प्रीती.. पर्व दुसरे! भाग -८२

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग - ब्यांशी.

"अगं खरंच, तू त्यांना भेटशील तर तुझाही विश्वास बसेल. आणि स्टुपिड इतकं अनसेक्युअर व्हायची गरज नाहीये. आय एम ओन्ली युअर्स अँड आल्वेज युअर्स."
तिच्या गालावर ओठांची मोहर उमटवत तो म्हणाला.


त्याच्या त्या अनपेक्षित कृतीने तिचा चेहरा लाजेने अगदी लाल झाला. हाताने चेहरा झाकून घेत ती आत जायला वळली. तिची अवस्था बघून कृष्णाच्या ओठावरचे हसू आणखी रुंदावले.

*******

आज सोनिया व्हिलामध्ये सगळीकडे धावपळ सुरू होती. संपूर्ण बंगला एखाद्या राजमहालासारखा सजला होता. लाडक्या प्रीतीच्या लग्नसोहळ्याची धामधूम जी सुरू होती.


अरे, पण हा लग्नसोहळा कोल्हापुरात का पार पडतोय याचे आश्चर्य वाटतेय ना? दोन वर्षांपूर्वी प्रीतीने सोनिया व्हिलाचे संपूर्ण कागदपत्रे सोनियाच्या हवाली केली आणि त्यानुसार ती त्या बंगल्याची कायदेशीर मालकीण झाली होती. त्या बंगल्यात तिचा जीव अडकला होता आणि त्यामुळेच ती मोहनसह कायमची तिथे रहायला आली. कोल्हापुरात सुरू केलेल्या सोनप्रीतच्या नव्या ब्रँचमध्ये जातीने लक्ष घालून तिने कोल्हापुरात आपल्या यशस्वीतेचा झेंडा पुन्हा उभारला. आप्पासाहेबांच्या जाण्याने धुळीला गेलेले सारे वैभव तिने स्वकर्तृत्वाने पुन्हा परत मिळवले. कोल्हापूरच्या उद्योजकामधली ती एक आघाडीची यशस्वी उद्योजिका बनली होती.

पुण्यातील मुख्य ऑफिस प्रीती आणि मिहीर सांभाळत होते. प्रीतीच्या मदतीने तेथील डोलारा मिहीर समर्थपणे सांभाळत होता आणि आता त्याला शालीनीची साथ लाभली होती.

शालिनी.. तिच्या आयुष्यात मिहीरचे आगमन झाले आणि आयुष्याची दिशाच बदलली. एक विराण रुक्ष वाळवंटात अवचित पावसाचे थेंब बरसावे आणि तृषार्त धरणी तृप्त व्हावी असेच काहीसे तिचे झाले होते. तीच काय, मिहीरही प्रेमाच्या वैशाखवणव्यात पोळला होताच ना? शालिनीमुळे त्या वणव्याची अखेर झाली होती. दोन वर्षांपूर्वीच सोनिया आणि मोहनच्या लग्नानंतर दोन महिन्यांनी असलेल्या मुहूर्तावर दोघांनी लग्नगाठ बांधली आणि ते एकमेकांचे झाले होते.

मिहीर अन शालीनीच्या लग्नानंतर दहा दिवसांनी स्वीटी आणि समीरचे लग्न पार पडले. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोन जीव लगेहात हनिमूनदेखील उरकून आलेत आणि आता त्यांच्या संसारवेलीवर गोंडस फुल उमलण्याची लक्षणे दिसायला लागली होती.

तर आपल्या लाडक्या प्रीतीचा लग्नसोहळा इथे का? तर आप्पासाहेबांनी सोनियाच्या लग्नाचा घाट घातला असता तर तो नक्कीच सोनिया विल्हा मध्ये साजरा झाला असता म्हणून प्रीतीचा मंगलसोहळा इथे करण्याचे सोनियाने ठरवले होते. म्हणूनच सर्व मंडळी या आलिशान बंगल्यात पंधरा दिवसापासून ठाण मांडून बसली होती.

ह्यावेळी विश्वास, रजत आणि वीरेनचे कुटुंबदेखील एका आठवड्यापासून हजर झाले होते. लाडक्या भाचीच्या लग्नात त्यांनाही कसली कसर बाकी ठेवायची नव्हती.


मेहंदीचा दिवस उजाडला. पिस्ता ग्रीन कलरच्या नेटेड साडी मध्ये प्रीतीचे सौंदर्य खुलून दिसत होते. भरीव दुल्हन मेहंदीने तिचे दोन्ही हात भरून गेले होते. तिच्यासोबत स्वीटी, निकी, सोनिया, शालिनी आणि समस्त स्त्री वर्ग मेहंदीच्या विविध डिझाईन आणि सुवासात गुंग झाला होता.

प्रीती एका निराळ्याच दुनियेत प्रवेश करत होती. या दोन वर्षात तिने तिच्या कुटुंबातील तीन लग्नसोहळे अटेंड केले होते. आता आजपासून तिच्या लग्नाच्या खास दिवसांची सुरुवात झाली होती.


"बाबा, मला भूक लागलीय." मोहनकडे बघत इवलासा चेहरा करून ती म्हणाली. दोन्ही हात मेहंदीने भरून असल्यामुळे ती स्वतःच्या हाताने खाऊ शकत नव्हती.

"हो, हो. मी आहेच की तुझ्या दिमतीला. बोल काय खाशील? सूप पितेस की दुसरे काही भरवू?" तिच्या पुढ्यात बसत त्याने विचारले.

"सूप चालेल. पण लवकर. सगळ्यांच्या पोटातील उंदीर माझ्याच पोटात शिरून उडया मारत आहेत." ती तोंडाचा 'आ' करत म्हणाली.


त्याने तिला सूप भरवले. तिच्या या कृतीने त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटला होता. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याची इच्छा असताना सुद्धा हा खास क्षण त्याला अनुभवता आला नव्हता. तिने मिहीरच्या हातून भरवून घेतले होते. त्यावेळी त्याला मनात वाईट वाटले होते. पण सोनियाने त्याला समजावले होते, की प्रीती केवळ त्याचीच मुलगी आहे. दोघांचे नाते रुळायला जरा वेळ लागेल, पण जुळेल याची तिला खात्री होती.

आज त्याची तीच लाडकी लेक त्याला स्वतःहून भरवायला सांगत होती आणि त्यामुळेच त्याला आनंद झाला होता. आनंद तर होताच, तो डोळ्यात अश्रूरूपी झळकतही होता. कदाचित आनंदाश्रू म्हणावे ते, हेच!

"बाबा, असे टिपिकल बाबासारखं काय हो रडताय? माझे लग्न होणार असले तरी इथे कोल्हापूरातच मी असेन की." त्याच्या डोळ्यातील पाणी बघून ती म्हणाली. तिच्या या वाक्याने खरंच त्याला भरून आले. तिच्या मस्तकावर ओठ टेकवून त्याने अलगद तिला आपल्या मिठीत घेतले.

तिच्यासाठी त्याच्या मनात असलेल्या भावना ओठावर येत नसल्या तरी तिच्यात त्याचा जीव किती गुंतलाय हे प्रीतीला कळत होते. बाजूच्या टेबलवर असलेली सोनिया त्या बापलेकीचा ते अनमोल क्षण डोळ्यात कैद करत होती. त्यांना तसे हळवे झालेले बघून ती उठून तिथे आली.

"अरे, दोघांचीच टीम बरी दिसत नाही. मी सुद्धा इथेच आहे की." मिठीत असलेल्या दोघांना तिने एक आलिंगण दिले.

"मॉम, अँड व्हॉट अबाऊट मी? मी सुद्धा आहेच की इथे. या टीमची मी देखील मेंबर आहे ना?" लटक्या रागाने तिथे येत स्वीटी म्हणाली.

"येस, ऑफकॉर्स." सोनियाने तिलाही मिठीत घेतले. चौघांच्या त्या एकत्र आलिंगणाचे ग्रुपफोटो फोटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेतले.

******

आज प्रीतीच्या अंगाला हळद लागणार होती. हळदीसाठी सगळ्यांनी खास थीमनुसार पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. प्रीतीने सोनेरी रंगाचे नाजूक वर्क असणारा लेहंगा घातला होता. थट्टामस्करीत हळदीचे कार्यक्रम पार पडत होते. तिच्या तिन्ही माम्या, सोनिया, राधाई, शालिनी, माही, स्वीटी, निकी सर्वांनी तिला हळद लावली. या कौटुंबिक कार्यक्रमात सर्व कुटुंबियांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवत होती.

सोनियाच्या चेहऱ्यावर समाधान उमटले होते. लेकीचे कोडकौतुक किती करू आणि किती नाही असे तिला होत होते. एकाच वेळी आनंद अन दुसऱ्याच क्षणी ती सासरी जाईल याचे दुःख. जराशी दूर जाऊन ती आपले डोळे पुसत होती.

"सोनाऽऽ.." राधामावशीची तिच्या पाठीवर थाप पडली. तिची अवस्था तिच्याशिवाय आणखी कोण चांगलं ओळखू शकणार होतं?

"राधामावशी, आपली प्रीती किती लवकर मोठी झाली गं? तिच्या सोबत जगताना एक दिवस लग्न होऊन ती भुरकन उडून जाईल असे कधी मनात आलेच नाही." डोळे पुसत ती राधामावशीला म्हणाली.

"सोना, एक ना एक दिवस हे तर होणारच होते ना? आपली राजकुमारी तिच्या स्वप्नातील राजकुमारसोबत निघून जाणार होतीच. मग असे हळवे होऊन कसे चालणार ना?" सोनियाला समजवताना तिच्याही डोळ्यात अश्रू उभे ठाकले.

तिला आठवला सोनियाच्या प्रेग्नसीचा काळ. तिच्या जीवाची होणारी तगमग. मोहन गेल्यानंतर त्यांच्यावर ओढवलेला प्रत्येक प्रसंग.

प्रीती जन्माला आली आणि राधामावशीचे अख्खे आयुष्य पालटून गेले. तिच्या जन्माने एक नव्हे दोन नव्या नात्यांची गुंफण तिच्याभोवती विणल्या गेली होती.
तो इवलासा मऊशार मांसाचा गोळा डॉक्टर आणि नर्सनंतर तिनेच तर पहिल्यांदा हाती घेतला होता. एक भुकेने रडणाऱ्या चिमण्या जीवाला तिनेच चमच्याने दूध पाजून त्याची क्षुधा भागवली होती. प्रीती जन्माला आली आणि त्याचक्षणी ती तिची 'आज्जी' झाली आणि सोनियाची आई. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते त्यावेळी सर्वश्रेष्ठ ठरले होते.

"राधामावशी, तुला आठवते? आपण प्रीतीचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला होता?" डोळ्यातील ओल टिपत सोनियाने तिला विचारले.

"हो, न आठवायला काय झाले? तिच्या आयुष्याच्या प्रत्येक घटनेची साक्षीदार आहे मी. प्रीतीच्या वाढदिवसाला तू माझ्यासाठी खारे दाणे घेऊन आली होतीस आणि त्याच पुडक्याच्या कागदात तुला मिहीरच्या कंपनीची जाहिरात दिसली होती." त्या दिवसाच्या आठवणीत राधामावशी वाहत गेली होती.


"हम्म, पण तेव्हा कुठे ठाऊक होतं की पुढे जाऊन आपणही एवढी मोठी कंपनी उभारू शकू. याचे सगळे श्रेय प्रीती आणि तुलाच आहे गं राधामावशी. प्रीती आपल्या आयुष्यात आली आणि जगच बदलून गेलं बघ." राधामावशी सोबत सोनिया देखील भूतकाळात जाऊन पोहचली होती.


"जग तर माझे बदलले सोना. तू जन्मत:च एका यशस्वी बिझनेसमनची मुलगी होतीस. एक ना एक दिवस तू हे यश गाठणार होतीसच. पण मी कोण कुठली एक अडाणी, वांझ असणारी राधा. तुम्हा दोघींमुळे कुठल्या कुठे पोहचले. कधी कल्पनाही करू शकले नसते ते आयुष्य मला तुमच्या मुळे लाभले. प्रीतीमुळे लाभले." राधामावशीचे डोळे पुन्हा वाहायला लागले.


"ओये गर्ल्स गँग, इकडे तुमचं काय चाललंय? राधाई तू माझ्या टीममधील होतीस ना गं? मग माईच्या टीममध्ये कधीपासून गेलीस हं? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही दोघी इकडे येऊन रडणार आणि मला कळणार नाही? माई, राधाई शेवटी माझी नाळ डिरेक्टली आणि अनडिरेक्टली तुम्हा दोघींशीच जुळली आहे ना गं? मग मला टाकून का रडताय?"
दोघींना मिठीत घेत प्रीती बोलत होती. त्या दोघी अशा दूर आल्या तेव्हाच तीही त्यांच्या मागोमाग तिथे आली होती.

"आणि माई, सोनप्रीत जोवर आहे ना तोवर तुझी प्रीत तुझीच आहे बरं. तू नको ना अशी हळवी होऊ." तिचा कंठ दाटून आला होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

वाचकहो, अनेक हळव्या क्षणांचा हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या अंतिम भागात. तोवर वाचत रहा, मस्त रहा.


🎭 Series Post

View all