Feb 25, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -८0

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -८0


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -ऐंशी.

"तुला माहित नाही प्रीत, मला कोल्हापूरला जायची किती ओढ लागलीये. यू आर द बेस्ट. बेस्ट डॉटर फॉरेव्हर!" तिच्या कपाळाचे एक चुंबन घेऊन सोनिया म्हणाली.

"येस आय नो द्याट. आफ्टरऑल मी मुलगी तर तुझीच आहे ना?" तिच्या मिठीत विसावत ती म्हणाली.


"हे कसे आणि कधी शक्य केलेस तू प्रीती?" कोल्हापूर एअरपोर्टवरून सोनिया व्हिला कडे निघताना विरेन प्रीतीला विचारत होता.

"जेव्हा मला कळले हा बंगला आपला राहिला नाही, तेव्हाच तो आपल्या ताब्यात कसा येईल हा विचार मी करत होते. त्यानंतर तेथील नवीन मालक शिरीषशी मी भेटले. सगळी प्रोसिजर व्हायला एक महिना लागला. आणि आता आपला बंगला लीगली आपला झालाय."
ती सांगत होती.

"प्रीती दी, यू आर सिम्पली ग्रेट. लव्ह यू यार." निकी तर जाम खूष झाली होती.

सोनिया आणि मोहन कारमधून बाहेर आले. कोल्हापुरात पाय टाकल्या बरोबर सोनियाची छाती धडधडायला लागली होती. मागे जेव्हा ती इथे आली तेव्हा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. तिला आकस्मिक बसलेला धक्का आणि त्यातच तिचा झालेला अपघात. ते आठवूनच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. आधारासाठी तिने मोहनचा हात घट्ट पकडला.


"सोनिया जे झाले, तो भूतकाळ होता. आता तू तुझ्या वर्तमानात आहेस. आणि वर्तमान हेच आहे की तुमचा बंगला आता तुमचाच आहे आणि तू आत्ता त्याच्यासमोर उभी आहेस." तो तिच्या हातावर हात ठेवून आश्वासक स्पर्शाने बोलत होता.


मोहनने म्हटल्याप्रमाणे खरोखरच ती त्यांच्या बंगल्यापुढे उभी होती. मागे जेव्हा आली तेव्हा बंगल्याचा रंग निराळा होता, त्यावरचे झळाळणारे \"सोनिया व्हिला\" हे नाव देखील गायब होते. आज मात्र नजरेसमोर असणारा बंगला तोच होता, ज्याचे चित्र तिच्या हृदयात कोरलेले होते. ती तिथे राहत असताना बंगल्याची जी रंगसंगती होती, तीच आत्ताही होती. पूर्वी दुरूनच नजरेत भरणारे सोनिया व्हिला हे नाव आताही अगदी तसेच दिमाखाने झळकत होते.

भारावल्याप्रमाणे एकेक पाऊल टाकत ती प्रवेशद्वाराजवळ आली तोच तिला कोणीतरी अडवले.

"सोना बेबी, असं नव्हं, तुम्ही आता तुमच्या हक्काच्या वास्तूत प्रवेश करत आहात, तेही पहिल्यांदा. तेव्हा अंगावरून भाकर तुकडा फिरवल्या शिवाय आत प्रवेश नाही करायचा बरं."

'सोना बेबी' ही हाक ऐकल्याबरोबर सोनियाला पुन्हा भरून आले. "माळी काका, तुम्ही?" तिने भरल्या कंठाने विचारले.

"हो सोना बेबी, मीच. या बंगल्याची मालकीण येत आहे हे कळल्यावर मी तर इथे येणारच ना?" डोळे पुसत महादू म्हणाला.
"गायत्री, अगं बघत काय बसलीस? भाकर तुकडा घेऊन ये की." त्याने आपल्या नातसूनेकडे इशारा केला तशी ती लगबगीने आली आणि तिने सोनियावरून भाकर तुकडा फिरवला. तिचे औक्षण करून तिला ओवाळले.

"छोट्या मालकीण, आता तुम्ही आत या. समद्यांनीच या." बाजूला सरत गायत्री म्हणाली.

मोहनसह सोनियाने आत पाऊल टाकले. त्यांच्या पाठोपाठ इतर मंडळीदेखील आली. त्या काळातील बांधलेली ती वास्तू एखाद्या प्रासादापेक्षा कमी नव्हती. आत प्रवेशून सर्वांचे डोळे दिपले तर या चारही भावांडांचे डोळे पाणावले.

"वॉव! दी किती सुंदर आहे हे सगळं. ईट्स लाईक अ पॅलेस." आनंदाने एक गिरकी घेत निकी म्हणाली.

"येस, ॲब्स्यूल्यूटली करेक्ट!" रॉकीचेही डोळे चमकत होते.
"मग, आपले आजोबा असे तसे नव्हतेच मुळी. त्यांचा बात काही औरच होती, तेव्हा त्यांचा महाल देखील त्याच तोडीचा असेल ना?" प्रीती दोघांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

*******

बंगल्यातील प्रत्येक वस्तूवर सोनियाचा हात फिरत होता. तिथले फर्निचर, तेथील वस्तू.. आजवर सगळं ती मनात जपत आली होती. आज प्रत्यक्षात पुन्हा एकदा ती तिथेच आली होती. ती या घरातून बाहेर पडली तो प्रसंग चटकन तिच्या नजरेसमोर उभा राहिला. याच हॉलमध्ये ती आणि आईसाहेब बोलत होत्या. तेथूनच ती शेवटची बाहेर पडली होती तेव्हा आईसाहेब इथेच तर होत्या.. पाठमोऱ्या!

आत डायनिंग रूममध्ये ती प्रवेशली तसे तिथे आप्पसाहेबांचा भास झाला. त्यांची तिथली ती मुख्य खुर्ची.. अलगद तिचा हात त्यावरून फिरला आणि डोळ्यातून टपोऱ्या मोत्याचा थेंब खाली ओघळला.

'आईसाहेब, आप्पसाहेब..' तिचे मन आक्रंदत होते. प्रीतीने तिच्या मनाचा ठाव घेत तिथे तयार करण्यात आलेल्या आर्टरूमकडे ती तिला घेऊन गेली. सोनियाच्या डोळ्याचे तर पारणेच फिटले. तिथे त्या दोघांचे पुतळे उभे केले होते.

"माई, आता तुझे आईसाहेब आणि आप्पासाहेब कायम आपल्यासोबत आहेत." तिच्या हातावर प्रेमाने दाब देत ती म्हणाली.
आपल्या लेकीच्या कार्याने सोनियाचा ऊर भरून आला. तिची प्रीती तिच्यापेक्षा एक पाऊल सदैव पुढे होती.550

*******
"दादा, प्लीज. तुम्ही सारे आता इथेच रहा ना. आपण सर्व मिळून राहू. आप्पसाहेबांचा बिझनेस नव्याने सुरू करून पुढे घेऊन जाऊ."

काही दिवस थांबल्यानंतर जायला निघालेल्या विश्वास आणि रजतला सोनिया थांबवत होती.

"नाही सोना, आप्पसाहेबांमधला व्यवसायिकतेचा गुण तुझ्यात पूर्णपणे उतरला आहे. आमच्याच्याने ते कधीच शक्य झाले नाही. आप्पसाहेबांची खरी वारसादार तूच आहेस. तूच आता इथे रहा आणि यशाने पुढे जा." तिला आपल्या मिठीत घेत विश्वास म्हणाला.

"दादा योग्य तेच बोलतो आहे सोना. तसाही विदेशात आमचा जम बसलाय. तिथून बाहेर पडता येणं शक्य नाही पण आता दरवर्षी आम्ही हक्काने कोल्हापूरात येत राहू." रजत तिला प्रेमाने कुरवाळत म्हणाला.

दोघांचे कुटुंबीय पूर्ण एक महिन्यासाठी भारतात आले होते आता त्यांना त्यांच्या ठिकाणी परत जाणे अनिवार्य होते. भरल्या कंठाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला त्याचबरोबर वर्षातून किमान एकदा तरी भेटायचे वचनही दिले.


"सोना, आता आम्हालाही निघावे लागेल." एकेदिवशी विरेन सोनियाला म्हणाला.

"विरेन दा, तूही जायची गोष्ट करतोस? तू तरी थांब ना इथे." सोनिया भावनिक होऊन म्हणाली.

"सोना, अशी इमोशनल नकी होऊ ना. आता निकीचे कॉलेज सुरू होईल. आधीच तिने तिकडे घोळ घालून ठेवलाय, तो निस्तारायचा आहे. आणि मी इथे आपल्या भारतातच आहे की, कोल्हापूरला काय कधीही येऊ शकतो. आता तेवढं जाऊ दे."

"हो आत्तू. बाबा बरोबर बोलतोय. माझे ग्रॅज्युएशन कंप्लिट झाले की तुझ्या हाती काम करायला धावत येते की नाही बघच तू." निकी एखाद्या शहाण्या मुलीसारखी बोलत होती.

"म्हणजे त्यापूर्वी कधी येणारच नाहीस काय?" प्रीती तिला टपली मारत म्हणाली.

"नाही गं दी. तशी तर येत राहणारच की. अशी सोडणार थोडीच आहे. " प्रीतीला मिठी मारत निकी म्हणाली.
दोघी बहिणींचे प्रेम उतू जात होते.

********

दोन वर्षानंतर…


"वॉव! धिस इज ब्युटीफुल! इज धिस फॉर युअर गर्लफ्रेंड?" एक मधुर स्वर कानावर पडला तसे त्याने मान वळवून बघितले.

"नो, नॉट फॉर गर्लफ्रेंड, माझ्या होणाऱ्या वाइफसाठी आहे." एक डॅशिंग तरुण स्मित करून सांगत होता.

ओह, महाराष्ट्रीयन? आम्ही सुद्धा महाराष्ट्रातील आहोत." हसून ती स्त्री म्हणाली. अंदाजे पंचेचाळीस वर्षांची ती स्त्री, पण वेल मेंटेन्ड अशी दहा वर्षांनी लहानच वाटत होती.

"आम्ही?" त्या तरुणाने आश्चर्याने विचारले.

"हो आम्हीच. मी आणि माझे पती." तिने बाजूलाच असलेल्या आपल्या नवऱ्याकडे बघून इशारा केला.
तिच्यासोबत असणाऱ्या पुरुषाला बघून तो तरुण थोडासा बुचकाळ्यात पडला.

"मला वाटते, मी यांना यापूर्वी कुठेतरी बघितले आहे." तो तरुण काहीसे आठवत म्हणाला. तोवर तो पुरुष त्या दोघांजवळ येऊन पोहचला.


"मीट माय हजबंड डॉक्टर अनिकेत साठे." तिने ओळख करून दिली.
"आणि ही माझी बिलव्ह्ड वाईफ डॉक्टर सुमती साठे." तिच्या कमरेत हात टाकून स्वतःजवळ ओढत डॉक्टर साठे म्हणाले.

"अनी, काय हे?" त्याच्यापासून दूर होत म्हणाली.
"सुमी तू आहेसच माझी लाडाची बायको, मग तुला दूर कसे ठेऊ?" डोळे मिचकावत ते म्हणाले.

"डॉक्टर साठे म्हणजे द ग्रेट गायनॅकॉलॉजिस्ट डॉक्टर अनिकेत साठे ना? तरीच तुम्हाला बघितल्यासारखे वाटत होते. कालच्या न्यूजपेपर मध्ये तुमचीच तर मोठी बातमी होती." तो तरुण म्हणाला.

"हो, त्यांच्या कामासाठी बेस्ट डॉक्टर म्हणून इथल्या असोसिएशनने स्पेशल अवॉर्ड सेरेमनी आयोजित केली होती त्यासाठीच आम्ही आलेलो होतो." सुमी हसून म्हणाली.

"येस, मी वाचलेय ते. हार्टली काँग्रॅच्यूलेशन्स सर." त्यांचे हात शेक करत तो म्हणाला.

"थँक यू यंग मॅन. पण तुम्ही कोण आहात ते आम्हाला कळेल का?" डॉक्टर साठेंच्या ओठावर मिश्किल हसू होते.

"हो, ते राहिलेच. मी कृष्णा. कोल्हापूरचा आहे. आयपीएस ट्रेनिंग साठी दोन वर्षापासून इथेच हैद्राबादला होतो. आता जस्ट ते संपलेय आणि पुढच्याच आठवड्यात माझे लग्न आहे. त्यासाठी मी होणाऱ्या बायकोला रिंग घ्यायला या शॉप मध्ये आलोय. हैद्राबादचे हिऱ्यांच्या ज्वेलरीसाठी फेमस ठिकाण हेच आहे ना." कृष्णा मोठया उत्साहाने बोलत होता.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

काय? सरप्राईज्ड ना? प्रीती संपत आलीये तर वाटलं मागच्या वर्षी तुम्हाला भेटलेल्या आपल्या अनी आणि सुमीला परत एकदा भेटून घ्यावे. जे माझे नियमित वाचक आहेत ते या दोघांना ओळखतातच, पण जे ओळखत नाहीत त्यांनी माझी पारिजात कथा नक्की वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.
धन्यवाद!


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//