प्रीती.. पर्व दुसरे! भाग -८३(अंतिम भाग.)

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची! (अंतिम भाग.)


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग - त्र्यांशी. (अंतिम भाग.)

"ओये गर्ल्स गँग, इकडे तुमचं काय चाललंय? राधाई तू माझ्या टीममधील होतीस ना गं? मग माईच्या टीममध्ये कधीपासून गेलीस हं? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही दोघी इकडे येऊन रडणार आणि मला कळणार नाही? माई, राधाई शेवटी माझी नाळ डिरेक्टली आणि अनडिरेक्टली तुम्हा दोघींशीच जुळली आहे ना गं? मग मला टाकून का रडताय?"
दोघींना मिठीत घेत प्रीती बोलत होती. त्या दोघी अशा दूर आल्या तेव्हाच तीही त्यांच्या मागोमाग तिथे आली होती.

"आणि माई, सोनप्रीत जोवर आहे ना तोवर तुझी प्रीत तुझीच आहे बरं. तू नको ना अशी हळवी होऊ." तिचा कंठ दाटून आला होता.

"आणि हे काय यार? सर्वांचे लग्न झाले तेव्हा आपण सगळे किती आनंदी होतो, हॅपी हॅपी होतो.आता माझ्या लग्नाची वेळ आली तर तुम्ही दोघीही रडताय. इट इज नॉट फेअर यार. माझ्या लग्नाचे तुम्हाला आनंदच नाही मुळी." नाकावर लटका राग घेऊन ती म्हणाली.

"एय, प्रीत. असे अजिबात नाहीये हं. आपल्या लेकीचे लग्न म्हणजे किती आनंदाची गोष्ट असते म्हणून सांगू? पण तरीही एक मन हळवे होतेच ना गं? काय करू शेवटी आई आहे ना मी तुझी? जेव्हा तुझ्या लेकीचे लग्न होईल तेव्हा तुला माझ्या मनाची अवस्था कळेल." तिला मिठीत घेत सोनिया म्हणाली.

"सोना, आधी तुझ्या लेकीचे लग्न होऊ दे. तिची लेक यायला बराच अवकाश आहे." राधामावशी हसून म्हणाली.


"अरे? काय चाललंय तुमचं? आत्ताच तुम्ही दोघी रडत होतात आणि आता मस्करी करताय. असं कुठे असते का? जा बाबा." तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला.


"अरे, नवरी मुलगी इथे आहे आणि आपणच धिंगाणा काय घालतोय? चला तिलाही घ्या इकडे." माहीने शालिनी कडे इशारा केला. तसे शालिनी तिघींनाही सोबत घेऊन आली. परत एकदा सर्वांबरोबर त्या तिघी हळदीच्या रंगात न्हाऊन निघाल्या.
******

"अम्म..." नाचता नाचता अचानक तोंडावर हात घेऊन स्वीटी पळत तिच्या खोलीत गेली. बेसिनमध्ये उलट्या काढल्यावर तिला जरा गरगरायला लागले.


"स्वीटी, आर यू ऑलराईट?" तिच्या मागोमाग येत समीरने विचारले.

"थोडं अनईझी वाटतेय रे. अजूनही मळमळतंय." ती.

"आपण डॉक्टरांकडे जाऊया का?" काळजीने त्याने विचारले.

"अरे नाही, ते खाण्यात थोडं स्पाईसी झाले ना म्हणून असेल. आपण पुण्यातील असलो तरी जेवताना इथे कोल्हापूरी तडका जाणवला ना. एरवी सहसा खात नाही पण आज मला ते मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह आवरता आला नाही, म्हणून असेल. तू काळजी करू नको. थोडं लिंबूपाणी प्यायले की बरं वाटेल." स्वीटी.

"आर यू शुअर?" तो.

"हम्म." ती.

"ठीक आहे मग, मी लिंबूपाणी घेऊन येतो. तोवर तू इथेच थांब. बाहेर जाऊ नको." असे म्हणून तो किचनकडे गेला.

तिथल्या मेडला सांगून त्याने लिंबूपाणी मागवले आणि तिला नेऊन दिले. तो परत येईपर्यंत तिने पुन्हा एकदा ओकारी काढली.

"बरं वाटत आहे ना आता?" तिच्या पाठीवरून हात फिरवत त्याने विचारले.

"हो. मच बेटर." ती स्मित करून म्हणाली. " चल, बाहेर जाऊया."

"नाही, थोडावेळ आराम कर मग जाऊ."

"अरे, मी बरी आहे ना. आणि किती रे काळजी घेशील माझी?" त्याच्याकडे वळून स्वीटी म्हणाली.

"मग काय करणार? एकुलती एक लाडाची बायको आहेस माझी. जोवर आपल्या दोघात आपल्या दोघांचा मिळून तिसरा कुणी येत नाही तोवर तूच लाडकी असणारहेस की नाही?"

डोळा मारत तो म्हणाला आणि त्याचा अर्थ कळून ती त्याला मारायला लागली. दोघेही परत बाहेर आले आणि बाहेरच्या जगात पुन्हा एकरूप झाले.

********

लग्नाचा मुहूर्त उजाडला. नवधूच्या वेषात प्रीती फारच सुरेख दिसत होती. हळदीचे तेज चेहऱ्यावर होतेच आता वधूचा साजही चढला होता. अंगावर गर्द निळ्या रंगाची पैठणी ल्यालेली. केसांचा अंबाडा, त्यावर गुंफलेले गजरे. तिचा उजळलेला चेहरा, काजळाने वेढलेले निळेशार डोळे, माथ्यावर चंद्रकोर, नाकात नथ, लालचुटूक ओठ आणि त्यावर उमललेले एक मंद स्मित! मूर्तिमंत सौंदर्याची खाणच जणू!

आपल्या तिन्ही मामांसोबत ती स्टेजवर आली अन तिला बघून कृष्णाची पार विकेटच पडली. तसा तोही काही कमी दिसत नव्हता. तिच्या तोडीस तोड तर होताच तो आणि लग्नाच्या आनंदाची एक वेगळी चमक त्याच्याही चेहऱ्यावर पसरली होती. पण आज प्रीतीला बघून तो एकदम गार झाला होता. असे इतके नटलेले त्याने तिला पहिल्यांदा पाहिले होते आणि त्या साजाने तिचे आरस्पानी सौंदर्य आणखीनच उठून दिसत होते.

"ओ, डिअर जि-जा-जी, दी तुमच्यासाठीच नटलीय बरं. इतके काय डोळे फाडून बघताय? बाहेर येतील ते." निकी त्याच्या कानाशी जाऊन कुजबुजली. तसे भानावर येऊन त्याने तिच्याकडे बघून एक हसून फनी लुक दिला.


शेवटचे मंगलाष्टक झाले आणि अंतरपाट दूर सरला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. सप्तपदी पार पडली. एकमेकांचे हात अगदी घट्ट पकडून दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले. खूप उत्साहात आणि धूमधडाक्यात दोघांचे लग्न पार पडले.


"खूप सुंदर दिसते आहेस." स्टेजवर संधी मिळताच कृष्णा तिच्याकडे बघून म्हणाला.

"खरंच? पण हैद्राबादला तुला भेटलेल्या तुझ्या फ्रेंड्स इतकी नक्कीच नसेन." ती नाक फुगवून म्हणाली.

"अरेच्चा! तुझ्या डोक्यातून ते अजूनही गेले नाही का? लग्नाला आले असतील तर तुला नक्कीच भेटवेन. त्यांचे सौंदर्य म्हणजे अहाहा.." तो बोलतच होता की प्रीतीने त्याला जोरात चिमटा काढला. त्याला बिचाऱ्याला ओरडताही आले नाही.

"काँग्रॅच्यूलेशन्स टुडेज ब्युटीफुल कपल!" थोड्यावेळाने एक सुंदर आणि एकमेकांना साजेसे जोडपे स्टेजवर आले.

"थँक यू सो मच सर." कृष्णा हसून म्हणाला.

"प्रीती, हे डॉक्टर साठे सर, एक नामांकित स्त्री रोग तज्ञ. आणि ह्या मिसेस डॉक्टर सुमती साठे. मला हैद्राबादला भेटलेल्या ह्याच त्या सौंदर्यवती!" सुमतीकडे बघून तो सांगत होता.

"रिअली यू आर सो ब्युटीफुल." प्रीती हसून तिला म्हणाली. तिचा कृष्णावरचा राग गेला होता.

अगं,आजच्या दिवशी हे तर नवऱ्या मुलीला म्हणायचे असते. खरंच खूप खूप सुंदर आहेस तू. चेहऱ्याने, मनाने आणि कर्तृत्वाने सुद्धा. इतक्या लहान वयात खूप काही अचिव्ह केलेस तू." सुमती तिची तारीफ करत होती.

"थँक यू सो मच." प्रीतीने स्मित करत म्हटले.

"हे तुमच्यासाठी." एक मोठे पाकीट आणि एक पारिजाताचे रोपटे सुमतीने भेट म्हणून त्यांना दिले.

"हा पारिजात! आमच्या प्रेमाचे प्रतीक. या पारिजाताप्रमाणे तुमचे प्रेम आणि नाते बहरत राहू दे, या शुभेच्छा आणि आशीर्वाद." तिने भरभरून दोघांना शुभेच्छा दिल्या.

"ग्लाड टू मीट यू." अनिकेत आणि सुमी सोनिया-मोहनला भेटत म्हणाले.

"तुम्ही ओळखता एकमेकांना?" कृष्णाने आश्चर्याने विचारले.

"नॉट पर्सनली. पण महाराष्ट्रातील नंबर वन असलेल्या बिझनेसवूमन ला कोण ओळखणार नाही. खरं तर इथे येण्यापूर्वी आम्हाला हे ठाऊक नव्हते की आम्ही सोनप्रीतच्या मालकाच्या जावयाच्या लग्नाला येतोय. इथे आल्यावर मात्र सगळा उलगडा झाला." त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.


सर्वांशी ओळख करून दिल्यावर एक फॅमिली फोटो घ्यायची वेळ झाली. प्रीतीच्या बाजूला स्वीटी उभी होती. फोटो झाल्यानंतर तिला परत मळमळायला लागले.

"व्हॉट्स रॉंग विथ हर?" अनिकेतने विचारले.

"कालपासून वोमिटिंग होत आहेत. गरगरतेय सुद्धा. बहुतेक स्पाईसी खाणे झाल्यामुळे होत आहे." समीर म्हणाला.

"मला रिझन काही वेगळेच वाटतेय. फर्स्टली लेट मी चेक हर."

रूममध्ये जाऊन त्याने तिला चेक केले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.

"अभिनंदन, या उलट्या, हे गरगरणे मसालेदार जेवणामुळे नव्हे तर आईपणात पदार्पण करत असल्यामुळे आहेत." मिश्किल हसत तो म्हणाला. स्वीटी त्याच्याकडे काही न कळल्यासारखे बघत होती.

"काँग्रॅच्यूलेशन्स डिअर्स. देअर इज अ गुड न्यूज फॉर यू. तुम्ही पेरेंट्स होणार आहात. स्वीटीच्या उदरात एक छोटुसा जीव वाढतो आहे." त्याने आणखी थोडे स्पष्ट करून सांगितले.

"आर यू शुअर सर?" स्वीटीच्या डोळ्यात खूप मोठा प्रश्न होता.

"हंड्रेड परसेन्ट. बावीस वर्षांचा एक्स्पेरिअन्स आहे. मेरी नजर धोखा नही खा सकती." तिच्या केसातून हात फिरवत तो मिश्किलपणे म्हणाला.

"थँक यू सो मच सर." समीर आणि स्वीटीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

काही क्षणातच ही न्यूज सगळ्यांना कळली. मोहनने तिला जवळ घेऊन तिच्या माथ्यावर ओठ टेकवले. त्याच्या डोळ्यांच्या कडा उगाचच पाणावल्या. तुषार-माही, मिहीर-शालिनी, सोनिया-मोहन सारेच फार खूष होते. लग्नाचा आनंदसोहळा सुरू असतानाच पुन्हा एक गुडन्यूज मिळाली होती.

*******

दुसऱ्या दिवशी लग्नानंतरची पूजा आणि त्यानंतर महालक्ष्मीचे दर्शन झाल्यानंतर आज कृष्णा आणि प्रीती खऱ्या अर्थाने जवळ येणार होते. कृष्णाच्या त्या खोलीत तिला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. या घरी ती काही पहिल्यांदा आली नव्हती, पण तेव्हाचे येणे वेगळे होते. आता मात्र हे तिचे हक्काचे घर आणि ही हक्काची खोली होती.

मनात थोडी भीती आणि हुरहूर घेऊन ती आरशासमोर बसली होती. अंगावर असलेली लाल साडी, डोक्यात भरलेले कुंकू.. तिला स्वतःलाच तसे बघून गोड हसू आले. गळ्यातील अलंकार काढून ठेवत असतानाच तिच्या मानेवर एक थंड स्पर्श झाला.

"कृष्णाऽऽ.." ती काही बोलणार तोच त्याने तिच्या ओठावर बोट ठेवले आणि तिच्या गळ्यात त्याने आणलेला डायमंडचा सेट घालून दिला.

"वॉव! खूप सुंदर. माझ्यासाठी?" आरशातूनच त्याच्याकडे बघत तिने विचारले.

"अहं, माझ्या बायकोसाठी." तिच्या कानाजवळ येऊन अगदी हळुवारपणे तो म्हणाला. त्याचे उष्ण श्वास तिला जाणवत होते. कृष्णाने तिला उभे करत स्वतःकडे ओढून घेतले. अंग चोरून घेत ती त्याच्या दणकट बाहुत आली.

"सो, मिस.. सॉरी, मिसेस प्रीती, मिसेस झाल्यानंतर कसे वाटतेय तुम्हाला?" तिच्या गालावरची बट कानामागे घेत तो विचारत होता.

"खूप मस्त. अगदी स्वप्नवत!" ती लाजून म्हणाली.

"मग हे असेच स्वप्नवत राहू दे." तिच्या गालावर ओठांची मोहर उमटवत तो म्हणाला.

"काहीही हं तुझे." लाजेने लाल झालेल्या तिने त्याला दूर ढकलले.

"अगं खरंच. नाहीतर बिचाऱ्या स्वीटीला काय वाटेल?"

"काय?" ती.

"हेच की तिच्या बाळासोबत खेळायला कोणाचे दुसरे छोटे बाळ नाही. मग आपल्याला तयारीला लागावे लागेल ना?" तो मिश्किलपणे तिच्याकडे बघत म्हणाला.

"ए, नाही हं. मला इतक्या लवकर मूल नकोय." ती पटकन म्हणाली.

"बरं, राणीसरकार! तुम्ही म्हणाल तसे." तिला फ्लास्कमधून कॉफी देत तो म्हणाला.

"कॉफी? आत्ता?" ती.

"हम्म. ते काय ना, माझी बायको माझ्या सोबत आहेच. पण मला आत्ता माझ्या प्रेयसीसोबत गप्पा मारायच्या आहेत. खूप दिवसांपासून तिच्याशी मनमोकळे बोलायला भेटले नाही. आणि आत्ताही बोललो नाही तर चिडेल ना ती." तो.

"एवढं घाबरतोस तिला?" त्याच्यावर नजर रोखून प्रीती.

"अहं, घाबरत नाही, खूप प्रेम आहे गं माझे तिच्यावर." स्मित करून तो म्हणाला.

"कृष्णा, किती रे मधाळ बोलतोस. आय लव्ह यू." तिचे ओठ रुंदावले होते.

"सेम टू यू डिअर." तिचा हात हातात घेत तो तिला बाल्कनीत घेऊन गेला.


चांदण्यांनी उधळलेली रात्र, चंद्राची पिटुकली कोर, हातात कॉफीचा मग अन सोबतीला कृष्णाची उबदार मिठी! कितीतरी वेळ दोघे गप्पांच्या फडात रंगले होते. त्यांची पहिली भेट, त्यानंतर कोल्हापूरात दिसलेली ती, त्याच्यासोबत घेतलेले महालक्ष्मीचे दर्शन, रंकाळा तलाव, त्याचे प्रपोजल.. साऱ्या आठवणी उजळून निघाल्या होत्या.

बोलता बोलता रात्री उशीरा केव्हातरी प्रीतीचा डोळा लागला. कृष्णाने अलगद तिला उचलून बेडवर आणून ठेवले. झोपेतही ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या लालचुटूक ओठावर ओठ टेकवण्याचा मोह त्याने आवरला. तेवढ्यात तिनेच झोपेत त्याच्या मानेभोवती हातांचा विळखा घातला. त्याने हसून तिला जवळ घेतले. झोपेतच स्मित करत तीही त्याच्या कुशीत अलगद विसावली.

*******
समाप्त.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*******

प्रीती! माझ्या आयुष्यात लिहिलेली पहिलीवहिली कथा. वेळेअभावी मागच्या वर्षी सुरू केलेली ही कथा यावर्षी दुसऱ्या पर्वाच्या रूपात पूर्ण झाली. तुम्हा वाचकांच्या भरभरून मिळालेल्या प्रेमामुळे माझे लिहिणे शक्य झाले. शेवटचा भाग लिहिताना उगाच डोळ्यात पाणी आले आहे. आपणच निर्माण केलेली पात्र आता पुन्हा भेटणार नाही याचे वाईट वाटते आहे. प्रीतीची ही कहाणी कधी सोनियाची झाली कळलेच नाही आणि पुन्हा सोनियावरून ती प्रीतीच्या रूपातच संपतेय.

कदाचित पुढे पुन्हा फुलेल पारिजात.. पुन्हा बहरेल प्रीती! पण सध्यातरी इथेच पूर्णविराम!

सर्व वाचकांचे खूप खूप आभार. असेच वाचत रहा आणि आनंदी रहा.
धन्यवाद!


🎭 Series Post

View all