प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४१

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -एकचाळीस.

"प्रीती आणखी एक सांगायचे होते, दोन दिवसांनी एक मिटिंग आहे, ती तुला अटेंड करायची आहे."

"मी? पण का अंकल? तुम्हीही करू शकता ना."

"नाही, जोपर्यंत सोनिया बरी होऊन इथे येत नाही, तोपर्यंत इथले महत्त्वाचे कामकाज तुलाच हाताळावे लागतील."

"पण अंकल.."

"आता पण नाही नि बिन नाही. बी प्रिपेअर आणि सोनियाची मुलगी आहेस हे सिद्ध करून दाखव." तो.

"येस अंकल, आय विल डू इट." ती म्हणाली.

मिहीरने स्मित करून तिच्या हातावर विश्वासाने आपला हात ठेवला.

******

"निकी, बरी आहेस ना गं? काय झाले होते तुला? मी आल्या आल्या राधाईने सकाळचा प्रकार कानवर घातला तशी सर्वात आधी तुझ्याकडे आले."
घरी परतल्यावर निकीला भेटून प्रीती काळजीने विचारत होती.

"नथिंग." निकी लहानसा चेहरा करून उत्तरली.

"मग चेहरा का उतरलाय तुझा?" प्रीती.

"दी, आय एम सॉरी." निकी.

"का पण?"

"मी सकाळी हॉलमध्ये फिरत होते तर कुतूहलाने तुझ्या माईच्या रूममध्ये डोकावले आणि मग घाबरून किंचाळले." खाली नजर करून ती.

"निकी, तू माईला बघून घाबरलीस? माझ्या माईला बघून कोणी कसा घाबरू शकतो?" प्रीती.

"नो.. नो. दी, प्लीज चुकीचं समजू नकोस. मी तर त्यांचा चेहराही नाही बघितला. तू नेहमीच त्यांचं कौतुक करत असतेस म्हणून तुझी माई आहे तरी कशी? हे मला बघायचं होतं पण तिथला पडदा बाजूला केला आणि त्यांच्या रूममधील त्या मोठमोठ्या मशिन्स, त्यांना लावलेला ऑक्सिजन मास्क.. हे सगळं बघूनच मी घाबरले आणि नकळत तोंडातून किंचाळी बाहेर आली." स्पष्टीकरण देत ती.

"अगं माझे झाशीची राणी, तू तर कधी घाबरत नसतेस ना? आणि तुलाही आयसीयूमध्ये असताना ऑक्सिजन मास्क लावला होताच की." प्रीतीने हसून विचारले.

"हो गं. पण तेव्हा मी बेशुद्ध होते, तर मला कसे माहित ना? शुद्धीवर आले तेव्हा मला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं होतं ना.
आणि दी, निकी खरंच घाबरत नसते पण हॉस्पिटलच्या इन्स्ट्रूमेंटना जाम घाबरते. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो ना." इवलेसे तोंड करून ती.

"मग आता बाहेर फिरणार वगैरे की नाही?" प्रीती.

"फिरेन ना. निकी इज अ स्ट्रॉंग गर्ल! फक्त त्या रूमकडे तेवढी जाणार नाही." तिच्या उत्तरावर प्रीतीने हसून तिच्या डोक्यातून हात फिरवला आणि ती सोनियाकडे गेली.

******

"कशी आहे गं निकी? तुला काही बोलली का ती?" जेवताना राधामावशी प्रीतीला विचारत होती.

"हो गं. माईच्या खोलीतील हॉस्पिटलच्या मशिन्स बघून घाबरली होती, बाकी काही नाही."
प्रीतीच्या उत्तरावर राधामावशीला हसू फुटले.

"राधाई, आज रात्री मी माझ्या आर्टरूममध्ये आहे. कितीवेळ लागेल माहित नाही. तू माईजवळ एकटी राहशील ना?"

"अशी काय विचारतेस, जसे याआधी आम्ही दोघी कधी सोबत राहिलोच नाही. तू तुझे काम बिनधास्त कर पण खूप वेळ जागी राहू नकोस. झोपदेखील आवश्यक आहे ना?" स्वयंपाकघरातील आवराआवर करत राधाई म्हणाली.


सोनियासोबत थॊडा वेळ घालवल्यानंतर काहीवेळाने प्रीती तिच्या आर्टरूममध्ये गेली. ह्या दोन महिन्यात तिला हाती कुंचला घ्यायला जमलेच नव्हते. आज तेथील कॅनव्हास जणू तिच्या हातून होणाऱ्या स्पर्शासाठी आसूसला होता.

प्रीतीने तिला लागणारे सर्व साहित्य एकत्र केले आणि मग डोळे मिटून तिच्या लाडक्या माईचा फोटोतील चेहरा नजरेसमोर आणला. आता तिथे कोणीच नव्हते. ती, तिचा कॅनव्हास आणि तिचा कुंचला!

नेहमी भराभरा फिरणारी तिची बोटे आज संथपणे एका लयीत फिरत होती. अगदी नाजूकतेने ती सोनियाला तिच्या कॅनव्हासवर रेखाटत होती.
तासाभराचा काळ सरला असेल, प्रीती तल्लीन होऊन तिच्या चित्रात हरवली होती.

"वॉव! दी, इट्स ब्युटीफुल! तू आर्टिस्ट सुद्धा आहेस हे ठाऊक नव्हतं मला." निकीच्या आवाजाने प्रीतीची तंद्री भंगली.

"निकी, तू इथे काय करते आहेस?" प्रीतीचा स्वर थोडा चिडलेला होता.

"अगं झोप येईना म्हणून मग नर्सच्या मदतीने व्हीलचेअर बसले होते. ती झोपली, मला इकडे उजेड दिसला म्हणून मग मी इथे आले. सॉरी. तुला डिस्टर्ब तर नाही ना झाला?" ती निरागसपणे विचारत होती.

"हम्म, इथे थांबायचे असेल तर निमूटपणे गप्प रहा नाहीतर आपल्या खोलीत जा." तिच्याकडे वळून न पाहताच प्रीती म्हणाली. तिचे काम सुरूच होते.

निकी तोंडावर बोट ठेवून त्याच खोलीत थांबली. सुई पडली तर तिचा देखील आवाज यावा इतकी शांतता तिथे पसरली होती. प्रीतीच्या बोटांच्या जादूत तीही हरवत होती.भारावल्यासारखी तीसुद्धा त्यात गुंतली होती.


"दी, तिथे डार्क रेड नाही, थोडी मरून शेड आहे." प्रीती केसांच्या पिनांना रंग देत असताना अचानक निकी बोलली.


"ओके." तिचे ऐकून प्रीतीने रंग बदलवला.

"गळ्यातील मोत्याचे पेंडन्ट आहे ना, त्यातील मधला मोती आणखी थोडा ब्राईट कर." तिचे एक ना दोन सजेशन चालूच होते. चित्र रेखाटताना कधी कोणाला मध्ये बोलू न देणारी प्रीती निकीच्या सूचना तंतोतंत पाळत होती.

प्रीतीने चित्रावरून शेवटचा हात फिरवला आणि मग चार पावलं मागे जाऊन चित्रातल्या सोनियाकडे एकटक बघत तिने निकीला विचारले, "नॉऊ हाऊ इट लूक्स?"

"जस्ट परफेक्ट!" तिच्या प्रश्नावर डोळ्याची पापणीही न हलवता निकीने उत्तर दिले.

तिच्या उत्तराने जणू प्रीतीची तंद्री भंगली आणि इतका वेळ न कळलेली गोष्ट तिच्या लक्षात आली.

"निकी, एक मिनिट. मला सांग, ह्या पेंटिंगमधले बारकावे तुला इतके परफेक्टली कसे कळले?" प्रीतीच्या प्रश्नाने निकीही इतका वेळ चित्राशी समरस झालेल्या जगातून बाहेर आली.

"दी, ॲक्च्युअली एक प्रश्न तर मला पडलाय. तू कुणाचे पिक्चर ड्रॉ केलेस? कारण तू जे काढलेस ना तो चेहरा मी माझ्या घरात खूपदा बघितलाय." निकी तिला प्रश्नांकित नजरेने विचारत होती.

"तुझ्या घरात बघितलाय म्हणजे?" प्रीतीने गोंधळून तिच्याकडे पाहिले.

"हो. आमच्या घरच्या एका अल्बममध्ये खूप सारे फोटो आहेत. त्यापैकी हा फोटो बाबाने एनलार्ज करून हॉलमध्ये लावलाय." निकी.

"काय सांगतेस निकी? तू ओळखतेस हिला?" प्रीतीचा गोंधळ तसाच होता.

"हो तर. माझ्या आत्तूचा चेहरा आहे हा. मग मी कसे विसरेन?" निकी.

"निकी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं हा फोटो माझ्या.."

"गैरसमज नाही दी, खरंच ही माझी सोना आत्तू आहे. तिचे खूप सारे फोटो मी पाहिलेत. हे जे तू रेखाटलेस ना तो एक ग्रुप फोटो आहे. त्या फोटोत माझा डॅड, माझा बाबा आणि दुसरे अंकलसुद्धा आहेत. बाबाने तिचा एकटीचा फोटो मोठा करून घरात लावलाय, सो जाता येता दिवसातून कित्येकदा त्याच्यावर नजर पडते म्हणून मला हे बारकावे माहिती आहेत." निकी अगदी कॉन्फिडन्टली बोलत होती.

निकीच्या इतक्या बोलण्यातून 'सोना आत्तू' हा शब्द तेवढा प्रीतीच्या डोक्यात क्लिक झाला आणि तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव पसरले.

"निकी, एकच मिनिट थांब. मी आलेच." प्रीती धावतच तिच्या खोलीत गेली.

कपाटात जपून ठेवलेला फोटो आणून तीने तो निकीसमोर धरला.
"निकी, तू या फोटोबद्दल बोलत आहेस का?" प्रीतीने धडधडत्या अंतःकरणाने विचारले.

"अगं हो, हाच तो फोटो आहे. हे बघ, हा माझा डॅड, हा माझा बाबा विरेन, आणि हा रजत अंकल." ती एकेकावर बोट ठेवून सांगत होती. "आणि ही माझी सोनाआत्तू. तूच नीट बघ, डोक्याची ही पिन मी म्हटल्याप्रमाणे मरून कलरची आहे की नाही?" निकीने प्रीतीकडे बघून विचारले.

प्रीतीचे डोळे पाण्याने डबडबले होते.

"दी, तू का रडते आहेस? माझं काही चुकलं का?आणि हा फोटो तुझ्याकडे कसा?"

"ते सोड, मला तुझ्या आत्तूबद्दल आणखी काही सांग ना." भरल्या स्वरात प्रीती.

"अगं, ती फार गोड होती. म्हणजे मी तिला प्रत्यक्षात बघितले नाही, पण बाबा नेहमीच सांगत असतो. तो तर मलाही म्हणतो की माझे डोळे निळे असते तर मी तिच्यासारखीच दिसले असते."

प्रीती मंद हसली. "आणखी?"

"आणखी काय? हं ती ना लग्नापूर्वीच प्रेग्नन्ट होती, माझी आज्जी जास्तच कडक असल्यामुळे तिला हे काही पटले नाही. मग तिचा रोष ओढवून आत्तू बाळासाठी त्यांचे घर सोडून निघून गेली." तिचा स्वर गंभीर झाला होता.
"बाबा तर मला नेहमीच म्हणतो की राग आल्यावर मी घरातून निघून जाते हा गुण आत्तूकडून माझ्यात आलाय." वातावरण हलके करण्यासाठी ती थोडेसे हसून म्हणाली.

"मग मीच त्याला प्रॉमिस केलं की मी कितीही रागावून घराबाहेर गेले तरी तुझ्याकडे नक्की परत येणार. त्यामुळे मी घरून अशी गेले तरी त्याचा मी येणार आहे हे त्याला ठाऊक असतं.
आत्तूवर त्याचा खूप जीव आहे गं दी. ती तेव्हा माझ्यासारखी घरी परत आली असती तर बरं झालं असतं ना?" प्रीतीकडे एक कटाक्ष टाकून निकी खिन्नपणे म्हणाली.

प्रीती काही न बोलता निकीच्या पायाशेजारी खाली बसली. डोळ्यातून अश्रू नाही म्हटले तरी गालावर आलेच.

"दी, अगं तू नको ना इतकी इमोशनल होऊ. तू अशी रडशील तर मलाही रडू येईल. आणि अशी खाली का बसलीस? तू आधी ऊठ बघू." निकीचा स्वर रडवेला झाला होता.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all