. कालपेक्षा आज थोडं बरं वाटत होतं. सिंकमधील भांडी तिने कशीबशी विसळली. कामाची सवय नव्हती तिला. त्यात तिचा बराच वेळ गेला. मोहन कसा काय करतो सगळं फटाफट तिला प्रश्न पडला. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन ती निजली...
पलीकडल्या चाळीत खोली आहे म्हणून विकास मोहनला घेऊन गेला खरा, पण ती चाळ बऱ्यापैकी दूर होती. जायलाच एक तास लागला. बऱ्याच शोधाशोधी नंतर एक खोली त्यांना मिळाली.मालकाने सहा महिन्यांचा किराया आगाऊच मागून घेतला. मोहनच्या खिश्यातील शिल्लक थोडीच उरली...
तीन एक तासांनी दोघे परतले. सोनियाने चहा टाकला.
" मिळालं का घर...?? "
तिने प्रश्न केला.
" हो, मिळालं. ऊन कमी झालं की निघूया आपण... " - मोहन.
आपण आपल्या घरी जातोय म्हणून ती आनंदात होती. किमान असं कोंदट वातावरण तरी नसेल तिथे... तिने मनात म्हटलं.
.
.
.
"... आपल्या राजमहालात आपलं स्वागत आहे राणीसरकार... ! "
तिच्यावर फुलांच्या पाकळ्या उधळत त्यानं हसून तिचे स्वागत केले.
" मोहन... ! तू सोबत असलास की कोणतंही ठिकाण माझ्यासाठी राजमहालच असेल. तू मला सोडून जाणार तर नाहीस ना..?? "
त्याला मिठी मारत सोनिया म्हणाली.
" नाही गं राणी... मी कायम तुझ्यासोबतच आहे... " तिच्या मस्तकावर आपले ओठ टेकवत तो म्हणाला..
" चला.. आपला संसार लावूया..."
असं म्हणत त्यानं तिला उचलून धरलं.
सामान लावून झाले.. हुश्श करत तिने आपल्या राजमहालावर एक नजर टाकली. ही खोलीही विकासच्या खोलीप्रमाणे दहा बाय दहाची होती. तिथेच त्यांचं बाथरूम आणि किचनदेखील. बेड म्हणून चटईवर अंथरलेली चादर. दोनचार भांडीकुंडी.. एक पितळेचा स्टोव्ह.. बस्स.. ! एवढाच त्यांचा संसार.. !!

मनात कुठेतरी घरची आठवण येत होती.. आईसाहेब , आप्पांना दुखावल्याचं शल्य टोचत होतं. पण पोटाकडे नजर गेली आणि सारंच ती विसरली.
"... बाळा... तुझ्याचसाठी चाललंय हे सगळं... ! "
ती म्हणाली.

मोहनने मागून तिला मिठी मारली.. तशी ती भानावर आली. मानेवरचे तिचे केस त्याने बाजूला सारले.त्याच्या स्पर्शाने शहारली ती. आपोआपच तिचे डोळे मिटले. तो हसला.. मिश्किलसा.
" सोनिया डोळे उघड... "
बाजूला होत तो म्हणाला.
तिच्या गळ्यात त्यानं छोटुसं मंगळसूत्र बांधलं होतं.
" हे रे कशाला ? " तिने नजरेने विचारलं.
" काल बघितली न त्या डॉक्टरची नजर..?? उद्या पुन्हा कोणी काही बोलेल म्हणून असू दे हे गळ्यात.."
तो म्हणाला.
" आता बराच खर्च झालाय. तेव्हा खरंखूरं सोन्याचे नाही घेऊ शकलो मी.. सॉरी... "
तो आपली नजर चोरत होता.
" सोन्याची गरज नाहीये रे मला... तू जे देशील त्यात समाधानी आहे मी.. "
त्याच्या डोळ्यात डोळे घालत ती म्हणाली.
त्यानं तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले.
" खरं अस्सल बावनकशी सोनं तर तूच आहेस सोनिया..
आईची जर तब्येत बरी असती तर तूला लगेच घरी घेऊन गेलो असतो.. तुझी आणि आपल्या बाळाची अशी परवड होऊ दिली नसती.. सॉरी यार.. "

तो मनात म्हणाला. त्याच्या डोळ्यातील अश्रू तिच्या केसावर पडले...
" मोहन... ! होईल ना रे सर्व ठीक...? "
भरल्या नजरेने तिने विचारले..
" हो...! मी आहे ना. नको काळजी करू तू.. ! "
तिला कुरवाळत तो म्हणाला..
"मी आहे ना..." कधीकधी जवळ काही नसतानाही कुणीतरी आपलं आहे आपल्यासोबत.. हा विश्वासही किती महत्वाचा असतो नाही... तिलाही असंच वाटलं.
बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीतच होते....
" मोहन.. " - ती.
" हुं ss " - तो.
" बाळाला भूक लागलीय... " ती लाडात येत म्हणाली.
"कुणाच्या..? " त्याने मिश्किलपणे विचारलं.
" कुणाच्या रे काय...?? आपल्या बाळाला.. " त्याला हलकेच धपाटा घालत ती म्हणाली.
" माफ करा राणीसरकार.. हा सेवक लगेच तुमच्या सेवेत हजर आहे.. "
तिला हाताने मुजरा करत तो म्हणाला.
" गरमागरम भोजन आमच्यासमोर पेश केल्या जावे.... "
तिनेही राणीच्या आवेशात आदेश सोडला..
" जो हुकूम.. " म्हणत तो स्वयंपाकाला लागला. डाळतांदूळ धुऊन त्यानं खिचडी फोडणीला टाकली... गरमागरम जेवल्यानंतर चटईवर त्याच्या कुशीत ती झोपी गेली...
... सकाळी जाग आली तेव्हा मोहन नव्हता जवळ. तिच्या काळजात धस्स झालं.. तिने आजूबाजूला पाहिलं. भांडी घासून उपडी ठेवली होती. स्टोव्हवर चहाचे आधन ठेवले होते.
" आहे तो इथेच कुठेतरी.. " तिने स्वतःला समजावलं..
तेवढयात दोन हातात पाण्यानी भरलेल्या दोन बादल्या घेऊन तो आत आला.
" अरे उठलीस तू..? गुड मॉर्निंग..! " धाप टाकत तो म्हणाला.
" कुठून आणलंस एवढं पाणी? "
आश्चर्याने ती.
" अगं नळ आलेत. दोनच तास असतात. मग पाणी नाही मिळणार. माझी आंघोळ झालीये. तू तुझं आटोपून घे लवकर.. "
चहा गाळत तो म्हणाला. तिने आपलं आवरेपर्यंत त्यानं स्वयंपाकाची तयारी करून ठेवली.
" खूपच उरक आहे रे तूला कामाचा.. " - ती.
" येवढया वर्षांचा अनुभव... लहानपणापासूनच आईला मदत करत होतो ना म्हणून... "
तिच्यासमोर चहाचा कप धरत तो म्हणाला. चहा झाल्यावर परत तो पाणी आणायला गेला. त्यानंतर स्वयंपाकाला लागला. त्याची सुरु असलेली धावपळ ती बघत होती. त्याला मदत करायची तिची इच्छा होती पण काय करायचं तिला कळत नव्हतं. कामाची कधी सवयच नव्हती तिला. घरात नोकरांचा राबता असायचा. त्यामुळे तिचा गोंधळ उडत होता.
" नको टेन्शन घेऊ अगं , सवय आहे मला कामाची... "
तिचा गोंधळ ओळखून तो म्हणाला.
" किती मनकवडा आहेस रे तू... !
पण शिकेल मी हळूहळू.. "
त्याला बिलगून ती म्हणाली.
त्यानं तिला थोपाटलं..
" चला जेऊया आता .. मला जायचं आहे.. " - तो.
" कुठे..? " त्याला घास भरवत तिने विचारलं.
" कुठे काही काम मिळेल तर बघावं लागेल ना राणी.. "
तिला भरवत तो म्हणाला...
त्यांचं आटोपल्यावर आवरून तिला मिठी मारून तो निघाला.
" तू आराम कर.. आणि मी आल्याशिवाय दार उघडू नकोस.. "
तिला सगळं समजावून सांगून तो निघाला....

कामाच्या शोधात....                                                      क्रमश :   ... 


      ******************************************

मिळेल का मोहनला काम..? 

चालेल का सुरळीत त्यांच्या संसाराचा गाडा.... 

कळण्यासाठी वाचा पुढील भाग. 

तोपर्यंत हा भाग आवडल्यास कॉमेंट करा..  share करा आणि मला follow करा. ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//